माझा राम
कलियुगातल्या मी पाहिलेल्या रामाचे आज तुम्हाला दर्शन घडवणार आहे.
माझे आज्जी आजोबा व त्यांनी तयार केलेली बाराजनांची क्रिकेटपटूची टीम. त्यातील 4 जणांची लहानपणीच विकेट गेलेली.
उरलेले नऊजन मॅचसाठी तयार. मोठे झाले, जाणते झाले, संस्कारी झाले, संसारी झाले.
सगळ्यावर आजोबांचा दबदबा. आजीवरही.
तोंडातून ब्र काढण्याची कुणालाच सोय नाही.
संसारी झालेल्या सर्वांनी आपापल्या 'शाखा' ओपन केलेल्या.
सर्व ठीक. आणि त्यातच नजर लागली.
दोन नम्बरच्या मोठयावडिलांनी कौटुंबिक तणावातून आत्महत्या केलेली. खूप इमोशनल आणि चांगले होते ते अस ऐकलेलं.
मागे पत्नी व दोन मुले सोडून गेलेले.
दोन्ही पोर हिऱ्यामोत्यासारखी. राम लक्ष्मणच अगदी.
एकत्र कुटुंबामध्ये सर्व सुनांना सासुरवास.
त्यात विधवा झालेल्या आईला खूपच वाढलेला.
'पोरगा मेलाय मग ही नसती ब्याद कशाला सांभाळायची' म्हणून.
झालं. 'माझ्या पोराला तूच मारलं. तुझा लहान पोरगा माझ्या पोरापासून झालेला नाही' असे नको ते आरोप करून तिला घराबाहेर काढलं.
तिच्या मोठ्या पोराला 'मुलाचा अंश' म्हणून जवळ ठेवलं.
मोठीआई दिसायला नाजूक तशी बोलायलाही, वागायलाही.
मदत करू बघणार्याचे व तिचेही आजीआजोबासमोर काहीच चालेना.
माहेरी गेली तिथे सावत्र आईचा त्रास.
राहणार कुठे? जाणार कुठे?
सोबत लहान पोर. तिला त्यावेळी काय वाटलं असेल तिलाच ठाऊक. नशिबाने बहिणीच्या घरी छप्पर मिळालं. छोटा मुलगा मोठा होत होता.
आम्ही सर्व भावंडे शेम्बडी, चड्डीतली पोर होतो. ही दुनियादारी आमच्या दुनियेच्या बाहेर होती.
पण छोटा मुलगा जिवंत असल्याचा पुरावा द्यायला अधेमधे यायचा.
मोठा मुलगा आईबापाविना पोर म्हणून लाडात ताडमाडासारखा झालेला. त्याला सगळं आयत मिळत गेल.
छोटा हा भेटीला यायचा हे का आठवत?
कारण तो आम्हाला पेन्सिल आणून द्यायचा पाटीवर लिहायला. आम्हा छोट्याना चॉकलेट मिळाल्याचा आनंद. कारण दोन्ही खायचे पदार्थ.
मी स्वःताची पेन्सिल संपऊन दुसऱ्याकडे हात पसरवायची. भाऊ कडे नाही. तो आमच्यासाठी फक्त पाहुणा होता.
खूप वर्षांनी तो पुन्हा आला. आईसोबत. नेहमीसाठी.
दोन्ही हिरेमोती एकत्र आलेले.
मोठा आम्हास नावडता. कारण तो स्वतः लाडात वाढलेला व आम्हाला धाकात ठेवणारा.
तर छोटा भाऊ आवडता. कारण तो स्वतः धाकात राहणारा नि आम्हाला लाडात ठेवणारा.
हिरा मोती दोन टोक.
मोठा 'दुनियाकी समज' नसलेला.
छोटा 'दुनिया' बघून आलेला.
दोष दोघांचाही नाही.
परिस्थितीशी ढिशुम ढिशुंम करत दोघे आ्पापल्या वाटेने पुढे चालते झालेले.
मोठा मला 'कुणी मदत करत नाही' म्हणून रडणारा.
छोटा कुणाच्या मदतीशिवाय हसणारा, हसवणारा.
मोठा घरजावई झालेला.
छोट्याने टुमदार घर स्वहिमतीने बांधलेलं.
मोठ्याने बायकोच्या नातेवाईकांना फॅमिली म्हणून ऍक्सेप्टलेलं.
छोट्यानी घरच्या शेम्बड्यापासून ते आजीआजोबांना सुद्धा ऍक्सेपटलेलं
मोठ्यांच्या घरी जाणं म्हणजे अपमानच.
छोट्याच्या घरी जाणं म्हणजे सन्मानच.
मोठ्याच सगळीकडे 'डीमोशन'.
छोट्याच सगळीकडे ' प्रमोशन'. अगदी सर्वांच्या मनातसुद्धा.
घरच्या कार्यक्रमात मोठा गैरहजर किंवा जेवायला हजर.
छोटा प्रत्येक कार्यक्रमात सर्वात पुढे हजर.
सर्व काकाआत्यानी मिळून ज्याचा लाड केला तो लाडोबा कृष्णासारखा निघून गेला तो आमच्या गोकुळात परतलाच नाही.
पण वनवास पूर्ण करून आलेला राम आम्हाला आजही सोबती आहे. निरपेक्ष, निस्वार्थ सोबती.
मला त्यांच्यातील फरक नाही सांगायच. मला फक्त रामबद्दल सांगायचंय. त्या रामाचे नाव दिलीप. त्याला बघून वाटत आमचे मोठेवडील असेच असतील किंबहुना हा त्यांच्यापेक्षा काकणभर सरस आहे. का? कारण हा वनवासातुन तावून सुलाखून निघालाय.
आम्ही अकरा बहिणी. आम्ही त्याला 'राखी' बांधावी, त्याने आमची 'रक्षा' करावी, असे कोणतेही 'बंधन' आमच्यावरही नाही, त्याच्यावरही नाही. तरीही आम्हास तो, त्यास 'आम्ही' पाठीराख्या आहोत. का? भावाने बहिणीची रक्षा करण्याचा जमाना गेला हो. म्हणून आम्ही पाठीराख्या.
त्यानेच आम्हा सर्व वीस बहिणभावंडाना बांधून ठेवलंय. त्याच्यासारखा भाऊ मिळायला आमचं भाग्य मोठं. ज्याने आम्हाला मायेने बांधलंय त्याला आम्ही काय धागे बांधणार? त्याच्यासमोर राखी फोल वाटते. त्याच्यासारखा मित्र मिळणं हेही आमचं भाग्य. अशा 'भाऊ कम मित्राला' मैत्रिदिनाच्या शुभेच्छा व रक्षाबंधनाच्याही शुभेच्छा.
भाऊ तुला खूप खूप प्रेम आम्हा बहिनीकडून.