माझी आई मराठी निबंध (Essay In Marathi)

Marathi Essay On Mazi Aai
आई! आई म्हणजे वात्सल्य मूर्ती, आई म्हणजे प्रेम आणि आई म्हणजे जगातील सर्वात सुंदर अशी कलाकृती जी देवाने खास सगळ्यांसाठी बनवली. आई विषयी कितीही बोललं, लिहिलं, वाचलं तरीही ते कमीच असतं. आई म्हणजे प्रेमाचा, मायेचा अथांग सागर असते ज्यातून कधीच प्रेमाचे जल संपत नाही.
असं म्हणतात देवाला सगळीकडे लक्ष देता आलं नसतं म्हणून त्याने आईची निर्मिती केली. देवाचं दुसरं रूप म्हणजे आई. जी सरस्वती होऊन आपल्याला शिकवते, लक्ष्मी होऊन आपल्याला अर्थार्जनाचे धडे देते, अन्नपूर्णा होऊन आपल्या जिभेचे लाड करते; आपलं पालनपोषण करते. एक आईच असते जी प्रसंगी दुर्गा, महिषासुरर्दिनी होऊन आपलं संकटातून रक्षण करते.
लहानपणी आईचा आदररुपी, प्रेमरूपी असणार धाक हळूहळू कमी होत जातो आणि आईच आपली सगळ्यात जास्त जवळची मैत्रीण होते. आईसोबत काहीही बोलायला, तिला काहीही सांगायला आपल्याला भीती नसते कारण माहित असतं, आई आपलीच आहे आणि आपल्याला तिच्याशिवाय जास्त कोणीच समजून घेऊ शकणार नाही.
माझी आई देखील अशीच खूप प्रेमळ, मनमिळावू आणि सुंदर आहे. माझ्या मनात जे सुरू असेल ते न बोलताच तिला समजतं. मी आजारी असताना ती ज्या पद्धतीने माझी काळजी घेते, माझ्या उशाशी बसून राहते त्यामुळे मला लवकर बरं वाटतं. जरा जरी काही त्रास होत असेल तर ती तिचे घरगुती उपचार करून मला बरं करते त्यामुळे जास्त आजारपण येतच नाही. अशी माझी आई प्रसंगी माझी डॉक्टर होते.
कुठे फिरायला जायचं असेल तर घरून परवानगी मिळवून देण्यासाठी माझी दुत होते, खर्चाला पैसे देताना ती माझी आर्थिक मंत्री असते आणि माझी बाजू घेऊन सगळ्यांना समजावताना ती माझी वकील देखील होते.
आईने खरंतर या कुठल्याच विषयात प्रावीण्य मिळवलं नसलं तरीही ती तिचं काम योग्यरीतीने पार पाडते. एवढ्या सगळ्या भूमिका पार पाडत असताना ती त्यावेळी जगतील त्या त्या क्षेत्रातील सर्वश्रेष्ठ व्यक्ती असते.
एवढं सगळं असून देखील माझी चूक असताना ती मला रागावते, माझ्यावर रुसते तेही प्रेमाने. ती इतकी भोळी आहे की, तिचा माझ्यावरचा राग जास्त वेळ टिकतच नाही.
आई माझ्यासाठी काय काय करते याची आठवण काढली तर अगदी दिवसा मागे दिवस संपतील पण ही यादी संपणार नाही एवढं ती माझ्यासाठी करत असते. एक आईच आहे जी कधीच माझी इच्छा अपूर्ण राहू देत नाही.
माझ्या आरोग्याची आईला खूप काळजी आहे त्यामुळे बाहेर मिळणाऱ्या चटपटीत पदार्थापासून मला काही होऊ नये म्हणून ती स्वतःच घरी सगळं करून मला खाऊ घालते. तिच्या हाताला खूप छान चव आहे. तिला याबद्दल विचारलं की दरवेळी एकच उत्तर देते; "पदार्थ करताना त्यात प्रेम ओतलं की पदार्थ छानच होतो."
खरंच आई माझ्यासाठी आणि घरासाठी खूप काही करत असते. घर आवरण्यापासून ते घरात काय बदल केले पाहिजेत हेही आईच बघते. बाहेरून घरी आलं की, काहीही काम नसताना सुद्धा"आई कुठे आहे?" असं आपसूक विचारलं जातं.
एक आईच असते जी डोळ्यासमोर दिसली नाही की कुठे गेली? असं वाटत राहतं. दिवसभरात जे काही घडलं असेल ते कधी एकदा आईला सांगून टाकू असं झालेलं असतं.
आई कधीच कसली अपेक्षा न ठेवता सगळं काही अगदी प्रेमाने करत असते. आपले वाढदिवस, खास क्षण, आपल्या निकालाचा दिवस, आपल्या आयुष्यात असणारे सगळे महत्वाचे प्रसंग हे आई खूप चांगल्या पद्धतीने पार पाडते. आपली आवड जपताना ती तिची आवड विसरून गेलेली असते. आपल्या आनंदात तिला आनंद होत असतो. सगळं काही ती फक्त आणि फक्त आपल्यासाठी करत असते आणि म्हणूनच आपण तिला गृहीत धरून चालतो.
आईला काय? आई आपल्यासाठी सगळ्याला तयार होणार असंच आपलं ठाम मत झालेलं असतं. काहीवेळा फक्त आपलं मन जपावं म्हणून ती कितीतरी गोष्टी तिच्या मनाविरुद्ध करते. आपण तिच्यावर रुसून बसू नये किंवा आपल्याला दुःख होऊ नये म्हणून ती जिवाचं रान करते. म्हणूनच आईला त्यागाची मूर्ती म्हणतात.
आपण आईच्या पोटात असल्यापासूनच ती आपली काळजी घेत असते. आपल्याला न बघता देखील ती आपल्यावर प्रेम करत असते. एका आईसाठी जगात सगळ्यात सुंदर आणि कर्तृत्ववान हे तिचं बाळच आहे असंच वाटत असतं.
आपण जन्माला आल्यावर देखील आपली कलाकलाने होणारी वाढ बघून ती हरखून जाते. सतत आपल्या मागेमागे फिरणारी आई आपल्यातच तिचं विश्व शोधत असते किंबहुना तिचं विश्व म्हणजे आपणच असतो.
माझी आईही अशीच आहे. अगदी लहानपणापासून तिने मला कधीच दूर केलेले नाही. परीक्षेच्या वेळी देखील माझ्यापेक्षा जास्त काळजी आईला असते. परीक्षा माझी असली तरीही आईला ती तिची परीक्षा वाटते. माझ्या बरोबर बसून सगळा अभ्यास पूर्ण करून घेणं, रात्रभर जागून सुद्धा दुसऱ्या दिवशी लवकर उठून शाळेची तयारी करून देणं, सगळी कामं वेळेत पूर्ण करणं हे फक्त आईलाच जमू शकतं.
माझ्या आईला मी कधीच विश्रांती घेताना बघितलं नाहीये. आई सतत हसतमुखाने आम्हा सगळ्यांना जे हवं नको ते बघत असते. आईला एक दिवस तरी सुट्टी मिळावी म्हणून मी आणि माझे बाबा, भाऊ आम्ही आईची कामं करायला जातो पण जी कामं एकटी आई दिवसभरात संपवते ती कामं आमच्या तिघांच्याने देखील दिवस संपला तरी संपत नाहीत. शेवटी आईला येऊन हात फिरवावा लागतोच.
कधी कधी माझी आई मला जादूच्या परीसारखी वाटते. घराला देखील तिची सवय झाली आहे. जी भांडी आम्ही हात लावताच खाली पडतात, जे कपडे आम्ही कितीही घडी केले तरी विस्कटतात तेच आईचा हात लागताच एकदम आज्ञाधारी असल्यासारखे वागतात. म्हणजे थोडक्यात काय तर आमच्या सारखी आमच्या घराला देखील आईची सवय झाली आहे. आणि का होऊ नये? माझी आई आहेच जगात भारी!
देवाच्या या आईरुपी आविष्काराला माझा मनापासून सलाम! शेवटी "ग. दि. माडगूळकर" यांनी म्हणलं आहेच;

"आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही.
म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे अ आ ई
मुलांनो शिकणे अ आ ई"