माझिया प्रियाला प्रीत कळेना भाग २

This is a love story

   भाग २

 संध्याकाळ टळून गेली आणि संग्राम आणि सुशांत जेवायला  होस्टेलच्या मेस मध्ये गेले.  साधारण आठ वाजले असतील आणि मेस सात वाजल्या पासून  रात्री दहा वाजे पर्यंतच उघडी असायची म्हणजेच तिथे दहा वाजे पर्यंत जेवण मिळत असे दहाच्या पुढे सगळे बंद! दोघे ही गेले मेस मध्ये त्यांनी ताटं घेतली आणि लाईनीत जाऊन उभे राहिले. लाईन तशी मोठी होती जवळ-जवळ पाऊण तास रांगेत उभे राहिल्यावर सुशांतचा नंबर आला त्याच्या मागे संग्राम उभा होता. पोटात कावळे ओरडत होते आणि संग्रामला आता घरची आणि आईची खूप आठवण येत होती. कारण, घरी जेवण मागितले की लगेच ताट हजर असायचे कधी कधी तर आई मागे लागून जेवायला घालायची. संग्रामच्या मनाची घालमेल होत होती कारण त्याला आज घराची, आईची आणि बाबांची खरी किंमत कळत होती. तो हा सगळा विचार करत होता आणि सुशांतच लक्ष मात्र ताटात वाढल्या जाणाऱ्या पदार्थांकडे होते. तो त्याला  कडकडून भूक लागल्याने पदार्थ वाढणाऱ्या वाडप्यांकडे आशाळभूतपणे पाहत होता. तितक्यात दहा-बारा मुलांचं एक टोळकं हुल्लडबाजी करत तिथे आले आणि त्यातल्या मोरक्याने सुशांतच्या हातातून ताट हिसकावून घेतलं आणि बाकी दहा-बारा जण संग्रामला एक-एक करत मागे ढकलत पुढे रांगेत येऊन उभे राहिले. सुशांत रागाने धुमसत होता तो काही बोलणार तर त्याला एका पोराने तिथून मागे नेले आणि तो स्वतः ही संग्रामाच्या मागे उभा राहत सुशांतला म्हणाला;

 “अरे बाबा इथे असच चालतं! तुला ज्याने ढकलले आणि ताट हिसकून घेतले ना!तो राजवीर आहे आणि ही सगळी त्याची गँग काही बोलला असतास त्याला तर तुला लय तुडवला असता त्यांनी! गप्प उभा रहा इथे हा बघ कसा शांत उभा आहे!” त्या हुल्लडबाजी करत असलेल्या  मुलांचे निरीक्षण करत असलेल्या  संग्रामकडे पाहत तो म्हणाला.

सुशांत,“ तो असेल राजवीर नाही तर कोण? नियम सगळ्यांना सारखेच आहेत ना ते ही इथे शिकायला आलेत आणि आपण ही!” तो तावातावाने बोलत होता.

मुलगा,“ ये बाबा तोंड बंद कर तुझं ऐकलं ना त्यातल्या एकाने जरी, तरी तुझं काही खरं नाही! तो राजवीर मोरे आहे आणि हे त्याचं टोळकं ते दुसऱ्या वर्षात आहे म्हणजे ते सिनिअर आणि आपण ज्युनिअर! कॉलेज कॅम्पसमध्ये त्यांचेच राज्य आहे! तर जरा जपून राहा बाबा!” तो म्हणाला आणि तो पर्यंत राजवीरला कोणी तरी जाऊन सुशांतचे बोलणे सांगितले. राजवीर ताट टेबलवर ठेवून त्यांच्याकडेच येत असलेला दिसला आणि इतका वेळ समजावणाऱ्या त्या मुलाची तंतरली. संग्राम मात्र त्यांच्याकडे  येणाऱ्या राजवीरचे त्याच्या भेदक नजरेने निरीक्षण करत होता.

       सहा फूट उंची, मजबूत शरीर, घारे खुनशी डोळे,लांबट चेहरा, सावळा रंग,तरतरीत नाक आणि चालण्यात आणि एकूणच वर्तवणुकित  एक प्रकारचा माज! तो येऊन सुशांतच्या पुढे उभा राहिला सुशांत ही त्याला पाहतच होता तेव्हढ्यात मगाच पासून बोलणारा तो मुलगा राजवीरला पाहत म्हणाला;

 “सोडा ना वीर भाई नवीन मुलं आहेत त्यांना  तुमच्या बद्दल माहिती नाही. बिचारे आजच आलेत होस्टेलवर!” तो समजावत होता.

राजवीर,“सांग रे संत्या यांना मी कोण आहे ते! पुन्हा जर माझ्याशी पंगा घेतला ना या चिमण्याने तर सरळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एक बेड बुक याच्या नावचा!(संग्रामकडे पाहत कारण संग्राम त्याला नुसता एक टक पाहत होता.)ये चंपु  नजर  खाली करायची! नाय तर इकडचा गाल तिकडं करीन!” तो रागाने म्हणाला.

संत्या,“ मी समजावतो ना वीर भाई यांना तुम्ही कशाला वेळ वाया घालवता जा तुम्ही!” राजवीर संग्रामची कॉलर धरणार तर  तो मध्ये येत म्हणाला.

राजवीर,“ ठीक आहे नीट समजावं यांना नाही तर…..!” तो असं म्हणून संग्रामकडे खुनशीपणे  पाहून निघून गेला.

संत्या,“ वाचलात लेक हो आज नाय तर काही खरं नव्हतं तुमचं! चला जेवा! मग सांगतो सगळं!” तो म्हणाला.

      संग्राम, सुशांत आणि संत्या(संतोष) पुन्हा रांगेत उभे राहिले त्यामुळे त्यांना जेवायला अजून अर्धा तास उशीर झाला. सुशांत मात्र तोंडात शिव्या पुटपुटत होता. त्याला खूप राग आला होता त्या राजवीरचा! पण संग्राम मात्र शांत होता. तो काहीच बोलला नाही. तिघे ही जेवले आणि हॉस्टेलच्या व्हरांड्यात जाऊन बसले. आता संग्रामला मात्र गप्प बसवत नव्हते म्हणून संग्रामने बोलायला सुरुवात केली.

संग्राम,“ संतोष कोण होता रे तो मुलगा इतकी दादागिरी करत होता?” त्याने विचारले.

संतोष,“ अरे तो आपल्या कॉलेजच मध्ये आहे दुसऱ्या वर्षाला राजवीर मोरे त्याच नाव आणि ती त्याची गँग होती. हे लोक अशीच दादागिरी करतात कॉलेज मध्ये आणि होस्टेलवर देखील!” तो सांगत होता.

सुशांत,“ त्यांच्या बद्दल रेकक्टर किंवा मग प्रिन्सिपॉलकडे कोणी तक्रार का नाही करत रे संत्या?”त्याने विचारले.

संतोष,“असा विचार ही मनात आणू नकोस!काल परवा नवीन आलेल्या एकाने त्या राजवीर बद्दल तक्रार केली त्याला समजले त्याने लय मारला आहे त्याला!” तो सांगत होता.

सुशांत,“ काय सांगतो काय? अरे पण प्रिन्सिपॉल काही बोलले नाहीत का यावर?”त्याने  विचारले.

संतोष,“ अरे ते प्रिन्सिपल म्हणे त्याचे नातलग आहेत मग कोण बोलणार सांग ना? त्याने या प्रकरणाकडे सरळ सरळ दुर्लक्ष केले आहे! मग रेक्टर तरी काय बोलणार! त्याच्या काकाची सॉफ्टवेअर कंपनी आहे म्हणे आणि त्याचे वडील त्यात पार्टनर! आता हा जोवर पास आउट होत नाही तो पर्यंत आपल्याला याची आणि याच्या गँगची दादागिरी सहन करावी लागणार आहे!” तो वैतागून म्हणाला.

सुशांत,“ संग्राम तू का गप्प रे?” कशी जायची आपली चार वर्षे आता आपण इथे शिकायला आलो आहोत की यांची दादागिरी सहन करायला!” तो दुःखी होत म्हणाला.

    संग्राम मात्र कसल्यातरी विचारात गढून गेला होता. तो काही उत्तर देत नाही हे पाहून संतोष म्हणाला.

संतोष,“ हे बघ सुशांत याच्या सारख शांत राहायला शिक तू पण!” अस म्हणून तो निघून गेला आणि संग्राम आणि सुशांत ही त्यांच्या रूममध्ये गेले.

      संग्राम आणि सुशांत निवांत झोपले असताना रात्री दारावर साधारण बारा वाजता थाप पडली आणि बाहेर गोंगाट ऐकू आला म्हणून ते दोघे बाहेर आले. पाहतात तर काय सगळ्या होस्टेलवर आलेल्या नवीन पोरांना नुसत्या अंडर वेअरवर रांगेत कोंबडा बनवून बसवले होते. त्यात मघाशीचा संतोष ही होता आणि समोर राजवीर फिदीफिदी हसत होता. 

राजवीर,“चला रे तुम्ही दोघे ही काडा कपडे  आणि व्हा कोंबडा!” तो हसतच म्हणाला.

संग्राम,“ मी असलं काही करणार नाही रॅगिंग कायद्याने गुन्हा आहे माहीत नाही का तुला?” तो शांतपणे म्हणाला.

राजवीर,“ ये कायदा मला नाही शिकवायचा! इथे माझा कायदा चालतो कळले!” तो खुन्नशीपणे म्हणाला.

संग्राम,“ मी झोपतो आहे. चल रे सुशांत!” तो  राजवीरचे बोलणे ऐकून न ऐकल्या सारखा  सुशांतला म्हणाला

राजवीर,“ ये चंपु स्वतःला शहाणा समजतो का तू?” असं म्हणून त्याने चिडून संग्रामची कॉलर धरली आणि संग्रामने त्याचा हात धरून मागे पिरगाळला आणि तो कळवळू लागला हे पाहून राजवीरचे मित्र मागे हटले आणि कोंबडा झालेली सगळी मुलं उठली आणि कपडे घालू लागली.

संग्राम,“ मी असलं काही करणार नाही म्हणालो होतो ना!” असं म्हणून त्याने राजवीरचा हात सोडला. राजवीर त्याचा हात झटकत त्याला रागाने म्हणाला.

राजवीर,“ आता तू गेलाच म्हणून समज रे तुझा बेड फिक्स कर हॉस्पिटलमध्ये!” असं म्हणून तो आणि त्याची गँग गेले.


           संग्राम शांतपणे रूममध्ये गेला आणि सगळी मुलं ही निघून गेली. कॉलेज नुकतेच सुरू झाले होते. त्यामुळे अजून विद्यार्थी येतच होते. त्यामुळे लेक्चर रेग्युलर अजून म्हणावे तसे सुरू झाले नव्हते. संग्राम आणि सुशांत तरी ही होस्टेलमध्ये बसून काय करायचे म्हणून कॉलेजमध्ये जाऊन बसत. राजवीर बरोबर संग्रामचा खटका उडून चार दिवस होऊन गेले होते. तरी होस्टेलमध्ये आणि कॉलेजमध्ये ही वातावरण शांत होते. पण, राजवीर गप्प बसणाऱ्यातला नव्हताच! हे कुठे तरी संग्रामला ही वाटत होते.  

      रोज प्रमाणे  संग्राम तयार होऊन कॉलेजला निघाला आणि एका मुलाने येऊन त्याच्या शर्टवर शाई शिंपडली. सगळ्यांना वाटले आता तो चिडणार पण संग्राम शांतपणे पुन्हा रूमवर गेला आणि त्याने शर्ट चेंज केला. तो कॉलेज कॅम्पसच्या गेटातुन आत गेला आणि एका  भरधाव टू व्हीलर वरून एक मुलगा आला आणि त्याने संग्रामची सॅग पळवली. त्या हिसक्याने संग्राम खाली पडला तो उठून कपडे झटकत उभा राहिला तर समोर राजवीर हजर होता. त्याच्या बरोबर अजून चार मुले होती. सगळ्यांनी त्याला घेरले आणि त्याच्यावर अट्याक केला. त्या सगळ्या झटापटीत संग्रामला हाताला खरचटले त्याचा शर्ट फाटला!पण संग्राम सगळ्यांना पुरून उरला.सगळी मुलं पळाली पण संग्रामला आता कळून चुकले की आता गप्प बसून चालणार नाही. त्याने सरळ सरळ त्याच अवतारात जवळचे  पोलीस स्टेशन गाठले आणि त्याच्या बाबांना बोलवून घेतले.  संग्रामचे बाबा लगेच आले. संग्राम पोलीस स्टेशनच्या बाकावर बसला होता. त्याला तशा अवस्थेत पाहून त्याचे बाबा त्याच जवळ गेले आणि त्याला विचारले; 

बाबा,“काय झालं चिनू? आणि तुला इतकं कस लागलं तुझा शर्ट कसा फाटला बेटा? कोणी केले हे?”ते काळजीने विचारत होते

      संग्रामने  पहिल्या दिवशी पासून घडलेला सगळा प्रकार त्यांना सांगितला. दोघांनी मिळून रॅगिंग आणि मारहाणीची कंप्लेट केली. संग्रामचे मामा पोलीस उप आयुक्त होते त्यांना ही त्याच्या बाबांनी बोलवून घेतले आणि पोलिसांनी कॉलेजच्या प्रिन्सिपलला फोन लावून राजवीर आणि त्याच्या साथीदारांना घेऊन अर्ध्या तासात हजर व्हायला सांगितले नाही तर मग पोलीस स्वतः जाऊन त्यांना घेऊन येतील अशी तंबी दिली. प्रिन्सिपल राजवीर आणि त्याच्या साथीदारांना घेऊन पोलीस स्टेशनमध्ये हजर झाले आणि त्यांच्या पालकांना ही बोलवून घेतले. राजवीरचे वडील आणि इतर पालक धावतच पोलीस स्टेशनमध्ये आले.

       इन्स्पेक्टरनी आता चौकशी सुरू केली.

इंस्पेक्टर,“ काय राजवीर मोरे! तुम्ही कॉलेजमध्ये शिकायला येता की दादागिरी करायला? हे प्रिन्सिपल तुमचे नातलग आहेत म्हणून कॉलेज काय तुमच्या बापाचे झाले काय?आणि काय व प्रिन्सिपल पाटील तुमचा नातलग आहे हा मोरे म्हणून तुम्ही काही ही खपवून घेणार का? तुम्हाला माहीत नाही का रॅगिंग कायद्याने गुन्हा आहे.. तुम्ही संग्राम सरदेसाईची रॅगिंग करण्याचा प्रयत्न केला होता ना राजवीर मोरे?” ते राजवीर वर ओरडले आणि राजवीर दचकला

राजवीर,“ नsss नाही! ते मी!” तो घाबरून तत पप करू लागला.

इंस्पेक्टर,“ मग हा खोटं बोलतोय का? आणि आज तर तुम्ही त्याच्यावर अट्याक केलात काय ओ मोरे साहेब तुमच्या मुलाला हेच संस्कार दिलेत का तुम्ही?आणि पाटील साहेब तुम्ही एव्हढे सगळे घडे पर्यंत झोपला होतात का?”त्यांनी विचारले.

प्रिन्सिपल पाटील,“ साहेब मला काहीच माहीत नाही यातले. हा मोरे माझा नातलग वगैरे कोणी नाही!” त्यांनी राजवीरकडे रागाने पाहत उत्तर दिले.


इंस्पेक्टर,“ मग Mr.संग्राम सरनाईक या राजवीर मोरे आणि त्याच्या मित्रां विरुद्ध F. R. I. नोंदवू ना? मारहाण आणि रॅगिंगची?” त्यांनी संग्रामकडे पाहत विचारले.

प्रिन्सिपल,“ काय F. R. I. मग या सगळ्यांना रेस्टीकेट केलेच म्हणून समजा!” ते तावातावाने म्हणाले. यावर Mr. मोरे म्हणजेच राजवीरचे वडील संग्रामच्या वडिलांसमोर हात जोडत म्हणाले.

Mr. मोरे,“ Mr. सरदेसाई प्लिज अस काही करू नका तुमच्या मुलाला थांबवा.मला माहित आहे राजवीरने चूक केली आहे पण आज जर त्याच्यावर आणि या पोरांवर F. R. I. दाखल झाली तर यांचे आयुष्य बरबाद होईल  हो! त्यात त्यांना जर प्रिन्सिपलने रेस्टीकेट केले तर मग संपलेच सगळे! मी तुमच्या मुलाची माफी मागायला लावतो हवं तर! हा आणि याचे मित्र पुन्हा तुमच्या मुलाच्या वाटेला जाणार नाहीत!” ते विनंती करत होते.


आता संग्राम काय निर्णय घेणार होता? राजवीर आणि त्याच्या मित्रांना सोडून देणार होता की त्यांना शिक्षा करायला लावणार होता? पाहूया पुढच्या भागात!

कथेचे सगळे अधिकार लेखिकेकडे राखीव आहेत.
सदर कथामालिकेचा रोज एक भाग पब्लिश होणार, दररोज दुपारी 3 वाजता. वाचनाच्या उत्कृष्ट अनुभवासाठी आजच ईरा app download करा.
 ©स्वामिनी चौगुले
 क्रमशः 

🎭 Series Post

View all