Jan 23, 2022
वैचारिक

माझे पर्यावरणावरील प्रेम

Read Later
माझे पर्यावरणावरील प्रेम

माझे पर्यावरणावरील प्रेम

 

या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे

 

चंचल वारा, या जलधारा, भिजली काळी माती

हिरवे हिरवे प्राण तशी ही रुजून आली पाती

फुले लाजरी बघुन कुणाचे हळवे ओठ स्मरावे

 

रंगांचा उघडुनिया पंखा सांज कुणी ही केली ?

काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली

सहा ऋतूंचे सहा सोहळे, येथे भान हरावे

 

बाळाच्या चिमण्या ओठांतुन हाक बोबडी येते

वेलीवरती प्रेम प्रियेचे जन्म फुलांनी घेते

नदिच्या काठी सजणासाठी गाणे गात झुरावे

 

या ओठांनी चुंबुनि घेइन हजारदा ही माती

अनंत मरणे झेलुन घ्यावी इथल्या जगण्यासाठी

इथल्या पिंपळपानावरती अवघे विश्व तरावे

 

कवी मंगेश पाडगावकर यांनी लिहलेल्या या अजरामर गाण्याला एकदा ऐकलं ना कि आपली सृष्ठी किती सुंदर आहे याचा साक्षात्कारच होतो . खरं सांगू का वृक्षांना सुद्धा माणसं हवी असतात . ती आपल्या स्पर्शासाठी आसुसलेली असतात .. त्यांना पण लहान मुलांना सारखे गोंजारले .. ऊन पाणी दिले ना कि बहरून जातात आणि एकदा बहरली कि रात्रंदिवस उन्हं पावसात सावली धरतात . प्राण वायू चोवीस तास बारा महिने सोडतात . झाडांची भाषा , व्यथा कळली असती ना तर वृक्षांची तोडमोड केली नसती आपण .

 

 

 

लता - वृक्ष आम्हा सगे सोयरे

झाडांशिवाय जगताच येत नाही

झाडांसोबत  पक्षी गाणी गातात

आपल्या जगण्याचं " वृंदावन " करतात

 

आपल्या आजूबाजूला नटलेला निसर्ग असेल तर किती छान वाटतं .. वृक्ष ,वेली , फळ , फुले असतील तर जीवन , मन आनंदी होते , झाडावरील पक्षांचा किलबिलाट , वाऱ्याची येणारी हलकीशी झुळूक , नुकत्याच उमलल्या फुलांचा सुगंध , रंगीबेरंगी विविध रंगांनी बहरलेला फळ फुलांचा बगीचा म्हणजेच वृंदावन ! देवी देवतांच्या कथांमध्ये आपण अशा वृंदावनाच्या वर्णन नेहमी ऐकतो म्हणजेच सत्युगात म्हणजेच स्वर्गात सृष्टीला म्हणजेच पर्यावर्णाला खास महत्व होते . काळ बदलला म्हणून पर्यावरणाला पर्याय मिळालेला नाही . आपण कितीही प्रगत झालो तरीही पर्यावरणाला विसरून चालणार नाही . धरतीला आपण सर्व जण आई मानतो . मग या धरतीवर आई सारखे प्रेमही केलं पाहिजे ना .. नाहीतर आई म्हणेल " पुत्र करंटा निपजला “

 

३०० वर्षांपूर्वी अंदाजे  औद्योगिक क्रांती झाली आणि माणसाचे जीवनच बदलले .. गरजा बदलल्या आणि वाढत्या गरजांच्या पूर्ततेसाठी वेगवेगळी साधनं , इंधन वापरून विकास होत गेला .. पण हा विकास नैसर्गिक नसून मानव निर्मित असल्याने हळू हळू 'पर्यावरणाचा ऱ्हास होऊ लागला मग हळू हळू जंगल तोड , सिमेंटचा वापर , इंधनाचा अति वापर , या शिवाय केमिकल चा वापर केल्याने नदी , समुद्र , तलाव यातील पाण्यात प्रदूषण , गाडयांच्या वापराने हवेचे प्रदूषण , खताचा अतिरिक्त वापर केल्याने जमीनीची सुपीकता कमी झाली आणि हे सगळे मंडळी वाढतच जात आहे ..

 

मानवाने स्वतःचे जीवन सुखकर बनवण्याकरता पर्यावरणाचा वाटेल तसा  वापर केला . पर्यावरणाचे तीन महत्वाचे घटक पाणी ,हवा आणि माती या तिन्ही घटकांचा ऱ्हास होऊ लागलाय केमिकल युक्त पाणी नद्यांमध्ये गेल्याने पाणी प्रदूषण , वृक्षतोड झाल्याने प्राण वायूची कमतरता , गाड्यांच्या धुराने अशुद्ध हवा आणि उंच उंच टॉवर , बिल्डिंग बांधण्यासाठी शेत जमिनीचे झालेले सिमेंटचे जंगल हा आहे मानवी विकासाचा दुष्परिणाम .

 

प्रगत देशांमध्ये वेळीच लक्ष देऊन पर्यावरणाचा ऱ्हास कसा कमी होईल याकडे लक्ष दिले .. युनायटेड नेशन ने १९७२ साला पासून पर्यावरणावर विचार करायला सुरुवात केली . जगातील पहिली कॉन्फरंन्स पर्यावरण या विषयावर झाली त्याचा कालावधी ५ जून ते १६ जून होती आणि त्यामुळेच ५जून हा दिवस " जागतिक पर्यावरण दिवस म्हणून साजरा केला जातो .

 

पर्यावरण संरक्षणाची जवाबदारी प्रत्येकाची असून लहान मोठ्या , गरीब श्रीमंत , पुरुष , स्त्रिया सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत . आपले पर्यावरणावरील प्रेम सिद्ध करण्याची वेळ आलेली आहे . नद्या , डोंगर , झाडे , प्राणी , पक्षी , प्राण वायू आपल्या धरतीला वाचवण्याचे संवर्धन करायची वेळ आली आहे . कुठल्याही परिस्थितीत पर्यावरणाचे म्हणजेच हवा , पाणी , माती , जंगल , पशु , पक्षी यांचे संतुलन बिघडणार नाही असे आपण वागले पाहिजे . नैसर्गिक गोष्टींना जास्त प्राधान्य दिला पाहिजे .. ह्याचा  फायदा नक्कीच सर्वांना आहे . असे समजा हि इन्व्हेस्टमेंट आहे त्याचे रिटर्न्स भरपूर आहेत .

 

ग्लोबल वॉर्मिंग , प्रदूषण आणि असंतुलतामुळे  नैसर्गिक आपत्ती येतात आणि त्या जेव्हा  येतात तेव्हा त्याच्या पुढे खूप मनुष्य हानी  होते .. सुनामी , भूकंप , वादळं , पूर , दुष्काळ अशा संकटाना सामोरे जावे लागते .. एकप्रकारे सृष्टीचा प्रकोप असतो तो . तर वेळीच पर्यांवरण कडे लक्ष दिले पाहिजे ..

 

आपण जन्माला घातले नाही

म्हणूनच कापताना  हात थरथरत नाही

आपली हृदय दगडाची झालीत

पर्यावरण बिघडले काय साधले ?

वृक्षतोड थाम्बवा , पर्यावरण वाचवा

 

 

चला तर मग आज शपथ घेऊ पर्यावरण वाचवण्यास सक्रिय बनु . फार काही नाही आपल्या दैनंदिन कामात थोडा बदल करू . माझ पर्यावरणावर प्रेम आहे हे सिद्ध करायला सुरुवात करू

१ . प्रत्येकाने ‘झाडे लावा झाडे जगवा’ हि मोहीम स्वतःपुरती चालवावी घरात , घरा भोवती, गॅलरीत जमेल तिथे जमेल तस बगीचा बनवावा त्याने आपोआपच आनंद आणि आरोग्य दोन्ही भरभरून मिळेल

२. घरात किमान दोन डस्टबिन असावेत एक ओला कचरा आणि एक सुका कचरा सेपरेट करून वेग वेगळा ठेवावा .

३. बाजारात जाताना कापडी पिशवी आठवणीने  बरोबर न्यावी म्हणजे प्लास्टिक चा वापर कमी होईल

४.पाण्याचा वापर आवश्यकते नुसारच करावा विनाकारण नळ चालू ठेवून पाणी वाया घालवू नये आणि हो तशीच शिकवण घरातील लहान मुलांना सुद्धा द्यावी

५. सांड पाण्याची विल्हेवाट व्यवस्थित लावावी .

६. गाड्या चालवताना प्रदूषण कसे कमी होईल या कडे लक्ष द्यावे .वेळो वेळीवेळी कार्बन एमिशन  लेव्हल चेक करावे .  हॉर्न चा वापर पण गरजेनुसार करावा .. गरज नसेल तिथे गाडीने न जाता पायी चालत जावे . बरयाचदा लोक सोसायटीच्या गेट वरच्या दुकानात दूध आणायला जाताना गाडीने जाताना दिसतात ..

७. विजेचा वापर गरजेनुसार करावा .. पूर्वी सात वाजल्यावरच दिवे लावत असत .. तोपर्यंत सूर्याच्या म्हणजेच नैसर्गिक  उजेडाचा वापर करत असत .

८. घरा  बाहेर असताना कचरा कचरा कुंडीतच टाकावा व तसेच लहान मुलांना पण शिकवावे

९. रस्त्यावर थुंकणे हे बाहेरच्या देशात गुन्हा आहे .. भारतात अजून याचा विचारही केला जात नाही तरीही आपण सर्वच जण सुजाण नागरिक आहेत तर याचा विचार जरूर करावा .

१०. मल , मूत्र विसर्जन रस्त्यावर , उघड्यावर करू नये स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या आरोग्याच्या दृष्टीने हे वाईटच आहे ..

 

अशा ह्या छोट्या छोट्या गोष्टीत केलेला बदल हा पर्यावरणासाठी खूप फायदेशीर आहे ..

 

विकासाच्या वाटेवर घेऊ पर्यावरणाची साथ

हातांमध्ये हात घेऊन करू संकटावर मात

जागतिक पर्यावरण दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now