माझं काय चुकलं भाग १०

ही एक सामाजिक कथा .. आई मुलाच्या नात्याची आगळी वेगळी गुंफण..


 

माझं काय चुकलं? भाग - १०

पुर्वाध:- आपण मागील भागात पाहिलं की  सीमा आणि उमेश आपल्या मुलासोबत खूप आनंदात होती. लहान बाळाच्या घरी येण्याने घरात चैतन्य संचारलं होतं. बाळ वर्षाचा झाल्यावर मोठ्या थाटामाटात त्याचं बारसं केलं. सीमाच्या आणि उमेश आवडीचं ‘सुमेध’ हे नाव ठेवण्यात आलं. दोघंही मुलाच्या भवितव्याचा विचार करू लागले. उमेश पार्टटाईम  नोकरी करू लागला. सीमाही घरगुती काम करून हातभार लावू लागली. काही दिवसांत उमेशने स्वकष्टाने आणि थोडं बॅंकेतून कर्ज काढून स्वतःच दोन खोल्यांच घर घेतलं. सीमा आणि उमेश आपल्या सुखी संसारात काटकसरीने जीवन व्यतीत करत होते. आता पुढे..


 

माझं काय चुकलं? भाग - १०


 

सगळं छान सुरळीत सुरू होतं. सुख सीमा आणि उमेशच्या घरात अगदी सुखा समाधानाने नांदत होतं. फार काही नाही पण गरिबीतही दोघे खूप सुखी होते. आनंदी होते. छोटा सुमेधच्या बोबड्या बोलाने, दुडक्या चालीने  सारं घर भरून जात होतं. दोघेही त्याचं बालपण भरभरून जगत होते. सीमाही आपलं आईपण मनमुराद जगत होती. सुमेधचं सारं करण्यात तिला दिवस पुरत नव्हता. 

पण एक दिवस तिच्या सुखी संसाराला कोणाची तरी दृष्ट लागली. लहानपणापासून  दुःख आणि फक्त दुःख भोगणाऱ्या सीमाच्या वाट्याला सुख आलं होतं. पण क्रूर नियतीला हे मान्य नव्हतं. नियतीने घात केला.


 

कामावरून परत येत असताना रस्ता ओलांडत असताना एका भरधाव येणाऱ्या ट्रकने त्याला जोरात उडवले होते. भर रस्त्यात रक्ताच्या थारोळ्यात त्याचा देह निपचित पडला होता. उमेशने जागच्या जागीच प्राण सोडले होते. उमेशवर  काळाने झडप घातली. आजूबाजूच्या लोकांनी स्थानिक पोलिसांना कळवले. पोलीस घटनास्थळी अँबुलन्स घेऊन पोहचली. उमेशला सरकारी इस्पितळात नेण्यात आलं आणि तिथे तो मृत झालाय घोषित करण्यात आलं. पोलीस पुढच्या तपासणीला लागले. उमेशच्या पाकिटात त्याचं ओळखपत्र, आधारकार्ड मिळालं होतं. त्यावरून त्याना उमेशच्या घरचा पत्ता मिळाला. इतकी भीषण  बातमी घेऊन पोलीस सीमाच्या घरी निघाले होते.

रोजच्या नेहमीच्या परतण्याच्या वेळेत उमेश घरी आला नाही. कधी उशीर होणार असेल तर तो तिला आधीच सांगून जायचा. आज तर तो तसं काहीच सांगून गेला नव्हता. सीमा चिंतातुर झाली. तिने जवळपास राहणाऱ्या उमेशच्या मित्रांकडे विचारणा केली. त्या सर्वांनी तो नेहमीच्या वेळेत ऑफिसवरून निघाल्याचे सांगितलं मग तर ती अजूनच घाबरली.

“कुठे गेला असेल उमेश? अजून का आला नाही?”  

तिला काहीच कळायला मार्ग नव्हता. 

आज सकाळपासूनच तिला उदास वाटत होतं. सुमेधही खूप रडत होता. संध्याकाळी देवापुढे लावलेला दिवाही अचानक विझून गेला. बाहेर कुत्री भेसूरपणे रुदन करत होती. तिच्या काळजाचं पाणी झालं. 

“ईश्वरा! का सगळ्या अशुभ घटना घडत आहेत? कुठे असेल उमेश? अजून का नाही आला? इतका उशीर कधीच होतं नाही आणि होणार असेल तर त्याचा फोन येतो. आता तर त्याचा फोनही लागत नाही. काय झालं असेल? देवा, उमेशची रक्षा कर.खूप चांगला आहे तो! माझा उरलेलं आयुष्यही त्याला दे.. त्याला सुखरूप ठेव.”

सीमाला खूप भीती वाटली. तिने रामरक्षा म्हणायला सुरुवात केली.

बरीच रात्र झाली होती. उमेश अजून आला नव्हता.तिने माहेरी सासरी दोन्हीकडे काळजीने फोन केला. उमेश अजून घरी आला नसल्याचं सांगितलं. त्यांनाही थोडी काळजी वाटली पण सीमाला धीर देण्यासाठी त्या तिला म्हणाल्या,

“ अग, काळजी करू नको. कोणत्यातरी कामात अडकला असेल म्हणून उशीर झाला असेल. अजून थोडा वेळ वाट बघ येईलच तो”

त्या सीमाला समजावून सांगत होत्या. तिला अजून थोडा वेळ वाट पहायला सांगितलं. धीर  देण्याचा प्रयत्न केला.

इतक्यात कोणीतरी जोरात दार ठोठावलं. तिला वाटलं उमेशचं आला म्हणून ती पटकन धावतच दाराकडे आली आणि दरवाजा उघडला. पण समोर उमेश नव्हता तर समोर पोलीस उभे  होते. सीमा अजूनच घाबरून गेली. त्यातल्याच एका पोलिसांनी तिला विचारलं, 

“हे उमेश देसाई यांचंच घर आहे ना?”

सीमाने होकारार्थी मान हलवली. 

“मग तुम्ही कोण? कोण कोण राहतं इथे? घरात अजून दुसरं कोणी मोठं माणूस आहे का ” 

पोलिसांनी प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. त्यांना उत्तर देत सीमा म्हणाली,

“हो, मी त्यांची पत्नी आहे. आम्ही दोघे आमच्या छोट्या बाळासोबत राहतो. का काय झालं? सगळं ठीक आहे ना! उमेश कुठे आहे?”


 

“एक वाईट बातमी आहे. उमेश यांचा अपघात झालाय”

पोलिसांनी उमेशच्या अपघाताची बातमी सांगताच तिला मूर्च्छा आली अन ती धाडकन जमिनीवर कोसळली. स्त्री वेशातल्या पोलिसांनी तिच्या तोंडावर पाणी मारून शुद्धीवर आणलं. सीमा स्तब्ध बसली होती.  इतक्यात आजूबाजूचे शेजारी गोळा झाले. पोलिसांनी शेजारच्या पुरुषांना उमेश अपघातात मृत झाल्याचं सांगितलं. सर्वजण हळहळत होते. शेजारच्या बायका तिला सावरण्याचा प्रयत्न करत होत्या. शेजारच्या लोकांनी तिच्या सासरच्या लोकांना आणि माहेरच्या लोकांना कळवलं. उमेशच्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी इस्पितळात येऊन मृतदेह ताब्यात घेण्यास सांगून ते निघून गेले.

पहाटे सगळे नातेवाईक पोहचले. सीमाच्या वडिलांनी अजून दोघांतिघां नातेवाईकांना सोबत घेऊन सरकारी इस्पितळात जाऊन उमेशचा मृतदेह अँबुलन्सने घरी घेऊन आले उमेशची आई लांबूनच रडत आली. सगळे नातेवाईक रडत होते. पण सीमा स्तब्ध. तिच्या डोळ्यांतून पाणीच येत नव्हते. एकटक ती त्याच्या मृतदेहाकडे पाहत होती. उमेशच्या अंतिम संस्काराची तयारी सुरू झाली.. त्याला शेवटचं स्नान घातलं हार चढवले. सगळ्या नात्यातल्या बायका आक्रोश करत होत्या. एवढा तरुण सोन्यासारख्या मुलासोबत हे काय झालं जो तो हळहळत होता. छोट्या सुमेधला तर काहीच कळत नव्हतं. तो सारखं विचारत होता,पप्पा का झोपलेत? मला पप्पांकडे जायचं. तो रडू लागला. त्याचं निरागस बोलण ऐकून उपस्थित असलेल्या सर्वांचे मन द्रवलं.  डोळ्यात पाणी आले होतं.

शेवटच्या प्रवासाची तयारी झाली. स्मशानभूमीत घेऊन जाऊन अंतिम विधी करायचा होता. त्याचा पार्थिव देह उचलून घेऊन जाणार इतक्यात सीमा धावत बाहेर आली आणि तिने जोरात हंबरडा फोडला.,

“नका ओ!! कुठे घेऊन जात आहात माझ्या नवऱ्याला? झोपले आहेत ते. नका घेऊन जाऊ. उठा नाव ओ! कशी जगू मी? आपला सुमेध तुम्हाला आवाज देतोय. कशी सांभाळू त्याला तुमच्याशिवाय?”

ती मोठमोठ्याने रडू लागली. तिचा तो आक्रोश अगदी गगनभेदी वाटत होता. काळजाला चिरे पडत होते. बायकांनी तिला आवरलं. स्मशानभूमीत सीमा आणि नात्यातल्या बायका आल्या होत्या. सीमाच्या बांगड्या फोडल्या. गळ्यातलं मंगळसूत्र तोडलं. तिच्या पायातली जोडवी निघत नव्हती. तिने  कधी ती काढलीच नव्हती.  तिची सगळी सौभाग्य लक्षणे काढून उमेशच्या मृतदेहावर टाकताना तिचा आक्रोश गगनाला भिडत होता. 

ती आता उमेशच्या विधवा होती. उमेशचा देह तिच्या डोळ्यासमोर सरणावर जळत होता. उमेश अनंतात विलीन होत होता. उमेश सर्वांना सोडून गेला होता. सीमा आणि सुमेधला एकटं टाकून गेला होता. पुन्हा एकदा नियती जिंकली होती. आणि सीमा हतबल होऊन सरणावर  जळत असलेल्या उमेशच्या पार्थिव देहाकडे पाहत होती. एकटक शून्यात.. 

पुढे काय होतं? सीमा यातून कसा मार्ग काढते? सुमेधचं काय होतं? पाहूया पुढील भागात..


 

क्रमशः

© ® निशा थोरे...

कथा आवडल्यास नावासकट शेअर करण्यास काहीच हरकत नाही.. साहित्यचोरी हा गुन्हा आहे.. लेख नावाशिवाय किंवा दुसऱ्या नावाने आढळून आल्यास सक्त कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी..

🎭 Series Post

View all