माझं काय चुकलं भाग ११

ही एक सामाजिक कथा आई मुलाच्या नात्यांची एक आगळी वेगळी गुंफण

माझं कुठे चुकलं??..भाग - ११

पुर्वाध:- आपण मागील भागात पाहिलं की  सीमा आणि उमेश आपल्या मुला सोबत खूप आनंदात होती.. उमेशने स्वकष्टाने आणि थोडं बॅंकेतून कर्ज काढून स्वतःच दोन खोल्यांच घर घेतलं होतं. सगळं सुरळीत चालू असताना एक दिवस नियतीने डाव साधला..एक अपघातात उमेश देवाघरी गेला. आता पुढे...

माझं कुठे चुकलं??..भाग - ११


 

सीमा वयाच्या अवघ्या पंचविसाव्या वर्षी विधवा झाली होती. लहानपणापासून भोगलेल्या दुःखानंतर आत्ता कुठे सुखाचे दिवस येत होते. तर नियतीने असा नवा डाव मांडला होता. एका विधवेचं जीणं तिच्या वाट्याला आलं होतं. कळत नव्हतं देव तिची का इतकी सत्त्वपरीक्षा पाहत होता. गावी उमेशचा दशक्रियेचा कार्यक्रम झाला. सगळं कार्य झालं. सासऱ्यांची विधी करताना सीमाच्या साडीचा पदर फाडला नव्हता. तो उमेशच्या सरणांवर टाकला नव्हता. तसं करून  जणू त्यांनी तिच्या घरच्यांना दुसरं लग्न लावून देण्यास परवानगी दिली होती. सीमा अजून लहान होती.

आता पुढे काय? निरागस सुमेधला यातलं काही कळत नव्हतं. तो त्याच्या पप्पांना भेटण्यासाठी रडत होता. त्याच्या प्रश्नांची उत्तरं सीमाकडे नव्हती. सीमाने सुमेधला पटकन उचलून घेतलं. भरल्या डोळ्यांनी त्याचे पापे घेऊ लागली. पण आता तिला या दुःखातून सावरायचं होतं. पुढे तिला सुमेधचं भवितव्य घडवायचं होतं. उमेशने सुमेधसाठी पाहिलेलं स्वप्न तिला पूर्ण करायचं होतं. तिच्या बाळासाठी तिला जगायचं होतं.


 

काही दिवसांनी सीमा आपल्या सासू सासऱ्यांची परवानगी घेऊन तिच्या राहत्या घरी सुमेधला घेऊन माघारी आली. तिने तिच्या सासू सासऱ्यांना सोबत येण्याबद्दल खूप विनवलं. पण ते तयार झाले नाहीत. लोकांच्या ऐकण्यावरून किंवा काही पुर्वग्रहित समजामुळे सीमलाच दोषी ठरवण्यात आलं. तीच उमेशकडे लक्ष नव्हतं. तिच्या मानसिक त्रासामुळे कदाचित उमेशचा अपघात झाला असावा. असे तर्कवितर्क, चर्चा केली जात होती. उमेश गेला आणि तिला माणसांचे मुखवट्यांआडचे चेहरे तिला उमजू लागले होते. तिने सुमेधला घेऊन जगायचं, या दुःखाला समोर जायचं ठरवलं.

सुमेध अवघा दीड वर्षांचा होता. स्वतःचं घर इतकंच काय ती संपत्ती उरली होती. उमेशने  लोकांकडून घर घेताना उधारीवर पैसे घेतले होते. बँकेचे कर्ज होते.. ते सर्व फेडल्या शिवाय तिला कुठेच जाता येत नव्हतं. शिवाय सुमेधच्या भवितव्याचाही विचार तिच्या मनात येत होता. उमेश खाजगी कंपनीत कामाला होता. त्यामुळे त्याच्या अपघातानंतर कंपनीकडून काहीच मदत झाली नाही. कोणताही विमा नव्हता त्यामुळे तिथूनही मदत झाली नाही. अपघातात उमेशला तसच रस्तात टाकून भरधाव वेगाने टाकून गेलेल्या ट्रकचा थांगपत्ता लागत नव्हता. गुन्हा कोणावर दाखल करणार? आणि नुकसान भरपाईची मागणी कोणाला करणार? थोडे दिवस उमेशच्या जाण्याने हळहळणारे देणेकरी आता दारात येऊ लागले होते. व्यवहाराची आठवण करून देत होते. उधारी परत मागत होते. यात तिचे स्वकीयही  होते आता तिची खरी लढाई सुरू झाली होती. 


 

सीमाने नोकरी करण्याचे ठरवलं. वडीलांनी शिक्षण अर्धवट सोडायला भाग पाडलं होतं. त्यामुळे नोकरी मिळत नव्हती. एक विधवा म्हणून समाजात वावरताना बऱ्याच अडचणी येत होत्या. पुरुषांच्या वाईट नजरांना सामोरं जावं लागत होतं. एका शेजारणीच्या ओळखीने एका खाजगी कंपनीत ती सुपरवायझर म्हणून  कामाला जाऊ लागली. तिने सुमेधला पाळणाघरात ठेवलं. दीड वर्षाच्या एवढ्याश्या जीवाला एकट्याला सोडून जातात तिच्या जीवावर यायचं. रोज त्याला सोडून निघताना डोळे भरून यायचे.सुमेध पाळणाघरात सारखा आजारी पडायचा. सर्दी खोकला चालू राहायचा. मग सीमाला काही सुचायचं नाही.नविन असल्यामुळे सुट्ट्या मिळणंही शक्य नव्हतं. सासूबाईना तिने तिच्याकडे येऊन राहायला विनावलं  तर त्यांनी स्पष्ट नकार दिला. 

“आमचा मुलगा गेला आमचं सगळं संपलं. तू मोकळी आहेस तुला हवं ते करायला”

असं त्यांनी तिला स्पष्ट सांगून टाकलं होत. सीमाला कळून चुकलं होतं. कोणीच कोणाचं नाही..सासरच्यानी तोंड फिरवली होती. सुनेची नातवाची जवाबदारी झटकून मोकळे झाले होते.  

सीमाने तिच्या आईवडिलांना विनंती केली,

“सुमेध मोठा होईपर्यत त्याचा संभाळ करा. मी तुम्हाला महिन्याला पैसे पाठवत जाईन. पण तो तुमच्याकडे सुखरूप राहील”

तिला पूर्ण खात्री होती. पैसे देते म्हटल्यावर शिवाय सुमेध मुलगा होता त्यामुळे ते नक्कीच सांभाळतील. आणि घडलंही तसच. तिचे आईबाबा सुमेधचा संभाळ करायला तयार झाले. पोटच्या मुलाला, काळजाच्या तुकड्याला ती स्वतः पासून दूर करत होती. त्याच्याच भवितव्याचा विचार करून तिने हा निर्णय घेतला होता.

सीमाने मोठ्या कष्टाने मनावर दगड ठेवून सुमेधला तिच्या आईवडिलांकडे ठेवले होते. प्रत्येक महिन्याला ती एक ठराविक रक्कम पाठवून देत होती. तिच्या सुट्टीच्या दिवशी, प्रत्येक रविवारी ती सुमेधला भेटायला घरी यायची. रोज सुमेधला फोन करायची. फोनवर बोलताना जीव कासावीस व्हायचा. आपल्या काळजाच्या तुकड्याला असं दूर ठेवताना किती यातना झाल्या असतील त्या माऊलीला देवच जाणो! पण एक गोष्ट खरी की आई इतका श्रेष्ठ योद्धा नाही. आपल्या मुलांसाठी ती साऱ्या जगाशी लढू शकेल इतकी ताकत असते तिच्याकडे. देवानेच आईला इतकी महान शक्ती बहाल केली असावी.

सीमाचा खडतर प्रवास सुरु झाला होता. आधीच एक तरुण विधवा म्हणून जगताना बऱ्याच संकटांना सामोरं जावं लागत होतं. ज्यांना ती आपलं समजत होती त्या सर्वांनी पाठ फिरवली होती. रक्ताची नाती फक्त सांगण्यापूरतीच उरली होती. आजूबाजूचे शेजारी एक विधवा म्हणून तिच्याकडे विचित्र नजरेने पहात होते.पुरूषांच्या वासनाधीन नजरा तीच जगणं मुश्किल करत होत्या. ज्यांना ती भाऊ म्हणायची.उमेश असताना ती माणसं घरी यायची. सुमेध त्यांना मामा बोलायचा. तेच मानलेले भाऊ आज तीच शिलहरण करू पाहत होते. खुल्लेआम तिला तिच्या शरीराची मागणी करू लागले. कोणी सरळ तोंडावर तर कोणी आडून आडून.. आणि सीमाने नकार देताच तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायला सुरुवात. ती कशी वाईट चालीची आहे हे जगाला बोंब मारून सांगायला मोकळे, पुरुष तर पुरुष इथे बायकांही काही कमी नव्हत्या. घरी कोणी ऑफिसमधले आले की आजूबाजूच्या बायका ज्या कधी काळी तिच्या मैत्रिणी होत्या त्या शंकेने पहात कुत्सितपणे हसत असायच्या. कधी मागे तर कधी तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायच्या.

सीमाची एक जिवलग मैत्रीण होती. रेखा तिचं नाव. ती सीमाला समजावून सांगायची. ती म्हणायची,

"सीमा..! समाज असाच असतो. जो भीक मागू देत नाही आणि कामही करू देत नाही. अश्या फालतू गोष्टींकडे तू लक्ष देऊ नको. तू तुझ्या मुलाचा विचार कर. सीमा जाणारा गेला म्हणून जगणं थांबत नाही ग..! जगावंच लागतं. सुमेधच्या भवितव्याचा विचार कर. चार पैसे गाठीशी ठेव. उद्या तेच कामी येतील"

तिच्या बोलण्याने सीमाला हुरूप यायचा. आधार वाटायचा. पण तिलाही संसार होता. ती किती दिवस सीमाकडे लक्ष देणार होती? पूर्वी ती नेहमी तिच्याकडे जायची. पण मग नंतर सीमाला जाण कमी केलं. रेखा होतीच सोबतीला कायमच. पण किती दिवस सीमा असा आधार शोधत राहणार? 

मग सीमाने स्वतःच स्वतःची मैत्रीण व्हायचं ठरवलं. मुलाच्या भवितव्याचा विचार करून  लोकांकडे दुर्लक्ष करायचं ठरवलं.  ही आपली लढाई आपणच लढली पाहिजे स्वतःलाच निक्षून सांगितलं. उमेशच्या आठवणींना दूर करण्यासाठी स्वतःला कामात व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न केला. तिच्या जगण्याचं ध्येय निश्चित केलं. आणि त्या अनुषंगाने पाऊलं टाकू लागली.

पहिलं ध्येय होतं लोकांची देणी मिटवण. इतक्या तुटपुंज्या पगारात ते शक्य नव्हतं. म्हणून तिने पार्टटाईम नोकरी स्वीकारली. तिच्या ऑफिसची वेळ १० ते संध्याकाळी ६ अशी होती. उरलेल्या वेळेचा तिने उपयोग करून घेतला. सुमेध लहान असताना तिने ज्या इन्स्टिट्यूट मध्ये कॉम्प्युटर आणि अकाउंट्स टॅली नावाचा कोर्सेस शिकली होती त्याच कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट मध्ये ती अकाउंट्स शिकवू लागली. टॅली कोर्स शिकवू लागली. सकाळी सीमा साडे सहा वाजता बाहेर पडायची. सकाळी ७ ते १० पर्यंत इन्स्टिट्यूटमध्ये नंतर तीच ऑफिस आणि पुन्हा ऑफिस सुटल्यानंतर संध्याकाळी ७ ते रात्री ९ पर्यंत इन्स्टिट्यूट मध्ये ती शिकवू लागली. सीमाला पहिल्या पासुनच शिकवण्याची आवड असल्याने तिच्या वेळेत वर्ग पूर्ण भरून असायचा. मुलांना तिच्याच वेळेत अडमिशन हवं असायची. तिच्या वेळेत जास्त गर्दी होऊ लागली. फी मधली ६० टक्के रक्कम तिला देण्याचं इन्स्टिट्यूटने कबूल केलं. तिचा पगाराव्यतिरिक्त अजून जास्तीची रक्कम मिळू लागली होती.

हळूहळू सीमाने जे देणेकरी होते त्यांची सगळ्यांची देणी फेडून टाकली. फक्त घराचं बँकेचे कर्ज  राहिलं होतं. पण एक एकटी स्त्री दिवसाचे १२-१२ तास काम करत होती. सकाळी साडे सहापासून रात्री १० पर्यंत घरा बाहेर राहत होती.लोकांचे कर्जे फेडत होती. पण समाजातल्या लोकांना इतका वेळ बाहेर असते म्हणजे नक्कीच वाम मार्गाने पैसा कमवत असेल. असा समज करून तिच्यावर चिखलफेक करायला सुरवात केली. ती विधवा आहे हाच मोठा कलंक घेऊन ती जगत होती.

तीने तो परिसर सोडण्याचा निर्णय घेतला आणि राहतं घर विकुन नवीन घर घेण्याचं ठरवलं. एका घर जागेची खरेदी विक्री करणाऱ्या दलाला भेटली. त्याने एक घर पाहुन दिलं. सगळी कागदपत्रे तयार झाली जुनं घर विकून आधीचं बँकेचे कर्ज फेडून तिने बँकेकडून अजून नवीन कर्ज केलं आणि तीन खोल्यांचं घर घेतलं. सुमेध परत आल्यावर त्याच्यासाठी वेगळी खोली. तिला नेहमी वाटायचं सुमेधला काही कमी पडू नये. तो घरी परत आला की सगळ्या वस्तू घरात हव्यात. आता ती अजून जोमाने काम करू लागली.

सुमेध मोठा होत होता. तो शाळेत जाऊ लागला होता. सीमाचं दुसरं ध्येय होतं तीच राहिलेलं शिक्षण पूर्ण करण. आता ती त्या ध्येयपूर्तीच्या प्रयत्नात होती. सीमाने बाहेरून पदवीच्या परीक्षेचा फॉर्म भरला. इतक्या व्यस्त वेळापत्रकातही ती रात्रीची जागून अभ्यास करायची आणि ती अखेर परीक्षा उत्तीर्ण झाली. सीमा पदवीधर झाली. अजून एक स्वप्न साकार झालं. तिचा आनंद गगनात मावेनासा झाला.  इतके दिवस ती पदवीधर नव्हती म्हणून दुसऱ्या नोकरीच्या शोधात बाहेर पडत नव्हती. पण आत्ता ती नोकरीसाठी मुलाखती देऊ लागली. गेलेला आत्मविश्वास परत येऊ लागला होता. काही दिवसांनी सीमाने एका मोठ्या कंपनीत अकाउंट्स मॅनेजर या पदासाठी नोकरीचा अर्ज केला. तिथे सगळ्या परीक्षा ती उत्तीर्ण झाली. तिला निवडण्यात आलं होतं.. चांगला पगार, चांगलं पद मिळणार होतं. आजवर केलेल्या कष्टाचं चीज होणार होतं. तिने पहिल्या कंपनीत राजीनामा दिला आणि नवीन नोकरी, जबाबदारी स्वीकारली.

नोकरीत बरेच चढउतार येत होते. बऱ्याच अडचणी येत होत्या. नोकरीच्या या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी तिला तीच ज्ञान वाढवण्याची गरज होती. कारण नोकरीची गरज होती. नाविन येणाऱ्या बदलाची माहीती असणं गरजेचं होतं. नोकरी टिकवण्यासाठी तिने पूर्ण लक्ष तिच्या कामावर केंदित केलं. तिच्या मेहनतीला यश मिळत गेलं. दिवसेंदिवस प्रगती होत होती.

मग पुढे काय होतं सुमेधच्या त्या विधानामागे काय गुपित दडलेलं आहे पाहूया पुढील भागात..



 

क्रमशः

© ® निशा थोरे...

कथा आवडल्यास नावासकट शेअर करण्यास काहीच हरकत नाही.. साहित्यचोरी हा गुन्हा आहे.. लेख नावाशिवाय किंवा दुसऱ्या नावाने आढळून आल्यास सक्त कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी..

🎭 Series Post

View all