माझिया प्रियाला प्रीत कळेना भाग ३०

This Is A Love Story


भाग ३०

संग्राम संध्याकाळी घरी पोहचला. गार्गी त्याच्या आधीच घरी आली होती. तिने संग्रामशी बोलण्याचा खूप प्रयत्न केला पण, संग्रामने तिला हो-नाही इतकी जुजबी उत्तरे देऊन बोलायचे टाळले. संध्याकाळी ही तो नीटसं जेवला नाही. त्याने त्याची बॅग लोणावळ्याला जायला भरून ठेवली आणि मी लंच ब्रेक नंतर घरी येईन असे गार्गीला सांगून तो झोपून गेला. गार्गी मात्र मनातून तडफडत होती. ती संग्रामच्या अशा वागण्यामुळे खूप अपसेट होती पण तिचे तिलाच कळत नव्हते की नेमके तिला काय होते आहे. ती ही तडफडतच झोपली.

“गार्गी मी निघालो ग!”

“कुठे निघालास संग्राम? अरे जरा थांब!”

“ते आता शक्य नाही आणि हि आपली शेवटची भेट मी तुला आता कधीच दिसणार नाही!”
असं म्हणून संग्राम एका अंधाऱ्या वाटणे गुडूप झाला.

“संग्रामss संग्रामss थांब माला एकटीला सोडून कुठे निघालास?” गार्गी ओरडत उठली.

तिने डोळे उघडून इकडे तिकडे पाहिले तर ती तिच्या रूममध्ये होती. तिने शेजारी नजर वळवून पाहिले तर तिच्या पासून काही अंतरावर संग्राम पालथा गाढ झोपला होता त्यामुळे त्याचा अर्धाच चेहरा तिला दिसत होता. फॅनच्या वाऱ्यामुळे त्याचे केस कपाळावर रुळत होते आणि त्यामुळे त्याची झोप चाळवत होती. गार्गी मात्र घामाने डवरली होती. ती उठून बसली. घड्याळात सहा वाजले होते. तिच्या घशाला कोरड पडली होती. तिने जवळ असलेल्या कॉर्नर पीस वरील झाकून ठेवलेला पाण्याचा ग्लास तोंडाला लावला आता तिला जरा बरं वाटत होतं.

“बाप रे किती भयंकर स्वप्न होतं. गार्गी स्वप्नच होत ते! संग्राम आपल्याशी नीट बोलत नाही दोन दिवस झाले तो रागावला आहे म्हणून कदाचित हे स्वप्न पडले असेल! (तिने त्याच्याकडे एकवार पाहिले आणि आपसूकच तिच्या ओठांवर हसू आलं. ती त्याच्या जवळ गेली आणि त्याला त्रास देणारे त्याचेच केस तिने अलगद हाताने बाजूला केले पण तिच्या स्पर्शाने त्याची चुळबूळ झाली म्हणून ती लगेच बाजूला सरकली. ती झोपलेल्या त्याला बराचवेळ पाहत होती आणि विचार करत होती) साहेब चिडले आहेत... पण का? हे मात्र कळत नाही! गार्गी मॅडम लवकर शोधून काढावं लागेल ते नाही तर काही खरं नाही!” ती हा विचार करतच उठली.

तिने नाष्ट्यासाठी त्याला आवडतो म्हणून उपमा केला पण आज ही संग्राम नाष्टा न करताच ऑफिसला निघाला होता. जाताना फक्त गार्गीला मी हाफ डे करून येतो तू तयार राहा असं सांगून गेला. गार्गीला खरं आज फुल डे रजा मिळू शकत होती पण श्रध्दाला भेटून तिचा सल्ला घेण्यासाठी ती ऑफिसला गेली. गार्गी ऑफिसमध्ये गेली आणि तिने पहिल्यांदा श्रध्दाच्या डेस्ककडे पाहिले तर श्रध्दा तिला आलेली दिसली. श्रध्दाला तिने एक स्माईल दिली आणि ती तिच्या डेस्कवर येऊन बसली. लंच ब्रेक मध्ये तिच्याशी बोलून मग जावे असा विचार गार्गीने केला.

इकडे संग्राम ऑफिसमध्ये पोहोचला. आज त्याला तसं काही फारसं काम नव्हतं पण एका महत्वाच्या प्रोजेक्टच्या ppt वर चर्चा होणार होती म्हणून तो ऑफिसमध्ये आला होता पण काही कारणास्तव ती चर्चा कॅन्सल झाली म्हणून तो आता रिलॅक्स होता. पण त्याच्या पुढे वेगळेच ताट आज मांडून ठेवले होते त्याची त्याला कल्पना नव्हती. त्याच्या डेस्क वरील इंटर कॉम वाजला आणि बॉसने त्याला केबिनमध्ये बोलवून घेतले. सुशांतचे सगळे लक्ष त्याच्याकडे होते.

संग्राम,“सर मला बोलवलत?”

बॉस,“हो आज तुमचा हाफ डे मी कॅन्सल केला आहे तुम्हाला ताबडतोब पनवेलला निघायचे आहे. तिथे आज एक महत्वाची मिटिंग आहे प्रेझेंटेशन सादर करायचे आहे आज. ही फाईल! यात डिटेल्स आहेत सगळ्या आणि हा पेन ड्राईव्ह यात ppt आहे तुम्ही तासा भरात स्टडी करा आणि निघा! आता वाजले आहेत दहा तुम्ही आकरा वाजता निघालात तरी दीड तासात पनवेलला पोहचाल तिथून प्रेन्टेशनला दोन तास लागतील. म्हणजे चार पर्यंत तुम्हीं फ्री होता. रिपोर्टिंगसाठी नाही आलात तरी चालेल मला मेल करा रिपोर्ट!” ते म्हणाले.

संग्राम,“पण सर मी कालच रजेसाठी अर्ज केला होता आणि हे प्रेझेन्टेशन निलेश देणार होता. तो कुठे आहे?” तो थोडा रागानेच म्हणाला.

बॉस,“ते विचारण्याचा तुम्हाला अधिकार नाही तरी ही सांगतो. त्याचा मेल आला आहे रजे बाबतीत. त्याला त्याच्या घरी मेडिकल इमर्जन्सी आली आहे! तुम्हाला तर लग्नाला जायचे आहे. तुमची पुढची सहा दिवसाची रजा मंजूर केली आहे. पण आज हे काम तुम्हाला करावेच लागेल! लोणावळा जवळ तर आहे चारच्या पुढे निघा!” ते म्हणाले.

संग्राम,“मी नाही जाणार पनवेलला! कारण हे काम माझं नाही तुम्ही तुमच पाहून घ्या तो निलेश असं कसं अचानक सांगू शकतो की मी येणार नाही म्हणून आणि तुम्ही माझी रजा कॅन्सल करून त्याची कशी रजा एक्सेप्ट करू शकता?” तो रागाने तणतणत होता.

बॉस,“मिस्टर अमेरिका रिटर्न मी तुमची तक्रार करेन हा मॅनेजमेंटला की तुम्ही वरिष्ठांचे ऐकत नाही! समजलं.... घ्या ती फाईल आणि निघा!” ते रागाने म्हणाले आणि संग्रामचा ना इलाज झाला. तो pd आणि फाईल घेऊन बाहेर आला तर सुशांत त्याचीच वाट पाहत होता. त्याने विचारले.

सुशांत, “संग्राम काय झालं? काय म्हणाला रे तो जांभळे?”

संग्राम,“मला पनवेलला जावे लागेल प्रेझेन्टेशन द्यायला!” तो खाली मान घालून नाखुशीने म्हणाला.

सुशांत, “अरे पण त्या निलेशचे काम होते ना हे? तो कुठे आहे?” तो रागाने म्हणाला.

संग्राम,“त्याला मेडिकल इमर्जन्सी आली आहे म्हणे!” तो म्हणाला.

सुशांत, “तू नाही का म्हणाला नाहीस रे? एक तर तुझा आज हाफ डे होता आणि हे तुझे काम नाही! हा जांभळे ऑफिस पोलिटिक्स करत आहे!” तो रागाने म्हणाला.

संग्राम,“मी म्हणालो नाही! तर माझा रिपोर्ट करणार म्हणे वरिष्ठांचे ऐकत नाही म्हणून आणि जांभळे सर तुला माहीत आहे ना त्यांना निलेशला अमेरिकेला पाठवायचे होते पण मॅनेजमेंटने मला पाठवले म्हणून राग काढत आहेत ते माझ्यावर असा!” तो वैतागून म्हणाला.

सुशांत, “कर म्हणावं रिपोर्ट... तू चुकला नाहीस तर घाबरायचं काय त्याला?” तो रागाने बोलत होता.

संग्राम,“मी माझा रिपोर्ट करतील म्हणून पनवेलला जात नाही पण हे प्रोजेक्ट जर हातून गेले तर जांभळेचे नाही कंपनीचे नुकसान होणार आहे आणि मी गप्प तर बसणार नाही लोणावळ्यावरून आल्यावर मी मॅनेजमेंटकडे तक्रार करेनच! पण आज मला जावं लागेल चार वाजेपर्यंत माझे काम होईल त्या नंतर जाईन मी लोणावळ्याला!” तो म्हणाला.

सुशांत, “आणि गार्गी तुझी वाट पाहत बसेल त्याच काय एक वाजल्या पासून?” त्याने विचारले.

संग्राम,“आता तिला फोन ही करू शकत नाही मी... ती ऑफिसमध्ये असेल! मी समजावेन तिला बरं चल मला आता तयारी करावी लागेल प्रेझेंटेशनची!” तो म्हणाला आणि त्याच्या डेस्कवर जाऊन बसला.

संग्राम आणि त्याचा बॉस ceo जांभळे याचे फारसे पटत नसे. तो सतत संग्रामला पाण्यात बघत होता. त्याची कुठे चूक होते का यासाठी जांभळे कायम टपून असे. पण संग्राम मात्र त्याच्या तावडीत कधीच सापडत नसे उलट निलेश जांभळेच्या मर्जीतील माणूस होता त्यामुळे कायम निलेशला फेवर मिळत असे. अमेरिकेला जाण्यासाठी देखील जांभळेने निलेशचे नाव रेकमेंड केले होते पण मॅनेजमेंटने परफॉर्मन्स पाहून संग्रामला निवडले होते. आज देखील निलशने ऐन वेळी कारण सांगून पेच निर्माण केला होता आणि जर प्रोजेक्ट मिळाले नाही तर जांभळेला उत्तरे द्यावी लागणार होती पण इतक्या शॉर्ट नोटीसमध्ये हे काम फक्त संग्राम करू शकतो हे जांभळेला माहीत होते म्हणून त्याने हे काम जबरदस्तीने संग्रामाच्या माथी मारले होते. संग्राम प्रेझेंटेशन द्यायला तयार झाला कारण प्रश्न कंपनीच्या नफ्याचा होता. तो तासभर फाईल स्टडी करून पनवेलला निघून गेला.
★★★
इकडे लंच ब्रेक झाला आणि गार्गी श्रध्दा जवळ गेली दोघी मिळून कॅन्टीनमध्ये गेल्या. श्रध्दाला गार्गीचा चेहरा पाहून कळले होते की ती अपसेट आहे म्हणून श्रद्धाने तिला विचारले.

“काय मॅडम आता काय झाले? आज तर लोणावळ्याला जाणार आहात ना तुम्ही?”

गार्गी,“अगं जाणार आहे लोणावळ्याला पण दुपार नंतर! अगं संग्रामना माझ्यावर रागावला आहे तो माझ्याशी बोलतच नाही म्हणजे बोलतो पण जुजबी. दोन दिवस झाले ना नाष्टा करतो घरात ना डबा घेऊन जातो मला म्हणाला की मी डबा नाही नेणार इथून पुढे!” ती तोंड पाडून सांगत होती.

श्रद्धा,“असं का? त्या दिवशी तर उड्या मारत होता ना भाजी चांगली झाली म्हणून?” तिने आश्चर्याने विचारले.

गार्गी,“त्याच दिवशी पासून त्याचं काही तरी बिनसले आहे ग!” ती खाली मान घालून म्हणाली.

श्रध्दा,“तुझं आणि त्याच भांडण? काही बोलणं झालं का?” तिने विचारले.

गार्गी,“भांडण अस नाही पण बोलणं झालं! त्याला कळले की त्या दिवशी भाजी केली होती आणि त्याने मला विचारले की तू का केलीस भाजी म्हणून... म्हणजे लग्ना आधी मी स्वयंपाक देखील करणार नाही असं त्याला स्पष्ट बजावले होते. म्हणून त्याने मला विचारले तर मी सांगितले की तू माझ्यासाठी माझ्या कुटूंबासाठी इतकं केलंस त्याची कृतज्ञता म्हणून मी हे सगळं करत आहे तुझ्यासाठी तर मला म्हणाला इथून पुढे माझ्यासाठी काही करायचं नाही! मी उद्या पासून ना डबा नेणार आहे ना नाष्टा करणार आहे घरात! मी त्याला खूप विचारलं की तुला आवडल नसेल तर नीनाताईच करतील सगळं पण तू डबा घेऊन जा नाष्टा कर पण माझं काही ऐकतच नाही आणि आता तर तुटकतुटक बोलतो. जास्त बोलत ही नाही!” ती रडकुंडीला येऊन सांगत होती.


श्रद्धा,“अगं गार्गी काय केलंस तू हे? मूर्ख आहेस का तू? गार्गी अगं त्याची कृतज्ञता मानायला आणि हे सगळं करायला तो परका आहे का? तो नवरा आहे तुझा आणि तूच म्हणतेस ना तो माझा चांगला मित्र आहे मग मित्राशी असं वागतात का? गार्गी तू त्याला दुखावले आहेस! खूप जास्त! त्याने जे काही केले ते तुला आणि तुझ्या कुटूंबाला आपले मानून केले पण तू? अरे देवा काय करू मी तुझं गार्गी? अगं तुला स्वतःच्या भावना ही ओळखता येत नाहीत तर संग्रामाच्या काय ओळखणार तू? तू त्याच्या प्रेमात पडली आहेस पण तुला ते मान्य करायचे नाही गार्गी!” ती चिडून बोलत होती.

गार्गी,“मान्य की मी चुकले असेन कदाचित असं कृतज्ञता वगैरे मानून त्याला दुखावले ही असेन त्यासाठी मी त्याची माफी ही मागेन पण मी त्याच्या प्रेमात वगैरे नाही कारण मी प्रेम करू शकत नाही माझा विश्वास नाही या गोष्टींवर!” ती भडकून म्हणाली.

श्रध्दा,“गार्गी तू इथेच चुकते आहेस. अगं एकदा दूध पोळले म्हणून माणूस ते प्यायचे सोडत नाही ते फुंकून पितोच की! पण तुझं म्हणजे असं झालंय दूधच वाईट असत! मुळात तुझ्यात आणि राजवीर मध्ये जे होत ते प्रेम नाही आडणीड्या वायातले आकर्षण होते. ज्याला तू आज तागायत प्रेम समजत आहे पण आता तू संग्रामच्या प्रेमात पडली आहेस पण तुला ते मान्य नाही! गार्गी अग जागी हो आणि पहा स्वतःच्यात तुला संग्राम दिसेल. तुझ्या मेंदूने तुझ्या मनाला बजावले आहे की प्रेम म्हणजे धोका प्रेम करायचेच नाही! पण तेच मन प्रेमात पडले आहे आणि मेंदू त्याचा विरोध करत आहे म्हणून तुला मान्यच करायचं नाही की तू संग्रामवर….!” ती पुढे बोलणार तर गार्गीने तिला मध्येच थांबवले आणि ती रागाने बोलू लागली.

“मी तुला ताई म्हणते तुला माझी मोठी बहीण मानले म्हणून माझी प्रत्येक गोष्ट तुझ्याशी शेअर केली पण याचा अर्थ असा अजिबात नाही की तू मला माझ्याच मनात काय चालले आहे ते सांगावे! तू खूप बोललीस आणि मी खूप ऐकले आता बास!” ती चिडून म्हणाली आणि जाऊ लागली तर श्रद्धाने तिचा हात धरला आणि ती बोलू लागली.

श्रद्धा,“गार्गी प्रत्येकाच्या आयुष्यात असा क्षण नक्की येतो जेंव्हा त्याला त्याच्या प्रेमाची जाणीव होते. देव करो आणि तुला ती लवकरच होवो! प्रेमाची जाणीव व्हायला शतकं नाहीत लागत गार्गी एक क्षण पुरेसा असतो! जेंव्हा त्याला काटा रुतेल आणि पाणी तुझ्या डोळ्यात येईल! जेंव्हा तुला असे वाटेल की त्याच्या शिवाय आपण जगूच शकत नाही आणि त्याच्या शिवाय जगलो तरी ते फक्त श्वास घेत असेल. जगात सगळ्यात जास्त भीती तुला त्याला गमावण्याची वाटेल ना! तेंव्हा आणि तेंव्हाच तुला त्याच्यावरच्या तुझ्या प्रेमाची जाणीव होईल आणि तो क्षण तुझ्या आयुष्यात लवरच येवो गार्गी!” ती मनापासून बोलत होती.

गार्गीने तिचा हात झटकला आणि ती रागाने निघून गेली. माणसा सारखा विचीत्र प्राणी जगात दुसरा कोणताच नसेल. माणूस सतत त्याच्या मनाच्या आणि मेंदूच्या द्वंद्वात अडकलेला असतो. इथे तर गार्गीने तिच्या मनाची दारच लावून घेतली होती आणि मेंदूला चौखूर उधळायला मोकळे सोडले होते.

गार्गी खरंच संग्रामच्या प्रेमात पडली होती का? आणि जर ती संग्रामच्या प्रेमात पडली होती तर तिला या गोष्टीची जाणीव कशी आणि केंव्हा होणार होती?

हे सगळं आपण पाहूच माझीया प्रियाला प्रित कळेना! या कथा मालिकेच्या उत्तरार्धात!

©swamini chougule

🎭 Series Post

View all