माझी लेखणीच माझे अस्त्र...

जे बदलता येतं.. ज्यांना बदलता येतं.. त्यांना खुशाल बदला.. जे बदलता येतं नाहीं.. ज्यांना बदलता येतं नाही त्यांना स्वीकारा आणि ज्यांना स्वीकारता त्यांच्यापासून लांब जा.. परंतु स्वतःला आनंदी ठेवा... माझी लेखणीच माझं अस्त्र आहे आणि ते माझ्यापासून कोणीच हिरावू शकतं नाही.


"काय नुसतं मोबाईलमध्ये डोकं खुपसून असतेस ग तू? आधीच वर्टिगोचा त्रास आहे ना तुला. तरीही मान वाकवू वाकवू काय लिहीत बसतेस."
"आई मला आज कोणत्याही परिस्थितीत हा लेख सबमिट करायचा आहे."
"बघ बाई बस आपली तब्येत नको खराब करू".
हे रोजचं असतं माझ्या सासूबाईंचं... प्रेमापोटी , तब्येतीपोटी , माझ्या काळजी पोटी त्या म्हणतं असाव्यात. पण
मला माझं ध्येय गाठायचं आहे. आपलं वेगळं विश्व निर्माण करायचं आहे. लिखाण केल्यानी मला मानसिक समाधान मिळतं आणि ते मिळवण्यासाठी मी वेळेतून वेळ काढतं असते .
मला ज्या गोष्टींमध्ये आनंद मिळतो मला तेच करावंसं वाटतं बाकी तब्येत बिब्येत न्यून वाटतं त्याच्या पुढे.
कसं आहे...
झाड हिरवं असलं की सगळ्यांना ते हवहवस वाटतं पण एकदा काय पानगळ सुरु झाली तर त्या वाळलेल्या निरस झाडकडे बघायची कोणाची इच्छा सुद्धा होतं नाहीं. जिकडे तिकडे तो पाला पाचोळा गार गार वाऱ्याच्या इशाऱ्यावर आपला नाचत असतो. जिकडे वारा जाईल तिकडे तो बागडत असतो. नकोसा वाटतो तो करकर आवाज लोकांना.
पण माझं तसं नाहीं... उलट तो मला खूप आवडतो. मुद्दाम घराबाहेर पडायचं. एखाद्या मोकळ्या मैदानात जायचं जिथे भरभरून सुकलेला पाला पडलेला असेल तिथे जाऊन मुद्दाम त्या पाचोळ्यात खेळायचं. त्या पाचोळ्यावर जाणून चालायचं, उड्या मारायच्या आणि तो पाला मोडण्याचा करकर आवाज परत परत ऐकायचा. काय तो विचित्र छंद होता माझा. जे लोकांना नाही आवडतं ना तेच मला आवडतं. लोकांना सरळ सोपे मार्ग आवडतात मला खडतळ, लोकांना मस्त कार मध्ये लॉंग ड्राईव्ह वर जायला आवडतं मला स्वतः बुलेट चालवत रोड ट्रिप करायला आवडतं, लोकांना शांत निरव समुद्र आवडतो मला उलट तेवढाच खवळलेला रुद्र समुद्र आवडतो, लोकांना उगवता सूर्य बघायला आवडतो मला चंद्रकडे एकटक पाहावंसं वाटतं, सगळ्यांना टवटवीत फुल आवडतात मला सुकलेली फुल गोळा करायला आवडतात...
आवड जशी वेगळी तशी मी सुद्धा वेगळी आहे. मला हसत, खेळत, बिनधास्त म्हातारं व्हायचं आहे. अजून लहानचं आहेस काय तू? कसल्या लहान मुलांसारख्या सवयी आहे तुझ्या? आता तरी बदल लेक आहे तुला! अश्या कित्येक प्रश्नांना रोज सामोरे जावं लागतं.
कसं होतं... नियमाप्रमाणे ऋतू बदलत जातात आणि वयानुरूप आपल्या सवयी सुद्धा बदलत जातात. आपण बदलत जातो आणि आपले छोटे छोटे छंद, आपल्या आवडी - निवडी जे कधी आपल्याला भरभरून आनंद द्यायचे ते मनाच्या तळाशी साचत जातात. मग कधी तरी फावल्या वेळी आपलं अर्ध वय निघून गेल्यावर एक पाय जमिनीवर एक पाय घाटावर लटकलेला असतो तेव्हा आपण आपल्या मनाचे एक एक पान चाळत बसतो आणि सरता शेवटी रिक्त होऊन बसतो.
"लोकं काय म्हणतील", या वाक्यावर जे आपण आयुष्य असंच काढतो ना! तर ही लोकंना ना तुमच्या आनंदात असतात ना तुमच्या दुःखात असतात, ना तुमच्या गरजेला तुमच्या हाकेला उभी राहणारी असतात त्यामुळे ही लोकं काय म्हणतील या विचाराने मी माझं आयुष्य जगायचं थांबवत नाही, मी ते कधीच थांबवलं नाही... कायम मला असं वाटतं परिस्थिती जरी आपल्या हातात नसली तरी कोणत्या परिस्थितीमध्ये कसं वागायचं आहे हे नक्कीच आपल्या हातात असतं. आपलं आयुष्य आपल्या मताने आपल्या शर्त वर जगायला पाहिजे. स्वतःसाठी जगलो की नाही स्वतःसाठी काही केलं की नाही याची खंत उतारवयात होण्यात काही अर्थ नाही.
मला असा शेवट अजिबातच नको आहे. मला जे आवडतं, ज्यात मला आनंद मिळतो, ज्याने मला समाधानी वाटतं ते मला सगळं करायचं आहे. आपले छंद मनाच्या तळाशी तळ साचवत नाही ठेवायचे आहेत. माझ्या वाटेला फावला वेळ यायलाच नको... कातर वेळ आली तरी ती मी उपयोगात आणायला हवी. माझी ओंजळ कधीच रिक्त असायला नको. माझी फक्त्त हिच शेवटची इच्छा.... माझ्यातील मी अशीच कायम टवटवीत दिसायला हवी.
आपलं कसं आहे... वेळ मिळाला की काढला आपला मोबाईल की टकटक करत कीबोर्डवर लिहायला सुरवात करायची. थोडाही वेळ वाया जाता कामा नये. यातच माझं आंतरिक समाधान.
पण प्रत्येकचदा परिस्थिती एकसारखी नसते. लोकं एकसारखे नसतात. नेहमीच लोकं आपला साथ देतील असं ही नसते आणि भरल्या घरात तर हे होणं अजूनच शक्य नसते. आपला पाय खेचणारे, आपल्यावर टीका करणारे, आपल्या चुका शोधणारे नेहमीच आपला तग धरून असतात पण तरीही आपण घाबरायचं नाही. आपला मार्ग आपणच शोधायचा हे आता अनुभवातून शिकायला मिळते आहे...
आपला जन्म लोकांच्या अपेक्षांवर खर उतरायला झालेला नाही किंवा लोकांची हाली मवाली करण्यासाठी सुद्धा झालेला नाही आणि परफेक्शनच्या नादात स्वतःचा आत्मविश्वास गमवण्यासाठी सुद्धा झालेला नाही. आपण आपली कर्तव्य पूर्ण करायची फक्त्त. बाकी कोणासाठी कितीही केलं तरी ते कमीच असतं. त्यांना वाटतं आपण फक्त्त एखाद्यावर आपल्या मोठं असल्याचा नुसता रोब जमवावा. दुसऱ्यांनी आपल्यासाठी खूप करावं आणि आपण रिक्त हातांनी, रिक्त मनानी आपला हक्क गाजवत बसावं.
एक - दोनदा कोणी तुम्हाला आदरपूर्वक ऐकेलही पण नेहमी नेहमी कोणी तुमचा अपमान करत असेल ना तर त्या विरुद्ध आपण आवाज उचलायलाच हवा. त्या लोकांना त्यांची जागा दाखवायला हवी. सगळं तुमच आहे.. घर, दार, शेती, सोन - नाण, मालमत्ता पण मी नाही. मी फक्त्त माझी आहे. माझ्यावर मोठ्याने बोलायचा आणि माझा अपमान करायचा, माझा स्वाभिमान दुखवायचा अधिकार मी कोणालाच दिलेला नाही.
आपला मोठेपणा, आपली उदारता आणि आपले उपकार स्वतः जवळ ठेवायचे. दुसऱ्यांवर आवाज चढवून , दुसऱ्यांचा अपमान करून, आपल्या अपेक्षांच ओझ दुसऱ्यांवर लादून ... तुम्ही मोठे होतं असाल पण कुणाची तरी मनस्थिती भंग होते, कुणाची तरी मानसिक शांती लोप पावते हे द्वेषाच्या भारात लोकं विसरून जातात. निव्वळ मी आणि माझं... मी जसं म्हणेल तसं... मी मोठा आहे म्हणून माझ्या मनाप्रमाणे प्रत्येक गोष्ट व्हावी, घर आपलं आहे म्हणून आपण एकमेकाच्या इच्छेप्रमाणे वागाव असं कोणत्या शास्त्रात लिहिलेलं नाही किंवा असा कोणता नियमही नाही.
एका घरात राहणारी लोकं जरी जास्ती असली तरी प्रत्येकाला आपलं वैयक्तिक आयुष्य जगण्याचा पुरेपूर अधिकार असतो. आपलं वैयक्तिक मत असतं. आपला स्वाभिमान असतो. त्यावर तुम्ही गदा आणू शकतं नाही.
घर फक्त्त आपलं म्हणायला असायला नको... एकमेकांचे सुख दुःख, वाईट वेळ, तब्येती, एकमेकांची चांगली वेळ, अचीवमेंट्स एकत्र आनंदाने साजर करणारं हव. वाईट वेळ, तब्येत, दुखापत कधीच सांगून येतं नाही मग अश्या वेळेला मदतीचा हात देणारे लोकं घरात असायला हवे.
नाही तर मोठेच म्हणतात, " तू असेल मोठी लेखिका, तुझ्या आजिव्हमेंट्शी आम्हाला काही लेणं देणं नाही. तू आपलं आपल्याजवळ ठेव म्हणजे एका घरात राहून जर तुम्ही असे बोलत असाल तर लाज वाटायला हवी तुम्हाला तुम्ही मोठे असल्याची. आपलं सगळं बरोबर करायचं आणि जेव्हा दुसऱ्याची चांगली वेळ आली की पटकण डोळ्यात खुपायचं"
कसं आहे घरातील लहान व्यक्ती जरा स्वतःच्या बळावर पुढे जातांनी दिसली की त्याचे पाय खेचायचे, त्याला मानसिक त्रास द्यायचा, त्याची मन शांती भंग करायची असा नाही तर तसा त्रास द्यायचा.... कोणी आपल्या आनंदात खूप आनंदी आहे ना मग कसं ही करून त्यात विघ्न आणायचं.
असेही लोकं आहेत बर का या समाजात!
पण या नंतर नाही घाबरणार मी अश्या लोकांना जे माझी मानसिक शांती भंग करतात . जे माझ्या वाटेत अडथडे आणतात. जे अत्यंत चिडचिड करतात..
आता माझं ठरलंय... देवाने देणगी म्हणून मला हे लिखाणाचं अस्त्र दिलेला आहे त्याचा मी भरभरून वापर करेल. आपल्या बोलण्यातून नाही तर कामावलेल्या यशातून मी त्यांना प्रतिउत्तर देईल..

आता तर मी फक्त्त शंखानाद केलेला आहे एक पुस्तक प्रकाशित करून पुढे शिखर गाठायचा आहे आणि तो ही तुमच्या नाकावर टिचकी देऊन...
जे बदलता येतं.. ज्यांना बदलता येतं.. त्यांना खुशाल बदला.. जे बदलता येतं नाहीं.. ज्यांना बदलता येतं नाही त्यांना स्वीकारा आणि ज्यांना स्वीकारता त्यांच्यापासून लांब जा.. परंतु स्वतःला आनंदी ठेवा...
माझी लेखणीच माझं अस्त्र आहे आणि ते माझ्यापासून कोणीच हिरावू शकतं नाही.

धन्यवाद!