माझी मानवी... 3

A story about love, friendship, kindness & relationship.

मॅनहॅटन, न्यूयॉर्क मध्ये एका आलिशान स्टुडिओ अपार्टमेंट मध्ये राहुल ला पॅकिंग करताना १ बॉक्स सापडतो.. त्या बॉक्स मध्ये १ काचेची बरणी आणि खूप सारे लेटर्स  असतात..

"ओह .. हा बॉक्स इथे होता तर.. ", निव्वळ तो बॉक्स बघून त्याच्या चेहऱ्यावर मोठी smile आलेली होती.. काचेच्या बरणी मध्ये एका puzzle चे खूप सारे तुकडे भरलेले होते.. तो ती बरणी बाजूला ठेवतो आणि ती लेटर्स हातात घेतो.. वाचता वाचता त्याच्या चेहऱ्यावर अजून हि ती smile कायम होती.. शेवटची काही पत्रे मात्र ‘लेटर रिटर्नड टू सेंडर’ असा शिक्का घेऊन आली होती.. त्यानी ती शेवटची पत्र हातात घेतली.. त्यावर च्या नावावरून मायेनी हात फिरवला.. - मानवी कुलकर्णी..

काही तरी ठरवून त्यानी लॅपटॉप हातात घेऊन सर्च करायला सुरुवात केली..

************

मानवी चा फोन अजूनही रिपेअर झाला न्हवता.. तिला आता प्रत्येक वेळी स्नेहल च्या कॉम्पुटर वर लॉग इन करून जॉब्स साठी अँप्लिकेशन द्यावे लागत होते.. तिचे पार्ट टाइम जॉब्स चालूच होते पण दमून जाण्या पलीकडे त्यातून काही मिळत न्हवते.. स्नेहल चा आणि तिचा दंगा नेहमीप्रमाणे चालूच होता.. आज मात्र मानवीनी घरी १ चक्कर मारायची ठरवली होती.. बरेच दिवस झाले ती घरी गेली न्हवती आणि कॅफे मध्ये पण वीक डे ला गर्दी कमी असते म्हणून तिला सुट्टी ची परमिशन मिळाली होती ..

तिच्या आई वडिलांचं छोटास घर बोरिवली मध्ये होत.. आणि घरातच बाहेरच्या साईड ला त्यांचा छापखाना होता.. ज्या वेळी त्यांचा बिजनेस बुडाला तेव्हा त्यांची जी काही थोडीफार शिल्लक होती त्यातून त्यांनी हि टुमदार वास्तू उभी केली होती.. चारचाकी लावायला जागा न्हवती पण घराभोवती निगुतीनं ठेवलेली बाग आणि मोठी झाडं रस्त्यावर सावली देत असायची.. उन्ह कलताना मानवी गेट उघडून आत आली.. छापखान्यात अजूनही आवाज येत होता.. म्हणजे तिच्या वडिलांचं काम अजूनही चालू होत.. मानवी सरळ मागच्या दारानी गेली आणि जाळीचं दार उघडून आत आली.. ती अशी मागच्या दारानी आलेली पाहून स्वयंपाकघरात कुठला तरी मसाला बनवण्याचे जिन्नस काढणारी आई एकदम दचकली..

"अरेच्चा माझं पिल्लू इकडून कस आलं ?", मानवी च्या आईची हि सवय स्नेहल ला पण आवडायची.. त्यांच्या चेहऱ्यावरून कळायचं कि समोरच्याच्या येण्याने त्यांना किती आनंद झालाय..

"आई.... "असं म्हणत मानवी पण गळ्यात पडली...

"कशी काय आठवण आली मॅडम ना आज घरची? आणि चप्पल कुठे आहे ग तुझी?"

"पुढे काढून ठेवली व्हरांड्यात.. "

"आणि अनवाणी आले म्हणावं तशीच मागच्या दारानी.. "

"हो मग?! मला माहिती होत.. बाबांचं काम चालूये म्हणजे पुढच्या खोलीत तू असणार नाहीस.. आणि अजून मेधा ची (मानवी ची धाकटी बहीण ) यायची वेळ नाही झाली म्हणजे तु स्वयंपाकघरात असणार.. म्हणून डायरेक्ट मागून एन्ट्री केली.. आता जाते आणि हातपाय धुवून येते.. "

"हुशार आहे अगदी माझी लेक ", मानवीच्या आईनी हसत उत्तर दिले..

मानवी फ्रेश होऊन आली.. तोवर आईने तिच्या आवडीचा पोळीचा चिवडा आणि शेंगदाण्याचा लाडू ठेवला होता..

" मस्तच झालाय हां आई .. ", १ घास खाऊन मानवी नि दाद दिली..

"सावकाश खा.. आज झोपायला थांबणारेस ना कि धावती भेट आहे?" , आई ..

"नाही ग आई.. उद्या सकाळी जायचंय ना लायब्ररी मध्ये.. आज फक्त कॅफे मध्ये सुट्टी टाकली.. "

"असं केलस होय? बर बरं.. नाहीतर स्नेहल ला इथेच बोलावलं असतंस जेवायला म्हणजे ती गाडी घेऊन आली असती तिची.. जेवण करून गेला असता दोघी एकत्रच.. "

"नको ग आई.. ती कधी नाही म्हणत नाही पण तिचे बाकीचे पण प्लॅन्स असतात.. आणि तू म्हणालीस कि ती सगळं सोडून धावत येते.. मी जाते ना बाबांना भेटून.. ९. ३० पर्यंत पोचेन घरी.. "

"लवकर निघ मग.. आणि स्नेहल ला हवा तर मेसेज टाक माझ्या मोबाईल वरून म्हणजे उशीर झाला तर ती स्टेशन वर घ्यायला तरी येईल कार मधून.. मोबाईल परत पाण्यात टाकला आपण मॅडम.. असं कस ग मानवी तुझं काम.. थोडं लक्ष देत जा ना ग बाळा .. ", बोलता बोलता आईच लक्ष मानवी च्या चेहर्या कडे गेलं.. मानवीच्या चेहऱ्यावर चे भाव बघून ती जवळ आली.. तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली, "काय झालं पिल्लू? कसला विचार करतीयेस ?"

मानवीच्या डोक्यात त्या दिवशीचा पार्टी च्या वेळचा प्रसंग आला होता.. पाण्यात ती पडलीये या कडे सगळ्यांनी जस दुर्लक्ष  केलं होत..जस काही तीच अस्तित्व च नाकारलं होत..

"आई.. " मानवीनी एक मोठा श्वास सोडून शब्द जुळवायला सुरुवात केली..

" दिसणं एवढं matter करत का ग? म्हणजे बघ ना .. परवाचंच उदाहरण घे.. मी हे स्नेहल ला पण बोलले नाही..  मी interview ला गेले होते ना परवा .. त्या दिवशी अजून १ candidate होती.. जिचे टोटल मार्क्स माझ्या पेक्षा हि कमी होते.. पण.. पण ती दिसायला छान होती.. एकदम girly girl म्हणतात तशी.. मी नक्कीच तिच्या पेक्षा जास्त काम करू शकले असते पण.. पण त्यांनी तिला सीलेक्ट केलं..ती माझ्या नंतर च्या राऊंड मध्ये सिलेक्ट झाली होती.. म्हणजे दिसण्याला पण महत्व आहे हे त्या दिवशी कळालं मला.. माझे कष्ट कमी पडतील कि काय असं वाटतंय मला.. पहा ना तिशी ला आले मी.. कुठाय मी आजमिती ला? अजून पायावर उभी नाही .. मेधा साठी काही करावं असं वाटत होत मला.. आता वाटतं.. माझं तरी मला काही करता येणारे कि नाही.. !? कुठं चुकलं का ग आई माझं?"

मानवी ची आई लक्ष देऊन ऐकत होती..

त्या दोघींना माहिती न्हवत पण तिचे बाबा पण खोलीच्या बाहेरून दारात उभे राहून ऐकत होते.. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होत.. मानवी असं बोलणारी मुलगी न्हवतीच कारण.. नेहमी दंगा करणार.. मेधा ला चिडवणार.. बाबांशी गोड बोलणार.. ती घरी आली कि त्यांना घर भरल्या सारखं वाटायचं.. त्यांचा हळवा कोपरा होती मानवी.. अभिमान होती त्यांचा  मानवी.. पण आज तिचा कुठे तरी हरल्या सारखा स्वर ऐकून त्यांना आपण मुलांना द्यायला कमी पडलो असं वाटलं .. तिशीला आली लेक आपली.. एव्हाना तीच लग्न करायला हवं होत आपण असंही वाटून गेलं त्यांना.. पण त्यांनी तो विचार झटकला.. जोवर मुली स्वतःच्या पायावर उभ्या राहत नाहीत तोवर तो विषय पण काढायचा नाही हे त्यांनी केव्हाच ठरवलं होत.. स्वतःच्या अनुभवातून त्यांना असं वाटायचं कि मुलींनी स्वतःच्या पायावर उभं राहणं महत्वाचं आहे कारण वेळ काही सांगून येत नाही.. चांगली परिस्थिती कशी पालटली होती ते त्यांनी पाहिलं होत.. आणि अशावेळी आपल्या आपल्या म्हणणाऱ्या प्रत्येक नातेवाईकांनी फिरवलेली पाठ हि त्यांना चांगलीच लक्षात होती.. त्यामुळे समाजाच्या दबावाला बळी पडून घाई घाईत त्यांना तीच लग्न उरकायच न्हवत.. आत्ता ते मानवीची आई काय उत्तर देते त्या कडे कान लावून ऐकू लागले..

"हे बघ बाळा.. दिसायचं म्हणशील तर मला खरंच अगदी मनापासून वाटत कि दिसणं मॅटर नाही करत.. तू माझी मुलगी आहेस म्हणून नाही म्हणते मी.. तुला हि माहितीये तू तुझ्या वडिलांच्यावर गेलीयेस.. त्यांच्या सारखेच केस आहेत.. गालांवर पण हे लाल freckles आहेत उन्हामध्ये फिरल्याने येणारे.. "आई तिच्या गालावर हात फिरवत किंचितशी हसली.. आणि पुढे बोलायला लागली..

"तू तर माझी मुलगी आहेस पण तुझ्या वडिलांना तर मी सिलेक्ट केलं ना लग्नासाठी? का बरं ? मी हि दिसायला सुंदर आहे.. मला त्यांच्याहून छान दिसणारे मुलं मिळाली असतीच ना.. ? पण पाहतियेस तू आज कि मी किती खुश आहे त्यांच्या सोबत ते.. फक्त दिसणं मॅटर नाही करत बाळा.. माणूस कसा आहे हे जास्त मॅटर करत..

आणि तुला तुझ्या जॉब च टेन्शन आहे ना ? तूच सांग आता स्नेहल सोडली तर तुझ्या किती मैत्रिणी आहेत ज्या स्वतःच्या पायावर उभ्या आहेत? किती तरी जणींची लग्न झाली.. ज्या कुणी करत होत्या जॉब्स त्यातल्या काही जणांचे जॉब्स पण गेले ना.. किती बाकीचे प्रॉब्लेम्स असतात मुलींना.. घरातून हवं तसं स्वातंत्र्य नसत, सपोर्ट नसतो.. काहींची करिअर फुलत असतानाच त्यांच्या वर संसाराची जबाबदारी टाकली जाते.. वाढत्या वयाचं कारण किती तरी मुलींना ऐकावं लागत आणि घरच्यांच्या दबावाला सामोरं जाऊन जॉब सोडावा लागतो.. एक ना अनेक.. कित्ती अडचणी येतात मुलींना.. तसं आहे का काही तुझं? सांग तूच? जोवर तू स्वतःच्या पायांवर उभी राहत नाहीस.. तुला जे हवंय ते करत नाहीस तो वर आम्ही तुला कसलंही pressure येऊ देणार नाही.. आणि तू हि स्वतःला सिद्ध करून दाखवत आलीच आहेस ना बाळा.. किती वर्ष झाले तू कुठे ना कुठे पार्ट टाइम जॉब करत आलीयेस.. आता हत्ती गेला आणि शेपूट राहिलंय.. आता नको अशी हार मानुस  आणि उदास होऊस ग पिल्लू.. तुझी किंमत करणारी कंपनी तुला नक्की मिळेल.. अगदी पर्मनन्ट जॉब ऑफर करतील तुला.. नको तू काळजी करुस.. तुला पैशांची गरज असेल तर सांग! मी मसाले विकून थोडे फार साठवलेत पैसे.. त्यामुळे तशी हि काळजी करू नकोस.. देऊ का पैसे थोडे ? असावेत तुझ्या कडे.. "

"नको ग आई.. नको.. पैसे आहेत माझ्या कडे.. या टॉनिकचिच कमी होती बघ.." असं म्हणून मानवी नि मिठी मारली आई ला..

"असं आहे काय? आणि अजून एक.. परत दिसण्यावरून काही ऐकून नाही घेणार हां मी.. माझ्या नवऱ्याच्या दिसण्याला नावं ठेवतेस काय गधडे ?!" आई नि हसून पाठीत धपाटा घातला.. तशी मानवी हसली..

"एवढं प्रेम? क्या बात है आई.. "

"मनु पण खरंच जर का तू स्वभावाने सुद्धा ह्यांच्या वर गेलीस ना तर तुझ्या नवऱ्या सारखा भाग्यवान कोणी नाही बघ.. कोणत्या कोणत्या परिस्थिती तुन गेलो आम्ही.. पण केवळ हे होते बरोबर म्हणून मला त्याही वेळी फक्त सुखच मिळालं.. ऐकताना विचित्र वाटेल तुला पण, पुढे असेही दिवस दिसतील हे मला कुणी आधी जरी सांगितलं असत ना.. तरी मी ह्यांच्याशीच लग्न केलं असतं.. ह्यांच्या सारखीच स्वभावाने पण हो बघ.. "

इतका वेळ दोघींचा लपून संवाद ऐकणारे मानवी चे बाबा आता आवरायला आत मध्ये गेले.. जाताना त्यांच्या चेहऱ्यावर च काळजीच मळभ निघून जाऊन त्याची जागा समाधानाच्या स्मितहास्यानी घेतली होती..

"आत्ता च तर म्हणालीस ना मी बाबांच्या वर गेलीये.. ? Kindness is the key हे बाबांच्या प्रमाणे माझं पण ब्रीद वाक्य आहे म्हटलं " मानवी इकडे आता आई ला चिडवायच्या मूड मध्ये आली होती...

आईनी थोडं निरखून तिच्या कडे पहिल्या सारखं केलं आणि म्हणाली.. "सुधारणेला अजून वाव आहे म्हणून म्हटलं.. "

"हॉ!!!... तुझ्या सारखा माझं एवढं कौतुक करणारा नवरा मिळेल का पण?" मानवी नि तोंडात अख्खा लाडू कोंबून म्हटले..

"आधी जॉब च रांकेला  लागू दे.. नवऱ्याचं नंतर बघू.. "

" हा.. मशीन चा आवाज बंद झाला का ग?.. बाबा आत आलेले दिसतायेत.. ", मानवी ने कानोसा घेत विचारलं..

"खरंच कि ग.. बोलण्याच्या नादात लक्षात च नाही आलं..आता आपल्या तिघांच्या साठी ठेवते चहा.. "

"आणि मेधा कधी येईल ?"

"अग तिची ट्युशन संपून यायला ७. ३० तरी होतात.. ती काय जेवायला च असते संध्याकाळी.. "

"अच्छा.. आई... तू स्नेहल ला बर्थडे विश करायला कॉल केला होतास ना ग? तिनी सांगितलं मला.. "

"हो ग.. तुम्हा मुलींचे वाढदिवस आम्ही आया कशा विसरू.. ? जशी तू तशीच ती पण आहे माझी मुलगीच.. "

"आई.. तू काकूंच्या अजून कॉन्टॅक्ट मध्ये आहेस? " मानवी नि हळू आवाजात विचारलं..

चहा च आधण ठेवून आई ने वळून तिच्या कडे पाहिलं आणि म्हणाली..

"मैत्रीण आहे ती माझी.. स्नेहल च्या बाबांच्यात आणि तिच्यात जे झाले तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न होता.. त्या दोघांचा डिवोर्स आमच्या मैत्री मध्ये कसा येईल? "

"आई.. पण तुला माहितीये ना स्नेहल नि काकूंशी संबंध तोडलाय.. तिला कळालं तर भडकेल ती.. "

"हे बघ मानवी.. तुम्ही तुमच्या teenage मध्ये होतात.. बऱ्याच गोष्टी चुकीच्या पद्धतींनी तुमच्या पर्यंत पोचल्या.. specially स्नेहल पर्यंत पोचलेल्या गोष्टी मध्ये जमीन अस्मान चा फरक होता.. स्नेहल च्या बाबांना तुझी- तिची मैत्री खटकण्या मागे हे सुद्धा १ कारण आहे कि तिची आई माझी मैत्रीण आहे.. ज्या प्रमाणे ते संपूर्ण  प्रकरण हाताळलं गेलं त्यात फक्त स्नेहल भरडली गेली.. असो.. सांगायचा मुद्दा हा कि.. ती माझी मैत्रीण आहे तशीच ती स्नेहल ची आई पण आहे.. आणि तिचा “आई” असण्याचा अधिकार तर तुम्ही हिरावून नाही घेऊ शकत तिच्या पासून.. आणि माझ्या तर्फे तिला तिची खुशाली कळत असेल तर त्यात वाईट काय आहे? स्नेहल एक ना एक दिवस नक्की समजून घेईल तिच्या आईला.. तो दिवस आज नाही तर उद्या नक्की येईल.. तिची कस्टडी हरली नसती तर स्नेहल तिच्या आई कडे च असते.. " विचारात हरवत आई बोलली..

"हम्म्म .. तू म्हणतीयेस तेच बरोबर आहे.. तस पण या वर्षी पण काकांनी तिला कॉल नाही केला असं वाटतंय मला.. तिच्या बोलण्यातून वाटलं.. तिनी काही सांगितलं नाही आणि मी पण उगाच विचारत नाही बसले.. "

"बरं केलेस.. आपल्याला माहिती असताना उगाच का तिला त्रास द्या.. तिच्या वडिलांचं कळत नाही मात्र मला.. मुलीला क्रेडिट कार्ड दिलं म्हणजे संपला का विषय.. फोन नाही कि काही नाही.. मित्राच्या हॉटेल मध्ये जॉब करते म्हणून सगळं कळतं असणारे त्यांना.. पण म्हणून काय झालं.. वाढदिवसा दिवशी तरी फोन करायचा लेकराला.. "

"हो ना ग.. मला पण वाईट वाटलं.. "

तेवढ्यात फ्रेश होऊन मानवी चे बाबा आले..

"काय चालल्यात गप्पा? कधी आलीस मन्या ?"

"अर्धा तास झाला असेल बाबा येऊन.. तुम्ही कामात होतात म्हणून आले नाही प्रेस मध्ये.. "

"हो का? बरं बरं.. चहा घेऊयात आता.. "

"काम कसं चालू आहे बाबा? एखाद नवीन पुस्तक आलं का हो प्रिंटिंग ला ?"

"नाही ग.. सध्या तर पुस्तक येत च नाहीत.. आली तरी अगदी लहान माहिती पत्रिका असतात तस काही तरी येत.. सध्या आपलं मशीन पण थोडं कुरकुर करतंय त्यामुळे मी पण लोड नाही घेते.. "

"का हो? परत बंद पडलं?" मानवीनी काळजीच्या सुरात विचारलं..

"नाही ग.. बंद नाही पडलं.. पण.. "त्यांनी केसातून हात फिरवला.. आणि आई कडे पाहिलं..

"बाबा.. आईकडे पाहू नका.. ती नाही तुम्हाला वाचवायला येणार.. काय झालंय ते सांगा मला नीट.. ", मानवीनी सरळ दम देत विचारलं..

"आग माझी आई.. काही नाही झालं.. पण सलग मशीन नाही चालू राहते पूर्वी सारखं अधून मधून थोडा त्रास देत.. त्यामुळे मी ब्रेक घेत काम करतोय.. तू नको बरं टेन्शन घेऊस.. "

"ते मशीन बदलायला आलंय बाबा.. ", आईच्या हातातून कप घेत बाबांच्या समोर ठेवत मानवी म्हणाली..

"नाही नाही.. बदलायची गरज नाही.. काहीही झालं तरी मी दुरुस्त करू शकतो इतकं ते मशीन माझ्या नजरेखालून गेलंय.. "

"तुम्ही नाही ऐकणार.. " म्हणत मानवी ने चहा प्यायला सुरुवात केली..

"तुझं कसं चालूये बेटा ?"

"चालूये ना बाबा.. १ interview झाला.. पण तिथे काही झालं नाही काम.. अजून १ interview line up आहे.. बघू कसं होतंय ते.. "

"सगळं होईल व्यवस्थित फक्त कॉन्फिडन्स ढासळू द्यायचा नाही बघ.. "

"येस्स बॉस .. " असं म्हणत मानविने त्यांना थम्ब्स अप दिला..

थोड्या वेळानी मानवी आईनी दिलेला डब्बा घेऊन घरी जाताना बस मध्ये बसून विचार करत होती.. आई बोलली ते किती खरय.. बाबा जसे दिसतात तशीच मी हि दिसते.. जशी आई मिळाली बाबांना तसं मला सुद्धा कुणी तरी मिळेल च कि.. सगळ्या जगाच्या नजरेत किती का विचित्र दिसत असू आम्ही पण आमच्या लाईफ पार्टनर च्या नजरेत जर का अनमोल असू.. तर अजून काय हवे.. राहिला प्रश्न स्वतःच्या पायावर उभा राहायचा तर आई म्हणाली तसंच तर आहे.. हत्ती गेला आणि शेपूट राहिलंय .. आजवर कधी हार नाही मानली.. आता डगमगणार नाही मी.. एकदा जॉब मिळाला ना.. मग काही झालं तरी सोडणार नाही..

मानवी स्वतःशी विचार करत घराच्या इथल्या बस स्टॉप वर उतरली.. इथून चालत गेले कि मध्ये १ पार्क लागायचे ते ओलांडले कि त्यांचे छोटेसे अपार्टमेंट यायचे.. खाली १ स्टेशनरी चे दुकान होते आणि वर ह्यांचे अपार्टमेंट.. गाडी पण स्नेहल ची छोटीशी beetle car होती म्हणून पार्किंग मध्ये बसायची.. 

थोडं अंतर ती चालली नसेल कि.. पावसाळा संपत आला होता तरी एक  पावसाची जोरात सर आली.. आईने दिलेला डब्बा सांडायला नको म्हणून तिला जोरात पळता पण येईना.. ती थोडीशी भिजत पार्क मध्ये असते तशा छत्री खाली येऊन थांबली..

"एवढ्या जवळ आले घराच्या आत्ता च यायचा होता हा पाऊस.. शी... अजिबात आवडत नाही मला हा पाऊस.. पावसात तर आता माझी केस अजून फुगून डबल होणार.. " स्वतःशीच बोलत ती तिथे उभी होती..

पाऊस आता कमी कमी होत थांबत आलाच होता इतक्यात तिला समोर १ गाडी येऊन थांबलेली दिसली.. गाडी पासून सरळ १० पावलं चालून डावीकडे वळलं कि त्यांचं घर होत.. तीच लक्ष गाडी मध्ये बसलेल्या व्यक्तींच्या कडे गेलं तेव्हा तिला लक्षात यायला वेळ लागला नाही कि ती स्नेहल आहे..

************

क्रमशः

************

🎭 Series Post

View all