मायेची साथ

A poor and homeless girl get love and affection from a family.

विषय - ....आणि ती हसली

फेरी -  "राज्यस्तरीय लघुकथा स्पर्धा"

शिर्षक - मायेची साथ

              परी नावाची ती एवढीशी पोर आपल्या खोपट्यात एका कोपऱ्यात बसून आजू - बाजूला जे चाललंय ते नुसतं बघत होती.तिला त्यातल काही समजत नव्हत. पण झालेल्या सगळ्या प्रकारामुळे ती खूप घाबरुन गेली होती. आणि आज तिला समजवायला,तिच्या डोक्यावरून हात फिरवायला तिची आईचं तिच्या सोबत नव्हती.त्या एवढ्याश्या लेकरासमोर तिच्या आईच्या मृतदेहाची तपासणी पोलिस करत होते.
                     बाप...नुसता नावाचा बाप होता.      
त्याने कधी मुलीला जवळ घेतले नव्हते,की तिला कधी प्रेमाने कुरवाळले नव्हते.सदा न कदा आपला दारूच्या नशेतच तो असायचा. आज त्यानेच दारूच्या नशेत आपल्या बायकोचा खून केला होता. तरी त्याची झिंग उतरली नव्हती नशेत तो बडबडत एका कोपऱ्यात पडून होता आणि पोलिस त्याला प्रश्न विचारत होते.

      परीच नाव नुसत परी होत पण जगणं मात्र तिच्या नशिबात एखाद्या गरिबाच आल होत. बिचारीची आईचं काय ती तिचा आधार होती.खरे तर तिच्या आईला तिला खूप शिकून मोठी करायचं होत पण....आता सगळचं संपून गेलं होतं.ती सहा वर्षांची पोरं नुसती कावरी - बावरी होवून सगळीकडे बघत होती.

     खरं तर परीची आई सुजाता एका सधन घरातली मुलगी होती. घरातली एकुलती एक मुलगी अगदी लाडा - कोडात  वाढलेली.पण शेतामध्ये काम करायला आलेल्या, ऊस तोडणी कामगार म्हणून काम करणाऱ्या सुरजवर तिच प्रेम बसलं आणि घरच्यांच्या नाकारला न जुमानता ती त्याच्याबरोबर पळून आली. सूरज खरेतर टपोरी मुलगा होता. त्याला वाटलं हिला पटवली की हिचा हिस्सा आपल्याला मिळेल आणि आपण ऐश करू. पण झाल उलटच ती याच्याबरोबर पळून आल्याने त्याच्या सगळ्या स्वप्नांवर पाणी फिरले आणि हिला हळू हळू त्याचे खरे रूप कळू लागले.

   पण आता वेळ निघून गेली होती.घराचे दरवाजे तिच्यासाठी बंद झाले होते.मग हिची फरफट चालू झाली.हिने धुण्या भांड्याची कामे करायला चालू केले आणि आपला प्रपंच नेटाने करू लागली.त्यातच तिला छोट्या जिवाच्या आगमनाची चाहूल लागली.तिला वाटले आता तरी आपला नवरा सुधारेल,चार काम करेल,आपल्याशी प्रेमाने बोलेल, पण सगळं व्यर्थ  ! त्याला या गोष्टीने काहीही फरक पडला नाही.उलट एक खाणारं तोंड वाढणार म्हणून त्याचा तिळपापड झाला आणि त्याही अवस्थेत त्याने सुजाताला मारहाण केली होती.असेच दिवस गेले.परीचा जन्म झाला.पण त्याचा आनंद फक्त तिच्या आईला झाला.

  बाळंतीण झाली तरी सुजाताला सुट्टी घेता आली नाही.आठाचं दिवसात तिने कामाला सुरुवात केली.असेच दिवस गेले. आईच्या मायेच्या पंखाखाली परी वाढत होती. वडिलांना तर ती नकोचं होती.परी सहा वर्षांची झाली.आईने तिचे नाव तिथल्याच नगरपालिकेच्या शाळेत घातल .परी शाळेत जाऊ लागली.अशीच एक दिवस परी शाळेतून घरी आली आणि तिने बघितले......आपली आई रक्ताच्या थारोळ्यात पडली आहे आणि आपले वडील बाजूला बसून शिव्या देत आहेत.पोलिस आजूबाजूला पाहणी करत आहेत.त्या बिचारीची तर वाचाच बंद झाली काहीवेळ .आपल्यावर मायेचं पांघरून घालणारी आई आता या जगात नाही हे कळायला ही त्या जीवाला पूर्ण एक दिवस गेला.

    अशा तऱ्हेने तो कोवळा जीव अगदी कोमेजून गेला.तिची जबाबदारी घेणारं कोणी नव्हतेच त्यामुळे तिची रवानगी अनाथ आश्रमात करण्यात आली.दोन दिवसांनी या केसचा तपास 'विवेक परांजपे' नावाच्या तरुण,तडफदार पोलिस ऑफिसर कडे आला.जेव्हा त्याने ही पूर्ण केस वाचली तेव्हा त्याने परीला भेटण्याचा निर्णय घेतला.

    विवेक परांजपे जेव्हा परीला भेटायला आश्रमात आले. तेव्हा त्यांनी बघितले की 'परी ' आपल्या इवल्याशा हातांमध्ये आपल्या आईची साडी पकडुन एका कोपऱ्यात बसली होती.अगदी शून्यात नजर लावून ती बसली होती.ते तिच्या जवळ गेले. त्यांनी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. तिची पापणी देखील हलली नाही.दोन दिवस त्या मुलीने काही खायला- प्यायलाही मागितले नव्हते.आश्रमातल्या काकूंनी जबरदस्ती तिला भरवले होते. पण ती खूपच अशक्त झाली होती.आपली सगळी कामे आटोपून परांजपे घरी गेले. पण त्यांचे कशातही लक्ष नव्हते.आज त्यांच्या मुलाचा अद्वैत चा वाढदिवस होता पण,ते त्याच्यासाठी भेटवस्तू आणायलाही विसरले होते.घरातल्या सगळ्यांना याचे नवल वाटले तरीही कोणी काही बोलले नाही.

     वाढदिवसाचा कार्यक्रम झाल्यावर घरातली मंडळी गप्पा मारू लागली.त्यामध्ये देखील विवेक सहभागी झाले नव्हते.मग रात्र झाली. सगळी मंडळी आपापल्या घरी गेली.त्यावेळी मात्र विवेक च्या वडिलांनी सगळ्यांना म्हणजेच विवेकला,त्यांच्या बायकोला म्हणजेच 'विभाला' विवेकच्या आईला बोलावले.सगळे जमल्यावर मग विवेकच्या वडिलांनी विवेकला आजच्या त्याच्या वागण्याबद्दल विचारणा केली.काही अडचण आहे का ते विचारले.आज तू पहिल्यांदाच तुझ्या मुलाला काही भेटवस्तू आणली नसल्याची जाणीव करून दिली. तो किती हिरमुसला होवून गेला याची जाणीव करून दिली. तेव्हा विवेकने आज त्याच्या हातात आलेली केस आणि परी,तिची अवस्था हे सगळे घरातल्यांना सांगितले.घरातल्या सगळ्यांना देखील खूप वाईट वाटले.

    विभालाही खूप वाईट वाटले.दोन वर्षांपूर्वी तिनेही अशाच एका गोड परीला जन्म दिला होता पण नियतीच्या मनात नव्हते आणि त्यांची परी त्यांना सोडून गेली. तिच्या आठवणीने सगळेच व्याकूळ झाले. तेवढ्यात विवेकचा फोन वाजला.फोन आश्रमातून होता.परीला खूप ताप आला होता,तिला दवाखान्यात न्यावे लागणार होते.ही केस विवेककडे होती म्हणून परवानगी मागण्यासाठी त्यांचा फोन आला होता.विवेकने होकार दिला आणि तो ही जायला निघाला.तेव्हा विभानेही त्याच्याबरोबर येणार असल्याचे सांगितले आणि तिने सगळ्यांनाच परीला दत्तक घेण्याचा विचार बोलून दाखवला.विवेकला तो विचार पटला पण तो आई - बाबांकडे बघू लागला.त्यांनीही होकार दिला.एवढा वेळ घरातल्या सगळ्यांचं बोलण दारा आडून ऐकणारा अद्वैत पुढे आला आणि आपल्या आई - बाबांना म्हणाला या रक्षाबंधनाला मला एक परीसारखी बहीण हवी आहे.सगळ्यांना त्याचे खूप कौतुक वाटले.विवेक आणि विभा आता मोठ्या समाधानाने दवाखान्यात जायला निघाले.

     पुढील चार दिवसात कायदेशीर बाबी पूर्ण करून विवेक आणि विभा परीला घेवून तिच्या हक्काच्या घरी आले.परीला ते मोठे घर,घरात असणारी माणसे,नवीन मिळालेले आई - बाबा .. सगळे बघून छान वाटलं .आजीने तिचे औक्षण केले.आजोबांनी तिला खूप छान परीसारखा फ्रॉक दिला,आईने म्हणजेच विभाने तिला खूप छान नटवले, अद्वैतने तिला त्या दोघांच्या खेळण्यांनी सजवलेल्या खोलीत नेले . घरात आल्या पासून ती थोडी मोकळी झालेली पण घरातल्यांनी तिला आपलं म्हणून स्विकारल याची तिला जाणीव झाली.. सगळे फक्त परी.. परी करतं होते या सगळ्यामुळे परी मनापासून हसली.. आणि तिला हसताना पाहून घरातले सगळे हसले.

     भाऊ,आई - बाबा,आजी - आजोबा असे माणसांनी भरलेले घरकुल तिला मिळाले आणि ती मग कायमच  हसत राहिली.

    विवेक आणि विभाने एका कोमेजलेल्या कळीला अलवार मायेची फुंकर घालून फुलवण्याचे काम केले.त्यांचा हाच आदर्श त्याच्या कित्येक मित्रांनी पुढे चालू ठेवला.प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे ते अशा परिस्थितीने गांजलेल्या मुलांना,लोकांना मदत करू लागले,त्यांचं जीवन फुलवू लागले.

        समाप्त.

©® प्रिती महाबळेश्वरकर
०६/०८/२०२२

जिल्हा - सातारा, सांगली.