माझं मलाच खातय

Feeling sorry for past deeds.

#माझं_मलाच_खातय

शोभना आजी व्रुद्धाश्रमाच्या खिडकीपाशी गालावर तळहात टेकवून, बाहेरचं द्रुश्य बघत बसली होती. दोनच दिवस झाले होते तिला या व्रुद्धाश्रमात येऊन.

 समोर हिरवंगार लॉन होतं. वडाचं ऐसपैस पसरलेलं झाड. त्याच्या पारावर काहीजणी गप्पा ठोकत बसल्या होत्या तर काहीजणं हात हवेत मागेपुढे करुन,वाकूनदुडून व्यायाम करत होते. 

शोभनाआजीला मात्र बाहेर जाववत नव्हतं. खिडकीबाहेरचं चित्र तिच्या डबडबल्या डोळ्यांना धुसर दिसू लागलं नि ती भूतकाळाचे धागेदोरे गुंफू लागली

शोभना म्युनिसिपालटीत कार्यरत होती. सुधाकररावांशी तिचं लग्न झालं. घरात सासूसासरे नि ही दोघंजणं पण शोभनाला सासऱ्यांच पान खाणं,मोठ्या आवाजात गाणी ऐकणं पसंत नव्हतं. ऑफिसला जाताना  ती उठायच्या आधी सासऱ्यांनी उठून शौचालयात जाणंही तिला पसंत नव्हतं. वयानुसार तात्या खाकरु लागले होते,कफाचा जोर वाढला होता पण सुधाकरराव म्हणत,"काय कटकट आहे ही. काय सारखे विचित्र आवाज काढतात तोंडातून. इतर रहिवासी काय म्हणतील!"

तात्या चालायचंच अशी मान हलवत खिडकीजवळ बसायचे. तात्यांच्या सौ,माई त्यांना त्यांच्या आवडीचा दुधाचा चहा करुन द्यायच्या. त्या चहावरुनही शोभना माईंना ओरडायची,"दूध जरा कमी घालत जा चहात. दुधाने कफ वाढतो. मग बसतात खोकत."

माई घरात केर काढायची,कोनाकोनातून लादी पुसायची,नातवाची,प्रथमची वह्यापुस्तकं व्यवस्थित लावून ठेवायची. कुठे भाजी चिर,कुठे नारळ खवून दे,कांदा चीर,ओटा पूस..अशी बरीच कामं हातावेगळी करायची. तिचं माहेर केव्हाच तुटलं होतं. आता सासरच तिचं माहेर होतं.

 तात्याही उतारवयात हळवे झाले होते. माईंना सुनेने घालूनपाडून बोललेलं तात्यांच्या काळजात रुते. माई त्यांना चालायचच तुम्ही नका मनाला लावून घेऊ म्हणायच्या पण तात्यांना सुनेचं वागणं पटेना. ते माईस घेऊन कर्जतला गेले. तिथे त्यांनी मित्रासोबत ड्युप्लेक्स बंगला घेऊन ठेवला होता. 

माईला बगिचा बनवायला ऐसपैस जागा होती तिथे. तात्यांनी तिला कुंड्या,रोपं सारं काही आणून दिलं आणि हो तिच्यासोबत उत्साहाने कामालाही लागले.

 सुधाकरराव वर्षातून दोनतीनदा फेरी मारायचे बंगल्यावर. 
माई त्यांना त्यांच्या आवडीचे पदार्थ खाऊ घालायची. लुकलुकत्या डोळ्यांनी आपल्या पन्नाशीकडे झुकणाऱ्या मुलाकडे बघायची. सुनबाईला भुईमुगाच्या शेंगा,नारळ,चिंचेचा गोळा,आंबापोळी,खारवलेले आवळे,मिरच्या,सांडगे,पापड,कुरडया असं बरंच काही पाठवून द्यायची. 

शोभना कधी सासूला मायेने दोन दिवस रहायला या म्हणाली नाही. नातवालाही आजीआजोबांचा लळा लागला नाही. प्रथम शिकला भरपूर पण मायेच्या बाबतीत कोरडाच राहिला. त्याने आपलं आपणच लग्न जमवलं. 

रजिस्टर मेरेज केल्याने शोभना व सुधाकररावांना मुलाच्या लग्नात काही हौसमौज करता आली नाही.

 सून,अनघा तिच्या आईवडिलांची एकुलती एक असल्याने तिला माहेराचा ओढा अंमळ जास्तच होता व शोभनानेही तिला कधी मायेने जवळ घेतले नाही. सासवासुनांतली दरी, भांडणं न होताच वाढत गेली. 

सासूच्या कारकिर्दीतही शोभनाचाच घरावर वचक होता. सासू गावी गेल्यानंतर तर तिचंच राज्य होतं, पुऱ्या घरावर पण नव्या विचारांच्या अनघाला तिच्या निर्णयांत किंवा तिच्या खाजगी गोष्टींत कोणीही ढवळाढवळ केलेली चालत नव्हती,अगदी तिच्या मम्मीपप्पांनीसुद्धा. शोभना तर दूरचीच गोष्ट. अनघाचं आधुनिक रहाणीमान,हॉटेलिंग शोभनाला पटेनासं झालं. तिची सुधाकररावांशी मैत्रीही शोभनाला सहन होईना. आनंदची मधल्यामधे फरफट होत होती.

सुधाकररावांसोबत शोभना सासूसासऱ्यांच्या ड्युप्लेक्स बंगल्यात रहायला आली. सासऱ्यांनी वयोपरत्वे एक्झिट घेतली होती. सासू जमिनीला तोंड टेकलं तरी देवाची पूजाअर्चा करत होती. 

घरकामाला,स्वैंपाकाला बाई ठेवली होती. शोभनाला, नव्वदी पार केली तरी तरतरीत असलेल्या सासूला पाहून  हेवा वाटला. आताशी ती सासूशी छान मनमोकळं बोलू लागली होती. 

सासूच्या मनात येई,"आधीपासूनच अशी वागली असतीस तर! माझा नवरा कमवणारा होता. आम्ही काही अवलंबून नव्हतो तुमच्यावर पैशासाठी, पण त्यांच्याशी कधी प्रेमाने बोलली नाहीस. माझं एक जाऊदे. आता तुझी सून आल्यावर तुला उपरती सुचली,वरातीमागून घोडे म्हणतात तशी. असो,ज्याचं त्याला. आपलेच दात न् आपलेच ओठ. परमेश्वरा,सुखी ठेव रे माझ्या लेकरांना." 

आजी झोपेतच गेली. गेली तेव्हा समाधान होतं तिच्या चेहऱ्यावर. त्यानंतर वर्षभरात सुधाकररावांना मुत्रपिंडांच्या दुखण्याने ग्रासलं. प्रथम त्यांना तज्ञ डॉक्टरांकडे घेऊन गेला पण तेही त्यांच्या आईपाठोपाठ गेले. 

बंगल्यांची जागा टॉवर बांधण्यासाठी बिल्डरला देण्यात आली नि शोभनाच्या मनात नसतानाही तिला मुलाच्या घरी यावं लागलं. अनघाचंच चालत होतं घरात. भाजी कुठची करायची,आमटी कोणती करायची,का बाहेरच जायचं जेवायला..सारं काही अनघा ठरवत होती.

 शोभनाला हे असं कुणाच्या अंमलाखाली जगणं जमेना. तिने स्वतःहून व्रुद्धाश्रमात जाण्याचा निर्णय घेतला. प्रथमने तिला अडवायचा कोरडा प्रयत्न केला. शोभनाने तिच्या सोन्याच्या पाटल्या अनघाला देऊ केल्या. 

अनघा म्हणाली,"चार मायेचे शब्द बोलला असतात तर ते मला याहून आवडलं असतं. माझे मम्मीपप्पा आले की आतल्या खोलीत बसून रहायचात ते जाईस्तोवर. किती वेदना व्हायच्या माझ्या मनाला! तुमचं सोनं,पैसे सगळं तुम्हाला लखलाभ. मला हवं ते मी कमवू शकते. देत असाल तर आशीर्वाद तेवढा द्या माझ्या पोटातल्या अंकुराला."

शोभनाने लेकाला व सुनेला आशीर्वाद दिला व व्रुद्धाश्रमाची वाट धरली. नेनेकाकू तिच्याशी बोलायला आल्या,म्हणाल्या,"का गं बाई,असं तोंड पाडून रहातेस. पोरांनी टाकलं म्हणून! अगं तू तुझं कर्तव्य केलंस नं, झालं मग. मस्त आनंदात रहायचं. कोणाकडूनच अपेक्षा नाही करायची. अपेक्षा केल्याने दु:ख होतं. चल बघू सागरगोटे खेळायला."

शोभना हसरा मुखवटा चढवत त्यांच्यासोबत जाऊ लागली..मनात म्हणत होती,"तुम्ही मनाने निर्मळ.  आयुष्यभर चांगलंच वागलात पण मी तशी नाही हो. सासूला,सासऱ्यांना छळलं,सुनेला आपलं मानलं नाही. अपेक्षा तरी काय करणार तिच्याकडून नि लेकाचं म्हणायचं तर त्याला जीव कसा लावायचा असतो ते शिकवलच नाही मी. कोणावरही रोष नाही माझा. माझं मलाच खातंय."

-------सौ.गीता गजानन गरुड.