माझं काय चुकलं भाग २

ही एक सामाजिक कथा आई मुलाच्या नात्याची..

माझं काय चुकलं??..भाग - २


 

पूर्वार्ध:- कथेच्या मागील भागात आपण पाहिलं की,  सुमेधच्या बोलण्याने सीमा पुरती कोसळली. पोटच्या मुलाला तिला आई म्हणायची लाज वाटते हे ऐकून ती एकदम स्तब्ध झाली. सारा भूतकाळ डोळ्यासमोर उभा राहिला. एका मध्यमवर्गीय कुटुंबात सीमाचा जन्म झाला. तीन बहिणींच्या पाठीवर झालेलं चौथं नावडतं अपत्य. पुरुषप्रधान संस्कृती.  बायकांना कायम तुच्छतेने वागवलं जात असे. पुढे दोन वर्षांनी सीमाच्या पाठीवर 'प्रसाद' चा जन्म झाला. आणि मुलगा आणि मुलगी हा भेदभाव होऊ लागला. सीमा आणि तिच्या बहिणींना या सगळ्या परिस्थितीला सामोरं जावं लागत होतं आता पुढे..

माझं काय चुकलं??..भाग - २

दिवसांमागून दिवस सरत होते. ऋतुचक्र वेगाने फिरत होते. प्रतिकूल परिस्थितीत सीमा आणि तिची भावंडं मोठी होत होती. सीमा लहानपासूनच अभ्यासात हुशार. शिकण्याची आवड होती त्यामुळे प्रत्येक वर्षी चांगल्या मार्कानी उत्तीर्ण होत होती. एकीकडे शालेय जीवनात सीमा प्रगती करत होती आणि दुसरीकडे  घरामध्ये तिची आई तिला घरकामाचे धडे देत होती. आजी नेहमी म्हणायची,

“मुलींनी शिकून करायचं काय? मुलीच्या जातीला स्वयंपाक येणं गरजेचं.. शिकून कुठे  दिवे लावायचेत? भाकरी तर बडवायच्या आहेत” 

आजी सारखी मुलींच्या मागे  भुणभुण लावायची. वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी सीमा उत्तम जेवण बनवायला शिकली. सीमा मन लावून तिचा अभ्यास करत होती. प्रत्येक इयत्तेत चांगल्या मार्कानी उत्तीर्ण होत होती. आईला घरकामात मदतही करत होती. मुलगी म्हणून घरात सतत मिळणारी उपेक्षित वागणूक तिच्या मोठ्या बहिणी सहन करत होत्या. पण सीमा थोडी बंडखोर होती. हा अन्याय तिला सहन होत नसायचा. एखादी गोष्ट करू नको म्हणून सांगितली तर मुद्दाम ती गोष्ट करायची. दिवेलागणीच्या वेळीस बाबा यायच्या आत घरी असायलाच हवं हा नियम होता कधी कधी खेळाच्या नादात तो नियम  ती विसरून जायची. मग तिला वाटायचं, दहा मिनिटे उशीर झाला आहे असाही मार मिळणारच आहे मग निदान मनसोक्त खेळुन का जाऊ नये? मग ती पूर्ण तासभर खेळून घरी जायची. मग इतर बहिणींच्या पेक्षा जास्त मार आणि उपेक्षा मिळायची. जास्त बोलणी खावी लागायची. 

आजी आणि आई तर कायमच ‛एक बंडखोर मुलगी जन्माला आली’  म्हणून सारखा सीमाच्या नावाने उद्धार करायची. आजी बाबांना तिच्या विरुद्ध काहीबाही सांगून बाबांचे कान भरायची. बाबांना सांगून मार द्यायला लावायची. सीमा दिवसेंदिवस जास्तच बंडखोर बनत चालली होती. घरात कोणी समजून घ्यायला नव्हतं. वय वाढत होतं. बालपण सरून तारुण्यात प्रवेश होतं होता. अश्यात ऋतूचक्रानेही कौल दिला. एका पाठोपाठ चारही मुली मोठ्या झाल्या होत्या. 

तारुण्यात पदार्पण झालं होतं आणि सीमा जास्तच चिडचिड करू लागली. कधी आईने प्रेमाने समजून सांगितलं नाही. निसर्गाने एका कळीचा फुलांत रूपांतर होण्याचा, एका मुलीला आई होण्याचा सन्मान दिला होता.    तिच्यात होणाऱ्या  शारीरिक  बदलामूळे मुळातच चिडखोर असलेली सीमा दिवसेंदिवस अजूनच बंडखोर झाली.  आजी आणि आई जास्तच कडक नियमांत त्यांच्याशी वागू लागल्या. त्या चार दिवसात बाजूला बसवू लागली. 

“आता तू  मोठी झालीस. घराच्याबाहेर जायचं नाही. मुलांशी बोलायचं नाही. खाली मान घालून चालायचं. पुर्णपणे अंग झाकून कपडे घालायचे. स्वयंपाक चौघीनी ठरवून आळीपाळीने करायचा. धुणी, केर, सगळं त्या चौघी बहिणींनी करायचं”

असे बरेच नियम घालून दिलेले. जणू आईने आणि आजीने स्वयंपाकाच्या कामातून संन्यास घेतला होता.

सीमाला हे नियम मुळीच आवडत नव्हतं.  तिला शिकायचं होतं. ‛रांधा..वाढा..उष्टी काढा..!!’ यांत तिला अडकून राहायचं नव्हतं. त्यामुळे ती कोणाचं ऐकत नव्हती.  वडील खूप मारायचे. कारणही खूप क्षुल्लक असायचे. घरकाम नाही केलं.बाहेर खेळायला गेली की मार पडायचा. त्यामुळे  सीमाच्या मनात आपल्यावर कोणीच प्रेम करत नाही ही भावना सारखी उफाळून यायची.

एकदा काय झालं. त्या वेळीस त्यांच्या इमारतीला पाणी टंचाई मूळे एकच वेळ पाणी यायचं. त्यामुळे पाणी साठवून ठेवावं लागायचं. पण खेळण्याचा नादात सीमा पाणी भरून ठेवायचं विसरून गेली.  घरात पाणीच नाही. रात्री बाबा घरी आल्यावर आईने ही गोष्ट सांगितली. बाबा खूप चिडले. आणि मग ‛पाणी भरलं का नाही?’ म्हणून सीमाला खूप मारलं. अगदी जीव जाईपर्यंत.

“नका ओ मारू बाबा., का मारताय? काय चुकलंय? आईई!!”

ती मोठमोठ्याने आक्रोश करत होती. 

सीमाच्या नाका तोंडातून रक्त वाहत होते. आणि तिचे बाबा  तिला एखादया जनावराला मारावं तसं मारत होते. बाबा  लाथाबुक्क्यांनी  तिला बदडून काढत होते.. ती विव्हळत, आक्रोश करत होती. जीव वाचवण्यासाठी ती या घरातून त्या घरी पळत होती आणि तिचे बाबा तिच्यामागे..

शेजारच्या काकूंना तिची दया आली. त्यांनी मध्ये पडून तिला वाचवलं. 

“वयात आलेल्या मुलीला असं मारू नये”

सीमाच्या बाबांना समजावून सांगितलं. बाबा शांत झाले. 

दुसऱ्या दिवशी शेजारच्या काकूंनी सीमाच्या जखमांवर हळद लावून दिली. नेमकं ते तिच्या आईने पाहिलं आणि बाबांना सांगितलं. 

“दुसऱ्यांना घरातल्या गोष्टी सांगतेस. आईवडील किती वाईट आहेत हे सांगतेस. तुझा किती छळ करतात हे पसरवतेस”

असं म्हणत तिच्या बाबांनी पुन्हा मरेपर्यंत मार दिला. सीमा आक्रोश करत राहिली. रडत राहिली. पुन्हा नव्या जखमा.. 

या घटनेच्या दुसऱ्या दिवशीच सीमाचा नववीच्या वार्षिक परीक्षेचा निकाल लागला. आणि ती शाळेतून पहिली आली.  होती. सर्व शिक्षकांनी तिचं कौतुक केलं. सर्वांना आनंद झाला होता.  पण तिच्या घरच्यांना त्याचं काहीच कौतुक नव्हतं.. 

“मुलींना शाळा शिकून करायचं तरी काय?”

असं त्यांना वाटायचं आणि हा छळ असाच सुरू राहायचा. 

पण कळत नव्हतं तिचा का असा छळ? मुलगी म्हणून का इतकी दुय्यम वागणूक? सीमा खूप रडायची.. घरातलं वातावरण बिघडत होत चाललं होतं. घरातल्या वातावरणाला ती कंटाळली होती. घरच्यांच्या विषयी  तिच्या मनातप्रचंड राग निर्माण झाला होता.

सीमा आणि तिच्या बहिणींचा रोज असाच छळ सुरू होता. सीमा खूप हट्टी आणि बंडखोर बनली होती. इतका मार सहन करूनही ती कोणाचंच ऐकत नव्हती. 

दिसायला सर्व साधारण. नाकेडोळी नीटसं असली तरी रंग काळा. त्यामुळे मनावर तिच्या प्रचंड दडपण होतं. 

‛गोरा रंग असेल तरच मुलींना सगळे विचारतात. पण आपला रंग काळा आपण कोणालाच आवडत नाही’

ही भावना सीमाच्या मनात दिवसेंदिवस तीव्र होत चालली होती. घरी होणारा मानसिक, शाररिक छळ यामुळे प्रंचड तणावाखाली ती जगत होती. जगण्याची इच्छा संपत चालली होती. ‛नको हे जगणं’ असं तिला वाटू लागलं होतं.

आणि एक दिवस बहिणी शाळेत गेलेल्या, आई भाजी आणण्यासाठी बाजारात गेली होती.  सीमा या जाचाला, आपल्या जीवाला कंटाळली होती. आणि तिने स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला. स्वयंपाक घरात गेली.  तिथे तिला कोपऱ्यात ठेवलेलं  झुरळ मारण्याचं जालीम औषध दिसलं. मागचा पुढचा कसलाही विचार न करता सीमाने ते औषध पिऊन टाकलं. वेदनेच्या प्रवासाचा अंत करून टाकण्याचा प्रयत्न केला. विष पोटात जाताच काही क्षणातच सीमाला भोवळ आली. तिच्या तोंडातून फेस येऊ लागला.

आजी बाहेरच्या खोलीत बसली होती. घरात येऊन पाहते तर काय!! सीमा जमिनीवर अस्ताव्यस्त पडली होती. तोंडातून फेस येत होता. आजी घाबरून गेली. मोठमोठ्याने ओरडू लागली. शेजारीपाजारी पटकन गोळा झाले. ताबडतोब सीमाला इस्पितळात दाखल केलं. आई बाबा घरी आल्यावर त्यांना सगळा प्रकार शेजाऱ्यांकडून समजला आणि तेही त्वरित इस्पितळात दाखल झाले.

पुढे काय होईल? सीमाचा जीव वाचेल का?  सीमाच्या आयुष्यात सुख येईल का पाहूया पुढील भागात..

क्रमशः..

© ® निशा थोरे..

कथा आवडल्यास नावासकट शेअर करण्यास काहीच हरकत नाही.. साहित्यचोरी हा गुन्हा आहे.. लेख नावाशिवाय किंवा दुसऱ्या नावाने आढळून आल्यास सक्त कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी..

🎭 Series Post

View all