माझं काही चुकलं का? भाग ५
मागील भागात आपण पाहिले की शोभाताई आणि पियु दोघीही सम्यकला आपल्यापाठी कोणी काही बोललं तर सांगायचा आग्रह करतात.. आता बघू पुढे काय होते ते.
"आई, लवकर ये.." सम्यक ओरडतच घरात आला.
"काय रे?? काय झालं?" शोभाताई घाबरून हातातलं काम टाकून बाहेर आल्या.
"आई, मैंने तेरे लिए ही साडी आणली आहे." सम्यक बॅगेतली साडी काढत म्हणाला.
"मेल्या.. काय ती भाषा.. धड ना हिंदी.. धड ना मराठी." शोभाताई करवादल्या.
"अग आई.. ही कूल भाषा आहे. पियुला खूप आवडते ही अशी भाषा. बरं ते जाऊ दे. ही साडी कशी वाटते ते सांग." शोभाताईंच्या कपाळावरच्या आठ्या बघून सम्यकने विषय बदलला.
"रंग फार डल वाटतो रे. पोत बरा आहे.. पण.. डिझाईन.."
"अग आई, पियुने स्वतः निवडली आहे. मी घेत होतो हिरवा रंग पण पियु म्हणाली म्हातार्या लोकांना भडक रंग चांगले नाही दिसत."
"म्हातारी? कोण म्हातारी? विशीत लग्न झालं आणि वर्षाच्या आत तू झालास. पन्नाशी पण ओलांडली नाही मी. आणि ती मला म्हातारी म्हणते? तू शुंभासारखं ऐकून घेतलंस? बायकोच्या ताटाखालचं मांजर झाला आहेस नुसता. ती घाऱ्या डोळ्यांची बोकी काही तरी बोलणार आणि तू हो ला हो करणार." शोभाताई चिडल्या होत्या. ते बघून सम्यक घाबरला. त्यांना शांत करायला श्रीकांतराव पण नव्हते.
"अग आई.. तुला कोण म्हातारी म्हणेल? उलट पियु तर किती कौतुक करत होती, तुझ्या या वयात एवढी कामं करण्याचं."
"या वयात? असं काय वय झालं आहे माझं?"
"खा.. नुसती माती खा.." सम्यक स्वतःवर चिडला. "आई, तू पण ना? मी एवढ्या प्रेमाने साडी आणली, ते सोडून बाकीच्या खोड्याच काढ. नाही आवडली ना तर जा आणि परत करून ये. हे घे बिल." सम्यकने वैतागून बिल शोभाताईंच्या हातात दिले.
"दहा हजार..." बिल बघून शोभाताईंचे डोळे फिरले. "तशी बरी आहे साडी. अंधारात पटकन जाणवले नाही. उजेडात बघते जरा." शोभाताईंचा राग साडीची किंमत बघून कमी झाला होता. "ती बया कुठे गेली आता?"
"अग तिला भेटली तिची मैत्रीण. त्या दोघींच्या गप्पा सुरू झाल्या. मग मी वैतागलो. म्हटलं घरी जाऊन तुला साडी दाखवून घ्यावी. तर.."
"गुणाचं गं माझं बाळ.. तू बस. मी चहा ठेवते." शोभाताई आत गेल्या. गडबडलेल्या सम्यकने साडीचं बिल बघितलं चुकून पियुच्या साडीचं बिल त्याने शोभाताईंच्या साडीचं म्हणून दिलं होतं.
"जाऊ देत.. त्यामुळे निदान शांत तरी झाली. पण यापुढे सम्यकराव तुम्हाला जपून बोलावं लागेल." सम्यकने स्वतःला सांगितलं.
"काय रे, घरी काही झालं आहे का?" रात्री झोपताना पियुने विचारले.
"नाही. का ग?" सम्यकने आश्चर्याने विचारले.
"ते आई नुसत्या मारक्या म्हशीसारखं माझ्याकडे बघत होत्या ना.. म्हणून विचारले."
"आपल्या घरात नक्की प्राणी तरी किती आहेत?" सम्यकने विचारले.
"आपल्या घरात प्राणी? काहीही असतं हं तुझं.." पियु मानेला झटका देत म्हणाली.
"मग काय.. आईला मांजर दिसलं.. तुला म्हैस. हे सगळे प्राणी मलाच का दिसत नाहीत?" भोळेपणाने सम्यक बोलून गेला.
"मांजर? आई मला मांजर म्हणाल्या?"
"छे.. मला मांजर म्हणाली आणि तुला बोकी.. मी आईला समजावणार होतो की आई मांजर स्त्रीलिंग बोका पुल्लिंग. पण आई एवढी चिडली होती ना.." सम्यक बोलून गेला.. त्याने समोर बघितले तर पियुच्या कपाळावर आठ्यांचे जाळे निर्माण झाले होते.
"तुझी आई मला साधं मांजर म्हणाली?"
"साधं नाही ग.. घाऱ्या डोळ्यांचं. माझ्या आईची नजर चांगली आहे." सम्यक पियुची समजूत काढत म्हणाला.
"तू ना आईच्या पदराखाली लपलेला बैल आहेस नुसता. तुझी आई बायकोला मांजर म्हणते आणि तू ऐकून घेतोस?"
"घ्या.. अजून एक प्राणी.. आणि आई काय तुला मांजर नाही म्हणाली.. ती तुला घाऱ्या डोळ्याची बोकी म्हणाली. मांजर तर मला म्हणाली."
"तू निघून जा इथून.. आत्ताच्या आत्ता." पियुचा आवाज चढला होता. काय चाललं आहे हे न समजलेला सम्यक खाली आला. बाबा हॉलमध्ये टिव्ही बघत बसले होते. त्यांच्या कानावर वरचा संवाद आला होताच.
"बस.." त्यांनी त्याला बाजूला बसायला सांगितलं. "काय झालं?"
सम्यकने बाबांना सगळं सांगितलं आणि शेवटी विचारलं, "बाबा, माझं काही चुकलं का?"
"चुकलं माझंच.. मी आधीच तुला हे द्यायला हवं होतं. आता यापुढे बायकोसमोर आईचा आणि आईसमोर बायकोचा विषय निघाला की हे घ्यायचे आणि तोंडात ठेवायचे." बाबांनी सम्यकच्या हातात एक बॉक्स ठेवला. सम्यक बघतच बसला.
"गेल्या वाटतं महाराणी उठून ऑफिसला? घरी आहे सासू कामं करायला.." शोभाताईंनी बोलायला सुरुवात केली. सम्यकने श्रीकांतरावांकडे बघितले. त्यांनी मानेने होकार दिला. सम्यकने त्यांनी दिलेली गोष्ट तोंडात ठेवली. शोभाताई बडबड करून थकल्या आणि 'माझ्या मेलीचं कोणाला काही पडलेलंच नाही' असं म्हणत स्वयंपाकघरात गेल्या. शोभाताईंपुढे उपाय यशस्वी झालेला बघून सम्यक खुश झाला.
"दिवसभर मरमर कामं करायची.. आणि घरी येऊनही तेच करायचं. वैताग आला आहे नुसता. पुरूषांचं बरं आहे, घरी आलं की मोबाईल घेऊन बसायचं.." पियु खोलीत येऊन बडबडू लागली. सम्यकने बाबांनी दिलेली गोष्ट तोंडात ठेवली आणि गादीवर चादर टाकायला घेतली. "नशीब तुला तरी कदर आहे माझी." पियुचा राग शांत होत गेला. रात्री पियु झोपल्यावर सम्यक खाली गेला. बाबा हॉलमध्ये टिव्ही बघत बसले होते.
"बाबा, थँक यू.. तुमचा उपाय उपयोगी ठरला." सम्यक बाबांना मिठी मारत म्हणाला.
"रामबाण उपाय आहे हा.. माझ्या बाबांनी मला सांगितला होता."
"आजोबांच्या काळातही हे होतं?" सम्यकने आश्चर्याने विचारले.
"बाळा, सासूसून जुगलबंदी आदिकाळापासून सुरू आहे. मग तुला काय वाटतं हा उपाय नसेल? उपाय तोच असतो पण त्याचं स्वरूप बदलतं." बाबा सांगत होते. सम्यक भक्तिभावाने ते ऐकत होता.
कोणता उपाय होता तो हाच प्रश्न समस्त पुरूषवर्गाला पडला आहे का?? काय म्हणताय माताभगिनींनो सांगू का यांना सुद्धा? तर सम्यकच्या बाबांनी सम्यकला दिलं होतं च्युईंगम.. कोणी बोलायला लागलं की तोंडात ठेवायचं म्हणजे आपलं तोंड बंद. समोरचा बोलतो बोलतो आणि वैतागून जातो.. तसंच काहीतरी. आता म्हणताय आधीच्या काळात कुठे च्युईंगम होतं? अहो तेव्हा आपले मूग होते की.. मूग गिळून बसणं आठवलं का? तेच ते. असं म्हणतात घरी भांडणं सुरू झाली की सगळे पुरुष तेच गिळतात. विनोद आहे विनोद म्हणूनच घ्यावा ही विनंती. एका मोठ्या कथेनंतर बदल म्हणून ही कथा लिहिली होती. ती कशी वाटली हे सांगायला अजिबात विसरायचे नाही. लवकरच भेटूयात एका नव्या कथेसह..
तोपर्यंत,
कळावे..
लोभ असावा..
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
दादर मुंबई
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा