मायेची माणसं भाग- 4

Gosht mayechya manasanchi

प्रयत्नांती चिंतामणीला सरकारी नोकरी मिळाली आणि माईंनी साऱ्या गावभर पेढे वाटले. रावसाहेब आशाबाईंना घेऊन स्वतः गोखल्यांच्या घरी आले.
"रमे, माफ कर बाई. झालं गेलं विसरून जाऊ सारं." आशाबाईंनी सर्वांची माफी मागितली.

"आमच्या मुलाला चांगली नोकरी मिळाली म्हणून इथवर आलात. नाहीतर तुमचा नकार होता ना या लग्नाला?" माई रावसाहेबांना म्हणाल्या.

"माई, माझा नकार नव्हता. पण काहींना चांगल्या गोष्टी पहायची सवयच नसते. त्यांच्यापुढे आपल्याला स्वतःला सिद्ध करावे लागते. मग कुठे त्यांचा विश्वास बसतो. असो, लग्नाची बोलणी कधी करायची हे विचारायला आलो आहोत आम्ही." रावसाहेब माईंना म्हणाले.

"रावसाहेब, स्पष्टच बोलते. मुलांच्या मनात एकमेकांविषयी ओढ आहे म्हणून..नाहीतर मी या लग्नाला नकार दिला असता." माई आशाबाईंकडे पाहत म्हणाल्या.

"माई, म्हंटले ना, चुकले माझे. झाले गेले विसरून जाऊ आणि मुलांसाठी एकत्र येऊ." आशाबाई माईंना म्हणाल्या.

"रावसाहेब, आमच्या काही मागण्या नाहीत. लग्न हौसेने पण साध्या पद्धतीने होऊ दे. लग्नाचा थोडा फार खर्च आम्हीही करू. आमच्या धाकट्या सुनेला दागिने घालू. याउपर तुम्हाला जे मनाला योग्य वाटते ते होऊ दे." माई म्हणाल्या.

"माधवराव, शेवटी आमच्या एकुलत्या एका मुलीचे लग्न आहे. लग्न जोरदार होणारच. शिवाय सारा खर्च मात्र आमचा असेल." रावसाहेब.

या बैठकीतच साऱ्या गोष्टी ठरल्या. काही दिवसांतच चिंतामणी आणि साधनाचे लग्न धुमधडाक्यात पार पडले आणि साधना गोखलेंची धाकटी सून म्हणून माप ओलांडून घरी आली.

साधनाच्या येण्याने घर अगदी भरून गेले होते. आपल्या मुलाची निवड अगदी छान आहे म्हणून माई साधनाचे हरतऱ्हेने कौतुक करत होत्या. रमाही खुश होती. पण नाही म्हंटले तरी रमावर थोडे दडपण आले होते. कितीही झालं तरी साधना बड्या घरची मुलगी होती. तिला घरच्या कामांची सवय नव्हती. आपल्या माहेरच्या श्रीमंतीचा गर्व कधीच नव्हता तिला ही गोष्ट निराळी. पण रमाला साधनाला काही काम सांगताना अवघडल्यासारखे होई.

एक दिवस तिची ही अवस्था ओळखून साधना म्हणाली, "वहिनी, मी या घरची सून आहे. काही काम सांगताना दडपण घेत जाऊ नका. मला या असल्या कामांची सवय नाही आणि तुम्ही नीट सांगितल्या शिवाय इथल्या रीतिभाती मला समजणारही नाहीत. धाकटी जाऊ म्हणून नाही तर बहीण म्हणून हक्काने काम सांगत जा." हे ऐकून रमाचे अवघडलेपण कुठल्या कुठे पळून गेले आणि त्या दिवसापासून रमा आणि साधनाचे एकमेकींच्याशिवाय पान हलेनासे झाले.

आता सारी कामे दोघी मिळून करत. काही दुखले खुपले एकमेकींना सांगत. एकमेकींजवळ आपली मनं मोकळी करत.
अगदी माहेरी जाताना, नको म्हणत असतानाही साधना बऱ्याच वेळा आपल्या सोबत रमाला घेऊन जात असे. रमा आलेली पाहून आशाबाई नाक मुरडत.
"साधने, काहीही झालं तरी तुझी जाऊ आहे ती. तिला असं उठसूट आपल्या माहेरी घेऊन येणं बरं दिसत नाही आणि तुझं सासर पडलं मध्यम वर्गीय..इथल्या श्रीमंतीची सवय नको व्हायला त्यांना.
तुला घरी फार काम पडत नाही ना? तसे असेल तर सांगत जा मला. मग त्या रमेकडे पाहतेच मी. आधीच तुझ्या नवऱ्याच्या पगारावर घर चालत. ते माधवराव काय पोटापुरते कमावतात. असा काय घर खर्च भगतो त्यात?"

"आई, तू म्हणतेस तसे काही नाही आणि माझ्या सासरची माणसे तशी नाहीतच मुळी. आहे त्यात समाधान मानणारी आहेत. उगा त्यांना काही बोललेले मी ऐकून घेणार नाही." साधना चिडून म्हणाली.

"बरं. राहील तर. पण एक ना एक दिवस कळेलच तुला." आशाबाई फणकाऱ्याने म्हणाल्या.

हळूहळू आशाबाईंचा मूळ स्वभाव डोके वर काढू लागला. आपल्या श्रीमंतीचा अभिमान त्यांना होताच. पण लेकीला आपल्या तोलामोलाचे सासर मिळाले नाही म्हणून मनातून त्या दुःखी होत्या.
आता काही ना काही कारण काढून त्या साधनाला सारखे घरी बोलवत. तिचे कान भरत. सासरी जाताना काही ना काही भेटवस्तू सोबत देत असत.
न राहवून एक दिवस माई साधनाला म्हणाल्या,
"साधना, उठसूट आपल्या माहेरी जाणं बरं नाही. शिवाय तिथून काही ना काही भेटवस्तू घेऊन येणं ही बरं दिसत नाही. तुला आपल्या घरात काही कमी पडत नाही ना? मग झालं तर. आईला सांग, काही कारण असल्याविना सारखे बोलवत जाऊ नको."
"माई, मी एकुलती एक मुलगी आहे त्या घरची. तिथे जायला काही कारण कशाला हवं? आणि आईला वाटतं, मला भेटाव. माझ्याशी गप्पा माराव्यात. त्यात काय चुकलं?" साधनाचे हे बोलणे नेमके चिंतामणीच्या कानावर पडले.

"साधना, माईला उलट बोलतेस? आधी तिची माफी माग." चिंतामणी चिडून म्हणाला.

"अहो, उलट बोलेन का मी माईंशी? मी सहज विचारते आहे. त्या आधी माई काय बोलल्या हे तरी जाणून घ्या." साधना तितक्याच शांतपणे म्हणाली.

"मी सारे काही ऐकले आहे. तू माईची माफी माग. बस्."

"अरे, माफी मागण्याजोगे काही झालेले नाही. मी तिला इतकेच म्हंटले..सारखे माहेरी जाणे बरे नव्हे." माई घाईघाईने म्हणाल्या.

"का बरे नव्हे? ती आमची एकुलती एक लेक आहे. लग्न झाले म्हणून आमचा तिच्यावरचा हक्क तर संपत नाही ना? काय हो चिंतामणराव? खरे ना हे? माई, तुमची सून ही माझी लेक आहे हे लक्षात ठेवा म्हणजे झाले." नेमक्या आशाबाई याचवेळी घरी आल्या.

"ते झालेच. पण नवी नवरी सारखी माहेरी जायला लागली तर लोक काय म्हणतील?" माई नाराजीने म्हणाल्या.

"काय म्हणायचे? सासरी मन रमत नसेल म्हणून जाते असे म्हणतील लोक."
आशाबाईंचे हे म्हणणे ऐकून माईंचा पारा चढला. शब्दाला शब्द वाढत गेला नि आशाबाईंची सारी नाराजी बाहेर पडली. "माझ्या जावयाच्या जीवावर रहाता तुम्ही..आणि माज तो किती? ते काही नाही. माझ्या मुलीला वेगळा संसार थाटून द्या. त्यातच तिचं भल आहे." 

साधनाने आईला समजवायचा प्रयत्न केला, पण आशाबाई काही ऐकायला तयार होईनात. त्या निघून गेल्या पण साधनाला आता आईचे बोलणे पटू लागले. तसं पाहायला गेलं तर माधवरावांपेक्षा चिंतामणीला नोकरी चांगली होती. घरच्या खर्चात त्याचा वाटा अधिक होता. मग साधनाच्या हाती काहीच पैसा येत नसे. 
'आई म्हणते ते खरेच आहे. असेच जर चालणार असेल तर माझ्या हाती काय उरणार?' साधना विचार करत राहिली.

क्रमशः

🎭 Series Post

View all