माझा आवडता सण: गणेश चतुर्थी (Maza Aavdta San Ganesh Chaturthi Marathi Essay)

Essay About My Favorite Festival Ganesh Chaturthi
आपल्या भारतात आणि खासकरून हिंदू धर्मात अनेक सण साजरे केले जातात. प्रत्येक सणाला काही खास महत्त्व आणि पौराणिक कथा जोडलेली असतेच. कोणी विचारलं की, "तुझा आवडता सण कोणता?" तर याचं उत्तर देताना मात्र खूप तारांबळ उडते. सगळेच सण आपले आहेत आणि सगळ्यांनाच काहीतरी विशिष्ट महत्त्व आहे मग असा एकच सण आवडता असून कसा चालेल? मला सगळेच सण आवडतात पण सगळ्यात जास्त मला गणेश चतुर्थी आवडते.

गणेश चतुर्थी! आपल्या सगळ्यांच्याच लाडक्या गणपती बाप्पाचा जन्मदिवस. एकदंत, विनायक, लंबोदर, भालचंद्र, विघ्नहर्ता, गणपती, गजमुख आणि अशी कितीतरी नावं आपल्या लाडक्या बाप्पाची आहेत. दरवर्षी बाप्पा आपल्या घरी येणार म्हणून आपण ज्या दिवसाची वाट बघत असतो तोच हा गणेश चतुर्थीचा दिवस. गणपती बाप्पाला बुध्दीची देवता मानले जाते. विघ्नहर्ता गणेश सगळी विघ्न दूर करतो. गणांचा अधिपती म्हणून गणपती नावाने बाप्पा सगळीकडे पुजला जातो. आमच्या घरी दरवर्षी हा सण उत्साहात साजरा केला जातो.

भाद्रपद चतुर्थीला गणेश चतुर्थी म्हणतात. घरोघरी आणि सार्वजनिक ठिकाणी गणपती बाप्पांचं आगमन होणार म्हणून महिना - महिना आधीपासून तयारी सुरू असते. सजावट काय करायची?, प्रसाद काय ठेवायचा?, आरत्या घेताना कोणत्या क्रमाने घ्यायच्या?, आरत्या म्हणण्याचा सराव आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे साफसफाई सगळीकडे सुरू असते.

घरगुती गणपती असेल तर एकदा घरातली साफसफाई झाली की सगळी लहान मुलं मोठ्यांच्या मदतीने सजावट करायला घेतात. दरवर्षीपेक्षा काहीतरी नवीन आणि सगळ्यांपेक्षा काहीतरी वेगळी सजावट व्हावी यासाठी सगळेच प्रयत्नशील असतात. आजच्या इंटरनेटच्या युगात नवीन नवीन कल्पना सहज मिळतात आणि सुरू होतो सजावटीचा कार्यक्रम.

सजावटीसाठी जे काही साहित्य लागतं ते दुकानातून आणताना रस्त्यात जेवढी गणपतीच्या मूर्तींची दुकानं असतील ती सगळी बघितली जातात. सगळ्याच दुकानात खूपच सुंदर आणि बघता क्षणीच मनाचा ठाव घेतील अश्या मुर्त्या असतात. तेव्हाची बाजारपेठ अगदी आपल्या बाप्पाला जे काही आवडतं त्या सगळ्यांनी फुलून गेलेली असते. सगळी तयारी होई होई पर्यंत गणेश चतुर्थीचा दिवस उजाडतो. ढोल ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पाचे सगळीकडे आगमन होत असते. बाल गणेश, मुषकारुढ गणेश, सिंहासनस्थ आणि अजून बऱ्याच लोभस रुपात गणपती बाप्पा घरोघरी येतो.

लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात केली होती. लोकांनी एकत्र यावे, एकोप्याने राहावे आणि एकता वाढावी हा त्या मागचा हेतू होता. तेव्हापासून घरगुती गणेश उत्सवासोबत सार्वजनिक पद्धतीने देखील गणेश उत्सव साजरा केला जातो. आज जवळजवळ सगळ्याच गल्ली मोहल्यात सार्वजनिक गणेश उत्सव धूमधडाक्यात पार पाडला जातो.

सगळ्यांचेच यात काहीतरी नावीन्य आणण्याचे प्रयत्न असतात आणि त्यानुसार सामाजिक बांधिलकी जपणारे आणि समाजाला उचित संदेश देणारे देखावे सगळेच सार्वजनिक गणेश मित्रमंडळ करत असते. प्रत्येक देखावा हा सुंदर असतोच आणि सगळेच अगदी आनंदात या देखाव्यांची मजा तर घेतातच सोबत दिला जाणारा संदेशही पटकन आत्मसात करतात.

गणेश उत्सवात सगळ्याच ठिकाणी आपल्याला बाप्पांचं अस्तित्व जाणवत असतं आणि हेच मला खूप आवडतं. गणेश चतुर्थीला घरोघरी उकडीच्या मोदकांचा नैवेद्य तयार होत असताना आसमंतात भरलेला त्याचा तो सुगंध, बाप्पाला जे आवडतं ते सगळं करण्यासाठी सुरू असणारी धावपळ, लाल फुलांनी सजलेले बाजार, सगळीकडून येणारे आरतीचे सुमधुर स्वर आणि एकूणच वातावरणात असलेली प्रसन्नता अनुभवणे खूप छान असते.

या दिवसात पाऊस देखील असतोच. त्यामुळे भरपूर प्रमाणात झाडे वाढलेली असतात, सगळीकडे दुर्वा असतात आणि त्यामुळेच आपल्या पूर्वजांनी गणपतीला पत्री वाहण्याची प्रथा पाडली असावी. त्या निमित्ताने झाडांची पाने, फुले खुडली जातात आणि त्यांना अजून चांगला बहर येतो. गणपतीला दुर्वा का आवडतात याची कथा तर आपल्याला माहीतच आहे.

भाद्रपद महिन्यात येणाऱ्या गणपतीला कौटुंबिक गणपती म्हणले जाते. याच दिवशी गणपतीला गजमुख प्राप्त झाले आणि त्याचा नवीन जन्म झाला होता. सगळ्यांच्या इच्छा, नवस पूर्ण करणारा हा बाप्पा आपल्या देखील कुटुंबाचा एक भाग होतो. सगळीकडेच गणपती आलेले असतात आणि म्हणूनच गणपती दर्शनासाठी लोकांची गर्दी होत असते. लालबागचा राजा, दगडूशेठ गणपती आणि अश्या बऱ्याच ठिकाणी लोकं मध्य रात्रीपासून रांगेत उभे असतात. खूप ठिकाणी लहान मुलांना खेळता येतील अशी खेळणी लागलेली असतात. या काळात बऱ्याच प्रमाणात रोजगार निर्मिती देखील होत असते.

घरोघरी दुर्वांच्या जुड्या निवडून ठेवणे, दुर्वांची कंठी बनवणे ही कामं देखील सुरू असतात. आजकाल बाजारात सगळेच उपलब्ध असले तरीही आपल्या हातांनी आपल्या बाप्पासाठी काहीतरी करणे ही खूप खास गोष्ट असते.

आमच्या घरी दुर्वांची कंठी, हार, गेजवस्त्र हे आईच बनवते. आईने स्वतः तयार केलेला मोत्याचा शेला बाप्पाला घातला जातो. सजावटीसाठी आईने मोत्याचे मोदक देखील बनवलेले आहेत तेही मांडले जातात. सगळी तयारी झाली की यथासांग गणपतीची प्रतिष्ठापना होते. प्रतिष्ठापना झाल्यावर खरंच त्या मूर्तीमध्ये दैवत्व आल्याच्या खुणा जाणवू लागतात आणि सगळं घर प्रसन्न होतं. आरती झाल्यावर आई स्वतः नैवेद्य तयार करते.

पहिल्या दिवशी उकडीचे मोदक आणि त्यावर तुपाची धार सोडली जाते. वरण भात, दही भात, बटाट्याची भाजी आणि उकडीचे मोदक असे नैवेद्याचे ताट सजते आणि त्यावर तुळशीपत्र ठेवून बाप्पाला नैवेद्य अर्पण केला जातो. दुपार सरते न सरते तोवर संध्याकाळच्या आरतीची तयारी सुरू होते. अश्यात कधी दोन दिवस संपतात कळतच नाही. मग आगमन होते गौरींचे.

या दिवशी तर आईची जास्त घाई असते. गौरींना नैवेद्यासाठी लाडू, करंजी, चकली असे फराळाचे पदार्थ बनवणे, गौरींना साड्या नेसवणे अशी एक ना अनेक कामं ती करत असते. सगळी तयारी झाली की, "गौर आली गौर आली कश्याच्या पायी? सोन्या रूपाच्या पायी.." अश्या जयघोषात गौरींचे आगमन होते. गौरी आल्यावर त्यांना दागदागिने घालून सजवले की आरती घेतली जाते. तेव्हा खिरापत म्हणून काकडीचे काप आणि साखर खोबरे असते. त्यानंतर फराळाचा नैवेद्य अर्पण होतो आणि थोड्या वेळात दशमी (दूध घालून केलेली भाकरी) आणि शेपूच्या भाजीचा नैवेद्य अर्पण केला जातो.

दुसऱ्या दिवशी गौरी पूजनाचा दिवस असतो. या दिवशी पुरण पोळी, कटाची आमटी, वरण भात, दही भात, भाजी, उसळ, पापड, कुरडया, चटणी, कोशिंबीर अश्या पदार्थांनी ताट सजते आणि नैवेद्य अर्पण केला जातो. संध्याकाळी हळदी कुंकवाचा कार्यक्रम असतो. दुसऱ्या दिवशी गौरी विसर्जन असल्याने यावेळी गौरींचे डोळे भरल्यासारखे दिसतात. सकाळ पासून प्रसन्न वाटणारे गौरींचे चेहरे दुपारनंतर अचानक उतरलेले असतात.

संपूर्ण गणेश उत्सवाच्या काळात संपूर्ण आसमंत "गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया" या गर्जनेने दुमदुमलेले असते. सर्वानिक ठिकाणी आणि आजूबाजूच्या घरात आरतीला जाणे, सगळ्याच ठिकाणच्या बाप्पांना न्याहाळणे आणि मनोभावे त्याची सेवा करताना कधी दहा दिवस पूर्ण होतात आणि अनंत चतुर्दशी येते कळतच नाही. बाप्पाला निरोप देताना सगळ्यांच्याच डोळ्यात अश्रू येतात आणि "गणपती बाप्पा मोरया; पुढच्या वर्षी लवकर या." अश्या जयघोषात बाप्पा पुन्हा त्याच्या घरी जायला निघतो.

या संपूर्ण गणेशोत्सवाच्या काळात एक दिवस तरी आपण बाप्पाशी पाच मिनिटं शांत चित्ताने बोललो, त्याच्या समोर डोळे मिटून शांत बसलो तरीही तो आपलं सगळं ऐकून घेतो. तो फक्त भावाचा भुकेला असतो. आपण त्याच्यासाठी जे काही प्रेमाने करतो तो ते सगळं स्वीकारून आपल्याला भरभरून आशीर्वाद हे देतोच. यामुळे तो पुढच्या वर्षी परत येईपर्यंत त्याचा वास आपल्या घरात राहतोच.

आजकाल गणपतीच्या मातीच्या मूर्तीमध्ये झाडांच्या बिया असतात त्यामुळे गणपती विसर्जनानंतर ती माती एका झाडात परावर्तित होऊ लागते आणि आपला बाप्पा कायम आपल्याच सोबत राहू लागतो. नेहमी गणेश उत्सव साजरा करताना पर्यावरणाची विशेष काळजी घेतली की बाप्पा अजूनच प्रसन्न होतो. आपल्या लाडक्या बाप्पाची पूजा करताना, त्याला आपल्या घरी आणताना सगळ्यांनी हा विचार देखील करायलाच हवा. शाडू मातीच्या मूर्ती, मातीच्या मूर्ती किंवा कागदाच्या लगद्यापासून तयार केलेल्या मूर्ती घेऊन आपण आपल्या आनंदासोबत पर्यावरण देखील जपले पाहिजे.

🎭 Series Post

View all