माझिया प्रियाला प्रीत कळेना भाग ३१

This Is A Love Story


भाग ३१

गार्गी रागातच घरी आली आणि ती फ्रेश तयार होऊन बसली. कारण संग्राम दोन वाजता नक्कीच पोहचेल हे तिला माहीत होतं. पण, तीन वाजून गेले तरी संग्राम आला नाही. गार्गीने त्याला फोन केले पण त्याने ते उचलले नाहीत. आधीच चिडलेली गार्गी अजूनच रागाने धुमसू लागली. अजून दीड तास असाच गेला आणि दाराची बेल वाजली! साडे चार वाजता संग्राम आला होता. गार्गीने रागानेच दार उघडले. गार्गीचा चेहरा रागाने लालबुंद झाला होता. संग्रामच्या ते लक्षात आले होते म्हणून तो तिला फक्त इतकच म्हणाला.

संग्राम,“मी फ्रेश होऊन आलोच आपण निघुयात!” तो म्हणाला आणि बेडरूममध्ये जावू लागला तर गार्गीने त्याला अडवले आणि ती बोलू लागली.

“हो ना निघूच आपण! माझ्या तर वेळेला किंमतच नाही! तुझा वेळ खूप महत्त्वाचा आहे बरोबर ना?” ती रागाने म्हणाली.

संग्राम,“प्लिज गार्गी! आपण निघुया ना! आधीच उशीर झाला आहे!” तो वैतागून म्हणाला.

गार्गी,“हो माझ्याच बोलण्याने उशीर होईल ना आता? मी किती फोन केले तुला? माझा फोन उचलला का नाही? अरे दोन वाजे पर्यंत येणार होतास तू आता किती वाजले घड्याळ बघ! तू फोन उचलत नाही म्हणून बाबांनी मला फोन केला होता, कधी निघणार म्हणून मी काय उत्तर द्यायचे त्यांना बोल ना?” ती रागाने तणतणत होती.

संग्राम,“अचानक एक महत्त्वाचे काम आले त्यामुळे उशीर झाला! मी बाबांना सांगेन काय ते!” तो म्हणाला.

गार्गी,“हो ना! आम्हाला तर काही कामच नसते आम्ही रिकामटेकडेच आहोत ना! बरोबर आहे तू माझ्या पेक्षा २०-२५ हजार रुपये पगार जास्तच घेतो! तू माझ्या पेक्षा करिअरमध्ये दोन-तीन वर्षांनी पुढे त्यातून तुम्ही टॉपर! आम्ही काय फुटकळ लोक! काम तर तुम्हालाच असणार ना बरोबर आहे!” ती चिडून बोलत होती.

संग्राम,“गार्गी प्लिज तू कोणता विषय कोठे घेऊन चालली आहेस! Sorry झाला मला उशीर प्लिज मला माफ कर!” तो आता रडकुंडीला येऊन हात जोडून म्हणाला आणि निघून गेला.

त्याच्या अशा बोलण्याने गार्गी थोडी वरमली. दोघी लोणावळ्याला जायला निघाले. संग्राम गाडी चालवत होता. तो गार्गीला जरा थकल्या सारखा वाटला पण तिच्या मनात राग असल्याने तिने त्याची जास्त चौकशी केली नाही. दोघे ही शांतच होते. गार्गी खिडकीतून बाहेरचे निसर्ग सौंदर्य पाहण्यात गढून गेली होती तर संग्राम शांतपणे गाडी चालवत होता.

दोघे ही रिसॉर्टवर संध्याकाळी सहा वाजे पर्यंत पोहोचले. गार्गी सगळीकडे पाहत चालत होती. तीन एकरच्या एरियामध्ये बांधलेले तीन मजली सुसज्ज असे रिसॉर्ट! समोर सुंदर असे गार्डन आणि लॉन! एका बाजूला स्वीमिंग पूल, एका बाजूला लहान मुलांसाठी केलेला प्ले एरिया आणि एक दहा बारा फुटांवर एक दरी! त्या दरीला फॅन्सीनने बंदिस्त केले होते पण तिथे बसण्यासाठी बेंचेस होते. तिथे उभे राहून दरीचे विहंगम दृश्य पाहता येत होते. खाली सगळे जंगल आणि निसर्गाने केलेली मुक्त हस्ताने उधळण! निसर्ग आणि आधुनिक सोयीसुविधांचा सुंदर संगम तिथे दिसून येत होता. संग्राम आणि गार्गी कोरीडॉर मधून आत गेले तर मोठा प्रशस्त हॉल होता. तिथे सगळे ओळखीचे चेहरे त्यांचीच वाट पाहत होते. अमरने संग्रामला पाहिले आणि धावत येऊन त्याने त्याला मिठी मारली.

अमर,“कसा आहेस भाई? आणि वहिनी तुम्ही कशा आहात?” त्याने गार्गी कडे पाहत विचारले.

संग्राम,“मी एकदम मस्त! तू कसा आहेस?” त्याने हसून विचारले.

काकू,“अरे त्यांना आत तरी येवू दे नीट! पाच दिवस चिनू तुझ्या बरोबर असणार आहे! गार्गी सांभाळून राहा हा तुझ्या या छोट्या दिरा पासून! हा आता पाठ सोडत नाही चिनूची तुला कॉप्लॅस्क देणार हा!” त्या हसून म्हणाल्या.

संग्राम,“काय ग काकू! माझा छोटुसा भाऊ आहे हा!” तो अमरचे गाल ओढत म्हणाला.

रौनक,“भाई आम्ही पण आहोत रांगेत सगळे लाड याचेच का? आणि इतका उशीर का केलास तू आम्ही कधीची वाट पाहतोय?” तो त्याच्या जवळ येत तोंड फुगवून म्हणाला.

संग्राम,“अरे अचानक काम आले म्हणून उशीर झाला! आणि रौनक तुझे तर स्पेशल लाड बाबा आता नवरदेव तुम्ही आणि तुझ्यासाठी खास काही तरी आणले आहे मी!” तो डोळे मिचकावत म्हणाला


काका,“अरे आत्ता आला ना तो त्याला श्वास तरी घेऊ द्या! संग्राम ही घे तुझ्या रूमची की आणि जा फ्रेश वगैरे होऊन या आता संगीत सुरू होईल तासा भरात!” ते म्हणाले.

संजयराव,“संग्राम खूप उशीर केलास बरं जा तयार होऊन या!”

मनीषाताई, “बच्चा बरं वाटत नाही का तुला चेहरा किती उतरला आहे!” त्या त्याच्या कपाळाला हात लावत काळजीने म्हणाल्या.

संग्राम,“नाही ग आई आज जरा धावपळ झाली त्यामुळे.... anyway आम्ही आलोच तयार होऊन!” तो म्हणाला आणि दोघे दुसऱ्या मजल्यावर रूममध्ये गेले.

संग्राम गप्प गप्पच होता. गार्गी बेडवर बसून बॅग उघडून विचार करत होती की इतकं लांब राहून देखील काय जबरदस्त बॉंडींग आहे याची याच्या चुलत भावांशी! तो पर्यंत संग्राम फ्रेश होऊन कपडे बदलून आला. तो ड्रेसिंग टेबल समोर उभा राहून त्याचे केस विंचरत होता आणि गार्गीचे लक्ष त्याच्याकडे गेले. अगदी फेंट आकाशी कलरचा शर्ट त्यावर थोडीशी डार्क आकाशी ट्रॅव्हजर आणि तसेच ब्लेंझर! तो अगदी किलर दिसत होता. पण चेहऱ्यावरचे तेज मात्र गायब होते त्याच्या! तो अगदी मलूल वाटत होता. गार्गी त्याच्याकडे पाहत होती आणि आरशातून संग्रामने तिच्याकडे पाहिले दोघांची नजरानजर झाली आणि गार्गीने मान खाली घातली. ती ही तयार व्हायला निघून गेली. तिने मरून कलरचा अनारकली घातला होता, मोकळे सोडलेले केस, लाईट मेकअप आणि मोठे झुमके! ती ही तयार होऊन आली संग्रामने चोरट्या नजरेने तिच्यावर एक कटाक्ष टाकला आणि दोघे खाली हॉल मध्ये आले.

तर कार्यक्रम नुकताच सुरू होत होता. गार्गी जाऊन मीनाताई आणि मनीषाताई बरोबर बसली तर संग्राम अमर आणि बाकी भावंडांमध्ये मिसळला! संगीताच्या कार्यक्रमाला सगळे प्रोफेशनल डान्सर बोलवण्यात आले होते आणि घरातील सदस्य फक्त त्यांच्यामध्ये जाऊन गाण्यावर हावभाव करत होते. तर कोणी तिथल्या तिथे सोप्या सोप्या स्टेप करत होते. एक गाणे संपले आणि स्टेजवर रौनक गेला. त्याने हातात माईक घेतला आणि बोलू लागला.

रौनक,“मला माहित आहे आपल्या कोणालाच चांगला डान्स करता येत नाही पण, आपल्यामध्ये दोन डान्सर आहेत ज्यांनी काही वर्षा पूर्वी युथ फेस्टिव्हल गाजवला होता. तर ते आता आपल्यासाठी एक सुंदर कपल डान्स सादर करतील! संग्राम भाई आणि गार्गी वहिनी प्लिज स्टेजवर या!” तो म्हणाला

आणि गार्गी-संग्रामने एकमेकांकडे बसल्या जागेवरुनच चमकून पाहिले. आता नाही म्हणण्याचा तर प्रश्नच नव्हता म्हणून मग दोघे स्टेजवर गेले आणि रौनकने डिजेला गाणे लावायला सांगितले. हॉलमधली लाईट मंद करण्यात आली आणि संग्राम-गार्गीवर स्पॉट लाईट होती. गाणे सुरू झाले.


"जब कोई बात बिगड़ जाए,
जब कोई मुश्किल पड़ जाए
तुम देना साथ मेरा ओ हमनवाज़

हो चाँदनी जब तक रात,
देता है हर कोई साथ
तुम मगर अन्धेरों में,
ना छोड़ना मेरा हाथ

जब कोई बात बिगड़ जाए …"

गाणे सुरू होते आणि गार्गी-संग्राम हातात हात घेऊन डान्स करत होते. गार्गी मात्र त्याच्याशी बोलण्यासाठी चरफडत होती. तिने रागाच्या तावात प्रवासात एक शब्द ही तोंडातून काढला नव्हता. पण, संग्रामचा उतरलेला चेहरा पाहून तिला आता त्याची काळजी वाटत होती म्हणून ती डान्स करत करत हळूच त्याच्या काना जवळ पुटपुटली!

गार्गी,“संग्राम! are you ok? तुझा चेहरा उतरला आहे काय होतंय का तुला? नाही म्हणजे आई आणि मम्मा पण विचारत होत्या!”

संग्राम,“मी ठीक आहे!” त्याने अगदी तुटकपणे इतकच उत्तर दिले.

गाणे थांबले आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या! गार्गी पुढे आणि संग्राम मागे असे स्टेजच्या पायऱ्या दोघे उतरत होते आणि अचानक संग्रामला चक्कर आल्यामुळे त्याचा तोल गेला तो पडणार तर गार्गीने त्याला दोन्ही हाताने त्याच्या दंडाला धरून सावरले! संग्राम मात्र त्यांच्याकडे कोणाचे लक्ष नाही ना हे पाहत होता तिने काळजीने पुन्हा विचारले.

गार्गी,“काय होतंय तुला संग्राम? चक्कर आली का? आपण हॉस्पिटलमध्ये जाऊयात का?” ती रडकुंडीला येऊन विचारत होती.

संग्राम,“प्लिज गार्गी जरा हळू बोल! तुझे बोलणे कोणी इथे ऐकले ना तर नसता इशू होईल! सगळे काळजीत पडतील! मला सगळ्यांचा मूड स्पोईल नाही करायचा आणि मी ठीक आहे काही झालं नाही मला! थोडा थकवा आहे थोडा आराम केला की होईन मी ठीक!” तो थोडा रागानेच बोलत होता.

गार्गी,“मग चल तू रूममध्ये तिथेच जेवण मागवून घेऊ! आराम कर!” ती काळजीने म्हणाली.

संग्राम,“पुन्हा तेच! मी असा रूममध्ये निघून गेलो तर सगळे काळजीत पडतील! मी अमर बरोबर आहे! तू जा आई आणि मम्माकडे!” तो म्हणाला आणि तिच्या उत्तराची वाट ही न पाहता निघून गेला.

गार्गी मात्र त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिली. आता तिला गिल्ट आले होते. आपण त्याला दुखावले त्यात कहर म्हणजे आज यायच्या आधी त्याच्याशी भांड भांड भांडलो! त्याने दोन दिवस झाले जेवण ही नीट केले नाही! नक्कीच त्याला काहीतरी होतंय पण सांगत नाही. त्याची खूप काळजी वाटत आहे मला! ती जाऊन मनीषाताई, मीनाताई आणि संग्रामाच्या चुलत्यां जवळ बसली पण तिचे सगळे लक्ष संग्रामकडे होते. मनीषाताईंनी न राहवून गार्गीला विचारले.

मनीषाताई, “काय ग गार्गी चिनूला बरं नाही का? त्याचा चेहरा इतका सुकला आहे तो?” त्यांनी काळजीने विचारले.

गार्गी,“नाही आई आज त्याची खूप धावपळ झाली आहे! म्हणून कदाचित!” ती संग्रामला पाहतच म्हणाली.

मीनाताई,“खरं सांगतेस ना? की भांडण झाले तुमच्यात गार्गी?” त्यांनी रोखून पाहत विचारले

काकू,“मीनाताई अहो गार्गी लाख भांडण्याचा प्रयत्न करेल पण चिनू भांडायला हवा ना! त्याला असं आपल्या माणसां बरोबर भांडायला आवडत नाही. कमालीचं शांत आणि मितभाषी आहे आमचं पोरग! तो लहान असताना सुट्टीत सांगलीत यायचा म्हणजे अजून ही येतो पण लहान असताना देखील भावंडे त्याच्याशी किती ही भांडली तरी तो मात्र शांत कोणालाच काही बोलायचा नाही. त्यामुळे याच्याकडे आम्हाला खूप लक्ष द्यावे लागायचे! याचे नाव ना संग्राम चुकूनच ठेवले आहे आम्ही! समोरच्या माणसाने तलवार काढली की याने याची तालावर म्यान केलीच म्हणून समजा पण हे फक्त घरातल्यासाठीच बरका! आमच्या एरियात राहणारा एक मुलगा अमर लहान असताना सारखा त्याला मारत असे! संग्रामपण तेंव्हा लहानच होता. तो सातवी असेल आणि अमर चौथीत! असच त्या मुलाने मारले म्हणून अमर रडत घरी आला. तर काय नुकत्याच जुडो कराटे शिकत असलेला संग्राम अमरला घेऊन गेला बाहेरच्या बाहेर आणि त्या कराटेची ट्रिक वापरून त्या मुलाचा हातच मोडला!आम्हाला त्याची आई तक्रार घेऊन आल्यावर याचा पराक्रम कळला आणि याला राग येतो हे देखील! पुन्हा काय तो मुलगा अमरच्या वाटेल गेला नाही पण, कमालीचा द्विस्वभावी आहे हा!” त्या हसून सांगत होत्या.

मनीषाताई, “धनु राशीचा आहे तो अर्धा घोडा अर्धा माणूस कधी घोडा होईल आणि कधी राग येईल सांगता येत नाही पण एरवी शांत असतो तो!” त्या ही हसून म्हणाल्या.

गार्गी त्यांचं बोलणं ऐकत संग्रामकडे पाहत विचार करत होती. “राग येतो? मला विचारा म्हणावं दोन दिवस झाले मी झेलतेय ना!”

सगळा कार्यक्रम होई पर्यंत नऊ वाजले होते आणि सगळे जेवण करत होते. जेवणाची बुफे सिस्टीम होती. गार्गीने विचार केला की संग्रामला जेवायला लावावे म्हणून ती उठली तर अमर तिला संग्रामला जेवणाची थाळी देताना दिसला आणि ती पुन्हा उठलेली बसली. संग्रामने आज नाष्टा ही केला नव्हता आणि मिटिंगच्या नादात त्याच लंच ही स्कीप झाल होत. त्यामुळे त्याला चांगलीच भूक लागली होती. त्याने जेवायला सुरुवात केली पण चार-पाच घास खाल्ल्यावर त्याला कसतरी व्हायला लागले होते. पण थकवा आहे जेवल्यावर बरं वाटलं म्हणून तो कसे बसे घास गिळत होता. त्याने दहा-बारा घास कसे बसे खाल्ले असतील आणि पहिल्यांदा ताट पडल्याचा आणि नंतर खुर्ची सहित कोणी तरी पडल्याचा धुडूम असा आवाज झाला. गार्गीने पाहिले आणि ती "संग्राम...." म्हणून मोठ्याने ओरडून धावतच त्याच्याकडे गेली. बाकी सगळ्यांनी ही त्याच्याकडे धाव घेतली. संग्राम खुर्ची सहित खाली कोसळला होता.

काय झाले असेल संग्रामला नेमके?
©swamini chougule

🎭 Series Post

View all