माझिया प्रियाला प्रीत कळेना भाग ३५

This Is A Love Story


भाग ३५

खाली हॉलमध्ये संध्याकाळी पाच वाजल्यापासून लग्नाआधी जी देव कार्ये सुरू होणार होती त्याची तयारी सुरू होती. गार्गी नाष्टा करून आणि थोडावेळ सगळ्यांशी गप्पा मारून तासाभराने वर रूममध्ये आली. एव्हाना दुपारचे बारा वाजून गेले होते. ती रूममध्ये आली तर अमर एकटाच रूममध्ये बसला होता आणि संग्राम झोपला होता. गार्गीने त्याला हळू आवाजात विचारले.

गार्गी,“सगळे कुठे गेले? आणि संग्राम केंव्हा झोपला?”

अमर,“भाई आत्ताच झोपला आहे आणि सगळे खाली गेले! तुम्हाला दिसले नाहीत का?”

गार्गी,“नाही दिसले मला कोण!”

अमर,“बरं मी निघतो तुम्ही ही आराम करा! रात्र भर जागरण झाले आहे तुम्हाला ही!” तो म्हणाला आणि गेला.

खरं तर आता गार्गी ही चांगलीच थकली होती. कालचा प्रवास त्यानंतर रात्रीचे जागरण आणि मानसिक ताण तिला या सगळ्यामुळे खूपच थकवा जाणवत होता. त्यातून पोटात थोडी भर पडली त्यामुळे तिचे डोळे झाकू लागले आणि ती बेडवर जाऊन पडली. तिला कधी झोप लागली हे तिचं तिला देखील कळले नाही. तिला जाग आली ती संग्रामाच्या झालेल्या हालचालीने! तिने डोळे उघडून पाहिले तर संग्राम उठून बसण्याचा प्रयत्न करत होता आणि त्यातच तिला त्याचा धक्का लागला होता. ड्रीप लावलेल्या हातावर भार पडल्यामुळे त्याचा हात दुखावला गेला आणि वेदनेमुळे तो उठून बसून तो हात झटकत होता. गार्गी उठली तिने घड्याळ पाहिले तर दोन वाजले होते.

गार्गी,“बघू हात... मी क्रीम लावून देते म्हणजे बरं वाटेल जरा!” ती काळजीने त्याचा हात हातात घेण्याचा प्रयत्न करत म्हणाली.

संग्राम,“its ok I am fine!” तो स्वतःचा हात तिच्या पासून दूर नेत म्हणाला आणि गार्गीने आवंढा गिळला.

गार्गीने कॉर्नर टेबलवर ठेवलेली क्रीम घेतली आणि दुसऱ्या हाताने त्याचा हात हातात घेतला. ती त्याचा हात पाहू लागली. काल शिरेतून बरीचशी इंजेक्शन्स दिल्यामुळे आणि ड्रीप लावल्यामुळे त्याचा हात चांगलाच सुजला होता आणि काळा-निळा देखील झाला होता. तिने क्रीम उघडून त्याच्या हातावर हळुवारपणे लावली. लावताना मात्र तिच्या डोळ्यात पुन्हा पाणी होते. संग्राम मात्र शांतच बसला होता. थोडा वेळ का होईना झोप झाल्याने गार्गीला आता फ्रेश वाटत होते. ती उठली आणि इंटर कॉम वरून जेवणाची ऑर्डर दिली आणि वॉशरूम मधून फ्रेश होऊन आली. तो पर्यंत दाराची बेल वाजली. वेटर जेवण घेऊन आला होता. तिने जेवण घेतले आणि पुन्हा संग्राम समोर जाऊन बसली.

गार्गी,“जेवण करून घे संग्राम चल मी भरवते! मेडिसीन्स ही घ्यायच्या आहेत अजून!” ती ताट त्याच्या पुढ्यात ठेवून म्हणाली.

संग्राम,“माझं मी जेवेन!” तो तिला न पाहताच म्हणाला.

गार्गी,“अच्छा कसा जेवणार तू? हात पाहिलास का स्वतःचा? नेमक्या उजव्या हाताला ड्रीप लावली गेली तुझ्या! आमच्या कोणाच्याच लक्षात आलं नाही ते! आणि इतका विचार करण्याची मनस्थिती ही नव्हती कोणाची! संग्राम काल रात्री काय कंडिशन होती तुझी तुझं तुला तरी माहीत आहे का? जेव बरं पटकन!” ती चपातीचा तुकडा बिन फोडणीच्या वरणात बुडवून त्याच्या समोर घास धरत म्हणाली.

संग्राम,“प्लिज गार्गी नको करुस ना हे सगळं माझ्यासाठी.... आधीच तुझे खूप उपकार झालेत माझ्यावर तेच मी कसा फेडणार आहे माहीत नाही!” तो तिच्या समोर हात जोडत म्हणाला.

गार्गी, “झालं तुझं बोलून आता फक्त जेवण्यासाठी तोंड उघडायचे समजले तुला!” ती त्याच्याकडे पाहून म्हणाली आणि संग्रामला घास भरवू लागली. संग्राम तोंड वाकड तिकडं करत एक एक घास खात होता.

गार्गीने मात्र त्याच्या बोलण्याचा काहीच फरक तिला पडला नाही असे वरवर दाखवले असले तरी आतून तिला वाईट वाटत होतं. स्वतः वरूनच तिला तिच्या बोलण्याचा संग्रामला किती त्रास झाला असेल याचा अंदाज येत होता. पण त्याच्या दुखऱ्या मनावर फुंकर घालायचे तिने ठरवले होते. शरीराची झालेली हानी ती त्याची योग्य काळजी घेऊन भरून काढतच होती पण मनाची झालेली हानी तिला वेगळेच काही तरी करून भरून काढावी लागणार होती. त्यासाठी तिने मनोमन काही तरी ठरवले होते.

संग्रामचे जेवण झाले आणि तो हळूच गार्गीला म्हणाला.

संग्राम,“जा तू जेवण कर आणि कोणाला पाठवू नको माझ्या बरोबर थांबायला मी ठीक आहे!”

गार्गी,“हे मेडिसीन्स घे आणि झोप आता! आणि माझी नको काळजी करू तू!” ती गालात हसत म्हणाली.

गार्गी थोडा वेळाने संग्रामला झोपवून संजयरावांना त्याच्या जवळ बसवून खाली निघून गेली. कारण, तिला माहीत होतं की संग्रामला एकटं सोडून चालणार नाही आणि तिला काही तरी तयारी करायची होती. त्यामुळे तिला पुन्हा वर यायला उशीर होणार होता. संग्राम झोपेतून उठला तर समोर संजयराव मोबाईलमध्ये काही तरी करत बसले होते. त्याने घड्याळ पाहिले तर संध्याकाळचे पाच वाजले होते. त्याने उठून बसत संजयरावांना विचारले.

संग्राम,“बाबा तुम्ही इथे! गार्गी कुठे गेली?”

गार्गी रूममध्ये येत होती आणि तिने त्याचे बोलणे ऐकले होते. ती हसत आत आली म्हणाली.

गार्गी,“आहे इथेच तुला सोडून कुठे जाणार?”

संजयराव,“बरं गार्गी मी जातो ग! खाली माझी काही मदत लागली तर पाहतो.” असं म्हणून ते गेले

संग्राम,“मी असंच विचारलं होतं. तुला तर मी सांगितले आहे तू नको करुस माझ्यासाठी काही!” जणू काही त्याची चोरी पकडली गेली आहे अशा आविर्भावात तो स्पष्टीकरण देत होता.

गार्गी,“मी विचारले का तुला काही? आणि आता कस वाटतंय तुला? हात पाहू कमी झाला का दुखायचा?” ती बेडवर बसत म्हणाली.

संग्राम,“मी ठीक आहे आता!” तो इतकंच म्हणाला.

तो पर्यंत अमर कसल्या तरी पिशव्या घेवून रूममध्ये आला आणि संग्रामला पाहून म्हणाला.

अमर,“भाई हे कपडे तुझ्यासाठी आणले आहेत मी! हा पांढरा कुर्ता-पायजमा कॉटनचा आहे आज घाल! हा उद्या मेहंदी सेरेमनी आहे ना हिरवा त्यासाठी आणि परवा हळद आहे ना म्हणून पिवळा! सगळे कॉटनचे आणि सॉफ्ट आहेत बघ!” तो एक एक ड्रेस काढून त्याला दाखवत बोलत होता.

संग्राम,“कशाला आणलेस रे तू कपडे अमर? मी आणलेत ना घालायला कपडे!” तो त्याला पाहत म्हणाला.

अमर,“कशाला म्हणजे तुला स्किन इन्फेक्शन झाले आहे ना म्हणून कॉटनचे सॉफ्ट कपडे आणलेत मी! हे तुला टोचणार नाहीत. आणि लग्ना पर्यंत तू बरा होशील मग घाल काय घालायचे ते!” तो बॅगा ठेवत म्हणाला आणि निघून गेला.

संग्राम,“thanks!” तो गार्गीला पाहत म्हणाला.

गार्गी,“आता मला कशासाठी? कपडे अमरने आणले आहेत!” ती थोडी गोंधळत म्हणाली.

संग्राम,“अच्छा! तुला काय वाटलं ग अमरला मी ओळखत नाही का? लहान भाऊ आहे तो माझा! हे त्याचं डोकं नाही तुझं डोकं आहे त्याला आणि तुला ही मी चांगलाच ओळखतो!” तो तिला रोखून पाहत म्हणाला आणि गार्गी मात्र चोरी पकडली गेलेल्या चोरा सारखी खाली मान घालून त्याच्या समोर उभी राहिली.

गार्गी, “तू.. मी तुला कपडे दिले असते तर कदाचित घातले नसते म्हणून….” ती पुढे बोलणार तर संग्रामने तिचे बोलणे मध्येच तोडले आणि तो बोलू लागला.

संग्राम,“म्हणून तू अमरला पढवून पाठवलस ना?” तो तिला रोखून पाहत म्हणाला.

गार्गी,“म्हणजे तसं नाही... sorry!” ती अडखळत म्हणाली. संग्रामला तिची झालेली फजिती पाहून खरं तर हसू येत होते पण तो तसं न दाखवता म्हणाला.

संग्राम,“पुन्हा सॉरी! या कपड्यांचे बिल मला पाठवून दे! असं ही तुला माझ्या पेक्षा 20000-25000 ने पगार कमी आहे!” तो म्हणाला आणि त्यावर गार्गी काहीच बोलली नाही.

पण मनात बोलत होती; "खडूस कुठला.. माझेच शब्द मलाच फेकून फेकून मारत आहे. एक संधी सोडत नाही सकाळ पासून टोमणे मारण्याची! गार्गी मॅडम भोगा तुमच्या कर्माची फळं!" ती विचार करत गॅलरीत जाऊन बसली. संग्राम मात्र एकटाच रूममध्ये बसून वैतागला होता. साडे सहा वाजले आणि गार्गीने कोणाला तरी फोन केला. आणि

“all done का?” असे विचारले. तिकडून "done" चा रिप्लाय आला.

ती रूममध्ये आली आणि संग्रामला म्हणाली.

गार्गी,“डॉक्टरने तुला फ्रेश हवेत फिरवायला सांगितले आहे. मी अमरला बोलवले आहे. तो तुला कपडे बदलायला मदत करेल तो पांढरा कुर्ता-पायजमा घाल! आपण फिरून येऊ! तुला ही दिवस भर रूममध्ये बसून कंटाळा आला असेल ना!” ती म्हणाली.

त्याने फक्त होकारार्थी मान हलवली. तो पर्यंत अमर आला त्याने संग्रामला कपडे बदलायला मदत केली. तो पर्यंत गार्गी गॅलरीत उभी राहिली. अमरने त्याचे कपडे बदलून दिले आणि तिला संग्रामच्या न कळत all the best चा अंगठा दाखवून तो निघून गेला. गार्गीने तिच्या बॅगेतून एक शाल काढली आणि संग्रामचा हात धरून ती त्याला घेऊन खाली आली. देव कार्याचे विधी सुरू झाले होते. त्यांना खाली आलेले पाहून संग्रामची कझीन गँग त्यांच्या भोवती जमली. तो पर्यंत तिथे संग्रामचे काका आले आणि म्हणाले.

काका,“अरे गप्पा उद्या मारा त्याच्याशी तुम्ही! त्याला डॉक्टरांनी मोकळ्या हवेत फिरायला सांगितले आहे. जावू द्या त्याला असे ही पावसाळ्याचे दिवस आहेत लवकर अंधारून येतं आणि पाऊस सुरू झाला तर त्यांना इथेच बसावे लागेल. गार्गी बेटा! तू जा बरं त्याला घेऊन!” ते म्हणाले आणि गार्गीने सुटकेचा निःश्वास सोडला.


ती संग्रामला रिसॉर्टच्या बाहेर घेऊन आली. हवेत चांगलाच ओलावा होता. ढगाळ वातावरणामुळे सगळीकडे अंधारून आले होते. ठीक ठिकाणी खांबाला लावलेले गोल पांढरे शुभ्र बल्बाचे गोळे दिमाखात लकाकत होते. सगळीकडे हिरवळ दिसत होती. वातावरण अगदी आल्हाददायक होते. त्यामुळे संग्रामला ही प्रसन्न वाटले.

त्याला जाणवणारी मरगळ थोडी कमी झाली. गार्गीने त्याला मुद्दामच दरीकडे असणाऱ्या गार्डनकडे नेले. समोर विस्तीर्ण दरी आणि तिथं पर्यंत पोहचण्यासाठी छान पायवाट जी एका सुंदर गार्डन मधून जात होती. आजूबाजूला पानाफुलांनी डवरलेली झाडे होती. संग्राम आणि गार्गी त्या पाय वाटेवर आले. संग्राम निसर्ग सौंदर्य न्याहाळण्यात गढून गेला होता. त्या पाय वाटेवर थोड्या थोड्या अंतरावर बसण्यासाठी बेंचेस होते. गार्गी मात्र वेगळ्याच विचारत होती आणि अचानक संग्रामला म्हणाली.

गार्गी,“संग्राम तू पुढे जा मी आलेच!” असं म्हणून ती गेली.

संग्राम मनातच विचार करत होता.

“सकाळ पासून मला वॉशरूमला ही एकट जावू दिले नाही हिने आणि आता खुशाल मला एकट सोडून गेली. पहिल्यांदाच सांगायचं ना मी अमरला घेऊन आलो असतो बरोबर! चला संग्रामराव आलीय भोगासी!”

तो असा विचार करून हळूहळू चालत पुढे गेला तर त्याला एका बेंचवर सुंदर गिफ्ट रॅप केलेली परडी दिसली. त्याने इकडे तिकडे पाहिले तर कोणीच नव्हते. खरं तर गार्गी त्याला जवळच असलेल्या एका झाडा आडून पाहत होती. संग्राम गेला आणि परडी उचलली तर त्यात केळी होती आणि त्या बरोबर एक छोटेसे ग्रीटिंग होते ते त्याने उघडून पाहिले तर सुंदर अक्षरात एक कोट लिहलेला होता.

“Bananas are important for your muscles
Just like that you are important for me! Sorry”

आणि खाली एक स्मायली होता. गार्गी त्याला एका झाडा मागून पाहत होती. ते वाचून संग्रामचे ओठ थोडेसे रुंदावल्याचे तिने पाहिले आणि तिच्या ही ओठावर हसू आले. तो पर्यंत एक वेटर पळतच त्याच्या जवळ आला आणि ती फळाची परडी घेऊन रूममध्ये नेऊन ठेवतो सांगून घेऊन गेला. ग्रीटिंग मात्र संग्रामच्या हातातच होते. तो अजून थोडा पुढे चालत गेला पण जाताना थोडा अडखळला त्याला थोडं गरगरल्या सारख वाटलं.

गार्गीने संग्रामची माफी मागण्यासाठी आणखीन काय काय केलं असेल? संग्राम अडखळला त्यामुळे गार्गीला झाडा आडून त्याला सावरायला यावे लागेल का?
©Swamini chougule

🎭 Series Post

View all