माझी सहल

Travelogue Of Kokan

माझी सहल
इयत्ता ७ वी पर्यंत compulsory असलेला निबंध.. त्या वेळेस सगळा निबंध काल्पनिक असायचे किंवा वडिलांच्या मदतीने लिहिलेले असायचे. कारण लिहिण्याचा आणि विचार करायचा प्रचंड कंटाळा यायचा , पण आजचा निबंध मात्र अगदी खरा आहे.. लग्नानंतर जेव्हा जेव्हा बाहेर फिरायला जायचो तेव्हा घरातल्यांसोबतच जायचो.. पण यावेळेस अगदी ठरवूनच आम्ही तिघांनीच जायचे ठरवले होते.पण नेहमीप्रमाणेच सुट्टयांची अडचण.. तसेच सिझन असल्यामुळे booking ची थोडी धाकधूक होती.. पण अनायसे ४ दिवस आधी सुट्टी आणि booking दोन्ही confirm झाले.. ठिकाण होते तिघांचेही आवडते कोकण.. आमच्या अहोंना एवढे अंतर चालवता येईल का अशी थोडी भिती होती.. पण धाडस करायचे ठरवले आणि निघालो. माझ्या सगळ्या भावंडांनी एक दिवस आधीच भाऊबीज साजरी करून मस्तच गिफ्ट दिले.. on the way तिघांची आवडती गाणी ऐकत प्रवास सुरू झाला.. आणि मनापासून कोकणात जाणाऱ्यांची दया आली ..almost हजारोंनी माणसे कोकणात चालली होती.. पण रस्ते? कोणाची हिंमत वेगाने गाडी चालवेल? रस्त्यात खड्डे कि खड्ड्यात रस्ता हा नेहमीचाच प्रश्न.. जवळपास २५० किलोमीटरचा प्रवास.. पण थकवा मात्र हजार किलोमीटरचा.. त्यामुळे गाडीची आणि माणसांची झालेली खिळखिळी अवस्था.. पण या वेळेस कोणत्याही गोष्टीचा त्रास करून घ्यायचाय नाही असे ठरवले होते.. त्यामुळे प्रयत्नपूर्वक तो विषय बाजूला ठेवायचा प्रयत्न केला.. आणि hotel Arabian sea वर पोचलो. Spot ladghar.. हॉटेल जिथे संपत होते तिथे समुद्र सुरू होत होता.. त्यामुळे कशातरी खोलीत बॅगा टाकून आम्ही दोघी मायलेकी समुद्रावर पळालो .. आल्यावर मस्त जेवणावर ताव मारून गप्पा मारत बसणार इतक्यात पावसाने दिलेल्या धावत्या भेटीमुळे खोलीत जावे लागले... कितीतरी दिवसांनी पहाटे पाच वाजता उठल्यामुळे प्रचंड झोप येत होती. झोपतोय न झोपतोय तोच तिकडच्या शेजाऱ्यांनी इमानेइतबारे खोलीबाहेर आरडाओरडा करून झोपमोड करायचे पुण्यकर्म केले.. असो.. दुसर्‍या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणेच लवकर जाग आली. पण आज समोर आयता चहा होता आणि नाश्ता स्वयंपाक, जेवणाच्या वेळा कशाचेच टेन्शन नव्हते.. मस्त किनार्‍याच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत चालणे झाले. आल्यावर परत आयता चहा.. आयुष्यात अजून काय पाहिजे. थोडा लिखाणाचा, वाचनाचा प्रयत्न केला.. पण शेजाऱ्यांनी जोरजोरात गाणी लावल्यामुळे ती ऐकण्याचाच प्रयत्न केला.. आमच्या हॉटेलच्या इथेच लोकमान्य टिळकांची सासुरवाडी होती.. ती पाहून आलो , तिथे त्यांनी जुने घर जतन करून ठेवले आहे.. खूप सारी झाडे.. त्यांची नीट राखलेली निगा.. त्यामुळे आणि जडलेल्या वाईट सवयीमुळे झाडांची कटिंग मिळेल का असे शब्द निघून गेले.. त्यांनी न अडखळता हो म्हटले पण शुद्धीत आल्यावर फक्त दोनच झाडांच्या कटिंग घेतल्या.. या वेळेस जास्त फिरायचे नाही असे आधीच ठरल्यामुळे जास्त दगदग करायची नव्हती.. पण दाभोळच्या चंडिकामंदिराबद्दल खूप ऐकले होते..आणि अनेक वेळा कोकणात येऊनसुद्धा ज्या गोष्टी राहिल्या होत्या त्याच करायचे ठरले होते..सुरुवात केली परशुराम स्मारकाने. भला मोठा पृथ्वीचा गोल आणि त्यावर उभी परशूरामांची मूर्ती. अतिशय विलोभनीय दृश्य. कौतुक त्या व्यक्तीचे ज्याने हे केले वा करून घेतले..नंतर गेलो दाभोळला .मंदिर खडकात आहे.. आतमध्ये कृत्रिम दिवे टाळले आहेत.. त्यामुळे थोडेसे वेगळेच वाटले.. तिथून निघताना कळले कि गाडीचा एक दिवा लागतच नाहीये ... त्यात गुगलमॅप आणि माझ्यामध्ये झालेल्या miscommunication मुळे आम्ही रस्ता चुकलो.. पण तरिही लवकर पडणाऱ्या अंधाराने आणि रस्त्याने थोडासा प्रसाद दिलाच.. पण नशिबाने कुठून तरी एक गाडीवाला पुढे आला आणि त्याच्या taillights च्या मदतीने कसेतरी हॉटेल वर आलो..आकाशात चंद्र कोर आणि शुक्र मस्त दिसत होते.. त्यांचा पटकन एक फोटो घेतला.. नंतर परत येईपर्यंत चांदोबा मात्र गायब झाले होते .. जणू काही आम्ही फोटो काढण्यासाठीच ते थांबले होते.. तिसर्‍या दिवशी फक्त केशवराज मंदिरात जायचे होते.. याही मंदिराबद्दल खूप काही ऐकले होते.. फक्त तिथे असलेल्या ३०० पायर्‍या सोडून.. त्यामुळे त्या चढताना अक्षरश घामटा निघाला.. पण आजूबाजूची दृश्ये अवर्णनीय... नंतर शास्त्र असल्याप्रमाणे काजूखरेदी आणि आम्ही back to hotel..आल्यावर परत सूर्यास्ताचे फोटोशूट आणि आमचेही...तिथल्या हॉटेलच्या मालकांशी भरपूर गप्पा..त्यातून कळलेली महत्त्वाची माहिती.. तो किनारा फक्त पर्यटन व्यवसायावर चालतो म्हणून ते सगळे पैसे देऊन रोजच्या रोज कचरा उचलून किनारा स्वच्छ ठेवायचा प्रयत्न करतात..
पण आता मला बर्‍याच ठिकाणी आलेला अनुभव.. जिथेतिथे पडलेल्या दारूच्या बाटल्या, प्लॅस्टिकचे रॅपर..आपल्याला निसर्ग सौंदर्य अनुभवायचे आहे.. मजा करायची आहे मग ही अशी घाण का करायची? मगाशी उल्लेख केलेले शेजारी रोज रात्री दारू पिऊन आरडाओरड करत होते.. मालकांनी याची तक्रार केल्यावर त्यांच्याशी भांडण.. हि अशी enjoyment? आपल्या सारखेच दुसरेही सुट्टीवर आले आहेत.. कोणाला शांतता हवी असेल तर कोणाला झोप याचा काहीच विचार करायचा नाही.. आणि दारूच जर प्यायची आहे तर बार आहेत ना? मग अशा ठिकाणी जाऊन घाण का करायची? आणि तुम्ही एवढेच निसर्ग प्रेमी आहात तर त्याची काळजी कोणी घ्यायची? बर्‍याच जणांना माझी ही मते backward वाटतात.. पण मला तरी सहल आणि दारू हे समीकरण पटतच नाही.. असो.. विषय परत आमच्या सहलीवर... स्वच्छ हॉटेल , सुंदर जेवण, एकमेकांसोबत घालवलेला quality timeआणि top of it पालीच्या बाप्पाचे दर्शन.. अनेक दिवसांनंतर खरेतर वर्षांनंतर एक छान सहल.. सारिका