माझिया प्रियाला प्रीत कळेना भाग ३९

This Is A Love Story


भाग ३९

एव्हाना दुपारचे दोन वाजून गेले होते. मनीषाताई आणि मीनाताई जेवल्या आणि मीनाताईच्या रूम मध्ये दोघी ही गेल्या. खरंतर दोघींना खूप आनंद झाला होता आज! त्याचं कारण देखील तसच होत.

मनीषाताई, “ताई खरंतर आम्हाला म्हणजे चिनूच्या बाबाला आणि मला त्याची खूप काळजी वाटायची कारण, तो सहजा सहजी कोणा समोर व्यक्त होत नाही! खूप अबोल आहे हो माझा लेक जास्त करून त्याच्या डोळ्यातून त्याला समजून घ्याव लागतं. पण आज माझी काळजी मिटली आमच्या नंतर त्याला समजून घेणारी आणि त्याच्यावर मनापासून प्रेम करणारी व्यक्ती जोडीदार म्हणून त्याला लाभली. गार्गी त्याच्यावर इतकं प्रेम करते की आपल्याला कोणाला ही माहीत न होऊ देता तो जे पथ्याचे बेचव जेवण सध्या करत आहे तेच जेवण ती करते! खरंच आज पासून मला त्याची काळजी नाही!” त्या आनंदाने पण थोड्या भावुक होत म्हणाल्या.

मीनाताई,“हो मी ही खूप खुश आहे आज! आणि माझी ही काळजी मिटली गार्गी तशी कोणाचं काही ठेवणाऱ्यातली नाही. बेधडक आहे ती म्हणूनच तिची काळजी वाटायची आणि दुसरी गोष्ट तिच्या आयुष्यात असं काही घडलं होत जे आम्हाला ही अजून माहित नाही ज्यामुळे तिने लग्न, प्रेम हे शब्दच टाकले होते. आम्ही लग्न तर केलं तिचं पण ती ते कितपत निभावेल असं वाटत होतं पण गार्गी संग्रामच्या प्रेमात पडली आणि ती ज्यांच्यावर प्रेम करते ना त्यांच्यावर जीव देखील ओवाळून टाकते! आज पाहिलं मी आम्ही केलेली तीच्यासाठी संग्रामची निवड अगदी योग्य आहे. माझ्या मुलीला तीच्यासाठी भांडणारा तिच्यामागे ठामपणे उभा राहणारा जीवनसाथी मिळाला अजून काय हवं एका मुलीच्या आईला!” त्या आनंदाने पण भावुक होत म्हणाल्या.

मनीषाताई,“ते दोघे सुखात तर आपण सुखात!” त्या म्हणाल्या.

मीनाताई, “हो! ताई मला तुमच्याशी थोडं बोलायचे आहे!” त्या अडखळत म्हणाल्या.

मनीषाताई, “मीनाताई अहो बोला ना इतका संकोच कशासाठी?” त्या म्हणाल्या.

मीनाताई,“संग्रामला इतका त्रास झाला तो क्रिटिकल झाला होता अगदी मरणाच्या दारातून माघारी आलं पोर! तुम्हाला असं तर कुठे वाटलं नाही ना की लग्ना आधी जोशी गुरुजीनी सांगीतले होते की लग्नानंतर एक वर्ष संग्रामसाठी खूप वाईट आहे म्हणून हा सगळा त्रास त्याला गार्गीशी लग्न केल्यामुळे झाला.” त्यांनी अडखळत त्याच्या मनातील शंका विचारली.

मनीषताई, “काय बोलताय ताई? अहो संग्रामला जो त्रास झाला तो एक अपघात होता! तो त्याच्याच चुकीमुळे झाला आहे त्याला गार्गी जबाबदार कशी असेल आणि लग्ना आधी त्या गुरुजींनी सांगितलेले मी तर विसरून ही गेले... उलट गार्गीच्या प्रसंगावधानामुळे तो आज सुखरूप आहे! रशमी काय म्हणाली ऐकलत ना तुम्ही? गार्गी सावित्री पेक्षा कमी नाही माझ्यासाठी तरी! तुम्ही मनात नसती शंका बाळगू नका! आणि गार्गी माझी सून नाही तर लेक आहे आता!” त्या त्यांना समजावत म्हणाल्या आणि मीनाताईंचे समाधान झाले.
★★★★

इकडे संग्राम गौरवशी फोनवर बोलत होता. त्याने संग्रामच्या तब्बेतीची चौकशी करण्यासाठी फोन केला होता. गार्गी संग्रामला त्याच बोलून झाल्यावर मेडिसीन्स देत म्हणाली.

“संग्राम आता आराम कर जरा! आज खूपच जास्त स्ट्रेस आला तुझ्यावर!”


संग्राम,“बरं झोपतो मी! तुझं न ऐकून मला पृथ्वीवर राहायचं नाही का?” तो हसून म्हणाला.

गार्गी,“झाला का जोक करून? झोप आता!” ती त्याला झोपवून पांघरूण घालत म्हणाली आणि संग्राम झोपला.

गार्गीला मात्र आज पुन्हा संग्रामची काळजी वाटत होती. कारण आज तर त्याला जरा बरं वाटत होतं आणि अजून हा तमाशा झाला होता. त्याच्या चेहऱ्यावर त्याचा स्ट्रेस आणि थकवा जाणवत होता. गार्गी बेडला टेकून तिथेच बसून राहिली. तिला ही झोप लागली. जेंव्हा तिला जाग आली तेंव्हा घड्याळात पाच वाजले होते आणि सहा वाजता मेंहदी सेरेमनी सुरू होणार होती. संग्राम अजून झोपलाच होता.

उशीर व्हायला नको म्हणून ती लगेच उठली आणि तिचं आवरायला निघून गेली. तिचं आवरल्यावर संग्रामला उठवावे असा तिने विचार केला होता. ती लाछा घालणार होती पण त्याची ओढणी मोठी आहे आणि ती व्यवस्थित आरशात पाहून पिनअप करावी हा विचार करून ती ओढणी तिथेच ड्रेसिंग टेबलच्या खुर्चीवर ठेवली. संग्राम झोपला आहे म्हणून ती निश्चीन्तपणे वॉश रूमला लागून असलेल्या चेंजिंग रूममध्ये गेली आणि लेहेंगा आणि चोली घालून बिना ओढणीचीच ड्रेसिंग टेबल समोर येऊन उभी राहिली. पण एकदम संग्रामला उठून बसलेला पाहून चपापली! संग्राम तिचे आरशातले प्रतिबिंब निहाळत होता. डीप फ्रंट आणि डिप बॅक गळ्याचा गोल्डन स्लीव्हलेस ब्लाऊज, आणि पोटाचा आणि कंबरेचा बराच भाग मोकळा आणि खाली घेरदार पिस्ता आणि गोल्डन कलरचा लेंहंगा! त्यात तिचा नितळ गोरा रंग अजूनच खुलून दिसत होता. संग्राम तिला भान हरपून पाहत होता आणि गार्गीला मात्र लाजून ओढणी घ्यायचे ही भान राहिले नव्हते. तिचे गोरे गाल लाजेने आरक्त झाले होते. संग्राम तिला जवळ येताना दिसला आणि तिच्या काळजाचा ठोका चुकला. तो गार्गीच्या जवळ आला तिला मागून मिठी मारली आणि म्हणाला.

“you are looking gorgeous!”

गार्गीच्या मात्र लाजेने पापण्या झुकल्या होत्या. ओठ थरथरत होते. त्याच्या स्पर्शाने ती जागीच थिजली होती. संग्रामने तिला सोडले त्याने खुर्चीवरची ओढणी उचलली आणि तिला मागून पुढे पर्यंत व्यवस्थित पांघरून घातली आणि तो निघून ही गेला. गार्गी मात्र गालात हसत होती. तिने ओढणी व्यवस्थित पिनअप केली आणि गॅलरीत उभ्या असलेल्या संग्रामला हाक मारली.

गार्गी,“आत ये संग्राम! झालं माझं!”

ती म्हणाली आणि संग्राम आत आला. तिने त्याच्या हातात वोर्डरोब मधून फेंट हिरव्या रंगाचा कॉटनचा कुर्ता त्यावर स्किन टाईट पायजमा काढून त्याच्या हातावर ठेवला. संग्राम तिला काहीच न बोलता वॉशरूममध्ये गेला. त्याची नजर आणि मान दोन्ही खाली झुकलेली होती.

गार्गी तयार होऊ लागली तिने तिच्या केसांची मधोमध भांग पाडून सैलसर वेणी घातली. भांगात आज पहिल्यांदाच तिने नाजूक कुंकू भरलं! कपाळावर लाल कलरची टिकली, डोळ्यात नाजूक काजळ रेषा, लाईट न कळत केलेला मेकअप आणि ओठांना गुलाबी लिपस्टिक! गळ्यात नाजूक मंगळसूत्र आणि गंठण! कानात झुमके! हातात किणकिणनाऱ्या हिरव्या जर्द बांगड्या त्यात मध्ये मध्ये सोन्याच्या बांगड्या आणि मागे पाटल्या आणि समोर तोडे! ती स्वतःला आरशात पाहून विचार करत होती.

“संग्रामला मी कशी तयार झालेली आवडेल! हे तर मला माहीतच नाही! सरळ विचारलं तर तो सांगणार नाही... लगेच मला म्हणेल की तू कसं तयार व्हायचं ते तुझं स्वातंत्र्य आहे. पण मला तर त्याला आवडेल असं तयार व्हायचं आहे. भांगात कुंकू छान दिसतं. आज पहिल्यांदाच लावलं आईनी दिलं होतं मला ते तसच मेकअप बॉक्समध्ये पडून होतं. त्याच महत्व या काही दिवसात कळले मला!”

ती विचार करत होती आणि संग्राम फ्रेश होऊन कपडे बदलून आला. फेंट हिरवा रंगाचा कुर्ता आणि स्किन टाईट पायजमा त्याला अगदी फिटिंगला बसला होता त्यातून त्याची पिळदार शरीरयष्टी उठून दिसत होती. त्याला पाहून गार्गी स्वतःवर खुश झाली. कारण तिनेच तो त्याच्यासाठी आणला होता आणि तिने त्याच्या मापाचा अंदाजाने आणलेला ड्रेस त्याला अगदी परफेक्ट बसला होता. ती त्याला पाहत होती. पण संग्रामच्या मात्र पापण्या झुकलेल्या होत्या तो तिला पाहत ही नव्हता आणि तिच्या नजरेला नजर देखील देत नव्हता. ते पाहून गार्गीला मात्र आश्चर्य वाटले. म्हणून तिने विचारले.

“काय झालं संग्राम माझं काही चुकलं का?”

संग्राम,“नाही ते मघाशीसाठी सॉरी!” तो नजर झुकवून म्हणाला.

ते ऐकून गार्गी मोठ्याने हसू लागली. संग्रामला काहीच कळत नव्हते की ती का हसते.

गार्गी,“असा कसा रे तू? एक तर तू मुद्दाम काहीच केले नव्हते आणि मला तू माझी स्तुती केलेली आवडली बरका! अरे एकदा माझ्याकडे बघ तरी कशी दिसतेय मी ते तरी सांग!” ती त्याच्या समोर हात बांधून उभी राहत म्हणाली. संग्राम तिला निहाळत होता.

संग्राम,“मला वाटले होते तुला राग आला की काय आणि ते…” तो केसातून हात फिरवत लाजत म्हणाला.

गार्गी,“माझं लाजाळूच झाड ग ते!” ती त्याच्या गाल ओढत हसून म्हणाली.

संग्राम,“नाही म्हणजे हे झाड तुझं कधी झालं?” त्याने तिला विचारले.

गार्गी,“मग माझंच आहे हे लाजळूच झाड आता! नाय तर काय त्या सुशांतच आहे का? माझं आहे समजलं!” ती त्याच्या गळ्यात दोन्ही हात गुंफत त्याला दटावत म्हणाली.

संग्राम,“बरं बाई तुझंच! झालं समिधा आणि सुशांतचा फोन आला होता! आणि तू ना सुंदर दिसतेस! मघाशीच सांगितलं ना!” तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला आणि काही तरी चुकीचं बोललो म्हणून त्याने जीभ चावली.

गार्गी,“अच्छा! आणि मेकअप वगैरे बरोबर दिसत आहे ना? नाही तर माझी फजिती व्हायची!” ती आरशात पाहून स्वतःला निहाळत मुद्दाम त्याची आवड जाणून घेण्यासाठी म्हणाली.

संग्राम,“ हो पण तू पहिल्यांदाच सुंदर आहेस आर्टिफिशिअल गोष्टींची तुला गरजच नाही. मला जास्त भडक मेकअप नाही आवडत! सादगी में ही सुंदरता होती हैं! आणि केसांची वेणी घालण्या पेक्षा मोकळे केस सुंदर दिसतात तुला! पण हा आता कसं तयार व्हायचं हे तुझं स्वातंत्र्य आहे! तू कस दिसावस हे तुझं तू ठरवायचे! ” तो बोलता बोलता त्याच्याही न कळत त्याची आवड सांगून गेला.

गार्गी,“ हुंमsss! सादगी में ही सुंदरता होती हैं!” ती असं म्हणून हसली.

संग्राम,“तू ना वेडी आहेस!” तो हसून केस विंचरत म्हणाला.

गार्गी,“असू दे! पण ना मला सुशांतचा हेवा वाटतो!” ती तोंड वाकड करत म्हणाली.

संग्राम,“त्या बिचाऱ्याचा का हेवा वाटतो तुला ग?” त्याने विचारले.

गार्गी,“एक तर तो बिचारा नाही! आणि हेवा या साठी वाटतो की तुझं आणि त्याचं बॉंडींग जबरदस्त आहे. तू इकडे आजारी पडलास आणि त्याला तिकडे स्वप्न पडलं रात्री एक वाजता त्याने फोन केला होता मला!” ती आता कौतुकाने बोलत होती.

संग्राम,“हो! तो ना माझा सच्चा मित्र आहे मी कॉलेज सोडलं ते! पण त्याने माझी आणि मी त्याची मैत्री नाही सोडली आता त्याला स्वप्न पडलं वाईट माझ्या बद्दल मी आजारी पडल्यावर याच मला ही आश्चर्यच वाटलं may be तू म्हणते तसं आमचं बॉंडींग असेल स्ट्रॉंग! बऱ्याचदा मी न सांगता त्याला माझं मन ओळखता येत! यार हैं वो मेरा!” तो सांगत होता.

गार्गी,“आणि माझा सवत्या (ती पुटपुटली) बरं झालं का तुझं चल उशीर होईल आपल्याला!” ती म्हणाली.

संग्राम,“गार्गी दुपारी इतका तमाशा झाल्या नंतर आपण नाही गेलं तर नाही चालणार का?” तो तोंड वाकडं करत म्हणाला.

गार्गी,“चलतो का आता? जास्तीचे आढेवेढे नको आहेत मला आपण रौनक भाऊजी आणि रशमीच्या आनंदात सहभागी व्हायला आलो आहोत इथे!” असं म्हणून तिने त्याला पुढे घालून हॉलमध्ये नेले.

तिथे मंद आवाजात मेंहदीची गाणी वाजत होती आणि ठिकठिकाणी ठेवलेल्या गाद्यांवर बायका, मुली मेहंदी आर्टिस्ट कडून मेहंदी काढून घेत होत्या. रशमीच्या देखील हातावर मेहंदी काढणे सुरू होते. गार्गी तिच्या जवळ गेली तर संग्राम बाहेर पुरुषांच्यासाठी बसण्याची सोय केली होती तिथे जावून बसला.

गार्गीच्या प्रियाला गार्गीच्या मनात फुललेली प्रीत केव्हा कळणार होती?
©swamini chougule

🎭 Series Post

View all