Login

माझा होशील ना भाग 7

Marathi love story

आपण मागील भागात पाहिले की नमनला प्रणाली नसल्याने करमत नव्हते.. त्याच्या आईने फोन केल्यामुळे प्रणाली घरी यायला तयार झाली.. नमन प्रणालीला घेऊन येतो.. संध्याकाळी नमनची आई फिरायला जा म्हणून सांगते.. आता पुढे..

लग्न झाल्यापासून पहिल्यांदाच नमन आणि प्रणाली दोघेजण कोठेतरी फिरायला चालले होते.. प्रणालीला काय बोलावे तेच कळेना.. ती शांतच होती.. नमन पण शांतच होता.. थोडे पुढे गेल्यावर नाक्यावर एक ग्राउंड होते.. आणि त्या ग्राउंडवर फेस्टिवल आले होते..

अर्थातच शहराच्या ठिकाणी दर वर्षी किंवा वर्षातून दोनदा असे फेस्टिवल किंवा फेअर येत असतात.. तसेच त्यामध्ये माणसे बसायची खेळणी होते.. त्यामध्ये टोरा टोरा, पाळणा, म्युझिकल चेअर अशा खेळायच्या वस्तू पण आल्या होत्या..

नमन हे नेहमी बघतच होता.. त्यामुळे तो नेहमीप्रमाणे निघाला.. पण प्रणाली तिला गावच्या जत्रेची आठवण झाली.. ती जत्रेत खूप मज्जा करायची.. पाळण्यात वगैरे बसायची.. थोडे पुढे गेल्यावर तिला टोरा टोरा हा गेम दिसला.. आणि एकदम ती उड्या मारू लागली..

"मला यात बसायचं आहे.. " असे म्हणत तिने एकदम नमनचा हात धरला..

नमनला काहीच कळेना.. "ही अशी अचानक लहान मुलीसारखी उगाच उड्या का मारत आहे?.." तो मनातच म्हणाला..

प्रणाली एकदम भानावर आली.. आणि शेजारी नमन आहे याची तिला जाणाव झाली.. ती जीभ चावून मनात बडबडते..

"मी किती वेंधळी झाली आहे.. काही अक्कलच नाही मला.. की कसे वागायचे कसे नाही.. किती बुध्दू आहे मी.. आम्ही शतपावली घालायला आलोय.. जत्रेत फिरायला नाही.." प्रणाली मनातच बडबडत असते..

"काय ग? बरं चल जाऊया.." नमन गालातच हसत म्हणाला

"नाही नको मी सहजच म्हणाले.." प्रणाली

"असू दे चल बघून तर येऊ काय काय आले आहे ते.." नमन

"पण घरी जायला उशीर होईल ना.." प्रणाली

"होत नाही.. चल.." नमन

मग दोघेही आत जातात.. पहिल्यांदा शाँपिग, स्टॉल्स असतात.. प्रणालीला काय घेऊ आणि काय नको असे झालेले असते.. तरी ती स्वतःला आवरते..

"आता आणखी काही नको.. शांत रहा ग प्रणाली.." प्रणाली मनातच म्हणाली..

"तुला काही हवं असेल तर घे.." नमन

"नको.. " प्रणाली..

"तसे काही नाही ग.. हवे तर खुशाल घे.. मला काहीच अडचण नाही.." नमन

"नाही.. नको.." प्रणाली

फेस्टिवल बघण्यासाठी खूप गर्दी झालेली असते.. त्यामुळे प्रणाली कोठे हरवू नये.. किंवा पुढे मागे होऊ नये.. म्हणून नमनने नकळत तिचा हात हातात घेतला.. हात पकडल्यावर प्रणाली आपण कोठे आहे हेच विसरली.. तिचे स्टाॅल्सकडे लक्षच नसते.. ती लाजत आणि गालातल्या गालात हसतच फिरत होती..

आता सगळे स्टाॅल्स संपले आणि खेळणी सुरू झाले होते.. ज्यात मुले किंवा मोठी माणसे बसतात.. नमन प्रणालीला घेऊन टोराटोरा गेमच्या समोर गेला.. आणि तिचा हात सोडला..

"चल बस चल.." नमन

"नाही मला बसायचं.." प्रणाली

"मला बसायचं आहे.." नमन

"काय?." प्रणाली

"होय.." नमन

"मग बसा की तुम्ही.." प्रणाली

"तुझ्यासोबत बसायचं आहे.. पार्टनर कोणी नको का??" नमन

"बरं चला.." म्हणून प्रणाली पुढे जाते आणि नमन तिकिट काढून गेला.. दोघेही बसतात..

"गच्च धर हं.. पडलीस तर मला माहित नाही.." नमन चेष्टेत म्हणाला

"मी नाही तुम्हीच पडालं.. मी तर प्रत्येक वर्षी जत्रेत बसायचे.. मला खूप आवडतं यात बसायला.." प्रणाली बडबडत असते..

तोच ते खेळणं चालू होतं.. आणि बसताना एकमेकांच्या पासून दूर बसलेले ते एकमेकांना कधी चिकटले तेच कळाले नाही..

"काय म्हणून यात बसायची दुर्बुध्दी झाली काय माहित?? यांना काय वाटेल?? शी बाई मला कसेतरीच वाटतं आहे.." प्रणाली मनातच म्हणाली..

"काय मी पण.. हिला नाव ठेवलो.. आता माझी फजिती होणार.. देवा वाचव रे.. मला भीती वाटतेय.." असे मनात म्हणत नमन प्रणालीच्या हाताला गच्च धरतो.. अर्थातच त्याला भीती वाटत होती..

नमन हात गच्च धरल्यावर प्रणालीला आणखी अवघडल्यासारख वाटलं.. तो पहिलाच असा क्षण जेव्हा ते दोघेही एकमेकांना चिकटून बसले होते..

थोड्या वेळाने पाळणा थांबला.. नमनला थोडं गरगरल्यासारखं वाचत होत.. पण त्याने दाखवून दिले नाही.. तो तसाच उतरून खाली आला.. मग दोघेही घरी जायला निघाले..

"घाबरला होता की नाही.." प्रणाली हसत म्हणाली.

"छे.. नाही ग.." नमन

"मग माझा हात का धरला होता.." प्रणाली

"नाही.. मी कुठे धरलो होतो.." नमन हळूच म्हणाला

"धरला होता.. आठवा बरं.." प्रणाली

"अच्छा ते होय.. तुला भीती वाटेल म्हणून धरलो ग.." नमन

"काहीही हं.. तुम्ही घाबरला होता.. कबूल करा.." प्रणाली हसत म्हणाली

"अरेच्च्या.. तुला पटेना त्याला मी काय करू.." नमन

"होय मला पटलं नाही.." प्रणाली

"मग तुला आवडल नाही का मी तुझा हात धरलेलं.." नमन

प्रणाली लाजली.. इतक्यात पाऊस पडू लागला.. अचानक पाऊस आल्यामुळे कुठे जावं आणि कुठे नको असे करू पर्यंत दोघेही बरंच भिजले होते.. एका आडोशाला दोघेही थांबले.. नंतर खूप छान पाऊस पडताना नमनला पावसात भिजण्याचा मोह आवरला नाही.. तो बिनधास्त पावसात भिजू लागला..

"अहो.. चला बघू.. सर्दी होईल.." प्रणाली नमनला म्हणाली

"बघ ना.. किती छान पाऊस पडत आहे.. ये तू पण.." नमन

"बरं.." म्हणून प्रणाली पण पावसात जाते.. तिला गावाकडची आठवण झाली.. तिथे मनसोक्त पावसात भिजलेलं आठवत.. आणि तिच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले.. ते पाणी पावसाच्या पाण्यात मिसळून एक सुखद आनंद ती लुटत होती..

यापुढील भाग आपण पुढच्या लेखात पाहू..
क्रमशः

आवडल्यास कमेंट आणि लाईक करायला विसरू नका..



🎭 Series Post

View all