माझिया प्रियाला प्रीत कळेना भाग ३६

This Is A Love Story


भाग ३६

संग्राम थोडा अडखळला त्याला थोडे गरगरल्या सारखे झाले. त्याला झाडा आडून पाहणारी गार्गी सावरायला जाणार तर त्याने स्वतःला सावरले आणि गार्गीने निःश्वास सोडला. पुढे अजून एका बेंचवर आणखीन एक परडी होती. संग्रामने ती परडी उचलली तर त्यात डाळींब होती. त्यात ही एक छोटे ग्रीटिंग होते. त्याने ग्रीटिंग उघडून पाहिले तर लिहले होते.

“Pomegranates are important for your blood
Just like that you are important for my life! Sorry”

ते वाचून त्याच्या ओठाच्या कडा आणखीन थोड्या रुंदावल्या. लपून त्याला पाहणारी गार्गी मात्र सुखावली. आता ही मगाच सारखाच आणखिन एक वेटर पळत आला आणि त्याच्या हातातून फळाची परडी घेऊन गेला. तो अजून थोडं पुढे चालत गेला. तर पुढच्या बेंचवर आणखीन एक सुंदर परडी होती. त्यात सफरचंद होते. संग्रामने ती हातात घेऊन त्यातले ग्रीटिंग उघडले. त्यात लिहिले होते.

“An Apple a day keeps doctor away
Please forgive me anyway
I am so so sorry!”

संग्रामच्या ओठांवर आता मोठ्ठी स्माईल होती आणि त्याची नजर गार्गीला शोधत भिरभिरत होती. ते गार्गीने हेरले होते आणि ती त्याच्या आवडीच्या ऑर्चिटच्या फुलाचा बुके घेऊन ती त्याच्या समोर थोड्या अंतरावर त्याच्या न कळत येऊन उभी होती. संग्राम तिच्या जवळ गेला. तर ती एका हातातने बुके समोर धरत एका हाताने कान धरून क्युट फेस करून उभी होती. संग्राम तिच्याकडे हसत पाहत उभा होता. गार्गीने त्याच्या हातात बुके दिला. त्यात ही एक मोठे ग्रीटिंग होते. गार्गीने त्यात बरंच काही लिहिले होते.

प्रिय,
संग्राम,
मला माहित आहे मी तुला खूप दुखावले आहे. एक तर तू जे माझ्यासाठी केलंस त्याच्यासाठी तुझी कृतज्ञता मानून! मला कळून चुकले आहे की आपल्या माणसांची कृतज्ञता मानायची नसते आणि तू जे काही माझ्यासाठी केलंस त्याची कधीच परत फेड होऊ शकणार नाही आणि मी ती करण्याचा प्रयत्न ही कधीच करणार नाही! So sorry for that!

दुसरी गोष्ट मी तुझ्याशी भांडले कारण तुला उशीर झाला. मी तुला तोंडाला येईल तसं आणि येईल ते बोलले! तुला एकदा ही विचारले नाही की तुला उशीर का झाला? किंवा तुला समजून घेण्याचा प्रयत्न देखील केला नाही. तू आधीच खूप मोठ्या तणावातून गेला होता आणि मी तुझ्या तणावात आणखीन भर घातली.

मी तुला गृहीत धरत राहिले त्यात मी हेच विसरून गेली की तू ही एक हाडामासाचा माणूस आहेस. तुला ही मन, भावना आणि हो शरीर देखील आहे जे आजारी ही पडू शकतं. काल रात्री जेंव्हा डॉक्टरांनी सांगितले की तू क्रिटिकल आहे तेंव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली! तुला गमावण्याच्या भीतीने मी सैरभैर झाले आणि तू माझ्यासाठी किती महत्वाचा आहेस हे देखील कळून चुकले. तू जो आजारी पडलास त्याला मी ही कुठे तरी जबाबदार आहे! त्यासाठी खरं तर सॉरी हा शब्द खूप तोकडा आहे. माझ्यामुळे तुला खूप त्रास झाला. पण, इथून पुढे माझ्याकडून कोणतीच चूक होणार नाही!
Sorry for everything!

माना कि आप रूठे हैं हमसे,
गलती भी तो हुई हैं हमीसे,
मनाने की ख्वाहिश हैं आपको,
बस एक और मौका मांगते हैं तुमको!

तुझी वेडी,
गार्गी.
★★★
संग्राम त्या ग्रीटिंग मधील पत्र वाचत होता आणि त्याच्या चेहऱ्यावरच्या भावना झरझर बदलत होत्या आणि गार्गी त्याच्या चेहऱ्याचे निरीक्षण करत होती. पत्र वाचून संग्रामच्या डोळ्यात पाणी होत. गार्गी त्याच्या जवळ आली दोन्ही कान हाताने धरून त्याला म्हणाली.

गार्गी,“sorry ना!”

संग्राम, “बास बास इतकं ही sorry sorry नको म्हणुस की मलाच गिल्ट येईल!” तो हसून म्हणाला आणि गार्गीने त्याला मिठी मारली.

दोघे ही जवळच्या बेंचवर जाऊन बसले. दोघे ही थोडावेळ काहीच बोलत नव्हते. गार्गीने मात्र त्याचा हात हातात धरून ठेवला होता आणि संग्राम निसर्गाचे निरीक्षण करत होता. वातावरणात चांगलीच आर्द्रता होती. त्यामुळे हवेत बराच गारवा होता. समोर धुक्याची पांढरी शुभ्र चादर ल्यालेली हिरवी गर्द दरी आणि वर आकाशात घरट्याकडे जाणारे पक्षांचे थवेच्या थवे! गार्गी मात्र संग्रामकडे एकटक पाहत होती संग्राम तिच्याकडे बोलायला वळला आणि तिने नजर वळवली.

संग्राम, “नाही म्हणजे हा बुके वगैरे समजू शकतो सॉरी म्हणायला पण माफी मागण्यासाठी कोणी तरी कोणाला तरी फळं पहिल्यांदाच दिली असतील!” तो हसून म्हणाला.

गार्गी, “त्याच काय आहे माणसाची हेल्थ ही खूप महत्वाची असते आणि तुला सध्या फळांची खूप गरज आहे म्हणून!” तिने उत्तर दिले

संग्राम, "अच्छा! पण कल्पना आवडली मला!” तो हसून म्हणाला.

गार्गी,“नशीब माझं!” ती ही हसून म्हणाली.

संग्राम, “पण गार्गी इथे सगळ्यांचा खूप गैरसमज झाला आहे की, तुझं माझ्यावर प्रेम वगैरे आहे म्हणून... नर्स ही म्हणत होती सकाळी मला! अमर आणि बाकी सगळे ही बोलत होते. अमरने रात्री काय काय घडलं ते सगळं सांगितले मला! बिचारे रौनक आणि रशमी लग्न त्यांचं आहे पण सगळी चर्चा आपल्या दोघांची आहे आणि त्यात तू कहर केलास काय गरज होती तुला मला C P R द्यायची?” तो म्हणाला.

गार्गी मात्र मनातच बोलत होती “अरे बुध्दू सगळ्यांना गैरसमज नाही झाला. खरंच माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. समजेल तुला लवकरच आणि मी तुला C P R दिला नसता ना तर माझाच जीव गेला असता की गुदमरून!”

ती या सगळ्या विचारात गढली होती आणि संग्रामने तिला हलवले त्याच्या हलवण्याने ती भानावर आली आणि म्हणाली.

गार्गी,“काय गरज होती म्हणजे? तुला माहिती तरी आहे का तुझी अवस्था काय होती ती? अरे इतकं करून ही तू क्रिटिकल होतास आणि काय गरज होती म्हणे! आणि कोणाचा काय समज गैरसमज व्हायचा तो होऊ दे मला फरक पडत नाही. तू असं समज तुला एका सुंदर मुलीने किस केलं!” ती हसून त्याला डोळा मारत म्हणाली आणि तिने आणलेली शाल त्याच्या अंगावर घातली.

संग्राम, “अच्छा! वेडी कुठली! वातावरणात चांगलाच गारवा आहे तू तुला काही आणली नाहीस का पांघरायला चल आपण निघुयात नाही तर तुला थंडी लागायची!” तो म्हणाला.

गार्गी,“अरे वा मला थंडी का लागेल आहे ना शाल (असं म्हणून ती त्याच्या आणखीन जवळ गेली हाताने अर्धी शाल स्वतःला पांघरूण घेत त्याला बिलगली त्याने ही तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला जवळ घेतले) आणि मी का बरं वेडी आता तूच म्हणालास ना की तुला C P R का दिला? तुला अवघड वाटत असेल ते तर तू किस समज!” ती त्याची खेचत मिस्कीलपणे हसत म्हणाली.

संग्राम, “हो का? घे माझी फिरकी आता!(तो तिला ऐकू जाईल असं म्हणाला आणि पुढचे वाक्य तोंडात पुटपुटला) आमचं कुठं आले इतके नशीब आणि ते स्वर्गीय सुख मिळत होते तेंव्हा आम्ही पडलेलो बेशुद्ध काहीच कळलं नाही!”

गार्गीने मात्र त्याचे सगळे बोलणे ऐकले होते अगदी पुटपुटने देखील. त्याच्या या बोलण्यावर ती खुदकन हसली आणि त्याला आणखीनच बिलगली. बराच वेळ दोघे तसेच बसून होते. संग्राम ही गार्गीच्या अशा वागण्याने सुखावला होता आणि गार्गीला त्याचे सानिध्य हवेहवेसे वाटत होते. ती त्याच्या मिठीत त्याचा निरपेक्ष स्पर्श अनुभवत होती. ज्यात कोणतीच अपेक्षा, वासना नव्हती. उलट तीच त्याच्या स्पर्शा मुळे, त्याच्या ऐकू येणाऱ्या हृदयाच्या धडधडीमुळे आणि त्याचा तिच्या कापळवर जाणवणाऱ्या गरम श्वासामुळे उत्तेजित होत होती.

ती डोळे झाकून फक्त त्याला अनुभवत होती. ती विचार करत होती.“श्रद्धा ताई म्हणते ते अगदी खरं आहे मी ज्याला प्रेम समजत होते ते निव्वळ आकर्षण होते आणि त्या नीच माणसाची वासना! मला पहिलं प्रेम तर आत्ता झालं! संग्रामच माझं पहिलं आणि आता शेवटचं प्रेम आहे. त्याला अजून माहीत नाही!पण योग्य वेळ आल्यावर मला त्याला प्रपोज करायचे आहे! खास माणसासाठी काही तरी खास करून!” ती या सगळ्या विचारत होती आणि अचानक तिच्या काही तरी लक्षात आले आणि तिने संग्रामला विचारले.

गार्गी,“संग्राम तुला एक विचारू का?”

संग्राम, “एक का दोन विचार?” तो हसून म्हणाला.

गार्गी,“झालं हसून? आता बोलू? तू इतका कसा बदललास रे? म्हणजे दहा वर्षात माणसात बदल होतो पण इतका?” तिने विचारले.

संग्राम, “म्हणजे? मी समजलो नाही? कशा बद्दल बोलत आहेस तू?” त्याने त्याला काहीच न कळल्यामुळे तिला विचारले.

गार्गी,“अरे म्हणजे तुझे राहणीमान! आधी गबाळ्यासारखा राहायचास आता जिम मध्ये जातोस अगदी मस्त राहतोस... एक मिनिट तुला चष्मा होता ना तो काय झाला?” तिने विचारले.

संग्राम, “मी संघवी मधून दुसऱ्या कॉलेजमध्ये गेलो तर तिथे ही मुलं-मुली मला चंपु समजू लागली आणि एक गोष्ट माझ्या लक्षात आली की आपण असे राहतो म्हणून लोक आपल्याला इग्नोर करतात, चिडवतात! अखिर दुनिया दिखावे की हैं! मग मी हळूहळू माझा मेकोव्हर करून घेतला आणि मला चष्मा मायनसचा होता! लेजरने नंबर गेला! आणि जिमच म्हणशील तर ते मी हेल्थसाठी लावले.. कारण दिवस भर बसून काम असतं आपलं! आपल्या बॉडीचा म्हणावा तसा व्यायाम होत नाही म्हणून!” बराच वेळ सलग बोलल्या मुळे त्याला पुन्हा ठसका येऊ लागला.

गार्गीने ते पाहिले आणि ती त्याला त्याच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाली.

गार्गी,“बरं बरं! तू शांत हो आणि चल आता जावूया बराच वेळ झाला!” असं म्हणून तिने उठून त्याला शाल व्यवस्थित पांघरली आणि दोघे ही पुन्हा रिसॉर्टमध्ये गेले.

एवढं सगळं होई पर्यंत साडे आठ वाजून गेले होते. जेवणाची वेळ झालीच होती. म्हणून मग गार्गी संग्रामला रूममध्येच घेऊन गेली आणि तिने इंटर कॉम वरून जेवणाची ऑर्डर दिली. ते रूममध्ये येई पर्यंत वेटर्सनी गार्गीने संग्रामला दिलेल्या फळांच्या परड्या आणून टी पॉयवर व्यवस्थित ठेवल्या होत्या. त्या फळांच्या परड्या पुन्हा पाहून संग्राम मात्र हसत होता. गार्गीची कल्पकता त्याच्या विचारांच्या पलीकडे होती. गार्गीला तो का हसत आहे हे कळले आणि तिने त्याच्याकडे रागाने पाहिले! संग्राम तिला त्याचं हसू दाबत म्हणाला.

“गार्गी अगं माफी मागण्यासाठी कोणी कोणाला फळं देत का? मला ना खरंच अजून देखील ती फळं पाहून हसू येत आहे!”

गार्गी,“हो का? ती फळं तुला नुसतं पाहून हसण्यासाठी नाही आणली मी; खाण्यासाठी आणली आहेत! जेवण येई पर्यंत हे खा!” असं म्हणून तिने केळाच्या परडीचे रॅप काढले आणि त्यातले एक केळ तोडून सोलून त्याच्या हातात दिले.

तो पर्यंत तिथे मीनाताई आणि मनीषाताई आल्या त्यांनी टीपॉयवर ठेवलेल्या फळांच्या सजवलेल्या परड्या पाहिल्या आणि मीनाताईनी विचारले.

“काय ग गार्गी या फळांच्या परड्या? त्याही गिफ्ट रॅप? कोणी दिल्या आहेत?”

संग्राम गार्गीकडे केळ खात तिरकस हसून पाहत होता गार्गीने त्याच्याकडे डोळे मोठे करून पाहिले आणि ती म्हणाली.

गार्गी,“ही फळे होय? ती सुशांतने कुरिअर केली आहेत संग्रामसाठी!”

मनीषाताई, “असले उपद्याप सुशांतच करू शकतो वेडा आहे तो!”

हे ऐकून तर संग्राम हसायला लागला आणि मनीषाताई आणि मीनाताई त्याच्या हसण्यात सामील झाल्या. गार्गी मात्र संग्रामकडे रागाने पाहत होती.

गार्गीला तिचं संग्रामवर प्रेम आहे हे आता कळले होते पण ती संग्रामला हे कधी सांगेल?

©swamini chougule

🎭 Series Post

View all