होळी आली होळी
खावी पुरण पोळी
बांधू दुष्कर्माची मोळी
करू त्याचीच होळी
खावी पुरण पोळी
बांधू दुष्कर्माची मोळी
करू त्याचीच होळी
खरंच! होळी म्हणलं की डोळ्या समोर येते गोड गोड पुरण पोळी, संध्याकाळी होणारे होलिका दहन आणि सगळ्यांचा उत्साह. आपल्या भारतात अनेक सण साजरे केले जातात आणि त्यातलाच एक सण म्हणजे होळी.
होळी हा सण अगदी पूर्वापार भारतात साजरा केला जातो. फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला होळी साजरी केली जाते. या दिवशी पुरणाच्या पोळीचा नैवेद्य होलिका मातेला अर्पण केला जातो. होळी साजरी करण्यामागे एक पौराणिक कथा आहे.
असे म्हणले जाते फार पूर्वी भक्त प्रल्हाद भगवान विष्णूची भक्ती करायचा. त्याचे वडील होते हिरण्यकश्यपू. आता ते होते एक असुर! प्रल्हाद भगवान विष्णूची आराधना करतो हे त्यांना पटत नसे. कित्येकवेळा हिरण्यकश्यपूने आपल्या मुलाला यापासून दूर करायचा प्रयत्न केला पण कायम भगवान विष्णूंनी त्याची रक्षा केली. या सगळ्याला कंटाळून एकदा हिरण्यकश्यपूने आपली व्यथा आपल्या भगिनिस होलिकेस सांगितली. त्या दोघांनी मिळून भक्त प्रल्हादला संपवण्याचा कट रचला. होलिकेला आगीपासून कोणताच धोका नाही असे वरदान होते म्हणून ती प्रल्हादला मांडीवर घेऊन बसली आणि स्वतः भोवती आग निर्माण केली. जशी आग वाढू लागली तसा होलिकेलाच त्रास होऊ लागला आणि वरदान असूनही तीच त्या आगीत भस्मसात झाली. त्या दिवशी पासून होलिका दहन होऊ लागले.
यामागे एक शास्त्रीय कारण सुद्धा सांगितले जाते ते म्हणजे होळी सण थंडीच्या दिवसात येतो. थंडीचे दिवस सरण्याचा आणि उन्हाळ्याचे आगमन होण्याचा हा कालावधी असतो. वातावरणातील तापमान घटलेले असते ते वाढवण्यासाठी होलिका दहन केले जाते. फाल्गुन महिना संपला की चैत्र महिन्याचे आगमन होते आणि चैत्रात झाडाला नवीन पालवी फुटते. त्यासाठीच आपल्या पूर्वजांनी फाल्गुन महिन्यात होळीसाठी झाडाच्या फांद्या वापरण्याची प्रथा पाडली असावी.
दरवर्षी होणाऱ्या या सणात मागचे सगळे वाईट, जुने विसरून पुढे जावे हा संदेश दिला जातो. अनिष्ट रूढी, परंपरा या होलिकेत दहन होतात. होलिका दहन होण्याआधी ती छान सजवलेली असते. प्रत्येकजण होलिकेला हळद कुंकू वाहून प्रदक्षिणा घालतो. प्रदक्षिणा घालत असताना बाजूने पाणी सोडले जाते. त्यानंतर होळीत नारळ आणि पुरण पोळीचा नैवेद्य अर्पण केला जातो.
हा होळीचा सण कोकणात मात्र खूप उत्साहात साजरा होतो. कोकणात होळी आणि गणपती हे सण खूप महत्त्वाचे मानले जातात त्यातल्यात्यात होळीला जास्त महत्त्व असते. कोकणात होळी हा सण "शिमगा" म्हणून ओळखला जातो. कामानिमित्त बाहेर असणारे कोकणी लोक खास होळीसाठी सुट्टी काढून कोकणात हजर होतात.
कोकणात हा सण एक दोन दिवस नव्हे तर आठवडाभर साजरा केला जातो. होळीच्या आधी तिथे बरीच तयारी केली जाते. घराची अंगणे शेणाने सारवली जातात, भिंतींना लाल गेरू लावून त्यावर सुंदर नक्षी काढली जाते. संपूर्ण गाव अगदी उत्साहात होळीची तयारी करत असते. होळीच्या वेळी कोकणात पालखी नाचण्याचा एक खास कार्यक्रम असतो.
रत्नागिरीत पोफळा, आंबा अश्या झाडांच्या रुपात होळी सजते. प्रत्येकाला आपल्याच बागेतून ही झाडे द्यावीत असे वाटत असते. यात कितीही चुरस असली तरीही याचाही कौल लावला जातो आणि देवाचा निर्णय अंतिम मानून त्याप्रमाणे झाडे निवडली जातात.
देवाच्या इच्छेने मग नाचत गाजत ती परंपरे नुसार ठरलेल्या जागी किंवा देवळात आणली जातात. त्यानंतर देवळाच्या मुख्य मंडपात ठेवलेली पालखी काढली जाते. होळीच्या पाच सहा दिवस आधीपासूनच पालखीची सजावट सुरू होते. पितळ्याच्या किंवा चांदीच्या देवांना सुंदर वस्त्र, दागिने घालून नटवले जाते. मूळ गाव देवीचे देऊळ लांब जंगलात असल्याने होळीच्या संध्याकाळी पालखी सहाणेवर आणली जाते आणि तिथूनच पालखी नाचवण्याचा कार्यक्रम सुरू होतो. लाकडाचे कोरीव काम असणारी ही पालखी शंभर ते दोनशे किलो वजनाची असते पण अगदी बारीक माणसंही जेव्हा एका खांद्यावरून दुसऱ्या खांद्यावर, डावीकडे - उजवीकडे अशी गोल गोल पालखी नाचवतात तेव्हा बघणारा बघतच राहतो. होळीसाठी लागणारे लाकूड हे आंब्याचे किंवा ताडाचे असते. ते तोडून आणणे हे फार जबाबदारीचे काम असते. होळीसाठी साधारण पंधरा वर्षे असलेले झाड ज्याची उंची पन्नास ते सत्तर फूट असेल आणि वजन बाराशे ते पंधराशे किलो असेल असे झाड निवडले जाते आणि गावकरी ढोल ताशांच्या गजरात नाचत गाजत ते पालखी समोर आणतात.
त्यानंतर एक खड्डा करून त्यात मागच्या वर्षीचा खुंट रोवला जातो आणि आजूबाजूला गवत टाकून होळी दहनासाठी तयार केली जाते. यास होळीचा होम म्हणतात. होलिका दहन सुरू झाले की पुरुष आणि मुले हाताची मुठ बंद करून तोंडावर नेऊन बॉ बॉ बॉ असा आवाज काढतात. यालाच शिमगा म्हणतात. एक गंमत म्हणून ज्याने कोणी आपल्याला त्रास दिला असेल त्याच्या नावाने शिमगा केला जातो. अर्थात यात कोणताच वाईट हेतू नसतो फक्त एक गमतीचा भाग म्हणून हे केले जाते.
होळी चांगलीच धगधगली की त्यात मानाचे नारळ अर्पण केले जातात. कोकणात नवीन लग्न झालेली जोडपी हे नारळ अर्पण करतात. त्यानंतर गाऱ्हाणे घातले जाते. यात मागच्या वर्षीचे नवस फेडणे आणि यावर्षीचे नवीन नवस बोलणे हे समाविष्ट असते. हे सर्व झाल्यानंतर गावाची मुख्य बैठक होते ज्यात महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होते. सहाणेवर डोकं ठेवून नमस्कार केला की आपला संसार चांगला होणार अशी लोकांची श्रद्धा असते.
यानंतर होळीची खरी मजा सुरू होते. भांगेच्या वड्या सगळ्यांना वाटल्या जातात. जेव्हा या वड्या दुधाबरोबर घेतल्या जातात तेव्हा सगळेच भान हरपते. सर्वत्र जल्लोषाचे वातावरण असते. सोंगे, दशावतार, जाखडी नाच, राधा हे सगळे छान मनोरंजन करतात. स्त्री वेशातला पुरुष राधा बनलेली असते जी "सांगा मुकुंद कोणी पहिला..." गाणे म्हणत नृत्य करते. मृदुंगाच्या तालावर अगदी लयबद्ध फेर धरुन ती नाचत असते. कोकणात काही भागात कोंबडा बळी दिला जातो याला तिखट होळी म्हणतात.
कोकणाला प्रशस्त किनारपट्टी लाभली आहे. इथले कोळी बांधव होळीच्या दुसऱ्या दिवशी त्यांच्या होडीची पूजा करतात. इतरवेळी मासेमारीसाठी फक्त पुरुष वर्ग होडीतून समुद्रात जातो परंतु या दिवशी स्त्रियांनाही हा मान मिळतो. समुद्रात होडी फिरवताना पूजा केली जाते. सर्वजण पारंपरिक वेशभूषेत असतात. गाणी, नृत्य आणि एकत्र भोजन असा हा सण साजरा केला जातो.
भारतातील आदिवासी लोकांमध्ये देखील हा सण फार उत्साहात साजरा होतो. यादिवशी त्यांच्या आहारात गोड पुऱ्या, मासे, गोड भात यांचा समावेश असतो. येथील लोक एकमेकांना गुलाल लावून टिमक्या आणि ढोलाच्या तालावर नृत्य करून सण साजरा करतात.
होळी हा सण फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो. उत्तर प्रदेश, बंगाल, गोवा, मणिपूर, केरळ अशी जवळ जवळ सगळीच राज्ये अगदी उत्साहात होळी साजरी करतात.
होळीची अनेक गीते, गाणी, ठुमरी तर जगप्रसिद्ध आहेतच. आला होळीचा सण लय भारी, होली हैं..., रंग बरसे अशी एक ना अनेक गाणी दर होळीच्या सणाला लागतातच आणि त्यावर फेर धरून नाचणारे देखील काही कमी नाहीत.
अश्या प्रकारे हा सण उत्साहात साजरा केला जातो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी धुलवड साजरी केली जाते. यात सगळे एकमेकांना रंग, गुलाल लावतात. निसर्गाशी जोडणारा, निसर्गाशी एकरूप होण्याचा, निसर्गाच्या अधिक जवळ जाण्याचा सण म्हणून ओळखला जातो.
आपापसातील मतभेद, वाद विसरून सगळ्यांनी पुन्हा एकत्र यावे असा संदेश होळी मार्फत दिला जातो. होळीमुळे जुनं जे काही वाईट घडलं असेल ते होळीत दहन केले जाते आणि पुन्हा प्रेम, एकोपा वृद्धिंगत करण्यास मदत मिळते. असा हा होळीचा सण संपूर्ण भारतात अगदी आनंदात साजरा केला जातो. सोबतीला
होळी रे होळी पुरणाची पोळी,
आनंद घेऊन येऊन दे यंदाची होळी.
होळीच्या उठल्या ज्वाळा
त्यातून बाहेर पडल्या दुःखाच्या झळा
होळीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा!
हे गीत असतेच.

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा