Feb 23, 2024
गोष्ट छोटी डोंगराएवढी

माझे गिर्यारोहण...एक अविस्मरणीय अनुभूती

Read Later
माझे गिर्यारोहण...एक अविस्मरणीय अनुभूती


मी तशी मूळची फार घाबरट ! उंचीची तर फारच भीती वाटते आणि पडण्याची सुद्धा .त्यामुळे अश्या गोष्टींपासून मी जरा लांबच राहते . मी कुठेही कधीही , कशीही धडपडू शकते त्यामुळे उगीचच धाडस करून दुसऱ्यांच्या जीवाला घोर नको लावायला .
" ट्रेक आणि तो ही बर्फात ? मुलांसोबत ? छे छे नकोच असे उद्योग आणि इतका खर्च करून नको रे बाबा ...आणि तुम्हीही विचार करा , नकाच जाऊ बिन कामाचं एडव्हेंचर कशाला पाहिजे ? " भावाच्या ट्रेकला जाण्याचा बेत ठरताच माझी पहिली प्रतिक्रिया ही अशी होती !
पण नंतर माझा मुलगाही हट्ट धरून बसला आणि ते ही मला सोबत घेऊन जायचं होतं त्याला .  जाणं नको वाटत होतं पण त्याच्या हटटा पुढे माझं काही चालेना आणि मग काय आम्हिही तयार झालो गिर्यारोहनाचा आनंद लुटण्यासाठी !
मी तशी धडपडी म्हणून प्रसिद्ध आहे त्यामुळे मनातून खूप घाबरले होते ! आणि यावेळी नवरोबा सोबत नव्हते त्यामुळे काही झालं तर खापर फोडायला हक्काची व्यक्ती सोबत नसणार.
तसा आमचा हा पहिलाच अनुभव होता एक ट्रेक ग्रुप सोबत जाण्याचे ठरले . इथून मी , माझा मुलगा , भाऊ , वहिनी आणि त्यांची दोन मुलं असे सगळे एकत्र पुढे जाणार होतो .आधी दिल्ली हरिद्वार वगैरे ला जाऊन , दोन दिवसांनी डेहराडून पासून ग्रुप सोबत पुढे जाणार होतो .
ग्रुप लीडरशी चर्चा आणि स्वतःचाही "रिसर्च " करून प्राथमिक तयारी केली होती . सोबत माझी सात वर्षाची भाच्ची होती. तिच्या धैर्याची कमालच होती , ती सगळ्यात उत्साही असल्यामुळे आमचाही उत्साह वाढला होता . सगळेजण आम्हाला जाण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करत होते .
" अरे वेड लागलंय का तुम्हाला ? कुठलाच अनुभव नाही आणि निघालात ? ते ही मुलांना घेऊन ? "
" तुमच्या वजनाने ते बिच्चारे डोंगर कोसळतील ना ! "
" इतक्या लहान मुलीला घेऊन जाताय काही अक्कल आहे की नाही ? "
" जाण्याआधी पूजा घाला . सगळं सुखरूप होउ दे म्हणून नवस बोलून घ्या ."
" आम्ही बातम्या बघत राहू , जिथे कुठे डोंगर कोसळले अशी बातमी मिळाली तुम्ही तिकडे आहात हे कळेल आम्हाला "
एक ना दोन , सगळेजण काळजीपोटी आम्हाला सांगत होते , कोणी मस्करी करत होते पण आता आम्ही माघार घेणार नव्हतो.सगळी तयारी करून , आई बाबा आणि देवाचा आशिर्वाद घेऊन आम्ही निघालो .
दिल्ली ऐरपोर्टवर उतरताच तिथली थंडी जाणवू लागली . डिसेंम्बर महिना असल्यामुळे थंडी तर असणारच म्हणून मनाची समजुत घातली. पुढे हरिद्वारला पोचेपर्यंत थंडीची थोडी थोडी सवय झाली . नंतर हृषीकेशला जाऊन आम्ही डेहराडूनला पोचलो . तिथे आमचा ग्रुप उशिरा पोचला त्यामुळे थोडा प्रॉब्लेम झाला पण ठरल्यावेळी आम्ही आमच्या " बेस कॅम्प " ला निघालो .
आठ तास आणि ते ही बस ने डोंगराच्या कुशीत खूपच अवर्णनीय दृश्य होतं ते ! सारखा चढ त्यामुळे हलत खराब झाली होती थंडी तर वाढतच चालली होती ...आम्ही आणलेले सगळे गरम कपडे पुरे पडत नव्हते ...आत्ताच ही परिस्थिती तर पुढे कसं होणार म्हणून अजूनच गाळण उडाली होती , मग रस्त्यात अजून गरम कपड्याची खरेदी झाली . बाकी आम्ही गोष्टी आम्ही भाड्याने घेणार होतो त्यामुळे तशी काही काळजी नव्हती .
संध्याकाळी " सांकरी " ला पोचलो .अगदी छोटंसं गाव ...संध्याकाळी सहा वाजताच अंधार पडला होता सगळीकडे ...कसंबसं आम्ही एका घरात राहण्यासाठी उतरलो
गरम गरम चुलीवरच्या जेवणाने प्रवासाचा सगळा शीण गेला होता पण अंधार आणि थंडीमुळे सगळे अगदी चिडीचूप होते .दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही ट्रेक सुरू करणार होतो .
सकाळी आम्ही निघालो ,  खाण्यापिण्याचे सामान फक्त सोबत घेतले . मग भाड्याने बूट , जॅकेट वगैरे वस्तू घेतल्या अजून काही गरजेच्या वस्तू आम्हाला हव्या होत्या पण आमच्या लीडरने स्पष्ट नकार दिला आणि तिथल्या एका गाईडला सोबत घेऊन आम्ही  \"केदारकंठ \" चढायला सुरुवात केली !
सगळेजण फुल्ल उत्साहात होतो आम्हाला खाली यायला अंदाजे पाच दिवस लागणार होते .
प्रत्येकाच्या पाठीवर सामान होते त्यामुळे थोड्या वेळातच थकायला लागलो .मग एका ठिकाणी चहापाणी झाल्यावर फ्रेश होऊन पुढे निघालो .
काही वेळाने आमचा गाईड येणार होता आणि आम्ही त्याची वाट बघत होतो .पण बराच वेळ झाला तो आलाच नाही ...काय करावं काही सुचत नव्हतं मोबाईल चे नेटवर्क नसल्यामुळे कॉन्टॅक्ट करण्याचा दुसरा काही मार्गच नव्हता .येणारे जाणारे लोक वेगळे वेगळे सल्ले देत होते त्यामुळे अजूनच घाबरायला झालं होतं.अंधार पडायच्या आधी ठरलेल्या ठिकाणी पोहोचणं गरजेचं होतं करण ठराविक ठिकाणीच टेंट लावणे भाग होतं .
सगळेच घाबरलो होतो . परत जावे की काय ? असा विचार मनात येऊ लागला असतानाच शेवटी मनाचा हिय्या करून पुढे जायचं ठरलं !
बाकी लोकांच्या मागे मागे एकमेकांना सावरत हळू हळू पुढे निघालो ...
अनेक लोक वेगळे वेगळे सल्ले देत होते आमच्या बरोबर चिमुकलीला पाहून तिच्या धाडसाचं कौतुकही करत होते त्यामुळे आम्ही अजूनच घाबरून गेलो होतो . गाईड शिवाय पुढे जाणं तसं धोक्याचं होतं पण , अंधार पडायच्या आत बेस कॅम्प ला पोहोचणं ही गरजेचं होतं . तिथे काही मदत मिळू शकली असती . बिना मोबाईलच जीवन किती अवघड आहे याची वेळोवेळी प्रचिती येऊ लागली .उसनं अवसान आणून स्वतः मनातून घाबरलो असलो तरी मुलांना धिर देत देत आम्ही चढत होतो .अवती भवती इतका सुंदर निसर्ग , जो बघण्यासाठी आम्ही इतका आटा पिटा केला होता तो ही आम्हाला दिसत नव्हता !
आणि काही वेळातच आमचा गाईड आला , आमच्या सोबतच्या एकाची तब्येत अचानक बिघाडल्यामुळे त्याला परत खाली जावं लागलं होतं . आता तशी काळजी मिटली होती . चढ खूप होता त्यामुळे दमछाक होत होती आणि आता बर्फ सुरू झाला होता त्यामुळे पायही घसरत होते .
आम्ही अखेर बेस कॅम्पला पोचलो पण तोपर्यंत पूर्ण अंधार झाला होता . हाडे गोठवणारी थंडी काय असते हे लक्षात आलं होतं . दातावर दात वाजत होते .कसातरी टेंट लावून आम्ही आत जाऊन बसलो .
भूक तर लागली होती पण हलायचीही इच्छा नव्हती मग काय आपली \" मॅग्गी \" होतीच मदतीला !
कसेबसे रात्री झोपलो . सकाळ झाली टेंटच्या बाहेर येऊन बघतो तो काय ...सगळा परिसर हिमाच्छादित झाला होता . ती प्रसन्न सकाळ खूपच सुंदर होती .आतापर्यंत टेन्शनमुळे आम्हाला निसर्गाच्या या सुंदर रूपाचा आस्वादच घेता आला नव्हता !
आता मात्र पुढे जायला खूपच उत्साह आला पण आता चढण खूपच अवघड झाली होती .बर्फात चालताना सगळ्यांची अवस्था बिकट झाली होती ! आमच्या गाईडने दिलेला धीर आणि सूचना मनात ठेवून , एकमेकांना धीर देत आम्ही पुढे चालू लागलो .
पुढे सुंदर तलावाचं मनमोहक रूप डोळ्यात साठवत आम्ही निसर्गाच्या कुशीत तल्लीन झालो . पुढचा टप्पा अजूनच कठीण होता .जोराचा वारा अजूनच अडथळे निर्माण करत होता .बरेच लोक अर्ध्या वाटेवरून परत येऊ लागले होते .अनेकजण धडपडत होते . पण कोणीही दुसऱ्याला मदत करायची नाही नाहीतर दोघेही अजून अडकाल अशी स्ट्रिक्ट वॉर्निंग असल्यामुळें नुसतं मनातून चरकत आम्ही हळूहळू पुढे जाऊ लागलो . दोन दिवस झाले . तिसऱ्या दिवशी वातावरण खूपच खराब होते . सोसाट्याच्या वारा सुटला होता . अर्ध्यापेक्षा जास्त लोक परत येत होते . पण आमचा निर्धार कायम होता .आम्ही टोकापर्यंत जाणारच होतो ...
पहाटेची वेळ , सूर्योदयाला \"केदारकंठ \" च्या टोकावर जाऊन \"समिट\" करण्यातला आनंद , ती अनुभूती शब्दात व्यक्त करणे कठीण ! इतकं सुंदर हिमशिखर आपण सर केलंय यावर विश्वास बसत नव्हता . आम्ही सोबत आणलेला भारताचा झेंडा आम्ही तिथे फडकवला. आपोआपच हात जोडले गेले . 12000 फूट उंचीवर भारताचा झेंडा तिथे फडकवण्यात जी अवर्णनीय परमोच्च आनंदाची परिणीती आली ती दुसऱ्या कशातच नाही !
हा एक अवर्णनीय सुख देणारा , आयुष्यभर सोबत करणारा असा आमचा पहिलावहिला गिर्यारोहणाचा अनुभव सतत तीच सुंदर अनुभूती देणारा आहे !! आणि मलाही पूर्णतः बदलून टाकणारा ठरला .माझी भीती आता कुठल्याकुठे पळून गेलीय .आणि विशेष म्हणजे हा पल्ला मी कुठेही न धडपडता पार पडला !!

प्रिय वाचकहो , लेख कसा वाटला ते जरूर कंमेंट करून कळवा !
आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करा !!
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Smita Bhoskar Chidrawar

Home maker

Like to Be Positive And Make Others Happy With My Writing

//