मायेची माणसं भाग- अंतिम

Gosht mayechya manasanchi


"साधना हे बघ, शेवटी संसार तुझाही आहेच. तुझा हक्क आहे तुझ्या नवऱ्यावर. तू तुझ्या मनाप्रमाणे संसार थाटू शकतेस. अगं, काय ठेवले आहे त्या घरात? आम्ही तुम्हा दोघांना वेगळे घर घेऊन देऊ. राहा दोघे निवांत. कोणाची कचकच नाही की जबाबदारी नाही."

आशाबाई म्हणाल्या आणि साधनाने चिंतामणीच्या मागे वेगळे राहण्याचा हट्ट धरला.

रमाने, माधवरावांनी समजावून देखील साधना ऐकेना.
"वहिनी, तुमची मुलगी राहते तिकडे बोर्डिंगच्या शाळेत. इथे खाणारी तोंड पाच. तिचा खर्च, शिवाय घरचा खर्च हा अर्धा अधिक जातो यांच्या पैशातून. आम्ही वेगळे झालो की तुमचा खर्च तुम्ही भागवू शकता." हे ऐकून रमाने साधनाशी बोलणे सोडून दिले.
आता तिला आणखी एक कारण मिळाले. वहिनी माझ्याशी बोलत नाहीत म्हणून साधना आईला सांगू लागली. या रोजच्या कटकटीने चिंतामणी वैतागला. अखेर माईंनी परवानगी दिली आणि चिंतामणीने साधनासोबत वेगळं राहण्याचा निर्णय घेतला.

"दादा, वेगळं राहिल्यावर जेव्हा सगळी जबाबदारी अंगावर पडेल तेव्हा कळेल साधनाला. वेगळा संसार थाटणे तितके सोपे नाही, हे कळेल लवकरच तिला. मी कायम येत -जात राहीन इथे. काही लागलं तर अवश्य सांग."

चिंतामणी गेला आणि त्या दिवसापासून माधवराव काहीसे अबोल बनले. रमेलाही करमेनासे झाले.

"तरी या लग्नाला माझी परवानगी नव्हतीच. मुलाच्या आनंदाखातर मी तयार झाले अन् आशा बाईंनी शेवटी त्यांचे खरे रंग दाखवलेच..जे नको होते तेच झाले." असे म्हणत माईंनी डोळ्याला पदर लावला.
________________________________

सहा महिने असेच गेले. नव्या घरी साधना रुळली. पण राहून राहून माई आणि रमाची आठवण येऊ लागली तिला. वहिनी प्रत्येक वेळी आपल्याला सांभाळून घेत होत्या, माई अगदी आईसारख्या वागत होत्या आपल्याशी आणि आपली आई? तिने आपल्या मुलीला चार समजुतीच्या गोष्टी सांगण्याऐवजी माझ्याच माणसांविरुद्ध माझे कान भरले. साधनाला आपल्या वागण्याचा पश्चाताप होऊ लागला. तिने रावसाहेबांपुढे आपले मन मोकळे केले.

"तरी मी सांगत होतो, मुलीच्या संसारात लक्ष घालू नका. नसता हस्तक्षेप करू नका. आता जे व्हायला नको तेच झाले ना? एकत्र कुटुंबात राहिली असती तर ही वेळ आलीच नसती आज." रावसाहेब आशाबाईंना ओरडत होते.
"वेगळं राहणं म्हणजे सगळी जबाबदारी एकट्याने पेलणं. तुमच्या मुलीला कामाची सवय तरी आहे का? इथे आयत सगळं हातात मिळत होतं आणि तिकडे मदतीला होती सारी. तुमच्या म्हणण्याप्रमाणे घर घेऊन दिलं..नवा सारा संसार घेऊन दिला. पण ते टिकवायची अक्कल हवी ना?" रावसाहेब तणतण करत होते आणि साधना आपल्या आईजवळ बसून रडत होती.

"आई, तुझ्या म्हणण्याप्रमाणे वेगळं राहिलो आम्ही. पण सगळी काम मला एकटीला करावी लागतात. यांच्या कचेरीतली माणसे बैठकीला सतत घरी येत -जात राहतात. नोकर माणसे कोणी टिकत नाहीत घरात. शिवाय यांचे दौरे सुरू असतात. किती दिवस एकटीने राहायचे मी घरात? तिथे शेजारी- पाजारी सगळ्या बायका म्हणतात, साधना उठ सूट माहेरी जाणं बरं नाही. आपला संसार आपण सांभाळावा. नवऱ्याला इतका पगार असून काय फायदा? सगळा संसार तुझ्या माहेरहून तर येतो. माघारी नको नको ते बोलतात."
इतके बोलून साधना जास्तच रडू लागली.

"मी बोलतो माधवरावांशी. तुम्ही दोघे जुन्या घरी परत जा." रावसाहेब अधिकाराने म्हणाले.

"मला तोंड दाखवायला जागा तरी आहे का आता? कशी जाऊ मी घरी? माई आणि वहिनी काय म्हणतील? आणि भाऊजी...त्यांच्या समोर जायला लाज वाटेल मला." साधना पुन्हा रडू लागली.
"जाते मी घरी. हे यायची वेळ झाली. मी इकडे आलेली यांनी पाहिलं तर मला बोलणी खावी लागतील." साधना घरी गेली.

"आशा पुन्हा एकदा जाऊन माईंची माफी मागा. तेच योग्य होईल." रावसाहेबांनी आपल्या बायकोला हुकूम केला.

घरी येताच साधनाला पुन्हा रडू आले. 'इतकं मोठं घर असून काय उपयोग? बोलायला दोन- चार माणसे असली म्हणजे घर कसं भरल्यासारखं वाटतं. नाहीतर दिवसभर एकट्यानेच वेळ काढायचा. आपलं घर भलं होत, तिथे मायेची माणसं होती.'

इतक्यात चिंतामणी आला. त्याला पाहताच साधना त्याला बिलगून रडू लागली.
"अहो, चुकलं माझं. आपण जाऊ आपल्या घरी परत. आईचे ऐकून मी नको नको ते बोलले, वागले. माई, भाऊजी, वहिनी माफ करतील ना मला? नुसती श्रीमंती असून भागत नाही तर आपली माणसे सोबत असली म्हणजे संसार सुखाचा होतो, हे कळले आहे मला."
हे ऐकून चिंतामणी नुसताच हसला.
_______________________

चिंतामणी आणि साधनाला घरी आलेलं पाहून माई काहीच बोलल्या नाहीत. रमा थोड थोडके बोलली.
"वहिनी, माई मी चुकले. मला हवी ती शिक्षा करा पण असा अबोला धरू नका. आईने माझ्या संसारात नसता हस्तक्षेप केला आणि मीही तिचे ऐकत गेले. खरंतर इथे मला काहीच त्रास नव्हता. पण मनात काहीबाही भरवले गेले नि मी ते ऐकत गेले. खरंच माफ करा माई. माझी चूक झाली." साधनाने माईंचे पाय धरले.
"अगं, काय करतेस हे? तू तर थोरा-मोठ्यांची लेक आणि आमच्या पाया पडतेस हे पाहून तुझी आई रागवेल ना? आणि कुणी कितीही कान भरले तरी आपल्याला कळायला हवे, काय योग्य अन् काय अयोग्य.
सासरी आल्यावर माहेर विसरावे, असे माझे अजिबात म्हणणे नाही. आपल्या मर्यादा आपणच आखून घ्याव्यात."

"माई, हे सारे खरे आहे. आता मी माझ्या मर्यादा लक्षात ठेवेन. माझ्या घरात आणि संसारात नसता हस्तक्षेप कोणाचाही होऊ देणार नाही. मी वचन देते माई. पण मला असे परके करू नका. माझी चूक सुधारण्याची एक संधी द्या." साधना माईंजवळ बसत म्हणाली.

"माई, राग सोड आता. रावसाहेबांनी हे सारे याआधीच माझ्या कानावर घातले होते. आशाबाईंनाही आपली चूक कळली आहे. झाले गेले विसरून जाऊ..पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करू." माधवराव रमेकडे एक नजर टाकून  म्हणाले.

"वहिनी, तुम्ही मला बहिणीची आणि भाऊजींनी भावाची माया दिली. माई कधी सासू सारख्या वागल्याच नाहीत माझ्याशी. पण मी तुम्हा सर्वांना ओळखू शकले नाही हेच खरं. आता मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही, अगदी माहेरी सुद्धा." साधना रमाचे हात आपल्या हातात घेत म्हणाली.

"तुझी चूक तुला उमजली, हेच खूप झाले. आता इतके लक्षात ठेव. आम्ही सारी तुझीच माणसे आहोत. अगदी मायेची." रमाने साधनाला आपल्या पोटाशी धरले. माईंनी आपल्या दोन्ही सुनांना जवळ घेतले.
माधवराव आणि चिंतामणी हा मायेचा सोहळा  अगदी भरल्या डोळ्यांनी पाहत राहिले.

समाप्त
©️®️सायली.

🎭 Series Post

View all