
दिनांक : १५ ऑगस्ट १९९०
प्रिय डायरी,
खरंतर खूप दिवसांन पासून माझी इच्छा होती मी रोज डायरी लिहावी. पण मुहूर्त लागत नव्हता. आता ठरवलं, आज पासून लिहायची. आजचा दिवस माझ्या आयुष्यातला एक खास दिवस!
आज मी खूप खूप खुश आहे. आज माझ्या दुसऱ्या लग्नाचा पहिला वाढदिवस! हो, दुसरं लग्न आणि ते शक्य झालं फक्तं आणि फक्तं माझ्या पाठी खंबीरपणे उभी राहिलेल्या माझ्या अक्कामुळेच. मी आजचा दिवस पाहू शकले केवळ माझ्या अक्कमुळे. माझ्या डायरी मध्ये आज पासून पुढे लीहिण्या आधी, मला माझ्या मनात, अजुनी ताज्या असलेल्या माझ्या भूतकाळातील आठवणी टिपून ठेवाव्या वाटतात....
आम्ही दोघी बहिणी, जयश्री आणि राजश्री. मी धाकटी, माझी अक्का माझ्या पेक्षा तीन वर्षांनी मोठी. आम्ही मूळचे कोंकणातले, पण वडील नोकरी निम्मित गेले अनेक वर्ष मुंबईत स्थलांतर झाले. अक्काच लग्न झालं आणि ती पुण्यात स्थाईक झाली. पाठोपाठ दोन वर्षात माझ देखील लग्नं झालं, अन् मी मुंबई पासून दूर पंजाब मध्ये पोहोचले.
माझ ग्रॅज्युएशनच शेवटच वर्ष, पण ओळखीतल चांगलं स्थळ आलं म्हणून आई वडिलांनी माझ लग्नं लाऊन दिले. माझ्या बरोबरच्या अनेक मैत्रिणींचे देखील असंच झालं. शिकातानाच आमची लग्नं लागली. १९८२ मध्ये माझ लग्न लावून दिले. "राहिलेलं शिक्षण जमलं तर सासरी पूर्ण करा" असं सांगण्यात आलं.
माझ्या नवऱ्याने मला शिक्षण पूर्ण करण्यास पाठिंबा दिला, पण सासूबाईंची विशेष मर्जी नव्हती. त्यांचं म्हणणं घर महत्वाच, डिग्री घेऊन काय करायचं आता! राहिलं, त्यांच्या पुढे कुठे काही शब्दं फुटतायेत.
नवीन संसार, घर ह्यात मी रमू लागले.
आमचं एकत्र कुटुंब, मोठे दीर जाऊ, धाकटा दीर, सासू सासरे आणि आम्ही दोघे. भरलेलं मोठं घर, नवीन वातावरण, नव्या जबाबदाऱ्या सगळं सगळं मला आवडू लागलं.
पंजाब मध्ये प्रचंड थंडी. मला तर मुंबईतील हवामानाची सवय, त्यामुळे सुरवातीला मी सतत आजारी पडत असे. सर्दी खोकला म्हणजे रोजचाच होऊन बसला. हळू हळू मी त्या वातावरणात रुळले. वर्षभरात मला तिकडच्या हवेची सवय झाली.
आमच्या सुखी संसाराची गोड साक्ष म्हणजे आमच्या मुलाचा जन्म. बघता बघता माझ बाळं एक वर्षाचं झालं. १९८४ त्या वर्षी पंजाब मध्ये प्रंचंड थंडीची लाट आली. महिनाभर सर्दी खोकला ताप सतत सगळे आजारी पडू लागले.
त्या दरम्यान माझ्या नवऱ्याचा सर्दी खोकल इतका वाढला की त्यामुळे त्यांना भयंकर निमोनिया झाला. तीन चार महिन्यांच आजारपण झालं आणि निमोनियाने पुढे त्यांनी हार मानली!
अवघ्या दोन अडीच वर्षांचा आमचा संसार आणि एक वर्षांच आमचं बाळ माझ्या पदरात सोडून ते मला आणि ह्या जगा पासून खूप खूप दूर गेले, कायमचे!
माझ्या समोर अनेक प्रश्न, चिंता अन् जबाबदाऱ्या होत्या. मी एकटीने हे सगळं कसं पेलाव?? डोळ्यात अश्रु आणि समोर भविष्याचा अंधार एवढंच होतं!
माझे आई वडील, अक्का भावजी ह्यांचे दिवस होई पर्यंत राहिले. जाताना मला काही दिवस मुंबईला घेऊन जाऊ का असे सासूबाईंना विचारताच त्या ठामपणे नाही म्हणल्या. मला आता माझ्या माणसांची गरज होती. इथे पण जाऊबाई, सासूबाई होत्या, पण आई अक्का जवळ मनमोकळे पणाने रडायचे होते, बोलायचे होतं....पण राहिलंच.
काही महिने असेच गेले. दिवस उजाडत होता, मावळत होता. माझ्यासाठी सगळे सारखेच. आला दिवस ढकलायचा, दुसरा काही पर्याय नव्हताच. दिवस बाळाच्या मागे, घर काम आणि स्वैपाक जात अन् रात्र मला खायला उठे.
त्या दिवशी सासूबाईंनी माझ्यासमोर एक विचित्र प्रस्ताव मांडला, प्रस्ताव कसला, त्यांनी हुकुमच सोडला म्हणता येईल. त्यांनी माझ अन् माझ्या धाकट्या दिरांचे लग्न लाऊन द्यायचे असे त्यांच्या मनात होते. कारण काय तर त्यांचा नातू, म्हणजे माझा मुलगा त्यांचा जवळ राहिल कायमचा. मोठ्या जाऊबईंना दोन मुली, त्यामुळे माझा मुलगा त्यांच्या वंशाचा दिवा त्यांना त्यांच्याच नजरे समोर हवा होता कायमचा.
मला, ते लग्नं कदापि मान्य नव्हतं. मी त्यांच्याशी अन् माझ्या आई बाबांशी तस स्पष्टच बोलले. पण सासूबाईंच्या हट्टापुढे कोणाचे काहीच चालेना. त्यांनी लग्नं ठरवलं आणि सरळ लग्नाची तयारी सुरू केली. माझ्या आईची तब्येत खूप बिघडल्याने आई बाबा मुंबईहून निघाले नाही.
माझी अक्का, भावजी आणि छोटी भाच्ची पंजाबला, माझ्या सासरी माझ्या लग्नासाठी पोहोचले. अक्का भेटताच मी कोसळल, तिच्या गळ्यात पडून ढसाढसा रडले. " अक्का, मला इथून घेऊन चल, मला नाही करायचं लग्न" अक्का माझ्याकडे थक्क होऊन पहातच राहिली.
"सासूबाईंच्या आणि घरच्यांच्या धाकामुळे मी शांत बसले. काहीच बोलले नाही. पण मला माझ्या दिराशी लग्न नाही करायचे. मला इथे नाही राहायचं, आपण जाऊया इथून, तू मला घेऊन चल अक्का"!
माझ्या सासूबाईंचा धाक, त्यांचा दराराच असा होता, की कोणाची टापच नसे त्यांच्या पुढे काही बोलण्याची. अक्का अन् भवाजिंना हे माहीत होत. त्यांनी दोघांनी मला समजावलं अन् हमी दिली की ते दोघे मला इथून घेऊन जातील. पण प्रश्न होता, कसं? मला कोणी घराबाहेर देखील एकटीला जाऊन देत नव्हते. सतत मोठ्या जाऊबाई माझ्या सावली सारख्या माझ्या बरोबर असायच्या. माझ्यावर लक्ष ठेवायला.
लग्नं आठ दिवसांनंतर होतं. अक्काच्या सांगण्यावरून भावजिंनी गुपचूप जाऊन आमचं सगळ्यांचं मुंबईचं तिकीट काढलं. लग्नाच्या आदल्या दिवशीचे तिकीट होत. घरात लग्नाची तयारी सुरू होती अन् आमची पंजाब अन् माझ सासर सोडून जाण्याची तयारी चालू होती. घरातून पळून जाण्याशिवाय कुठलाही पर्याय नव्हता.
दोन तीन दिवस असेच सरले, आम्ही सगळे प्रचंड दबावा खाली घरात वावरत होतो.अक्का सतत माझ्या सोबत होती अन् जाऊबाई व सासूबाई दोघी देखील कायम माझ्यावर लक्ष ठेऊन होत्या.आम्हा बहिणींना एकांतात काही बोलायची सुध्दा चोरी झाली होती.
लग्नासाठी आलेले अक्का अन् भावजी लग्नाच्या आदल्या दिवशी निघाले हे घरात मान्य नसणार,हे आम्हाला ठाऊक होत. त्यामुळे घरातून निघताना मोठी बॅग घेऊन बाहेर पडणं शक्य नव्हतं. म्हणून आम्ही जवळच्या माझ्या एका ओळखीच्या टेलर बाईच्या दुकानात आमच्या कपड्यांच्या पिशव्या ठेवल्या. दोन तीन वर्षांत ती टेलर दीदी माझ्या ओळखीची झाली होती. तिला म्हटलं "दीदी ये बॅग्स रखो आपके पास प्लीज़, चार दिन बाद लेने आऊंगी" तिनं काही न विचारता बॅगा ठेवल्या. अक्का अन् भावजी असं लग्नाच्या आदल्याच दिवशी निघणार हे कोणाला पटणार नव्हतं. त्यामुळे त्यांची मोठी बॅग घेऊन घरातून बाहेर पडणं शक्यच झालं नसतं. म्हणून त्यांचे अन् माझे काही कपडे पिशवीत घालून टेलर कडे ठेवले.
लग्नाच्या साड्यांचे ब्लाऊज शिवण्यासाठी टेलर कडे मी आणि अक्का जात आहोत हे कारण घरी सांगितल्याने सासूबाईंना आमचं घरा बाहेर जाणं मान्य होतं. आमच्या दोघींच्या बाहेर जाण्यावर त्यांना काही आक्षेप नव्हता. त्या त्यांच्याच विश्वात खुश होत्या. त्यांच्या मर्जी नुसार लग्न होणार होतं. आमचं सगळं सविस्तर बोलणं टेलरच्या दुकानात होत असे. आमची जवळ जवळ सगळी तयारी झाली. तिकीट काढलेलं, कपडे पिशवीत घालून टेलरच्या दुकानात ठेवले अन् मनात हिम्मत बांधून आम्ही निघण्याची वाट पाहू लागलो.
आज, तो दिवस उजाडला ज्याची आम्ही आतुरतेने वाट, पहात होतो. मला मान्य नसलेल्या लग्नाचा अदला दिवस! माझ्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस, माझ अस्तित्व अन् भविष्य आज ठरणार होतं.
आमची सकाळी ११ वाजताची अमृतसर, पंजाब ते मुंबई ट्रेन होती. ठरल्या प्रमाणे मी, अमोल(माझा मुलगा) आणि अक्का टेलर कडे जाण्याच्या बहाणे घरातून निघणार आणि वाटेत टेलर कडून आमच्या कपड्यांच्या पिशव्या घेऊन स्टेशनवर जाणार. भावजी माझ्या भाचिला घेऊन गेले ३-४ दिवस रोज बागेत खेळायला जातात, तेच कारण सांगून आज पण घरा बाहेर पडणार आणि स्टेशनवर ट्रेनच्या बोगीत आम्हाला भेटणार.
सगळ्यांची न्याहारी झाली, घड्याळात नऊचा टोला पडला. माझ्या काळजात धस्स झालं, बसं आता पुढच्या आर्ध्या तासात निघायचे. मी अन् अक्का आवरून सासूबाईंन कडे गेलो. आम्ही टेलर कडे जाऊन येतो, तासा भरात येतो घरी. " रोज काय काम असतं तुमचं टेलर कडे? " सासूबाईंनी वरच्या आवाजात विचारले. माझ्या तोंडून शब्द बाहेर पडेन.
"अहो, राजश्रीचे दोन ब्लाऊज, हाताला खूपच घट्ट शिवलेत. ते दुरुस्त करून आणतो. उद्या नेसायाच्या साड्यांचे ब्लाऊज आहेत ते, आज नीट करून आणलेच पाहिजेत." अक्काने उत्तर दिले.
"मापाचे ब्लाऊज द्या, टेलर कडून मोठ्या सूनबाई दुरुस्त करून आणतील. तुम्ही जायची गरज नाही."
" अहो, राजश्री ने स्वतः गेलेलं बर, म्हणजे नीट काम होईल, नाहीतर गडबड झाली तर उद्या कशी धावपळ करणार ना?" अक्का समजावण्याचा सुरात म्हणाली.
" बर,.....जाताना मोठ्या सूनबाईंना सोबत घेऊन जा. त्यापण येतील बरोबर."
" काय??" मीे अन् अक्का दोघी एकाच दमात बोललो
"आणि अमोलला कशाला घेऊन जाताय, त्याला घरीच ठेवा, त्या लेकराच काय काम तिथे टेलर कडे?? तुम्ही तिघी या
जाऊन मी बाळाला सांभाळते, द्या त्याला इथे"
संपल सगळं, आता काय होणार! मला रडूच येत होत...
"राजश्री अगं तू म्हणत होतीस ना, बाळासाठी पण कपडे विकत घ्यायचे आहेत, उद्या लग्नात घालायला, सांग की तसं सासूबाईंना...." अक्का माझ्याकडे बघत बोलली.
"हो ...होना, अहो सासूबाई अमोल साठी पण कपडे घेईन म्हणते. चालेल का?"
"चालेल का काय, अगं घे त्याला छान कपडे. आणि या लवकर जाऊन"
चला शेवटी घरा बाहेर पडायची परवानगी मिळाली. पण जाऊबाई आमच्या सोबत येणार होत्या.... आता काय करावे??
असो, घराच्या बाहेर पडणं महत्त्वाचे. अमोल माझ्या कडेवर आणि आम्ही तिघी निघालो. झपझप पावलं टाकत आम्ही चालू लागलो. घरापासून टेलरचे दुकान चालत १५ मिनिटांवर होत. घड्याळात १० वाजले होते. आम्हाला ११ची ट्रेन काही करून पकडायची होती.
भावजी अन् भाची ठरल्या प्रमाणे आमच्या आधीच घरातून बाहेर पडले होते. ते स्टेशनवर वेळेवर पोचतील, पण आमचं काय?? आमच्यासोबत जाऊबाई असल्याने मी, अमोल अन् अक्का जाऊबाईंना चुकवुन स्टेशन वर कसे जाणार होतो??
काही सुचत नवहतं! आम्ही टेलरकडे पोचलो. दुकानात पोहोचताच अक्कने माझ्या जाऊबाईंन समोर हात जोडले. त्यांना सत्य काय ते सगळं सांगितले. जाऊबाई अवाक् झाल्या. त्या माझ्यावर ओरडू लागल्या. मला म्हणाल्या "आधी घरी चल तू" मी आणि अक्का दोघी त्यांना खूप समजावण्याचा प्रयत्न करत होतो. त्यांना देखील सासूबाईंचा धाक होता, त्यांनी मला जाऊ दिलं तर त्यांचं पुढे घरी काय होईल ह्या विचाराने त्या आम्हाला सोडत न्हवत्या.
अक्कने शेवटी त्यांचे पाय धरले, आम्ही दोघी त्यांना खूप विनवण्या करू लागलो. अखेर त्यांच्यातले स्त्री मन पाघळले. त्यांना माझी अवस्था माहित होती. मी लग्नाला तयार नसून मला जबरदस्ती घरात डांबून ठेवण्यात येत आहे, हे त्यांना माहीत होतं.शेवटी माझ्या जाऊबाईंनी आम्हाला स्टेशनवर सोडलं. त्या जाता जाता मला मिठी मारुन म्हणाल्या " राजश्री, नशीबवान आहेस तुला अशी पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी मोठी बहीण मिळाली" .
खरंच,आज अक्कामुळे मी स्वतंत्र होणार होते. माझ्या घरी आई बाबांकडे जाणार होते. अक्का आज नसती तर मी,मला मान्य नसणाऱ्या लग्नं बंधनात जीवनभर अडकून पडले असते!
आम्ही तिघे धावत पळत आमच्या ट्रेनच्या बोगी जवळ पोहोचलो. भावजी तिथे भाचीला घेऊन आमची वाट पहात होतो. सगळे धापा टाकत ट्रेनमध्ये चढलो . ट्रेन सुटायला आता दहाच मिनिटे बाकी होती. एक एक मिनिट म्हणजे मला एक एक युग वाटू लागले. माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी दहा मिनिटे होती ती! अखेर भोंगा वाजवला अन् अमृतसर मुंबई एक्स्प्रेसने प्लॅटफॉर्म सोडला....
मी सुखरूप मुंबईत माझ्या माहेरी आले. माझ्या अक्का अन् भवाजिनमुळे मला जणू एक नवीन जन्म मिळाला! मुंबईच्या हवेत मी माझा मोकळा श्वास घेतला.
आईवडिलांच्या आशीर्वादाने, अक्का भवाजिंच्या पाठिंब्यामुळे मी माझे ग्रॅज्युएशन पूर्ण केले आणि मुंबईतच एका प्रायव्हेट कंपनी मध्ये नोकरीला लागले. म्हणता म्हणता चार वर्ष सरली....
१५ ऑगस्ट १९८९ मध्ये माझ्या समत्तीने आणि माझ्या पसंतीने माझा पुनर्विवाह प्रमोद ह्यांच्याशी झाला.आमचं एक नवीन आयुष्य एक नवीन पर्व सुरू झाले. मी, अमोल, प्रमोद आणि त्यांची रेवा असं आमचं चौकोनी सुखी कुटुंब!
आज आमच्या, माझ्या आणि प्रमोद ह्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस. माझ्या आयुष्यातला हा दिवस मी केवळ माझ्या अक्कामुळे पाहू शकले.
माझ्या पसंतीने माझ दुसरं लग्न झालं आणि ते केवळ शक्य झालं कारण माझी अक्का, ती खंबीर होती म्हणून....
©तेजल मनिष ताम्हणे