माझा पुनर्जन्म

लघुकथा


विषय - अविस्मरणीय प्रसंग

शीर्षक - पुनर्जन्म

माझ्या शाळेतील दोन माजी विद्यार्थींनीचे दि.१८ मे २०२२ रोजी वेरळतांडा व आखतवाडा तांडा येथे लग्न होते.
"सर, तुम्हाला लग्नाला नक्की यायचं आहे.आम्ही कोणतेही कारण ऐकणार नाही".
मनात विचारचक्र सुरू झाले.विद्यार्थी, विद्यार्थिनी व पालकवर्ग यांचे मिळणारे व मिळत असलेले नि:स्वार्थी व निखळ प्रेम हीच सत्तावीस वर्षाच्या नोकरीत कमविलेली खरी संपत्ती.
नित्यनेमाने १८ तारखेला सकाळी उठलो व माझी धर्मपत्नी अश्विनीला म्हणालो,"अगं,मी लवकर आवरतो.चहा ठेव.आंघोळ करून देवपूजा करतो व चहा घेऊन निघतोय."
अश्विनी मला म्हणाली,"अहो,आज सुटीचा दिवस आहे आणि तुमची कुठे जायची घाई आहे."
मी तिला सर्व सांगितले व तिनेही लग्नाला जायचा मला आग्रह केला.
मी चहा घेतला व माझ्या टु व्हिलरने वेरूळला निघालो व वेरूळवरून माझ्या काही सहकारी शिक्षकांना सोबत घेऊन आखतवाडा तांडा येथे लग्नस्थळी पोहोचलो.
आम्हाला पाहिल्यावर सर्वांना आनंद झाला.लग्न लागल्यानंतर वधूवरांना आशीर्वाद व गिफ्ट देऊन निघालो व वेरूळ तांडा येथील दुसऱ्या लग्नात पोहोचलो.वेरूळताडा येथेही आमचे स्वागत झाले.
वधूवरांना आशीर्वाद व गिफ्ट देऊन आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो.
माझ्या सहकाऱ्यांसोबत वेरूळ ला आलो.माझे सहकारी चहापाण्यासाठी मला आग्रह करीत होते पण मला औरंगाबाद येऊन अश्विनी सोबत खरेदीला जायचे होते.दुसऱ्याच दिवशी नागपूरला माझी भाची कु.मंजिरीचा साखरपुडा असल्यामुळे खरेदी करून रात्री नागपूरला जायचे होते.
माझे सहकारी घरी गेले व मी औरंगाबादकडे तीन वाजता वेरुळ वरून निघालो. दौलताबादच्या थोडे पुढे आल्यानंतर औरंगाबाद वरून वेरूळ कडे जाणाऱ्या तीन कार ला ओव्हरटेक करून एक टू व्हिलरवरील वाहनचालक १२० च्या वेगाने आला व मला जोरदार अचानकपणे धडकला.
माझ्या गाडीला व मला जोरदार धडकल्यामुळे मी गाडीसह दूर फेकल्या गेलो. माझ्या डोक्याला मार लागला.रक्त वाहू लागले.हाताला व पायाला हेअरक्रॅक(फ्रॅक्चर) झाले व मी जागेवरच बेशुद्ध पडलो होतो.
दहा मिनिटांनी औरंगाबाद वरून वेरूळ ला जात असलेल्या माझ्या माजी विद्यार्थ्यांच्या भावाने मला पाहिले व गाडी थांबवून तो जवळ आला.माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागला.
पण मी बेशुद्ध असल्यामुळे प्रतिसाद देत नव्हतो.त्याने न डगमगता व न घाबरता वेरूळ मधील माझ्या सहकारी शिक्षकांना फोन केला व लगेच १०८ क्रमांकावर ॲम्बुलन्स ला फोन केला.पंधरा मिनिटांनी माझे सहकारी व ॲम्बुलन्स अपघातस्थळी पोहोचले व मला ॲम्बुलन्स मध्ये टाकून अश्विनीला फोन केला.
माझ्या अपघाताची बातमी ऐकून अश्विनी,माझी मुलगी अनघा व मुलगा संकेत तिघेही घाबरून गेले व अश्विनीने रडणे सुरू केले पण माझे बंधुतुल्य सहकारी श्री महाजन सर यांनी अश्विनीला धीर दिला व सरांना काहीही झालेले नाही व होणार नाही याची हमी दिली.
ॲम्बुलन्स माझ्या घरासमोरून जात असल्याने माझ्या परिवाराला सोबत घेऊन औरंगाबाद मधील "हायटेक आधार" या हाॅस्पिटलमध्ये मला भरती करण्यात आले.
तिथेही गेल्यावरही मी बेशुद्ध असल्यामुळे डाॅक्टरांनी मला आयसीयुत हलविले.
डोक्याला मार असल्याने व रक्तप्रवाह चालू असल्याने माझे सीटी केले व नंतर जखम स्वच्छ करून एक टाका देऊन बॅंडेज केले. व जेव्हा नाॅर्मल रिपोर्ट आले तेव्हा सर्वांनीच सुटकेचा निःश्वास सोडला.
डाॅक्टरांनी उजव्या हाताला व उजव्या पायाला प्लॅस्टर केले व दोन महिने संपूर्ण आराम करण्याच्या सूचना दिल्या.
थोड्या वेळानंतर मी शुद्धीवर आलो तेव्हा मी स्वतःला दवाखान्यात बेडवर पाहून व आजूबाजूचे वातावरण पाहून मी इथे कसा व नेमकं काय झाले हे अश्विनीला व महाजन सर यांना विचारले कारण अपघात होण्यापूर्वीचे सर्व मला आठवत होते पण नंतर काय झाले हे आठवत नव्हते.
मी माझ्या नोकरीच्या २७ वर्षात निस्वार्थी पणे केलेल्या कार्यामुळे व विद्यार्थी,पालक व सहकारी वर्ग यांची सहानुभूती, सद्भावना, आशीर्वाद व प्रेम यामुळेच मला जणू पुनर्जन्म मिळाला.
तीन दिवस आयसीयुत ठेवल्यानंतर चौथ्या दिवशी सायंकाळी मी घरी परतलो.
दोन महिने विश्रांती घ्यावयास सांगितल्यामुळे व हाताला व पायाला प्लॅस्टर असल्यामुळे कुठेही जाऊ शकत नव्हतो.
दवाखान्यातून घरी आल्यानंतर माझे नातेवाईक,माझे आजी,माजी विद्यार्थी, पालकवर्ग, सहकारी शिक्षक, परिचयातील सहकारी मित्र,मैत्रिणी हे माझ्या घरी सदिच्छा भेट देण्यासाठी येऊ लागले .
मला भेटण्यास येण्याऱ्या सर्वांचेच यथोचित स्वागत अश्विनी करीत होती.
निस्वार्थी सेवा,माणसं जोडण्याची माझी सवय व ऋणानुबंध जोडून कायम निभावणे व नेहमी इतरांना मदत करणे ह्या माझ्या सवयींमुळेच मला त्वरीत सर्वतोपरी सहकार्य व मदत मिळाल्यामुळे माझा जणू पुनर्जन्म झाला.
नुकताच घडलेला हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा व महत्वाचा अविस्मरणीय प्रसंग आहे.

©® श्री सुहास अजितकुमार मिश्रीकोटकर औरंगाबाद