माझं काय चुकलं भाग ९

ही एक सामाजिक कथा आई मुलाच्या नात्याची एक आगळी वेगळी गुंफण..

माझं काय चुकलं? भाग - ९

पुर्वाध:- आपण मागील भागात पाहिलं की सीमाच्या काकांनी तीच उमेश नावाच्या युवकाशी अगदी साध्या पद्धतीने लग्न लावून दिलं.  सीमा सासरी छान रुळली होती. सासरच्या लोकांना सीमा आवडू लागली होती. सर्वांच्या गळ्यातला ताईत झाली. सीमाचा सुखी संसार सुरू झाला आता पुढे..


 

माझं काय चुकलं? भाग - ९

कालचक्र वेगाने फिरत होतं. सीमाचा सुखाचा संसार सुरू होता. उमेश आणि सीमा खूप आनंदात जीवन व्यतीत करत होते. आणि काही दिवसांतच तिच्या आयुष्यात अजून एक आनंदाची बरसात आली. सीमाला आई होण्याची चाहूल लागली. एक छोटा पाहुणा घरी येणार होता. ती खूप आनंदून गेली.  ती आई होणार होती. 

उमेशला तर आनंदाने आकाश ठेंगणं झालं होतं. खूप आनंदी होता तो. सीमा त्याला खूप अमूल्य भेट देणार होती.

सीमाच्या गरोदरपणात त्याने तिची खूप काळजी घेतली. रोज तिच्यासाठी उमेश प्रेमानं खायला घेऊन यायचा. तिला फिरायला घेऊन जायचा. तिची खूप काळजी घायचा. दोघे खूप आनंदी होते.

उमेशने ही बातमी सीमाच्या आणि आपल्या घरीही सांगितली होती. उमेशच्या घरी तर आनंदाला उधाण आलं होतं.  उमेशच्या घरच्यांना ही बातमी ऐकून खूप आनंदी झाला.  उमेशने आणि तिच्या सासरच्या लोकांनी कौतुकाने मोठ्या आवडीने तिचं ओटीभरण केलं. उमेशच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. सीमा आणि उमेश खूप आनंदाने राहत होते. खूप वेळ मुलगा हवा की मुलगी यावर चर्चा व्हायची. तिला मुलगी हवी होती. आजवर तिला जे सुख मिळालं नाही ती ते सगळं सुख, ते स्वातंत्र्य ती मुलीला देणार होती. दोघांनी मिळून मुलांची काय नाव ठेवायची आधीच ठरवून टाकलं होतं.  खरंतर सीमा आई होणार होती पण उमेशला बाबा होण्याचा प्रचंड उत्साह!  त्यामूळे सीमाचं आईपण तो रोज जगत होता. आनंदाने तिला जपत होता.

सीमाचे दिवस भरत आले होते. नववा महिना सुरू झाला. सीमाचं हे पाहिलं बाळंतपण होतं. रितीप्रमाणे ते माहेरी व्हायला पाहिजे होतं. सीमाच्या सासूबाई तिला माहेरी जाण्यासाठी विचारत होत्या. त्यांनी सीमाच्या मावशीला कळवलं. आणि मग  लोकांच्या पुढे निंदा होऊ नये म्हणून तिचे वडील नाईलाजाने सीमाला माहेरी घेऊन आले.खरंतर उमेश पाठवतच नव्हता. पण त्याच्या आईने समजून सांगितल्यावर तो सीमाला माहेरी पाठवण्यास तयार झाला. पण तरीही उमेश रोज न चुकता सीमाला फोन करायचा तिची खुशाली, विचारपूस करायचा. उमेशचं प्रेम पाहून सीमाला कधी कधी गहिवरून यायचं. 

आणि एक दिवस सीमाच्या पोटात खुप दुखू लागलं तिला त्वरित इस्पितळात दाखल करण्यात आलं. तिचे आई बाबा सोबत आले होते. उमेश ऑफिसच्या अडकला होता. तसं सीमाच्या या अवस्थेबद्दल उमेशला तिच्या आईने कळवलं होतं. तोही काम उरकून विलंब न करता तातडीने इस्पितळात येण्यासाठी निघाला. सीमा इस्पितळात बेडवर वेदनेने विव्हळत होती. तिचा आई होण्याचा प्रवास सुरु झाला होता. एका जीवातून  दुसरा जीव जन्म घेणार होता.. सीमाला प्रचंड प्रसव वेदना होत होत्या. अगदी सारे देव तिला आठवत होते.. खरंच आई होणं इतकं सोप्प नसत ना..!! जाणवत होतं तिला. आणि अखेर त्या प्रसव वेदनेतून तिची सुटका झाली. पहाटे च्या वेळीस तिने एक गोंडस मुलाला जन्म दिला. बाळाला जन्म देताच तिची शुद्ध हरपली. 

थोड्या वेळाने सीमा शुद्धीवर आली. पुढ्यात मुलाला पाहून थोडी हिरमुसली. कारण तिला मुलगी हवी होती. आजवर आई वडिलांनी मुलगा मुलगी असा केलेला भेदभाव तिला मिटवायचा होता. जे सुख तिला लहानपणापासून मिळालं नव्हतं ते तिला तिच्या मुलीला द्यायचं होतं. पण मुलगा झाला होता. सीमाने स्वतःचीच समजूत घातली.

“आई होणं काही सोप्प नाही” मनातल्या मनात पुटपुटली.

हलकेच ओठांवर स्मित हास्य आलं. ती आई झाली होती. आई होण्याचा आनंद थोडीच लपून राहणार होता! 

लेबरवॉर्डच्या बाहेर येऊन डॉक्टरांनी बाहेर असलेल्या सीमाच्या नातेवाईकांना ही गोड बातमी सांगितली. 

“ अभिनंदन, मुलगा झाला आहे. आई आणि बाळ दोघेही सुखरूप आहेत”

हे ऐकून सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद उमटला. 

“चला,वंशाला दिवा मिळाला” 

असं म्हणत सीमाच्या आईने सुटकेचा निःश्वास सोडला. उमेशने  डॉक्टरांकडे दोघांच्या प्रकृती विषयी विचारपूस केली. बाळ आणि सीमा दोघेही ठीक होते.  सीमाला भेटण्यासाठी तो  सीमेजवळ आला. सीमा खूप अशक्त दिसत होती. सीमाकडे पाहून त्याने स्मित हास्य केलं आणि म्हणाला,

“सीमा, आज मी जगातला सर्वात श्रीमंत माणूस झालो बघ. तू खूप अनमोल भेट दिलीस मला. थॅंक्यु सो मच.. ”

हे बोलताना त्याचे डोळे भरून आले होते. जणू काही त्याला बाबा होण्याचं सुख दिल्याबद्दल डोळ्यातल्या आसवांची बरसात करून तिला धन्यवाद म्हणत होता.  उमेशला बाबा होण्याचा खूप आनंद झाला होता. त्या आनंदात त्याने साऱ्या वॉर्डभर  मिठाई वाटली होती.

काही दिवसांत सीमा इस्पितळातून घरी आली. सगळे नातेवाईक तिला भेटायला येत होते. उमेशने त्याच्या आई वडिलांना ते आजोबा झाल्याचे कळवलं. मुलगा झाला हे ऐकताच त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. ते दोघे सीमाला भेटायला आले. सगळे आनंदात होते. सोबत बाळंतीणीसाठी खारीक, सुखे खोबरे घालून तयार केलेला सुंठवडा आणला होता. सीमाची सासू आपल्या सुनेचं तोंडभरून कौतुक करत होती. सुनेला छान साडी बाळाला नवीन कपडे  चांदीचा वाळा, कमरेला चांदीचा कंबरबंध, सीमाच्या आई वडिलांना कपडे आणले होते. रितीरिवाजाप्रमाणे आणि त्यांच्या आर्थिक कुवतीनुसार त्यांनी सगळं व्यवस्थित केलं होतं. 

काही दिवसांनी सीमा आपल्या बाळासमवेत आपल्या घरी आली.

आपल्या बाळासोबत सीमा आणि उमेश खूप आनंदी होती. त्या चिमुकल्या बाळाच्या हसण्याने, रडण्याने घर अगदी भरून जायचं. बाळाच्या दुडक्या चालींचा आवाज घरात येऊ लागला. घरातून अंगाईगीत ऐकू येऊ लागले. सीमा सतत कामात गर्क असायची. बाळाचं न्हाऊ खाऊ घालणं यात तिचा पूर्ण दिवस जाऊ लागला. उमेशही आता पहिल्या पेक्षा जास्त मेहनत करू लागला होता. एक छोटा जीव त्या घरात वाढत होता. त्याच्या भवितव्याचा विचार त्याच्या मनाला खात होता. आपल्या मुलाला चांगलं घडवायचं, सगळी सुखं द्यायची असं मनाशी पक्कं ठरवून तो काम करत होता. दुहेरी मेहनत घेत होता.

बाळ मोठं होत होतं. वर्षांचा झाला होता. सीमा उमेशने पहिला वाढदिवस आणि नामकरण सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. सीमाचे सासरचे तिच्या माहेरचे शेजारी सगळे या सोहळ्याला हजर होते. दोघांनी मिळून त्याच नाव 'सुमेध' ठेवलं. जेवणाच्या पंगती उठल्या आणि सारे आनंदात आपापल्या घरी परतले. सुमेध आता चालू लागला होता. त्याचे बोबडे बोल ऐकून उमेश सीमा आनंदून जायचे. कौतुकाने पहायचे. खरंच खूप सुरेख प्रवास सुरु होता आई बाबांचा. आपल्या मुलांचं कोडकौतुक करण्यात उमेश कधीच कमी पडला नव्हता. सीमा कामात असली की उमेश सुमेधला सांभाळायचा. न्हाऊ, खाऊ पिऊ घालायचा. चिऊ काऊ च्या गोष्टी सांगायचा. डोस दिल्यानंतर कधी सुमेध आजारी पडला तर रात्रभर जागा राहायचा. 


 

सीमा आणि उमेश सुमेधच्या भवितव्याचा विचार करून काटकसरीने राहत होते. उमेश भाड्याचं घर सोडून दोन खोल्यांचं घर थोडं बँकेचे कर्ज काढून विकत घेतल होतं सुमेधच्या पावलांनी जणू लक्ष्मी आई घरात आली होती. वास करू लागली होती. कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी तो दुसरीकडे पार्ट टाइम काम करू लागला. सीमा साडीला फॉल पिंको,ब्लाउजला काज बटण करून देऊ लगली. उमेश त्याच्या आईवडिलांचीही काळजी घेत होता. गावाकडे चार पैसे पाठवू शकत होता. सगळं छान सुरळीत चालू होतं. 





 

पुढे काय होतं? सीमाच्या आयुष्यात अजून कोणतं संकट दबा धरून बसलं होतं?  पाहूया पुढील भागात..


 

क्रमशः

© ® निशा थोरे...

कथा आवडल्यास नावासकट शेअर करण्यास काहीच हरकत नाही.. साहित्यचोरी हा गुन्हा आहे.. लेख नावाशिवाय किंवा दुसऱ्या नावाने आढळून आल्यास सक्त कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी..

🎭 Series Post

View all