माझी मानवी...भाग ६५

मानवी तर बेड वर पडताच झोपी गेली पण स्नेहलला झोप लागत नव्हती. ती उठली आणि मनवीच्या खोलीत तिच्या ब

मागील भागात आपण बघितले....

"काय माणूस आहे हा. सतत काय मानवीच्या मागे मागे करतोय." राहुल मनातच बोलत रवीकडे रागाने बघत होता. राहुलला असं बघून. रवी मुद्दाम मुद्दाम मानवी सोबत राहत होता. 

आता पुढे...

संध्याकाळ झाली पण आज ऑफिस मधून कोणीच जायला तयार नव्हते मानवी मुळे सगळ्यांमध्ये कामाचा उत्साह वाढला होता. जो तो अपआपल्या कामात इतका मग्न होता की, घड्याळाकडे कोणाचे लक्षच नव्हते अगदी रियाचे सुद्धा.

काम करताना राहुलने सहज घड्याळ बघितले तर आठ 

वाजले होते. त्याने पटकन मॉनिटरची स्क्रीन बंद केली आहे केबिन मधून बाहेर आला.

"आज कोणाला घरी जायचे नाहीये का?"

त्याच्या बोलण्याने सगळ्यांची तंद्री तुटली आणि सगळ्यांनी त्याच्या दिशेने बघितले.

"बघताय काय असे सगळे? चला पॅक अप करा आठ वाजले. पण उद्या सकाळी एक्झॅक्ट नऊला मीटिंग साठी सगळे मला हजर पाहिजेत." राहुलने सगळ्यांना तकीत दिली. पण ह्यावेळेस रागाने नाही तर हसून.

त्याच्या बोलण्यावर सगळेच हसले आणि लगेच पॅक अप करून निघाले. राहुल परत त्याच्या केबिन मध्ये निघून गेला.

"सर तुम्ही नाही जाणार घरी?" सीमा मॅमने राहुलच्या केबिनमध्ये डोकावत विचारले.

"हो जाणार की, पण तुम्ही सगळे गेले की." राहुल कॉम्प्युटर मध्ये बघत बोलला.

तशा सीमा मॅम निघून गेल्या. त्यांच्या पाठोपाठ विशाल निघाला आणि त्याला कंपनी द्यायला रिया लगेच त्याच्या मागे धावली.

"छोटी चल सगळे निघाले आहेत." रवी त्याची बॅग घेत मानवीला बोलला.

"सर एवढं काम संपवून मी निघेल. थोडावेळ अजून. तुम्ही जा."

"बरं नक्की जाऊ?" 

"हो नक्की."

"ठिक आहे उद्या भेटू." म्हणून रवी निघून गेला.

आता ऑफिस मध्ये मानवी आणि राहुल दोघेच होते. मानवी तिच्या डेस्कवर काम करत होती. राहुलने तिला बघताच त्याचे कॉम्प्युटर ऑफ करून तिच्या जवळ जाऊन बसला. 

"सर, काही हवे आहे का?" 

"नाही. तू केव्हा जाणार?"

"अजून पंधरा मिनिटांनी जाईल. काम होतच आले आहे माझे."

"ओह."

"सर, तुम्ही जा."

"नाही नको मी पण थांबतो पंधरा मनिटांनी जाईल." असे म्हणून राहुल परत त्याच्या केबिनकडे जाण्यासाठी वळला.

मानवीने परत आपलं डोकं तिच्या कामात घातले. पुढील दोन मिनिटांत तिच्या समोर गरम गरम वाफाळत्या कॉफीचा मग आला.

"सर. तुम्ही का त्रास घेतला. मला सांगितलं असतं मी आणली असती बनवून."

"पुढच्यावेळी नाही घेणार त्रास. तुलाच सांगेल. पण आता कॉफी घे." राहुल थोडीशी स्माईल देत बोलला.

थोड्यावेळात मानवीचे काम संपल्यावर दोघे ऑफिस मधून निघाले. 

मानवी तिच्या बसस्टॉपवर जाऊन उभी राहिली. रात्र झाली होती त्यामुळे तिला असे एकटीला सोडणे त्याला पटत नव्हते म्हणून राहुल त्याच्या गाडीतून तिला बघत होता. अर्धा तास झाला तरी बस आली नाही. मानवी एकटीच त्या स्टॉप वर उभी होती. 

तितक्यात दोन टवाळ मुले तिथे आली आणि मानवीला विचित्र नावरेने बघत होती. मानवी अंग चोरून उभी होती. 

राहुल हे सगळं बघत होता शेवटी न राहून राहुल गाडी घेऊन तिच्या जवळ आला.

"चल सोडतो तुला घरी." म्हणत राहुल ने एका हाताने बाजूच्या सीटचा डोअर ओपन केला 

"सर रहुद्या बस येईलच इतक्यात."

"इंटर्न इथे अशा परिस्थीत उभी राहणार आहेस का? चल पटकन बस." आता राहुल जरा रागावून बोलला.

तशी मानवी चूपचाप गाडीत जाऊन बसली.

"हा इतका चांगला जरी वागत असला आज तरी, आपण जरा दूरच राहू याच्यापासून." मानवी मनातच बोलत होती.

दोघे ही संपूर्ण रस्ता काहीच बोलले नाही. मानवीच्या घरासमोर गाडी थांबली. मानवी उतरणार इतक्या राहुल ने आवाज दिला.

"मानवी. उद्यापासून कितीही काम असेल तरी इतक्या उशिरा घरी जायचे नाही. ऑफिसच्या वेळेतजा नाहीतर ऑफिस मधील कोणाला सोडायला सांगतजा. समजलं?" राहुल आता सुद्धा करा रागातच होता.

मानवीने नुसतीच मान डोलावली.

"आणि हो थँक्यू परत एकदा. तू परत आलीस म्हणून."

मानवी नुसतीच हसली आणि गाडीतून उतरून तिच्या बिल्डिंगकडे गेली. राहुल तिला जाताना बघत होता. आत गेल्यावर मानवीने एकदा वळून बघितले राहुल तिथेच होता. तिने हातानेच त्याला बाय केला. त्याने देखील बाय केला आणि गाडी सुरू केली. गाडी मेन रोडवर नेण्यासाठी तो गाडी रिव्हर्स करत होता आणि अचानक त्याने गाडी बंद केली. खिडकीतून डोकावून तो मागे बघत होता. 

"मला भास झाला का? ती मानवी होती? पण इथे कशी? आणि असेल तर मला भेटली का नाही? मी तिचा फोन उचलला नाही म्हणून रागावली असेल का? नाही मला भास झाला असेल. असं ही उद्या करेल तिला मेसेज." राहुल स्वतः शीच बोलत होता. गाडी रिव्हर्स घेताना रेअर व्ह्यू मधून त्याला स्नेहल दिसली होती. विचारातच राहुल तिथून निघून गेला.

स्नेहल मानवीची वाट बघत त्यांच्या नेहमीच्या पार्क मध्ये होती. तेव्हा तिला राहूलची गाडी येताना दिसली. सोबत मानवी देखील होती. त्यामुळे स्नेहल मागेच थांबून त्या दोघांना बघत होती. राहुलने अचानक गाडी बंद केली म्हणजे राहुलला आपण कदाचित दिसले असू ह्या शंकेने ती पटकन परत पार्क मध्ये शिरली.

स्नेहलच्या मनात मात्र विचारांचे थैमान माजले होते. एक मन प्रेमात अडकत होते तर दुसरे मैत्रीत. तिला कोणालाच गमवायची नव्हते. 

"स्नेहल तू अशी नाहीस. तू स्वार्थी बनलीस तरी राहूल तुला मिळणार नाही. मग उगाच अट्टाहास का? लवकरात लवकर मी राहुल आणि मानवीला सगळं खरं सांगेल." ह्याच विचारात तिने रवीला फोन केला.

"हॅलो सर." 

"मॅडम तुम्ही इतक्या उशिरा का फोन केलात? सगळं ठीक आहे ना? मानवी ठिक आहे का?" रवी घाईत प्रश्न विचारत होता.

"हो सगळं ठिक आहे. पण मला तुमची मदत हवी आहे. आपण उद्या भेटू शकतो?"

"ठिक आहे. सकाळी हॉटेलच्या रेस्टॉरंट मध्ये भेटू."

"ओके." म्हणत दोघांनी फोन ठेवला.

स्नेहलने डोळे पुसले आणि घरी गेली. मानवी तिची वाट बघत होती.

"बायको किती उशीर केलास आज यायला." स्नेहल मानवीला मागून पकडत बोलली.

"अगं जुन्या ऑफिसला परत जावं लागलं." म्हणतं मानवीने सगळी हकीकत सांगितली.

"वाह मस्त. शेवटी त्या खडूसला तुझ्या समोर वाकवे लागलेच. चूक त्याचीच होती." स्नेहल जबरदस्ती हसत बोलत होती.

"एक मिनिट. पण तुझे डोळे का सुजले? रडलीस का?" मानवी स्नेहलचा चेहेर हातात घेत बोलली.

"नाही गं. मला ते लायनरचा जरा त्रास होतोय. उद्या दुसरं घेऊन येते." स्नेहलने काहीतरी कारण सांगितले.

त्या नंतर दोघींनी मस्त जेवण केले आणि आपआपल्या खोलीत झोपायला गेल्या.

मानवी तर बेड वर पडताच झोपी गेली पण स्नेहलला झोप लागत नव्हती. ती उठली आणि मनवीच्या खोलीत तिच्या बेडवर झोपायला गेली.

"बायको झोपू दे ना आज इथे."

"ये, पण लाथ मारायची नाही." म्हणतं मानवीने तिला झोपायला जागा दिली. 

मानवी तर झोपेतच होती. पण स्नेहल तिचा चेहेरा न्याहळत होती. 

"आय एम सॉरी. परत तुझ्या सोबत असं राहता येईल की नाही माहीत नाही. पण सत्य कळेपर्यंत मला तुझ्या सोबत छान क्षण घालवायचे आहेत. होप तू मला माफ करशील." स्नेहल मनात बोलत होती आणि नकळत तिच्या डोळ्यातून अश्रूंचे दोन थेंब ओघळले. स्नेहल ने हळूच मानवी च्या अंगावर हात टाकला आणि झोपी गेली.

पुढील भागात बघू स्नेहल कशा रीतीने मानवी आणि राहुलला सत्य सांगेल? रवी साथ देईल का स्नेहलची? की अजून काही लपले आहे स्नेहल च्या मनात?

क्रमशः 

प्रिय वाचक मित्रांनो. माझी मानवी आपल्या सगळ्यांचीच खूप आवडती कथा आहे. ती पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करत आहे आणि मी लिहिलेल्या पहिल्याच भागाला तुम्ही इतका छान प्रतिसाद दिला आणि छान छान कमेंट करून मला प्रोत्साहन दिले ह्या बद्दल सगळ्यांचे खूप खूप आभार. तुमच्या मुळे ही कथा पुढे लिहिण्याचा मला हुरूप आला आणि हिम्मत देखील. सुभाषिनी मॅडम इतकी छान लेखिका मी नाही. त्यात त्याची लोकप्रिय कथा पूर्ण करण्याचे काम खरंच अवघड आहे. तरी त्याची कथा पूर्ण करण्याचा प्रयत्न करते आहे काही चुकल्यास सांभाळून घ्या.

सुभाषिनीच्या आठवणीत

© वर्षाराज 

🎭 Series Post

View all