माझी माऊली

Mother is a full of love...always caring her children and her relation also

माझी माऊली....

माऊली म्हणजेच आई...आई विषयी कितीही लिहिण्याचे ठरवले तर शब्द अपुरे पडतात,..आणि माझी माऊली तिच्या विषयी लिहायला नेमके कुठून सुरुवात करू हाच प्रश्न मला पडला...

माझ्या आई चे सोळाव्या वर्षी लग्न झाले,..अन् लग्न ही भर पावसात झाले...इकडे लग्न चालू अन् तिकडे धो धो पाऊस चालू...त्यामुळे आई बाबांचे लग्न अगदीच साधेपणाने झाले,...लग्नात म्हणे आईला फारशी हौश करायला मिळाली नाही...अन् माझ्या बाबांना देखील साधेच राहणीमान आवडते,पण कदाचित आईची ती इच्छा अपूर्ण राहिली असावी...

माझी आई एक असे व्यक्तिमत्व जीला तिच्या लहानपणी चार भावंडांची आई व्हावं लागलं,..आईचे बाबा आईच्या लहानपणीच वारले...घरात पाच भावंड आणि माझी आजी असे कुटुंब,आता घरात पुरुष नसल्यामुळे माझ्या आजीला घरखर्च भगविण्याकरिता शेतात जावे लागत असे,मग काय आजी दिवसभर घराबाहेर अन् घरातील सर्व जबाबदारी माझ्या आईला पार पाडावी लागत होती...

आई तिच्या लहान भवांडाची आई होऊन सर्व काही करत होती,लहान मामा तर फक्त 11महिनाच्याचे होते...अन् माझ्या आईचे तरी वय किती होते लहानशी पोर ती...सर्वकाही मोठ्या कर्तुत्वाने पार पाडत होती...तिला तर बालपण कशाला म्हणतात हे देखील माहीत नव्हते...

असेच सर्व काही चालू असताना एक चांगला सोयरा आला म्हणून आजी ने आईचे 16व्या वर्षी बाबांसोबत लग्न लावून दिले,नोकरी असल्यामुळे फार काही चौकशी न करता लगेच लग्नाला होकार दिला...शेवटी आजीला आईच्या नंतर तीन मुलं एक मुलगी आणखी त्यामुळे जास्त विचार न करता आईचे लग्न पार पडले...

लग्न करून आई सासरी आली,..इकडची आजी थोडी कडक स्वभावाची होती,त्यामुळे आई सासूबाई ला थोडी घाबरत होती...पण आईने जसे आजी म्हणेल तसेच वागून आजी चे मन जिंकून घेतले,...मग काय आजी ला पण आई खूप जवळची वाटत होती...इतकी जवळची की बाबा अन् आई मध्ये जर काही भुणभुण झाली तर आजी नेहमी माझ्या आई ची बाजू घ्यायची...

बाबा धरून तीन भाऊ पण दोन्ही काकांकडे आजीसाठी जागाच नव्हती,...आजी सुरूवातीपासून तर शेवट पर्यंत आमच्या सोबतच राहत होती...तिला आम्ही म्हणजेच आई अन् बाबांनी कधीच दूर केले नाही,बाबा तर आजी ला खूप जीव लावायचे,परिस्थिती थोडी बिकटच पण आनंदाने मी माझे दोन भाऊ,आई ,बाबा ,अन् आजी राहत होतो...थोडक्यात फार समाधान होत...अन् विशेष म्हणजे मी आजीला व आईला कधीच भांडताना बघितलं नाही,दोघीही एकमेकींना समजून घ्यायच्या....

आजी वारली तेव्हा आई बाबां पेक्षा जास्त रडत होती,खूप सेवा केली आईने आजीची...कधी बिचारीला दुखविले नाही...जातांना आईच्या हातचा चहा सुध्दा आजी प्यायली होती,..मला तर आजही विचार येतो आई अन् आजी चे कसेकाय पटत होते...आईला लहानपणा पासूनच कामाची सवय ,कामासाठी बिचारी कधी नाही म्हणत नाही,,आजी गेल्यानंतर सर्व काम आई घरात एकटीच करत होती...मला आईने कधीच काम करू दिले नाही....

तिची एकच इच्छा होती..ती हुशार असून सुध्दा तिला शिक्षण पूर्ण करता आले नाही त्यामुळे मुलीला मी पूर्ण शिकवणार...म्हणून मला तिने कधी काम करूच दिले नाही,फक्त अभ्यास कर तेवढंच तीच सांगणं...अन् मग मलाही कामाचा कंटाळा येत होता...इतर मुली प्रमाणे मी आईला घरकामात मदत करत नव्हती,तेव्हा काही वाटत नव्हते पण आज पश्र्चाताप होतो..जर मी पण आईला थोडी कामात मदत केली असती तर.....कारण सासरी येऊन तर आपल्याला सर्वच करावे लागते...मला आजही खूप वाईट वाटत की आपण आपल्या आईला कामात कधी सुख दिलच नाही.....आई ला या गोष्टीचं काहीच वाटत नाही..माझ्या आईचा मोठेपणा तो....मी शिकली यातच तिला समाधान...


अधून मधून एखादे काम मी करत होती,जेणेकरून लग्न झाल्यावर कोणी माझ्या आईवर बोट उचलू नये...की तुझ्या आईने तुला काही शिकवले नाही....

आईला सुख फार कमी मिळाल पण थोडक्यात आई खूप समाधानी,ती कसलीच अपेक्षा ठेवत नाही जे आहे त्यात समाधानी...

आईकडून खूप काही शिकण्यासारखे असते,पण आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही....घरची परिस्थिती बेताची असून सुद्धा आईने आम्हाला कशाची कमी पडू दिली नाही,...

आईने दुसऱ्यांना कायम समजून घेतले,म्हणूनच आत्या काका आईच्या हाताखाली दहा वर्षे राहिले म्हणजेच त्यांचे लग्न होई पर्यंत पण कधीच त्यांच्या सोबत भांडण वैगरे झाले नाही...तसेच आमच्या कडे माझी आते बहीण व आते भाऊ शिकायला होता त्यांचा देखील आईने अगदी प्रेमाने आट काढला...कधी त्यांच्यावर रागावली नाही..माझी आतेबहिन व आते भाऊ आजही आईचे कायम नाव काढत असतात...

सासरी आईने आमच्या सोबतच नणंद दिर भाचा भाची या सर्वांना आपुलकीची वागणूक दिली ,त्यांच्या सोबत नेहमी प्रेमाने वागली... खरंच आईमध्ये खूप सहनशक्ती आहे...मी आईला नेहमी कष्ट करतांना च बघितले अन् आजही आई सकाळी च उठून सर्व कामे करत असते...

मला तर नेहमी विचार येतो आईच्या वयाची ज्यावेळी मी होईल त्यावेळी माझ्याकडून आई येवढे कामे होईल का??

आईला तोडच नाही ...आईला कामाचा अजिबात कंटाळा नाही...केव्हा केव्हा आईला समजून घेण्यात मी कमी पडत होते पण आज मी जेव्हा स्वतः एक आई झाले तेव्हा मला आईचे खूपच कौतुक करावेसे वाटते...स्वतः कडे दुर्लक्ष करीत आईने कायम आमचा विचार केला...आम्हाला शिकवले नोकरीवर आम्ही लागलो...यात आईचे मोलाचे श्रेय आहे...

अशा माझ्या माऊली ला शत शत प्रणाम.....

Ashwini Galwe Pund