माझा काय दोष?

कधी कधी दोष नसतांनाही खूप काही भोगावं लागतं.


कथेचे नाव :- माझा काय दोष?
विषय :- आणि ती हसली
फेरी :- राज्यस्तरीय लघुकथा स्पर्धा

अनुपमा आणि अनुराग दोघांच्या लग्नाला सात ते आठ वर्ष झाली तरीही घरात काही पाळणा हालेना. दोघांच्या सगळ्या तपासण्या झाल्या. दोघांचेही रिपोर्ट नॉर्मल होते. पण बाळ न होण्याचं कारण काही कळेना.

सुरुवातीला गोड वागणारी, गोड बोलणारी सासू आता बदलली  होती. तुझ्यामुळे माझ्या मुलाचं नुकसान झालं, घराचं नुकसान झालं, ह्या बोलण्यावरून तर तू वांझोटी आहेस इथपर्यंत गोष्ट आलेली होती.

बाहेर कुठे काही समारंभ असेल तर अनुपमा अजिबात कुठेच जात नव्हती. कारण कुठेही गेली तरीही सगळ्यांचा हाच प्रश्न असायचा की,

" बापरे! किती वर्ष झाली लग्नाला अजून काही मुलं बाळ नाही??."

हे ऐकून ऐकून तिला आता जीव द्यायची वेळ आली होती. मात्र अनुराग तिच्या पाठीशी खंबीर उभा होता.


पण नशिबाच्या पुढे काहीच नसतं हे सतत बोलणार्या  अनुपमाला दृढ विश्वास होता की, तिला बाळ होणारचं. वयाच्या तेहतीसाव्या वर्षी ती गरोदर  राहिली. यानंतर घरातले वातावरण खूप बदलून गेले.

सासूबाई वंशाचा दिवा येणार म्हणून तिची खूप काळजी घेऊ लागल्या आणि अनुराग बाबा होणार म्हणून खूप खुश होता.


" अनुपमा... अगं, जास्त काम नको करू,तुला काहीही लागलं तर मला सांग आणि भरपूर खा. बाळ कसं एकदम तंदुरुस्त व्हायला पाहिजे ना!" सासूबाई गरमागरम शिरा करत असताना म्हणाल्या.

हे ऐकून अनुपमाला बरं वाटलं.पण एक नेहमी मनात यायचं की जर मुलगी झाली तर?

एक दिवस ती अनुरागला म्हणाली," अहो आईची फार इच्छा  आहे की, मला मुलगा व्हावा. पण जर का मुलगी झाली तर?"

अनुरागने तिच्या पोटावरून हात फिरवला आणि म्हणाला,

"तुला काय हवंय गं?"

" प्रश्नावर प्रश्न नकोय मला उत्तर हवं आहे."अनुपमा चिडली.

" मला पण मुलगा हवाय कारण यानंतर कुणी बघितलं, आपल्याला बाळ होईल की नाही ते? आणि मुलगा कुणाला नको असतो का?"

" अनुराग , पण एक सांगू का... मला मुलगा किंवा मुलगी काहीही चालेल. कोणत्याही आईच्या मनात हे  येत नसेल की मला मुलगा व्हावा की मुलगी. खरं तर तिला कुणी तरी आपलं हक्काचं  हवं असतं. जे बोबड्या आवाजात तिला आई म्हणेल, दुडूदुडू चालत येऊन तिला मिठी मारेल, बस्स."

हे दिवस सगळ्या घरासाठी खूप आनंदाचे होते. नऊ महिने कुठे गेले  कळले नाही.अचानक एक दिवस अनुपमा जेवायला बसली आणि तिला त्रास होऊ लागला. तिने एकही घास खाल्ला नाही तसंच तिला दवाखान्यात  हलवलं आणि तीन चार तासानंतर तिला एक गोंडस मुलगा झाला. ती सुरुवातीला बेशद्ध अवस्थेत होती.

सासूबाईंना तर बाळाला कुठे ठेऊ आणि कुठे नाही असं झालं. अनुराग सुद्धा खूप खुश होता. काही वेळानंतर अनुपमाला शुद्ध आली. तिने बाळाला जवळ घेतलं एक गोड पप्पी घेतली आणि घट्ट छातीशी धरलं.तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले.


" अनुपमा अगं रडतेस कशाला? आता तर हसण्याचे, खेळण्या- बागळण्याचे दिवस आहेत.चल पुस बरं डोळ्यातलं पाणी आणि खबरदार कधी रडलीस तर!"

सासू बाईच्या अश्या प्रेमळ वागण्याने  अजूनच तिचं मन गहिवरून आलं.

तीन चार दिवसात अनुपमा घरी आली. अनुपमाला माहेरी कुणीचं नसल्यामुळे ती इथेच सासरी राहिली. सासूने तिची खूप काळजी घेतली. बारसे थाटामाटात पार पडले आणि  त्याचं नाव ठेवलं किरण. हळूहळू बाळाची वाढ होत होती, सुरुवातीला त्याचं पालथं पडणं, रांगणं, काही दिवसानंतर बाबा- आई आणि  इतर काही शब्द बोलणं  आणि  चालणं हे सगळं सुरू झालं यात वर्ष कसं गेलं कळलंच नाही.

बाळाची म्हणजेच किरण याची आवड जरा बाकी मुलांपेक्षा वेगळी होती. त्याला सगळी मुलींची खेळणी  आवडायची  म्हणजे त्याला बाहुली, मुलींची खेळ भांडी आवडायची. त्याचबरोबर  टिव्हीवर त्याला मुलीचे  गाणे, नाचणे आवडायचे.तर कधी आईच्या मेकअपच्या वस्तू म्हणजे लिपस्टिक, पावडर आवडायची.  एक दिवस अनुपमाने त्याला फ्रॉक आवडतो म्हणून दुकानातून विकत आणला आणि घातला. ते सासूबाईंनी बघितलं आणि त्या ओरडल्या,

" अगं हे काय घालते? शोभून दिसतं का मुलाला मुलीचे कपडे घालणं. त्यात नावही ठेवलं किरण, अगदी मुली सारखं  वाटते.मला तर अजिबात आवडलं नाही बाई. "


"अहो आई हौस म्हणून करते, लहानपणी चागलं वाटत.. मोठं झाल्यावर नाही वाटत."

यावर सासूबाई काहीच न बोलता निघून गेल्या.

आता तो पाच वर्षाचा झाला होता. त्याला शाळेत घातलं. त्याला जो युनिफॉर्म मिळाला तो त्याला अजिबात आवडत नव्हता.


" आई, मला हा युनिफॉर्म नकोय गं...त्या पँट पेक्षा मला स्कर्ट  हवा आहे."

हे ऐकून आई त्याच्याकडे बघत राहिली.आणि म्हणाली,

" अरे बाळा! तू आता मोठा झालास!तू मुलगा आहेस मुलीचे कपडे नाही घालायचे."


" आई पण मला आवडतात गं ते."

आई त्याला शाळेत सोडून निघून गेली. चार पाच दिवस होत नाही तोच.संध्याकाळची वेळ होती सगळे जेवायला बसले.

" आईने त्याला हाक मारली किरण... अरे, बाळा जेवायला ये ,उशीर होतोय खूप."

" आई अगं थांब,  मी येते गं...मला माझी खेळणी  आवरून ठेवू दे."


हे ऐकल्याबरोबर आजी ओरडली, " घ्या मुलीचे कपडे घाला त्याला. कसं मुलींसारखा बोलतोय. काय तर म्हणे आवडतात त्याला मुलीचे फ्रॉक."

दोघांनी एकमेकांकडे बघितले.

किरण आता जसजसा मोठा होत होता  तो तसतसा मुलीसारखा वागू लागला.त्याला शाळेत मुलांपेक्षा मुलींसोबत रहायला आवडू लागलं. सहावीत असतांना एक दिवस तो मुलींच्या वॉश रूममधे गेला. तेव्हा खूप आरडाओरडा झाला आणि त्याच्या आईवडिलांना शाळेत बोलावलं.

ही घटना घडली तेव्हा बाबांना खूप राग आला.

घरी आल्यावर...बाबा रागाने बोलले,

" अनुपमा त्याला समजून सांग नाहीतर माझ्या एवढं वाईट कुणी नाही, नाक कापलं बघ.लाज नाही वाटली त्याला मुलीच्या... छी !!!!"

आईने त्याला खूप समजावलं की बाळा तू मुलगा आहेस तू हे जे केलं ते चुकीचं आहे.यावर तो काहीच बोलला नाही.तो फक्त आई कडे एकटक बघता होता.

एक दिवस  घरी कुणी नसतांना त्याने आईच्या ओढणीची साडी घातली, लिपस्टिक, काजळ  वैगरे सगळं लावलं आणि स्व:ताला आरशात न्याहाळत होता. तेवढ्यात आई आली आणि तिने त्याला पाहिले.

आई जशी आली तसं तिने त्याला मारायला सुरुवात केली."

"अरे!!! हे काय करतोय तू? आजी आणि  बाबा म्हणत होते  तुझे लक्षण काही ठीक नाही दिसत. पण मीच तुझ्या प्रेमात वेडी झाली होती, मला काही कळलं नाही."

" आई, अगं लागतं मला, मी नाजूक आहे  आई प्लिज अगं मला तू तरी मला समजून घे."

" कसं समजून घ्यायच रे!" म्हणत आईने डोक्याला हात लावला.

" अगं मला आवडत मुलीसारखं , मला नाही आवडत मुलासारखे रहायला. आई तुझ्या शिवाय कोण समजून घेईल मला? "


" हा दिवस बघण्यासाठी देवाजवळ  नवस केला होता का मी?. ऊठ!!!काढ ते कपडे आणि परत असं काही केलंस तर ...जीव घेईल तुझा."

" घे ना ...घेऊन टाक एकदाचा. तसही  रोज माझं मन मारून जगते आहे, अगं देवाने मला तसं बनवलं, मी काय करू तूच सांग ना?"

हे सगळं बाबा आणि आजीने ऐकलं. बाबा आत आले  आणि त्याला खूप मारलं.आईने बाबाला आवरण्याचा खूप प्रयत्न केला मात्र बाबांनी तिचं काहीही ऐकलं  नाही.


" हे बघ, तुला राहायचं असेल तर नीट रहा नाहीतर तुम्हाला दोघांसाठी मार्ग मोकळा आहे."

त्यावर आजी बडबडली,

" नाही, या घरात तुमच्यासाठी अजिबात जागा नाही. चला चालते व्हा या घरातून."

आईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.ती एक शब्दही बोलली नाही आणि किरणला घेऊन निघून गेली.


ती अशा  ठिकाणी गेली जिथे तिला कुणीही ओळखणार नाही, तिथे ती निघून गेली. एक रूम भाड्याने घेतली. ती तिथे लोकांची धुणीभांडी करायला लागली आणि त्याला शाळेत टाकलं. मात्र आता त्याच्या छातीचा भाग थोडा वाढायला  लागला, तो बराच मुलींसारखा दिसू लागला.  त्याच्या वागणुकीमध्ये खूप तफावत आली होती म्हणून त्याला शाळेत मुलं हसायला लागले. त्याच्याशी कुणी मैत्री करत नव्हतं आणि एक वेळ अशी आली की त्याला शिक्षणही सोडून द्यावे लागले, कारण तो खूप एकटा पडला होता.

त्याची ती अवस्था बघून आईला सुद्धा वाईट वाटायचे पण तिलाही काही सुचेना काय करावे?

किरणने  घरात राहून मोबाईल वर बघून काही चित्र काढायला सुरुवात केली आणि त्याचबरोबर त्याने मुलीचा पेहराव सुद्धा केला, केस वाढवले, त्याला नटायलही आवडू लागलं. तो चित्र काढण्यामध्ये एवढा पारंगत झाला की , त्याला अगदी कुणाचही चित्र  हुबेहूब काढता येऊ लागलं.

असेच तीन चार वर्ष निघून गेले. एक दिवस त्याने काढलेले चित्र अनुपमा जिथे काम करायची तिथे त्या साहेबांना त्यांच्या वाढदिवसाला भेट म्हणून दिलं. तेव्हा साहेबांनी त्याच्यातला  कलाकार  ओळखला.


" बाई, अहो तुम्ही त्याला आणा आमच्याकडे, मला भेटायचं आहे त्याला."


" नाही साहेब, तो घराच्या बाहेर नाही पडू शकत."

" का काही प्रॉब्लेम आहे का?"

" साहेब आता तो दहावीत असता पण?...म्हणजे असती... खरं तर काही गोष्टी माझ्या मलाच कळत नाही आहे."


साहेबांच्या लक्षात आलं, काहीतरी प्रोब्लेम आहे.एक दिवस ते तिच्या घरी गेले.एक छोटीशी रूम होती पण त्या रूममध्ये  सगळीकडे एवढे अप्रतिम चित्र काढले होते  की त्यांची आपण कल्पना सुद्धा करू नाही शकत.


ते घरात गेले आणि बघितले एक मुलगी फ्रॉक घालून हे सगळं चित्र काढत होती.

त्यांनी डोक्यावरून त्यांच्या हात फिरवला.तेवढ्यात त्याने हाथ झटकला आणि तो चिडला,ओरडला...

" कोण आहात तुम्ही?इथे कशाला आलात?  मला या सगळ्या जगापासून  लांब राहायचं आहे, हे लोक, हे जग मला जगू देणार नाही... जा तुम्ही इथून."

"  बाळा, तुला जो त्रास होतोय त्याचं काय? सगळं माहीत बाळा. तुला जसं आवडतं तसचं रहा... आय मिन तशीच रहा. तुझ्या ह्या वेगळ्या रूपाला दुनिया सलाम ठोकेल तुझ्या हातात जादू आहे जादू."

आईप्रमाणे त्याला कुणी तरी भरवश्याचं भेटलं आणि त्याने एक हलकीशी स्माईल दिली.


आठ दिवसाच्या आता साहेबांनी त्याच्या पेंटिंगचं प्रदर्शन भरवलं आणि त्याला खूप प्रसिध्दी मिळाली कारण त्याची कला अप्रतिम होती.

खरं तर यावेळी त्याला कुणीही  विचारलं नाही की, तो मुलगा आहे का मुलगी. त्याची सगळ्यांनी फक्त कला आणि कलाच बघितली. त्यानेही फक्त किरण म्हणून ओळख दिली.

त्याला यासाठी पारितोषिक मिळालं तेव्हा तो मुलीचा ड्रेस  घालून गेला आणि  तिथे पहिल्यांदा त्याचे खूप कौतुक झालं, कौतुकाचे शब्द कानी पडले आणि आज तो पूर्णतः "तो" चा "ती" झाला होता  म्हणून त्यांचा आनंद गगनात  मावेनासा झाला.

एवढ्या मोठ्या गर्दीत किरणने आईच्या नजरेला नजर भिडवली आणि आईकडे बघून ती हसली.

समाप्त...

माझी ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे.ह्या कथेचा कुणाशी काहीही समंध नाही. धन्यवाद!

©® कल्पना सावळे
जिल्हा :- पुणे