माझिया प्रियाला प्रीत कळेना पर्व २ भाग ६६

क्षितिराजचे मार्ग अभिराज म्हणाला तसे खरचं वेगळे होणार होते का?


भाग 66
आज संग्राम आणि गार्गीला उटीमध्ये येऊन पाच दिवस झाले होते.काल रात्री त्यांच्यात राजवीरवरून कडाक्याचे भांडण झाले होते आणि रात्रीच ते मिटले ही होते. संग्राम उठला तर गार्गी अजून झोपेतच होती. तो त्याच आवरून आला आणि गार्गीला उठवत म्हणाला.

संग्राम,“ उठा मॅडम नऊ वाजत आले.”

गार्गी,“ हुंम! संग्राम काल रात्रीसाठी सॉरी! मी तुझ्यावर इतकं ओरडायला नको होते.” ती उठून बसत बारीक तोंड करून बोलत होती.

संग्राम,“ सोड ना गार्गी आपल्या नात्यात एक अलिखित नियम आपण पाळतो की नाही आपल्यात भांडण झाले आणि दोघांपैकी एकाने सॉरी म्हणले की आपण ते भांडण ताणत नाही. असं ही मला भांडायला ही आवडत नाही आणि खूप काळ राग मनात ठेवायला देखील. रात गयी बात गयी! उठा आता मॅडम मी नाष्टा मागवला आहे फ्रेश होऊन या मग नाष्टा करू.” तो तिचा हात धरून तिला समजावत म्हणाला.

गार्गी,“ संग्राम यु आर सच अ स्वीट हार्ट! पण तुझ्या याच स्वभावाचा लोक फायदा घेतात असो! जी.डि. आय लव यु सो मच!” ती त्याला मिठी मारत म्हणाली.

संग्राम,“ आय नो दॅट डार्लिंग! बरं जा आता तयार होऊन ये ना मला भूक लागली आहे.” तो हसून म्हणाला.

गार्गी,“ हो!” असं म्हणून ती गेली.
★★★★

इकडे मुंबईत नेहमीप्रमाणे सगळ्यांचे रुटीन सुरू होते. सुशांत, आदिराज आणि अभिराज ऑफिसला गेले. सुशांत आदिराजला घेऊन मिटींगला गेला होता. अभिराज एकटाच ऑफिसमध्ये होता आणि क्षितिजा ऑफिसमध्ये आली. तिला पाहून रिसेप्शनिस्ट सुषमा खुश झाली.

सुषमा,“ व्हॉट अ प्लेजंट सरप्राईज क्षितिजा! किती दिवसांनी भेटते आहेस. कशी आहेस तू?” तिने हसून विचारले.

क्षितिजा,“मी मस्त आहे तू कशी आहेस? बरं सुषमा मला संग्राम सरांना भेटायचं आहे ते आहेत का ऑफिसमध्ये?”तिने विचारले.

सुषमा,“ म्हणजे तुला काहीच माहीत नाही? अगं संग्रामसर खूप आजारी आहेत. ते गेले बरेच दिवस झाले ऑफिसला येत नाहीत आणि कधी येणार आहेत ते देखील माहीत नाही.” ती म्हणाली.

क्षितिजा,“ काय? अगं काय झालं आहे संग्रामसरांना आणि ते आता कसे आहेत आता?” तिने काळजीने विचारले.

सुषमा,“ इतकं काही माहीत नाही पण ऑफिसमध्ये चर्चा होती की त्यांना सिव्हीयर स्ट्रोक आला होता म्हणे. चार-पाच दिवस तर कोणीच ऑफिसकडे फिरकले नव्हते. आता बरे आहेत म्हणे ते पण ते आणि गार्गी मॅडम अजून तरी ऑफिसमध्ये आले नाहीत.” ती म्हणाली.

क्षितिजा,“ बरं अभिराजसर आहेत का?” तिने विचारले. हे विचारताना तिला घाम फुटला होता पण तिने स्वतःला सावरले.

सुषमा,“ हो आहेत.”

क्षितिजा,“ मला त्यांना भेटायचे आहे. तू फोन करून विचार ना जरा!” ती म्हणाली.

सुषमा,“ बरं! हॅलो अभिराजसर मिस क्षितिजा पाटील आल्या आहेत ऑफिसमध्ये त्यांना तुमच्याशी भेटायचे आहे. पाठवून देऊ का त्यांना?” तिने विचारले आणि क्षितिजाचे नाव ऐकून अभिराजच्या काळजाचा ठोका चुकला. त्याने स्वतःला सावरले आणि म्हणाला.

अभिराज,“ द्या पाठवून.”

क्षितिजा त्याच्या केबीनमध्ये गेली. तिचे काळीज जोरात धडधडत होते. ती त्याच्यासमोर जाऊन उभी राहिली. दोघे ही एकमेकांना तब्बल दोन महिन्यांनी पाहत होते. दोघे एकमेकांना भान हरपून पाहत होते पण अभिराज सावरला आणि म्हणाला.

अभिराज,“ बसा मिस पाटील!”

क्षितिजा,“ खरं तर मी तुमची तेव्हाच माफी मागायला हवी होती सर मला माहित आहे मला यायला खूप उशीर झाला आहे. पण परिस्थितीच अशी होती की मला येता आले नाही. मी तुमच्याशी महाबळेश्वरमध्ये जे काही वागले त्याबद्दल रियली व्हेरी सॉरी सर! मी तुमच्याशी खूप पातळी सोडून वागले. तुमचा अपमान केला तुमच्यावर हात उचलला. तरी तुम्ही माझ्या बाबांना आगीतून वाचवले अगदी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता. तुमचे आभार कसे मानू आणि कोणत्या तोंडाने तुमची माफी मागू हेच कळत नाही. मला माफ करा सर मी खूप चुकले.” ती हात जोडून बोलत होती आणि तिच्या डोळ्यातून कढ वाहत होते.

अभिराज,“ मिस पाटील मी ते सगळं खूप मागे सोडून आलो आहे.” तो म्हणाला.

क्षितिजा,“ म्हणजे? सर तुम्ही मी तुम्हाला माफ करावं म्हणून तुमचे प्रेम स्वीकारावे म्हणून किती काय काय सहन केले आणि आज तुम्हीच असे बोलत आहात जेंव्हा मला माझी चूक उमगली आहे आणि माझे तुमच्या वरचे प्रेम मी स्वीकारायला तयार आहे.” ती आश्चर्याने म्हणाली.

अभिराज,“ कोणत्या प्रेमाबद्दल बोलत आहेस तू क्षितिजा ते प्रेम जे मिळवण्यासाठी मी तुझ्या मागे वणवण फिरलो. तुझा प्रत्येक त्रास सहन केला इतकंच काय तुझा मार देखील खाल्ला! तुझ्या वडिलांना वाचवून मी उपकार नाही केले. ती माणुसकी होती माझी पण एक वेळ मला झालेल्या त्रासाबद्दल मी तुला माफ करेन ही पण आधीच माझ्या वागणुकीमुळे दुखावल्या गेलेला अंकू माझा त्रास पाहून आणखीन खचला. माझ्या बाबतीत जे झाले त्याचे त्याने स्वतःच गिल्ट घेतले आणि त्याला सिव्हीयर स्ट्रोक आला. तो आठ तास मुदतीवर होता क्षितिजा! काही ही होऊ शकत होते. तो त्या आजारपणातून अजून सावरला नाही. त्याला काही झाले असते तर आंटीला, आदीला, आजी-आजोबांना मी काय तोंड दाखवणार होतो? परमेश्वराची कृपा आहे म्हणून तो आता बरा आहे. मी तू माझ्याशी जे वागलीस त्यासाठी तुला माफ करेनही पण माझ्यामुळे माझ्या तुझ्यावर असणाऱ्या प्रेमामुळे माझ्या अंकुला जो त्रास झाला त्याबद्दल स्वतःलाच माफ करू शकत नाही तर तुला काय माफ करणार मी! तुझं आणि माझं एकत्र येणं कदाचित त्या विधात्याच्या ही मनात नसेल.” तो डोळे पुसत म्हणाला.

गार्गी,“ सुषमा मला म्हणाली बाहेर की संग्रामसर आजारी आहेत म्हणून; माझ्यामुळे तुमच्या कुटुंबाला खूप त्रास झाला हे मान्य आहे मला पण सर माझे तुमच्यावर आणि तुमचे माझ्यावर प्रेम आहे. हे देखील सत्य आहे. मला माहित आहे स्वतःच्या देखील आधी तुमच्यासाठी संग्रामसर आहेत पण तुम्ही त्यांच्यासाठी स्वतःच प्रेम नाकारणं त्यांना तरी आवडेल का?” तिने कातर आवाजात विचारले.


अभिराज,“ या जगात जर माझ्यासाठी कोणी महत्त्वाचे असेल तर तो अंकू आहे. त्याने आणि आंटीने मी एक वर्षाचा असल्यापासून मला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपले आहे. आज देखील आदीपेक्षा ही त्यांचा कणभर माझ्यावर जास्तच जीव आहे आणि त्यांना माझ्याचमुळे माझ्या प्रेमामुळे त्रास झाला आहे. इतकी खंबीर असणाऱ्या आंटीला मी अंकूच्या काळजीने सैरभैर होताना पाहिले आहे. सतत हसमुख असणाऱ्या आदीला वडीलांना गमावण्याच्या भीतीने ढसाढसा रडताना पाहिले आहे. माझ्या डॅडला मॉमला मी गुपचूप अश्रू ढाळून पुन्हा आजी-आजोबांच्यासमोर जाताना पाहिले आहे. माझ्या डॉक्टर बहिणीला रात्रंदिवस अंकूच्या काळजीने झुरताना पाहिले आहे आणि इतके सगळे कशामुळे तर फक्त आणि फक्त माझ्या प्रेमामुळे मी तुझ्याकडे माफी मागायला आलो आणि ती दुर्घटना माझ्या बाबतीत घडली त्याच गिल्ट अंकुनी घेतले. त्याचाच परिणाम त्याच्या तब्बेतीवर झाला. जर माझे प्रेम माझ्याच माणसांना दुःख देणार असेल तर असे प्रेम मला नको आहे. तू आमच्या फॅमिलीमध्ये फिट बसू शकत नाहीस क्षितिजा कारण तू आत्मकेंद्रि आणि त्रिकोणी कुटुंबात वाढलेली मुलगी आहेस तू नाही समजू शकणार आमची नाती त्यामुळे प्रेम आणि बाकी सगळं आपण न बोललेलंच बरं! बाकी तू कंपनीची एम्प्लॉइ आहेस तर त्याबद्दल काय असेल तर बोल!” तो कातर आवाजात पण ठामपणे म्हणाला. त्याच बोलणं ऐकून क्षितिजा हतबल झाली आणि ती डोळे पुसून त्याला म्हणाली.

क्षितिजा,“ ठीक आहे माझ्या चुकांची हीच शिक्षा असेल तर ती मला मान्य आहे. मला खरं तर माझ्या बदली संदर्भात संग्रामसरांना भेटायचे होते पण ते नाहीत म्हणल्यावर; हा माझा बदलीचा अर्ज!” ती लिफाफा त्याच्यासमोर ठेवत म्हणाली.

अभिराज,“ तुला अपॉइंट अंकलने केले आहे. तुझी पुण्याला बदली ही त्यानेच केली आहे. त्यामुळे मला तुझ्याबद्दल कोणता ही डिसीजन घेण्याचा अधिकार नाही. तो हवापालटासाठी आऊट ऑफ टाऊन आहे. आठ दिवसांनी घरी येईल पण ऑफिसमध्ये कधी येईल मला माहित नाही. तू तुझा मोबाईल नंबर रिसेप्शन जवळ देऊन पुण्यात जॉईन कर. अंकू आला की तुला ऑफिसमधून कॉल येईल. तू जाऊ शकतेस.” तो म्हणाला आणि क्षितिजा रिसेप्शनजवळ मोबाईल नंबर देऊन निराश होऊन निघून गेली.

क्षितिराजचे मार्ग अभिराज म्हणाला तसे खरेच वेगळे होणार आहेत का? अभिराज क्षितिजाला कधीच माफ करू शकणार नाही का?
©स्वामिनी चौगुले

प्रिय वाचक हो,

तुम्ही जशी लेखकाकडून उत्कृष्ठ लेखनाची अपेक्षा करता आणि कथेचे भाग न चुकता रोज यावेत अशी अपेक्षा करता तशाच लेखकाच्या ही तुमच्याकडून अपेक्षा असतात त्या म्हणजे तुम्हाला कथा कशी वाटत आहे कथा योग्य दिशेने सुरू आहे का?याबद्दल लेखकाला तुमच्या प्रतिक्रिया हव्या असतात. तुम्ही जशी कथेच्या पुढच्या भागाची आतुरतेने वाट पाहता तसेच आम्ही देखील तुमच्या प्रतिक्रियेची वाट पाहत असतो. म्हणून नुसतेच बदाम आणि ईमोजी न देता शब्दात प्रतिक्रिया द्या ही नम्र विनंती! कारण तुमचे शब्द आम्हाला प्रेरणा देतात!

🎭 Series Post

View all