Aug 18, 2022
सामाजिक

माझी खिडकी

Read Later
माझी खिडकी

#खिडकीतून

आज पहाटेच वीज गेली. घामाने चिंब झाले. अंगाखालची गोधडीही घामाने भिजली. शेवटी उठले अंथरुणातून. हॉलची खिडकी उघडली व बाहेर पाहू लागले. अस्पष्टसं दिसत होतं. हल्ली सुर्योदय लवकर होतो. पक्ष्यांचा किलबिलाट सुरु होता. आमची खिडकी मावळतीला असल्याने उगवत्या सुर्यनारायणाचे दर्शन होत नाही.

 मला माहेरची ग्यालरी आठवली. तिथे उगवत्या भास्कराचं दर्शन व्हायचं.  तो लाल गोळा हळूहळू वर येताना दिसायचा. नकळत हात जोडले जायचे. तिथे बाजूला तळं होतं. त्यावर सकाळी धुकं पसरलेलं असायचं. बदकांची माळ पोहत असताना त्यांच्याकडे बघतच रहावसं वाटायचं. पोपट तर किती इथून तिथे बागडायचे. 

इथे दिसतोय तो पिवळा दिवा असलेला वीजेचा खांब. उगाच त्याचा मंद प्रकाश डोळ्यांत साठवून घेतला. समोरच्या इमारतीच्या कुंपणात सोनचाफ्याचं झाड आहे. गेल्यावर्षी फुलांनी बहरलेलं होतं. यावर्षीही बहर आला होता पण लॉक डाऊनमध्ये तिथली लोकं गच्चीत जाऊन काठीने ती फुलं काढतात त्यामुळे पानाआड लपलेली चाफी दिसणं दुरापास्त झालंय. 

या सिझनमध्ये बाजारात खूप चाफी मिळतात. आम्ही दोघंही त्या वाटेने आलो की चाफ्यांची पुडी आणायचो. यांना चाफ्याची फुलं देवाला वहायला आवडतं. दिवसभर घरात चाफा दरवळत रहायचा. आत्ता फुलं मिळतही असतील पण आणायची भितीच वाटते. त्यादिवशी मोगऱ्याच्या टपोऱ्या कळ्यांचे गजरे दिसले होते पण आवर घातला मनाला. ते गजरे मीठाच्या पाण्यात थोडीच घालणार!

पुर्वी मी व लेक आईच्या घरी दुपारचं जाताना मी यांच्यासाठी लायब्ररीतून एखादं राधेय,क्रुष्ण यांसारखं पुस्तक व सोबत एक सोनचाफ्याचं फुल टेबलवर ठेवून जायचे. तो सुगंध घेत वाचत बसणं यांना आवडायचं. हल्ली पुस्तकं कमी वाचतात. मोबाईलवर विनोदी नाटकं,गाणी ऐकत बसतात. न्यूज वाचत बसतात. बायको,मुलं कितीही जवळ असो प्रत्येकाचं स्वत:च असं जग असतं..असावं.

लेक जगाच्या घडामोडींत रमतो. जगात चाललेली उलथापालथ बाबांना सांगतो मग दोघं त्यावर गप्पा मारत बसतात. त्या युएसमध्ये वर्णभेद सुरु आहे म्हणे. तिथले पोलीस काळ्या रंगाच्या लोकांना मारतात कारण त्यांच्या मते काळे गोऱ्यांपेक्षा जास्त गुन्हेगार असतात. याविरुद्ध जनतेचे मोर्चे वगैरे सुरु आहेत. युएसमध्ये पण
पन्नास टक्क्याहून जास्त बेरोजगार झाले आहेत.
रशियात तर कोण डॉक्टर सरकारच्या विरोधात बोलला तर त्याला गायब करतात किंवा उंच इमारतीवरून फेकून देतात. 

चीनच्या वस्तू आपण वापरु नये म्हणतो पण आपलं त्याशिवाय जमणार नाही. बरेच देश चीनकडून वस्तू आयात करतात. धर्मनिरपेक्ष सरकार हवं म्हणतो. सारेच मुस्लिम वाईट नसतात म्हणे. खरंच आहे ते. सुक्यासोबत ओले भरडले जातात. 

चीनमधील गुहांत वटवाघळांची शेतीच असते. तिथले शेतकरी ही वटवाघळे बाजारात विकतात. अशाच एका शेतकऱ्याला वटवाघळाकडून कोरोनाची लागण झाली. त्याच्यामुळे मार्केटमधल्या इतरांनाही झाली व पसरत गेली. चीनची चुकी ही झाली की त्याने याबाबत जगाला जाग्रुत केले नाही. संवाद होतोय हे महत्त्वाचं. त्याचं काही चुकत असेल तर ते वयानुरुप त्याला कळू लागेल. असो प्रत्येकाची जागा..प्रत्येकाचं जग.

काल गावी आईला फोन केलेला. ती विचारत होती की लोकं इतक्या झुंडीने गावाकडे का येताहेत. म्हंटलं त्यांच्या हातात पैसा नाही,सार्वजनिक शौचालयं वगैरे पण खरंतर ही खरी गरजू लोकं मुंबईतच राहिली आणि इपाससाठी पाच पाच हजार मोजून, गाड्यांची अव्वाच्या सव्वा भाडी देऊन सधन लोकंच गावात दाखल झाली. सुकळवाडीत एक स्त्री कोरोना पॉझिटिव्ह मिळाल्याने तिथला बराचसा भाग बंद करण्यात आला आहे.

आत्ता बरंच स्पष्ट दिसतय..उजाडलंय. खिडकीतून मच्छर घरात येताहेत. गार वारा काही विशेष नाही पण घामाने चिटमिटणं कमी झालंय. 

बुलबुलची जोडी तारेवर येऊन बसलेय. पिवळ्या चोचीच्या गब्दुल साळुंक्या विजेच्या खांबावर बसल्याहेत. तिथला दिवा मालवला आहे. काळ्या पांढऱ्या दयाळ पक्ष्यांचा थवा गोलगोल गिरक्या घेत गुंजारव करतो आहे. त्यांची खडाजंगी होत आहेसी वाटतेय. समोरच्या फणसाच्या झाडावर पानांत घरटं विणलेलं शिंपी पक्ष्याने. मला त्याचं काम पहायला आवडायचं. छंदच लागलेला तो. 

लेक चौथीत असताना आम्हा दोघांना अचानक गावी जावं लागलं होतं. मधल्या दिराचा विजेच्या खांबावरुन पडून म्रुत्यू झाला होता. लेकाला आईकडे ठेवलं होतं तेंव्हा. हे गावीच राहिले होते. मी मोठ्या दिरांसोबत घरी आले तेंव्हा अनिकेत सांगत होता,"आई मी नी आबा दुपारी खिडकीत बसायचो. तिथे खूप रंगीत पक्षी पाहिले. भारद्वाज तर ठरलेला असायचा तिथे. समोर बेशरमचं व जंगली अळूचं रान होतं. आईने केळी,पपई लावलेली खाली. पेरुचंही झाड होतं. त्यामुळे खूप सारे इवलेइवले पक्षी फलाहार करायला यायचे. तिथेना आमच्या बेडरुममध्ये चिमण्या यायच्या. ठुमकत रहायच्या घरभर. आरशावर चोची मारायच्या. आई चिमण्यांशीही गप्पा मारते.

असं माझं मन कधी इथे कधी तिथे उंदडत असतं. इथे समोर भेरल्या माडाचं झाड आहे. त्याची हिरवी तोरणं ,कात्रीने कापलेली पानं बरी दिसतात पण पानांवर खूप धूळ साचली आहे . पाऊस पडला की हिरवंगार दिसेल. इथे समोरना गुलमोहर होता. त्याची पानं खूप आवडतात मला. या सिझनमध्ये तो रक्तरंजित दिसायचा. खिडकीतून पहावंही लागायचं नाही. दुपारी त्या लाल फुलांच,पानांच्या पिसाऱ्याचं प्रतिबिंब हॉलच्या लादीवर उमटायचं. गेल्यावर्षी तोडला त्याला. किती पक्षी रहायचे त्यावर! अजून बरीच झाड तोडली व उंच टॉवर बांधला तिथे. बाजूला विहीर होती. तिलाही बंद केलं. आता फक्त तो भेरला माड व एक सुकलेलं,निर्जीव झाड ठेवलंय. त्याला दोन ढोली आहेत. एन्टीक पीस म्हणून ठेवलं असावं. अव्वाच्या सव्वा किंमत आहे तिथल्या ब्लॉकांची. घेणारी घेतात. सगळी सोंग करता येतात पण पैशाचं सोंग नाही करताहेत. अंथरुण पाहून पाय पसरायचं हेच खरं नाहीतर अनेक मानसिक व्याधी पाठी लागतात. 

वॉचमन कचरा गोळा करुन गेला. पाणी सोडणारा दिसला खाली. त्याने काल सांगितलेलं खरं,"पानी भरके रखना. कल पानी नहीं आयेगा।" चला आवरायला हवं लवकर लवकर.

 मला बरीचजणं म्हणतात,"हे लिहून तुला काय मिळतं. कशाला लिहितेस?" मला एक कळत नाही,सगळंच पैशात मोजता येतं का? आता लिखाणाने दोन लाँग बुक भरत आल्यात. शिवाय बरचसं मोबाईलवर डायरेक्ट टाईपते. माझं लिखाण मला समाधान देऊन जातं. काहीजणं म्हणतात,"नाहीतर तुझा टाईमपास कसा होणार!" आई मात्र सांगते,"लिहित रहा. त्यातून तुला व्यक्त होता येतं." मेंदुला खाद्य मिळतं. कोणी काही म्हणो, लिहिती रहाणार..

-------सौ.गीता गजानन गरुड.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now