माझं काय चुकलं भाग ७

ही एक सामाजिक कथा..आई मुलाच्या नात्याची एक आगळी वेगळी गुंफण..

माझं काय चुकलं? भाग - ७

पुर्वाध:- आपण मागील भागात पाहिलं की  सीमा कॉलेज संभाळून नोकरीही करत होती. यंदा कॉलेजचं शेवटचं वर्ष होतं. परागच्या ओळखीने तिच्या मोठ्या बहिणीचंही लग्न झालं. पराग आणि सीमा यांच्या प्रेमाची कुणकुण घरी लागली आणि घरात वादळ उठलं. दोन्ही घरातून त्यांच्या प्रेमाला प्रंचड विरोध होत होता. एक दिवस संधी साधून पराग आणि सीमा एका बागेत भेटले. 

आता पुढे...


 

माझं काय चुकलं? भाग - ७

पराग आणि सीमाला एकांत मिळावा म्हणून ‘लगेच येते’ असं सांगून कुसूम तेथून निघून गेली. परागला इतक्या दिवसानंतर समोर पाहून सीमाच्या डोळ्यांतून मेघ वाहू लागले. दोघांत निरव शांतता. शांतता असूनही डोळ्यांचा मौनातला संवाद सुरू होता.  एकमेकांच्या गळ्यात पडून ते दोघे रडत होते. मोकळे होत होते. एकमेकांना समजावत होते.

थोड्या वेळाने सीमा शांत झाल्यावर तिच्या डोक्यावरून, केसांवरून हात फिरवत पराग म्हणाला,

“सीमा!, कशी आहेस ग? काय अवतार केलास? रडून रडून डोळे सुजलेत किती? नको ग इतका त्रास करून घेऊ”

 त्याला मधेच थांबवत सीमा म्हणाली, 

“पराग, मी नाही जगू शकत तुझ्या शिवाय.! खूप प्रेम करते रे मी तुझ्यावर.! आपण हे सगळं, घरदार सोडून जाऊ. आपण कोर्टात जाऊन लग्न करू. एकदा लग्न झालं की सगळे शांत होतील. आपल्या घरचे माफ करतील आपल्याला”

सीमा आर्जवे करत होती. पराग शांतपणे ऐकत होता. त्याने अलगद सीमाचा हात आपल्या हातात  घेतला. तिच्या डोळ्यांत खोलवर पाहत म्हणाला,

“सीमा, माझंपण तुझ्यावर खूप प्रेम आहे ग! एक क्षणभर ही मी तुझ्यापासून दूर राहू शकत नाही. पण प्रेमापेक्षा आपली कर्तव्ये श्रेष्ठ आहेत बघ. कर्तव्याच्या पुढे प्रेमाचा त्याग करावाच लागतो ग. आपल्या प्रेमाबद्दल घरी सांगितलं. घरी खूप वादंग उठलं. बाबांनी माझ्याशी बोलणं सोडलं. आईने खूप त्रागा केला. आई म्हणाली,

“हे लग्न झालं तर आत्महत्या करेन. संपवेन स्वतःला. मी मेल्यावर कर मग लग्न आणि त्यानंतर माझ्या पार्थिव देहाला अग्नी पण देऊ नकोस” मी हे ऐकून हवालदिल झालो आपलं लग्न झालं तर आई जीव देईल ग.! तिला गमावून माझं सुख कसं पाहू?”

सीमा रडू लागली. परागचे डोळे भरून आले.डोळ्यातलं पाणी लपवत तो बोलू लागला,

“माझं प्रेम तुझ्यावर होतं, आहे आणि कायम राहिलही. तुझी जागा कोणी घेऊ शकणार नाही. पण आपल्या आई वडिलांना दुखावून मला सुख नकोय. ही आपली शेवटची भेट.. तू मला विसरुन जा. निघतो मी! 

सीमा, आपलं प्रेम खरं आहे त्यामुळे त्याला काही कलंक लागेल असं वागू नकोस. ते प्रेम सदैव जिवंत राहू दे. प्रेमाचा हा दिवा कायम प्रज्वलित ठेव. मला वचन दे सीमा! तू स्वतःला कधीच इजा पोहचवणार नाहीस. लक्षात ठेव तू स्वतःला जखमा देशील तर त्या मला मिळतील त्यामुळे काळजी घे तुझी” 

सीमा स्तब्ध होती. डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं. तोंडातून शब्द फुटत नव्हते. ती शांत राहून त्याचं बोलणं ऐकत होती. तिच्या हृदयाचे तूकडे तुकडे होत होते. परागच्या डोळ्यांत पाणी होतं. त्याने शेवटचं तिला डोळे भरून पाहून घेतलं. तिला जवळ घेत तिच्या भाळावर आपले ओठ टेकवले आणि तिचा निरोप घेतला.

सीमा त्याच्या पाठमोऱ्या जाणाऱ्या आकृती कडे ती पाहत राहिली. अगदी हताशपणे. काय होतंय कळत नव्हतं. सगळं संपलं होतं. ‘प्रेम म्हणजे काय असत?’ हे समजण्या आधीच ते संपल होतं.  हृदयावर घाव झाला होता. सैरभैर अवस्थेत कुसूमसोबत सीमा घरी आली. त्या दिवसापासून सीमा खूप शांत झाली. घरात बोलणं कमी झालं. जगणं संपवता येत नव्हतं. तसं वचन दिलं होतं परागला. सीमाचं कॉलेज बंद झालं होतं. ऑफिस पण बंद. घरात कोंडून ठेवलेल्या पाखराप्रमाणे तिची अवस्था झाली होती. साऱ्या वाटा बंद झाल्या होत्या.

सीमाच्या वडिलांनी तिच्या लग्नासाठी स्थळं पाहायला सुरवात केली होती. रंगाने काळी सावळी, त्यात शिक्षण जास्त झालं होतं. लग्नात अडचणी येत होत्या. कधी पत्रिका जुळत नव्हती तर कधी हुंडा हवाय म्हणून लग्न जमत नव्हतं. आई वडिलांनी याचंही खापर सीमाच्या माथी फोडलं. तिला ‘ तिचं लग्न जमत नाही’ म्हणून त्रास द्यायला सुरुवात केली. घालून पाडून बोलायला सुरुवात केली

“हीचं बाशिंगच जड आहे” म्हणून हिनवायला सुरुवात केली होती.  पण आता सीमा प्रतिउत्तर देत नव्हती. गुपचूप सारं ऐकून घेत होती. शब्दांचे घाव सोसत होती. सीमा या सगळ्या गोष्टींना कंटाळून गेली होती. या सगळ्या गोष्टींचा, मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमाच्या प्रक्रियेचा तिला विट आला होता. 

दिवस सरत होते. सीमा आयुष्यातला एक एक दिवस पुढे ढकलत होती. त्याच दिवसांत नेमकी सीमाची मोठी मावशी भेटायला त्यांच्याकडे आली.  सीमाने पाहुण्यांना चहापाणी दिला. आणि ती आतल्या खोलीत निघून गेली. इतक्यात सीमाच्या आईने तिच्या लग्नाचं गाऱ्हाणं गायला सुरुवात केली. 

“आक्के, जरा सीमाच्या लग्नाचं बघ की, बावीस वर्षाची घोडी झाली तरी लग्न जमेना. हिच्या तोंडाचा आधीच प्रकाश पडला होता त्यात बया भरमसाठ शिकलीय. लोकं बक्कळ हुंडा मागताहेत. काही ना काही तरी अडचण येतेय. बघ जरा भावोजीने सांगून कुठं काय सोयरीक जुळतेय का?”  

सीमाच्या आईचा तोंडाचा पट्टा सुरूच होता. 

सीमाच्या मावशीला तिच्या बहिणीचा आणि भावोजींचा स्वभाव माहीत होता. ती त्या दोघांनाही चांगलीच ओळखून होती. सोन्यासारख्या पोरीची दोघांना कदर नाही तिने हे ओळखलं होतं. सीमाची मावशी सीमाच्या आईला म्हणाली,

“मी सीमाला माझ्या घरी घेऊन जाते. तिकडे तिच्यासाठी स्थळं पाहते. सीमालाही लगेच मुलांकडच्या लोकांना दाखवता येईल आणि मलाही सीमाची घरकामात मदत होईल. मी तिला माझ्या घरी घेऊन जाते” 

सीमाच्या आईने तिच्या वडिलांकडून सीमाला मावशीकडे  जाण्याची परवानगी घेतली. मुलीचा भार तिचे काका मावशी कमी करताहेत म्हटल्यावर तिच्या वडिलांनी लगेच होकार दिला. सीमाही रोजच्या घरातल्या वातावरणाला वैतागली होती. ‘मनाला थोडी शांती मिळेल आणि घरच्या कटकटीतून सुटकाही होईल’ या विचाराने सीमाही मावशीकडे जायला तयार झाली. वडीलांची परवानगी मिळाल्यानंतर सीमा आपल्या मावशीसोबत तिच्या गावी आली.

सीमा तिच्या मावशी काका सोबत त्यांच्या गावी आली. सीमा मावशीला घरकामात मदत करत होती. स्वयंपाक बनवण्यापासून ते घरातली साफसफाई  सगळं सीमा करत होती. आपल्या मावस भावंडांची काळजी घेत होती.  मावशीला तिची खूप मदत होत होती. सीमाचे काका तीच्यासाठी स्थळं पाहत होते. आपल्या घरापासून दूर आल्यानंतर त्या कटकटीतून सुटका झाल्यामूळे सीमा थोडी हसू लागली होती. चेहऱ्यावरील उदासी काहीशी मिटली होती. 

काही दिवसांत सीमासाठी एक स्थळ सांगून आलं. काकांनी एक योग्य मुलगा तिच्यासाठी निवडला. पत्रिका जुळली होती. मोठं कुटुंब होतं.  पाच भावंडं, सासू सासरे. एकत्र कुटुंब. सासरे आर्मीत होते. आता रिटायर्ड, मोठा मुलगा इंजिनिअर आणि दुसरा मुलगा विज्ञान शाखेतून पदवीधर. तिसरा सी.ए. आणि बाकीचे दोघे अजून शिकत होते. 

मुलाकडची मंडळी मावशीच्या घरी येऊन सीमाला पाहून गेले होते. त्यांना सीमा पसंत पडली होती. त्यांचा दुसरा मुलगा उमेश तोही फार देखणा, रुबाबदार वैगेरे नव्हता  तोही सर्व साधारणच होता. सीमा त्याच्यासाठी अनुरूप होती.  त्यालाही ती आवडली होती. पण तरीही अजून सीमाच्या आईवडिलांची पसंती बाकी होती. सीमाच्या काकांनी उमेशचा फोटो मागावून घेतला आणि सीमाच्या आईवडिलांशी बोलून कळवतो असं सांगून त्यांचा निरोप घेतला.


 

काही दिवस मावशीकडे राहून जाण्याची इच्छा नसतानाही सीमा परत आपल्या घरी जाण्यास निघाली. सीमाचे मावशी आणि काका तिला  तिच्या घरी सोडवायला आले होते. चहापाणी झाल्यावर थोडी विश्रांती घेतल्यावर काकांनी उमेशच्या स्थळाचा विषय काढला. त्याचा फोटो पुढे करत ते म्हणाले,

“ मुलगा खाजगी कंपनीत कामाला आहे. घरदार सगळं चांगलं आहे. हा मुलाचा फोटो, बघून सांगा पसंत आहे का?” 

सीमाच्या वडिल  फोटो  ढुंकूनही न पाहताच काकांना म्हणाले, 

“मुलाकडच्या लोकांना सीमा आवडली असेल तर आम्हाला काही जास्त पाहायचं नाही. होकार कळवून टाका. असही त्यांनी सीमाला पसंत केलं हीच खूप मोठी गोष्ट आहे”  

काका  थोडं बिचकतच तिच्या वडिलांना म्हणाले,

“सीमाचं काय?  तिला आवडला आहे का उमेश?”

सीमाच्या वडिलांनी काकांकडे रागात एक कटाक्ष टाकला आणि ते म्हणाले,

“आपण कधीपासून मुलींना विचारून सोयरीक करू लागलो? जास्त विचारत बसू नका. होकार कळवा आणि पुढच्या बोलणीसाठी तारीख काढायला सांगा”

सीमाच्या काकांनी निमूटपणे होकारार्थी मान डोलावली. आणि पुढच्या तयारीला लागले.

पुढे काय होतं? सीमा आणि उमेशचं लग्न होतं का ??पाहूया पुढील भागात.. 

क्रमशः

© ® निशा थोरे...

कथा आवडल्यास नावासकट शेअर करण्यास काहीच हरकत नाही.. साहित्यचोरी हा गुन्हा आहे.. लेख नावाशिवाय किंवा दुसऱ्या नावाने आढळून आल्यास सक्त कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी..

🎭 Series Post

View all