माझे संसाराबद्दलचे स्वप्न भाग १

माझे संसाराबद्दलचे स्वप्न

                                माझे संसाराबद्दलचे स्वप्न (जलद कथा लेखन) भाग १                                                         ​​​​​ " आज  मला बघायला मुलगा येणार होता." त्याचा फोटो बघून मला तो आवडला होताच आता प्रत्यक्ष कसा दिसतो याचीच उत्सुकता होती. ते संद्याकाळी ४ वाजता येणार होते पण दुपारच सरत नव्हती. शेवटी कसेतरी चार वाजलेच. तो आणि त्याचे आई – बाबा कार मधून उतरले.                                                                   फोटोत दिसत होता अगदी तसाच होता तो, बघत रहाव असा.  देखणा, रुबाबदार.आत आल्यावर तो माझ्याकडे बघून अगदी जन्मजन्मांतरीची ओळख असल्यासारखा गोड हसला. काकू आणि वहिनीने ते बघितल आणि मी एकदम लाजलेच. त्याच्या घरच्यांना सुद्धा मी आवडले होतेच.त्याच भेटीत अगदी लग्नाची तारीख सुद्धा ठरली.सगळ अगदी स्वप्नात होत तसच झाल, मला तर खरच वाटत नव्हत.                                                                                      त्या गडबडीत आम्हाला दहा पंधरा मिनिटच बोलता आल होत,तेवढ्या वेळेत काय बोलू आणि काय नको अस मला झाल होत.शेवटी त्याने माझा नंबर घेतला आणि आपला सुद्धा दिला.हे एक त्याला बर सुचल माझ्या तर ते लक्षातच आल नव्हत.म्हणजे साहेब सगळी काम लक्ष देऊन करणारे वाटत होते, मला त्यासाठी सुद्धा त्याच कौतुक वाटल. माझ्यासारख्या कायम स्वप्नात रमणाऱ्या आणि त्यातच वहावत जाणाऱ्या मुलीला असला थोडा जमिनीवर असलेला नवराच मिळायला हवा तरच संसार होईल. नाहीतर दोघेही असेच स्वप्नात जगणारे असलो तर उपाशी मरायचीच पाळी यायची.                                                                                                                      सगळी बोलणी झाल्यावर ते निघाले.मी त्याच्या आई बाबांच्या पाया पडले.नोकरी करणारी सून मिळाली म्हणून ते सुद्धा खुश झाले होते.जाताना मी त्याला हळूच बाय केल पण ते सुद्धा नेमक वाहिनीने बघितलच.बाबा आणि दादा त्यांना गाडीपर्यंत सोडून आले.किचन मध्ये गेल्यावर वाहिनीने लगेचच “फोन नंबर घेतलाय हा लेकीने तुमच्या आठवणीने,आता काय बाबा फोन बीजी लागणार कायम”अस म्हणून मला चिमटा काढला.                                                                                                      मी तिकडून पळूनच माझ्या खोलीत आले.रात्री जेऊन झाल्यावर लगेच त्याचा  “जेवलीस का”  असा मेसेज आलाच.त्याच रात्री आम्ही जवळपास तीन तास बोललो.काय सांगू आणि काय नको अस मला झाल होत.त्याला सुद्धा माझ्याशी बोलायला आवडत होत. हळू हळू मेसेज,फोन वाढतच गेले.नंतर एक सुद्धा दिवस असा गेला नसेल कि जेव्हा आम्ही एकमेकांशी बोललो नसू.                                                                                                             मी माझ्या सगळ्या अपेक्षा सगळी स्वप्न त्याला सांगायचे. माझ स्वप्न होत की जस मी पैसे कमावण्यात,घर चालवण्यात नवऱ्याला नोकरी करून मदत करते तशी त्याने सुद्धा मला जेवणात, घरकामात मदत करायला हवी.तो नोकरीसाठी बाहेर राहायचा त्यामुळे लग्नानंतर आम्ही घरात दोघेच असणार होतो.माझा आणि त्याचा कामाचा वेळ वेगळा होता.मला सकाळी साडेसात वाजता घरातून निघावं लागणार होत आणि तो नऊ वाजता निघणार होता.संद्याकाळी मी सहा वाजता पोचणार होते पण त्याला उशिरा थांबायला लागायचं त्यामुळे त्याला आठ-साडेआठ वाजणार होते. मला हे सगळ जमेल का हीच काळजी होती.                                                                                                                 आई आणि वाहिनी घरीच असल्यामुळे माझ्यावर तशी कधी कामाची जबाबदारी पडलीच नव्हती.जेवण मला बनवता यायचं पण कधी अस सगळ अंगावर घेऊन केल नव्हत.उगाच मधेमधे लुडबुड करायची,एखादा पदार्थ करायचा एवढच. जसजसी लग्नाची तारीख जवळ यायला लागली आईला माझी काळजी वाटायला लागली. आईला काळजी वाटण साहजिक होत.मला सकाळी कधी वेळेत उठायला व्हायचंच नाही.आईच्या चार शिव्या खाल्ल्याशिवाय कधी मी उठलेच नाही.”इकडे म्हणून हे चालतंय ,उद्या सासरी गेल्यावर अशी झोपून राहिलीस तर सासू कमरेत लाथ घालून उठवते की नाही बघ” हे रोज सकाळी ऐकण ठरलेलच होत.                                                                                             हळूहळू घरी आल्यावर आई माझे क्लास घ्यायला लागली होती.नवनवीन पदार्थ शिकवले जात होते,कस वागायचं कस वागायचं नाही असल काय काय सांगितल जात होत एकूणच डोक्याला ताप झाला होता.मी तिला सांगायचे की तो तसा नाहीये ग,त्याला सवय आहे एकट राहिल्यामुळे कामाची,मला मदत करेल तो करू आम्ही दोघ मिळून सगळ व्यवस्थित.पण आई ला हे कधीच पटायचं नाही. “अजून लग्न झाल नाही ना म्हणून वाटत तुला अस,एकदा लग्न होऊदे मग कळेल कसा आहे तो ते.बाहेरून आला कि हातात पाण्याचं भांड सुद्धा द्याव लागत पुरुषांना आणि म्हणे मदत करेल.                                                                    मी सांगते ते लिहून घे तू बाहेर पडेपर्यंत तो अंथरुणावरून सुद्धा उठणार नाही,दोघांचा सकाळचा चहा - नाश्ता,दोघांच्या डब्याला पोळ्या-भाजी आणि तुझ सगळ आवरण हे तुला साडेसात पर्यंत कराव लागेल,आणि तुझा कामाचा वेग बघून मला तर वाटत तुला चार वाजताच उठाव लागेल”.आईच्या या असल्या बोलण्यानी मलासुद्धा भीती वाटायला लागली होती.                                                                  क्रमशः 

🎭 Series Post

View all