माझिया प्रियाला प्रीत कळेना भाग ३

This is a Love story

 भाग ३
   संग्राम मात्र शांतपणे बाकावर बसून होता. संजयराव(त्याचे बाबा) त्याच्या जवळ गेले आणि त्याला म्हणाले.

बाबा,“ बेटा संग्राम काय करायचे यांचे? तू म्हणशील तसं करू. पण, एक लक्षात ठेव आज जर यांना शिक्षा झाली तर त्यांचे अख्खे लाईफ स्पॉइल होईल. आणि त्यांच्या बरोबर यांच्या घरच्यांना ही शिक्षा होईल! अंतिम निर्णय तुझा आहे.” ते त्याला समजावत म्हणाले.

   संग्राम उठला आणि इन्स्पेक्टर समोर जाऊन बोलू लागला.

संग्राम,“ सर नका नोंदवू F. R. I. मी यांना सोडेन पण एका अटीवर!” तो काही तरी विचार करून म्हणाला.

Mr. मोरे,“ कोणती अट बेटा आम्हाला तुझ्या सगळ्या अटी मान्य आहेत!” ते म्हणाले.

संग्राम, “राजवीरने आणि त्याच्या मित्रांनी इथे पोलिसांना लिहून द्यावे की ते इथून पुढे मलाच काय पण कॉलेजमध्ये कोणालाच त्रास देणार नाहीत, दादागिरी करणार नाहीत आणि हो कोणाची रॅगिंग ही करणार नाहीत!” तो ठामपणे बोलत होता आणि राजवीर त्याला डोळ्यांच्या कोनातून रागाने पाहत होता.

इंस्पेक्टर, “हवालदार लिहून घ्या यांच्याकडून आणि हो राजवीर तू संग्रामची माफी माग” ते आदेश देत म्हणाले

  राजवीरने चमकून वर पाहिले. खरं तर त्याला संग्रामचा खूप राग आला होता.

 “काल कॉलेजमध्ये आलेला हा पोरगा त्याची माफी मागायची आणि ती ही मी!no way!” तो मनात विचार करत होता. त्याच्या वडिलांनी त्याला खांदे धरून हलवले  आणि म्हणाले.

Mr. मोरे,“माफी मग राज संग्रामची!” ते रागातच म्हणाले.

राजवीर,“ I am sorry संग्राम इथून पुढे माझ्याकडून अशी चूक होणार नाही!” तो खाली मान घालून म्हणाला.

इन्स्पेक्टर, “आणि होऊ ही नये. कळले का तुला?” ते दटावत म्हणाले. राजवीरने नुसती मान हलवली संग्राम मात्र शांत होता. तो काहीच बोलला नाही.

प्रिन्सिपल पाटील,“ इथून पुढे तुझ्यावर माझी करडी नजर असेल राजवीर!” ते त्याला रागाने पाहत म्हणाले.

इन्स्पेक्टर,“ हे आधीच करायला हवं होतं पाटील तुम्ही! जर आधीच या राजवीरला लगाम घातला असता ना तर याची मजल संग्रामवर हल्ला करण्या पर्यंत केली नसती आणि Mr. मोरे स्वतःच्या मुलाला शिकवा जरा काही तरी कॉलेजमध्ये शिकायला येतो हा आणि बाकी मुलं ही! याची दादागिरि सहन करायला नाही. Mr. सरदेसाई तुम्ही संग्रामला घेऊन जाऊ शकता. त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा त्याला आरामाची गरज आहे. बाकी आम्ही पाहून घेतो.” ते म्हणाले.

बाबा,“ thanks इंस्पेक्टर! चल बेटा!” असं म्हणून ते संग्रामचा हात धरून त्याला घेऊन गेले.

       संग्रामचे बाबा त्याला पहिल्यांदा हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. त्याला बरेच खरचटले होते. नंतर होस्टेलवर ते दोघे आले. सुशांत ही रूमवर होता त्याने दोघांना पाणी दिले.

बाबा,“चिनू घरी चल दोन दिवस अराम कर मग ये होस्टेलवर!”ते काळजीने म्हणाले.

संग्राम, “बाबा मला इतकं ही काही लागलं नाही आणि घरी नको प्लिज आई उगीच काळजी करत बसेल आणि आज इथे काय झाले ते तुम्ही आईला नका सांगू तिचा स्वभाव तुम्हांला माहीतच आहे.” तो म्हणाला.

सुशांत, “मी आहे काका संग्रामची काळजी घायला तुम्ही नका चिंता करू! मी पण ना आज लवकर कॉलेज मध्ये गेलो होतो. लायब्ररीत काम होत माझं म्हणून नाही तर याची साथ मी ही दिली असती.” तो म्हणाला.

बाबा,“ठीक आहे मग मी निघतो! काळजी घे बच्चा! मला आता तशी काळजी नाही.. हा आहे की तुझा मित्र तिची काळजी घायला! आणि हो त्या राजवीर मोरेने पुन्हा काही केले तर लगेच फोन कर मला!” ते म्हणाले.

संग्राम,“ हो घेईन मी काळजी! या सगळ्यात याची ओळखच करून द्यायची राहिली! हा सुशांत माळी कोल्हापूर वरून आला आहे माझा रूम पार्टनर! आणि राजवीर आता काही करेल असं नाही वाटत मला!” तो म्हणाला.

बाबा,“ ok take care!”  असं म्हणून ते निघून गेले.
★★★

       इकडे प्रिन्सिपलच्या ऑफिसमध्ये मात्र वेगळाच गोंधळ चालू होता. इंस्पेक्टरने राजवीर आणि त्याच्या मित्रांकडून लिहून घेऊन त्यांना सोडले होते. पोलीस स्टेशनमधून त्यांची सुटका झाली होती पण, अजून प्रिन्सिपलचा राउंड निघणे बाकी होते. प्रिन्सिपल पाटील तावातावाने बोलत होते.

पाटील,“ या तुझ्या पोराने आज लाज आणली रे प्रकाश! हा कॉलेजमध्ये आणि होस्टेलवर माझा नातलग आहे म्हणून दादागिरी करत फिरतो! अरे नशीब त्या संग्रामने तक्रार मागे घेतली नाही तर आज याच्या बरोबर माझी ही वाट लागली असती. आणि शेवटी मला ही कोणाला तरी उत्तर द्यावे लागते. याच्यामुळे कॉलेजची बदनामी झाली ती वेगळीच!” 

Mr. मोरे,“ राजवीर मी तुला कॉलेजमध्ये शिकायला पाठवतो दादागिरी करायला नाही आज तुझ्यामुळे माझी मान शरमेने खाली गेली. माझे संस्कार निघाले आज! तुझ्यामुळे पोलीस स्टेशनची पायरी चढावी लागली आज!” ते रागाने बोलत होते.

राजवीर,“ sorry पप्पा इथून पुढे अशी चूक नाही होणार!” तो खाली मान घालून म्हणाला.

       राजवीरचे वडील रागातच निघून गेले आणि राजवीर होस्टेलवर पोहोचला. झालेल्या मारामारीत त्याच्या ही हाताला लागले होते. खरं तर राजवीर आणि त्याच्या चार मित्रांना संग्रामने अक्षरशः लोळवले होते. त्याचा एक मित्र विवेक फस्ट एड बॉक्स घेऊन आला आणि त्याच्या हाताला औषध लावत म्हणाला.

विवेक,“ वीर भाई तो पोरगा संग्राम लयच पुढच्या पायरीचा निघाला की! तोंडावरून वाटतो चंपु पण त्याने आपल्या चौघांना लोळवला आणि वरून पोलीस स्टेशन बी दाखवलं. माझ्या बापाने तर माझा पॉकेटमनी चार महिने बंद केला.” तो म्हणाला.

राजवीर,“ विक्या मला वीर भाई म्हणतात. आज जे त्या संग्रामने केलं ना त्याचा हिशोब त्याला आज ना उद्या चुकवावा लागणार!” तो रागाने म्हणाला.
             
       माणूस जसे आयुष्यात मित्र तयार करत असतो, तसेच त्याच्या नकळत आणि कधी कधी परिस्थितीमुळे शत्रू देखील आपसूकच तयार करत असतो. तसेच काहीसे संग्रामच्या बाबतीत घडले होते. त्याला सुशांत सारखा मित्र होस्टेलवर मिळाला तसच त्याला राजवीर सारखा शत्रू ही आज मिळाला होता. जो गप्प बसणाऱ्यातला नव्हता.
★★★

कॉलेज सुरू होऊन आता पंधरा दिवस होत आले होते. तरी ही अजून नवीन ऍडमिशन येतच होते. प्रवेश प्रक्रिया अजून पंधरा दिवस चालणार होती म्हणूनच कॉलेज मध्ये इतकं काही शिकवले जात नव्हते. तरी रोज थोडे फार लेक्चर्स होत होते आणि संग्राम आणि सुशांत ते अटेंड करत होते. ती घटना घडून ही आता आठ दिवस होऊन गेले होते आणि राजवीर आता शांत होता. तरी संग्रामचे बाबा फोन करून त्याची चौकशी रोज करत असत. वरून जरी सगळे निवळले असे वाटत असले तरी राजवीरच्या मनात मात्र संग्राम विषयी खदखद कायम होती. राजवीर फक्त योग्य वेळेची वाट पाहत होता. 

      संग्राम मात्र आता अभ्यास आणि इतर ऍक्टिव्हिज मध्ये गढून गेला होता. तो शनिवार रविवार न चुकता घरी जात होता. असाच तो या आठवड्यात ही  विकेंडला घरी गेला आणि आज म्हणजे सोमवारी तो होस्टेलवर न जाता डायरेक्ट कॉलेजमध्ये आला. नेमकी आज बस मध्येच पंचर झाल्याने त्याला कॉलेजमध्ये यायला उशीर झाला होता आणि पहिले लेक्चर सुरू झाले होते. म्हणून तो कॉलेजच्या गेट मधून त्याची सॅग सांभाळत झपाझप पाऊले टाकत येत होता. पण, समोरचे दृश्य पाहून तो थबकला आणि भान हरपून तिथेच उभा राहिला.

          साधारण त्याच्याच वयाची एक मुलगी एका जखमी भटक्या कुत्र्याच्या पिल्लाला गोंजारत होती. संग्राम तिला एक टक नुसता पाहत होता. गोल चेहरा, मोठे काळे भोर डोळे,नितळ गोरा रंग,नाजूक जिवणी, वाऱ्यावर उडणारे ब्लंट कट असणारे केस तिच्या गालाशी चाळा करत होते. तिचे कानात असणारे  लोम्बते कानातले तिची कमनीय मान हलेल तसे हलत होते. ती मन लावून त्या कुत्राच्या  पायावरची जखम तिच्या जवळ असलेल्या टीशूने साफ करत होती. तिने जखम साफ केली आणि स्वतःचा रुमाल कुत्र्याच्या पायाला बांधला त्याला स्वतःच्या पर्स मधील बिस्कीट खायला घातले. तिला पाहणाऱ्या संग्रामला मात्र उगागच त्या कुत्र्याच्या इटूकल्या पिल्लाचा हेवा वाटत होता. त्या मुलीने त्या पिल्लाला आणखीन एकदा गोंजारले आणि त्याला खाली सोडले. ती संग्राम समोरून चालत निघून गेली तरी संग्राम मात्र तिला त्याच्या नजरे आड ती जाई पर्यंत पाहतच होता. इतक्यात तिथे सुशांत आला आणि त्याच्या समोर हात हलवत म्हणाला;

सुशांत, “अरे ये संग्राम किती वेळ झाला तुला हाका मारतोय मी! लक्ष कुठे आहे रे तुझे?”

संग्राम,“ अरे तू कधी आलास?” तो भानावर येत म्हणाला.

सुशांत,“ मला अठरा वर्षे झाली या पृथ्वीवर अवतरुन. पण, तू! तू कोणत्या ग्रहावर आहेस?” तो वैतागून म्हणाला.

संग्राम,“ सुशांत अरे काय पण काय बोलतोयस मी आहे इथेच तुझेच लक्ष नाही बघ!” तो म्हणाला

सुशांत,“ हो का? बरं चला महाराज आपण क्लासमध्ये जाऊ! अरे पहिले लेक्चर झाले. मला वाटले तू आज येत नाहीस वाटत कॉलेजला! आज सरांनी लय बोर केलं बघ माझ्या तर  सगळं डोक्यावरूनच गेलं.” तो बडबडत होता.

   पण संग्रामचे मात्र लक्ष त्याच्याकडे नव्हतेच. त्याच्या नजरे समोरून त्या मुलीचा चेहरा अजून ही जात नव्हता. तीच्या विचाराचे गारुड त्याच्या मनात थैमान घालत होते.

“ती  कोण असेल?तिला या पंधरा दिवसात कॉलेजमध्ये पाहिले नाही! आपल्याच कॉलेजमध्ये शिकत असेल का? मग या आधी आपल्याला कशी दिसली नाही? पहिल्याच वर्षाला असेल का?की आपल्याला सिनिअर आहे ती?आपल्याच डिपार्टमेंट मध्ये असेल का? की दुसऱ्या कोणत्या तरी इंजिनिअरिंगच्या शाखेत असेल? नाव काय असेल तिचे? संग्राम अरे किती विचार करत आहेस तिचा... आज पहिल्यांदा पाहिलेस तिला! कुठली कोण ती मुलगी? एकदा पाहून इतका विचार करत आहेस तिचा? वेडा आहेस का?” तो स्वतःच्याच विचारात स्वतःच्या मनाला तिचा विचार करत आहे म्हणून दटावत होता. या सगळ्या विचारात तो क्लासमध्ये कधी पोहोचला हे त्याचं त्याला ही कळले नाही.सुशांतच्या बोलण्याने तो पुन्हा भानावर आला.

सुशांत,“ महाराज ती सॅग काढा पाठीवरची मग बसा! अस कसं बसायला येईल तुम्हाला?”  संग्रामला पाठीवरच्या सॅग सहित बेंचवर बसताना पाहून तो हसून म्हणाला.

संग्राम,“ अ sss हं! काढतोय रे सॅग! तसाच बसायला काय वेडा आहे का मी?” तो पुन्हा भानावर येत म्हणाला.

सुशांत,“ आता वेडा की शहाणा तुझे तुलाच माहीत पण आल्यापासून पाहतोय तू ना कुठे तरी हरवला आहेस!” तो हसून म्हणाला.

संग्राम,“  असं काही नाही सुशांत! अभ्यासाकडे लक्ष दे! लेक्चर मध्ये लक्ष नसलं की सगळं डोक्यावरूनच जाणार की!” तो काही तरी बोलायचे म्हणून बोलला सुशांत काही बोलणार तर तो पर्यंत क्लासमध्ये मॅडम आल्या आणि लेक्चर सुरू झाले.

     संग्राम सुशांतला लेक्चरकडे लक्ष दे असं म्हणाला पण त्याचेच लक्ष लेक्चरमध्ये नव्हते. सतत राहून राहून त्याच्या समोर त्या मुलीचा चेहरा येत होता. तिचं त्या पिल्लाला कुरवळणे, हळुवार त्याची जखम साफ करणे, त्याच्या जखमेवर फुंकर घालणे, तिच्या डोळ्यातले ते भाव सगळं सगळं त्याला सतत डोळ्यासमोर दिसत होतं. लेक्चर कधी संपले हे त्याला कळलेच नाही. तो हसत नुसताच बसून होता आणि सुशांत त्याला आश्चर्याने पाहत होता! संकेत त्यांचाच क्लासमेट संग्रामला येऊन काही तरी विचारत होता पण संग्राम मात्र त्याला काहीच उत्तर देत नव्हता हे पाहून सुशांत म्हणाला;

सुशांत, “संकेत आज या संग्र्याच काही तरी बिनसले आहे तो सकाळ पासून एकटाच हसतोय! मला तर याचं काही कळेना!” तो वैतागून  म्हणाला.

संकेत,“ प्रेमात बिमात पडला की काय हा!” तो हसून म्हणाला.

संग्राम,“ काय रे संकेत तू कधी आलास! आणि लेक्चर कधी संपले?”त्याने पुन्हा भानावर येत म्हणाला.

     आणि त्याच्या या प्रश्नावर सुशांत आणि संकेत हसायला लागले. संग्रामला मात्र ते दोघे का हसत आहेत हेच कळत नव्हते.

काय मग आपला हिरो खरंच त्या मुलीच्या प्रेमात पडला की काय?तुम्हाला काय वाटते? पण ती मुलगी कोण होती? वाचू पुढच्या भागात!

कथेचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव आहेत!

सदर कथामालिकेचा रोज एक भाग पब्लिश होणार, दररोज दुपारी 3 वाजता. वाचनाच्या उत्कृष्ट अनुभवासाठी आजच ईरा app download करा.
 ©स्वामिनी चौगुले
 क्रमशः 

🎭 Series Post

View all