माझी गगन झेप !! एक अविस्मरणीय अनुभव भाग 1

My Skydiving Experience


लहान असताना उंच - उंच आकाशात स्वच्छंदपणे उडणाऱ्या पक्षांना पाहून, असंख्य विचार मनांत यायचे . त्यांच्याकडे कुतूहलाने पहात ... कसे वाटत असेल या पक्षांना उडताना ? आपण यांना वरून कसे दिसत असू ? असे एक ना अनेक प्रश्न माझ्या मनात काहूर माजवायचे . कधीतरी हेवाही वाटायचा या पक्षांचा . किती मस्त जीवन आहे या पाखरांचे ! त्यावेळेस विचारही केला नव्हता की, मला या पक्षांप्रमाणे उडण्याची संधी मिळेल . अगदी त्यांच्यासारखे नाही, पण त्यापेक्षा कमीही नाही ; पाच मिनिटे का होईना आकाशात उडता येईल .होय ! अशी संधी मला मिळाली ती " स्कायडायव्हिंग " या साहसाच्या (ऍडव्हेंचर ) रूपाने; आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे अहोंच्या आवडीमुळे तसेच त्यांच्याकडे असणाऱ्या दुर्दम्य महत्त्वाकांक्षेमुळे .
\" स्कायडायव्हिंग \" हे काही मी केलेले पहिले साहस नाही. याआधीही आम्ही दोघांनी बलून सफारी , स्कुबा डायव्हिंग , पॅराग्लाइडिंग केले आहे आणि हे सगळे साहस आम्ही दर वर्षी आमच्या लग्नाच्या वाढदिवसादिवशी केले आहेत . वेगळ्या प्रकारे वाढदिवस साजरा करून आयुष्यभर तो दिवस आठवणीत रहावा हा त्यामागील हेतू . असेही कोणीतरी म्हंटलेच आहे की ,

"लिव्ह अ गुड , ऑनरेबल लाईफ .....?जेव्हा तुम्ही वृद्धावस्थेत जाल आणि मागे वळून पहाल , तेव्हा तेच आयुष्य तुम्हाला पुनः पुन्हा जगावं लागणार आहे."

असो , तर लग्नाचा वाढदिवस जवळ आला की , तो कसा साजरा करायचा याबाबत घरात चर्चा सुरु होते . काय विशेष करता येईल याबाबत चे पर्याय तपासले जातात . ते याही वर्षी झाले आणि खूप दिवसांपासून करण्याची इच्छा असणारे साहस , "स्कायडायव्हिंग " यावर्षी करायचे का ? अशी विचारणा अहोंकडून झाली आणि मी ही त्यावर होकारार्थी नंदीबैलासारखी मान डोलावली . ? मग काय , लगेचच " स्कायडाइव्हदुबई.एई " या संकेतस्थळावर लॉग इन करण्यात आले .तिथे दिलेली सगळी माहिती व्यवस्थित वाचून दोघांचेही फॉर्म भरले. 30 जानेवारी 2020 ला सकाळी 11 वाजताची स्कायडाइव्ह राईड फिक्स झाली.

“13,000 फुटांवरून विमानातून उडी मारायची” ??? ऊफ !!!

एवढावेळ शांतबसून आमची चर्चा ऐकणारा माझा दहा वर्षाचा मुलगा,आपल्याला परत एकदा दुबईला जायला मिळणार आणि दोन दिवस शाळेलाही सुट्टी मिळणार या आनंदाने नाचू लागला.

स्कायडायव्हिंग साठी दुबई हे सर्वार्थाने योग्य ठिकाण होते. एकतर. पुण्याहून दुबईला जायला फक्त तीन तास लागतात आणि. दुसरे म्हणजे तिथला परिसर खूपच सुंदर आहे . हा परिसर वरून आकाशातून बघण्याची संधी कशी सोडायची ?? अशाप्रकारे आम्ही आमच्या स्वप्नातल्या एका साहसाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले.

राईड बूक केली होती पण अजून 30 तारिख यायला एक महिन्याचा अवधी असल्याने हॉटेल आणि विमानाचे बूकिंग नंतर करण्याचे ठरले होते. सर्वात महत्वाचे म्हणजे हा एक महिना इतका गुंतागुंतीचा जाईल याचा विचारही केला नव्हता. स्कायडायव्हिंगसाठी मी होकार तर दिला होता , पण ते बूक झाल्यानंतर अनंत विचारांनी डोक्यात गर्दी केली. मला जमेल ना? विमानातून झेप घेताना काही त्रास तर होणार नाही ना ? असे एक ना अनेक प्रश्न रोज मनात यायचे. त्या एक महिन्यात बरेचसे स्कायडायव्हिंग चे व्हिडीओ बघून झाले होते. त्या संदर्भातील सगळी माहिती आम्ही घेतली होती. ते ही कमी म्हणून ... मी स्कायडायव्हिंग केलेल्या अमेरिकेत राहणाऱ्या माझ्या एका मैत्रिणीलाही तिचा अनुभव विचारला. तिच्याशी बोलल्यानंतर मला जरा हायसे वाटले.

ह्या सगळ्या गोष्टी तर चालू होत्या पण आता प्रश्न होता तो आम्ही करत असलेल्या या चित्तथरारक साहसविषयी घरच्यांना सांगणे. तसं जाण्यासाठी विरोध होणार नाही हे आम्हाला माहित होते पण हे साहस धोकेदायक आहे हे समजल्यावर आईनकडून ( माझ्या सासूबाई ) थोडा नकारार्थी स्वर उमटला खरा पण थोड्या कालावधीत तोही मावळला, अर्थातच त्यांच्या मुलाने समजून सांगितल्यावर . माहेरच्या साईडने काही विरोध होण्याचा प्रश्न नव्हता कारण जावयाने ठरवले आहे म्हंटल्यावर कोण काय बोलणार ? फक्त \" काळजी घ्या \" असे सांगण्यात आले. अशा रीतीने आमचे हेही काम आता झाले होते.

एक एक दिवस जात होता , 30 तारीख जवळ येत होती तशी हृदयातील धड - धड वाढत होती. पंधरा दिवस राहिले असल्याने आता हॉटेल आणि विमानाचे बुकिंग करणे गरजेचे होते. त्यासाठी तिघांचेही पासपोर्ट घेतले आणि \"माशी शिंकली\" !! आमचे दोघांचे तिकीट बुक झाले पण मुलाचे तिकीट बुक करताना लक्षात आले की त्याचा पासपोर्ट एक्सपायऱ झाला आहे. आमच्या आनंदावर विरजण पडले. माझ्या शोनाचा चेहरा पडला. ट्रिप कॅन्सल करणे शक्य नव्हते, म्हणून त्याला घरीच ठेऊन जाण्याचे ठरले. तसा माझा शोना खूप समजदार आहे पण व्यावसायिक वडिलांचे थोडेफार गुण तर मुलामध्ये असणारच. त्याचा त्याने पुरेपूर उपयोग केला. घरी राहण्याच्या मोबदल्यात त्याने दोन लिंडोर चॉकोलेट च्या डब्यांची मागणी केली आणि ती तात्काळ मान्यही झाली.?‍♀️ कारण दुसरा काही पर्याय पण नव्हता.

तर मग आम्ही दोघेच 29 जानेवारीला जाणार होतो आणि 1 ला पहाटे माघारी उरणार होतो. तीन दिवस मुलाला आई- बाबांसोबत ठेवण्याचे ठरले . सगळे व्यवस्थित ठरले होते तरीसुद्धा माझे मन मात्र सारखे - सारखे माझा बाळ येऊ शकणार नाही याच गोष्टीवर येऊन अडकत होते . अगदी, बहिणाबाईंच्या कवितेतील त्या ओळीप्रमाणे ........

मन वढाय वढाय

उभ्या पिकातलं ढोरं

किती हांकल हांकल

फिरी येतं पिकांवर

ज्यावेळेस आपण एखाद्या गोष्टीची आतुरतेने वाट बघत असतो त्यावेळी काही केल्या त्यासाठी लागणारा वेळ लवकर जात नाही. माझ्या मनातील चलबिचल काही थांबत नव्हती. रोज स्कायडायव्हिंगचाच विचार मनात येत असल्याने दुसऱ्या कामातही लक्ष लागत नव्हतं . याच विचारात दिवस जात होते . ठरल्याप्रमाणे 28 तारखेला माझे आई-बाबा आले . किचनचा ताबा आईने घेतल्यावर, मी माझ्या पॅकिंगसाठी रिकामी झाले होते. कितीही वेळा विमान प्रवास केला तरी, बॅग पॅक करताना मला पहिल्यांदाच विमान प्रवास करणार असल्यासारखे वाटते . कोणते सामान कुठे ठेवायचे हे मी परत परत तपासते. 29 ला रात्री 8.30 वाजताच विमान होते. आम्ही संद्याकाळी 5 वाजता लोहगाव विमानतळाकडे जाण्यासाठी निघालो. आई - बाबांनी शुभेच्छा दिल्या.माझा शोना थोडा हिरमुसला होता तरी त्याने हसत आम्हाला निरोप दिला.

मनात येणाऱ्या विचारांवर ताबा मिळवत, विमानाच्या उड्डाणाची वाट बघत आम्ही विमानतळावर बसलो होतो. बरोबर 8.30 वाजता आमचे विमानाने दुबईच्या दिशेने झेप घेतली आणि आम्ही आमच्या साहसाच्या दिशेने ....

क्रमश : ....

🎭 Series Post

View all