मायेची माणसं भाग -1

Gosht mayechya manasanchi

माईंनी तुळशीपुढे दिवा लावला. मनोमन नमस्कार करून त्या आत जाणार इतक्यात माधव मास्तर तिरीमिरीत घरी आले. आपली सायकल त्यांनी जवळ जवळ भिंतीला आपटून टेकवली.

"काय रे माधवा? इतके झाले तरी काय?" माई स्वतःला सावरत आत आल्या.

माईंचा प्रेमळ आवाज ऐकून माधव मास्तरांचा राग कुठल्या कुठे पळून गेला. त्यांना वाटले असेच जावे नी माईच्या कुशीत शिरून मन मोकळे करावे. 'पण आपण आता इतकेही लहान राहिलो नाही. दहा वर्षांची मुलगी आहे आपल्याला. शिवाय पाठचा भाऊ कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला आहे. कसे दिसेल ते?'
मनातला विचार झटकून माधव हात -पाय धुवून आत आले.

"रमे, चहा टाक. माधव आला बघ." असे म्हणत माधव काही बोलत नाही हे पाहून माई जप करायला देवघरात निघून गेल्या.

"रमा, चिंतामणी काय करतोय? माधवराव पाटावर बसत म्हणाले.

"भाऊजी कधीचे अभ्यास करत आहेत. आता दोनच विषय राहिले आहेत. दोन दिवसांत त्यांची परीक्षा संपेल." रमेने माहिती पुरवली.

"अहो, काही बिनसले आहे का? चेहरा पडलेला दिसतो तुमचा." रमा माधवरावांचा चेहरा निरखत म्हणाली.

पण माधवरावांचे लक्ष तिच्या बोलण्याकडे नव्हतेच. पट्कन चहा संपवून ते सायकल घेऊन पुन्हा बाहेर निघून गेले.

थोड्या वेळाने माई बाहेर आल्या.

"दिवेलागणी होऊन गेली. आता कुठे गेला हा? याचे वागणेच चमत्कारिक आहे. धड काही बोलत नाही की विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत नाही."

इकडे अंधारात माधवराव आपली सायकल जोराने दामटत होते. बरेच अंतर गेल्यावर ते आपल्या सायकलवरून खाली उतरले आणि समोरचे घर आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकांचे असल्याची खात्री करून लगबगीने आत गेले.

"अरे, माधवराव तुम्ही आत्ता, यावेळी इथे?" दामले मास्तर आश्चर्याने म्हणाले.

"मास्तर, वेळच तशी आली म्हंटल्यावर यावेच लागले." माधवराव गडबडीने म्हणाले.

"तर..सरळ मुद्द्यावर येतो. मला तुम्ही शाळेच्या शिक्षक वृंदातून कमी करणार आहात बातमी अशी कानावर पडली. माझे काय चुकले ते सांगा मास्तर. पण ही नोकरी गेली तर घर चालवणे फार मुश्किल होईल. अहो, लहान मुलगी आहे मला. तिचे शिक्षण चालू आहे. शिवाय पाठचा भाऊ अजूनही शिकतोय.
माझी नोकरी गेली तर खरं सांगतो मास्तर, हाता-तोंडाची गाठ पडणे देखील कठीण होईल." बोलता बोलता माधवरावांच्या डोळ्यात पाणी आले.

"हे काय माधवराव? तुमच्या डोळ्यात पाणी? अहो, तुमचे वडील मोठा उमदा माणूस! आमचे चांगले मित्र होते ते. त्यांच्या जागी तुम्हाला नोकरी लागली ना? शिवाय तुमचे कामही उत्तम आहे.
मी पाहतो काही होते का..आमच्या सहकाऱ्यांशी बोलून कळवतो तुम्हाला. काही काळजी करु नका."  दामले मास्तर माधवरावांच्या पाठीवर थोपटत म्हणाले.

हे ऐकून माधवरावांना फार बरे वाटले.

____________________________

"माई, भाऊजी तुम्ही जेवून घ्या बरं. यांचा काही नेम नाही." रमा पानं वाढत म्हणाली. 
काही वेळाने जेवणं झाली, तरी माधवराव आले नव्हते. मग रमाने घाईघाईने दरवाज्याजवळ पाण्याचा पेला उलटा करून ठेवला आणि ती दारासमोर बसून राहिली.
बऱ्याच वेळाने सायकलचा आवाज आला तसा चिंतामणी उठून बाहेर आला.

"काय हे दादा? कुठे गेला होतास? बरीच रात्र झाली. वहिनी थांबल्या आहेत जेवायच्या. जा पट्कन जेवून घ्या दोघे. आधीच उशीर झाला आहे." चिंतामणी माधवरावांच्या हातातली सायकल आपल्या हातात घेत म्हणाला.

माधवरावांच्या चेहऱ्याकडे पाहून रमाला जरा बरे वाटले. आता त्यांचा चेहरा बराच निवळला होता. ती गडबडीने उठून आत आली.
"अहो,...."
"सांगतो सारे. आधी जेवण होऊ दे. मग तपशीलवार सांगेन." माधवराव रमेचे बोलणे मध्येच तोडत म्हणाले.

जेवण झाल्यावर आवरून रमा आपल्या खोलीत आली. तसे माधवरावांनी तिला सारे काही सांगून टाकले. हे ऐकून रमा रडू लागली. नोकरी गेली तर काय करायचे? ही भीती तिच्याही चेहऱ्यावर दिसत होती.

"अगं, रडतेस कशाला? ठीक होईल सारे." माधवराव रमाचा हात आपल्या हातात घेत म्हणाले. तरीही त्यांच्या चेहऱ्यावर चिंतेची एक छटा उमटलीच.

चिंतामणी आपल्या दादाला काहीतरी विचारण्यासाठी त्यांच्या खोलीत येत होता. मात्र रमा आणि माधवरावांचे बोलणे कानावर पडले, तसा तो आपल्या खोलीत निघून गेला.

'काहीतरी अडचण दिसते. दादा बहुतेक नोकरी विषयी बोलत असावा. काय झाले असेल कुणाला ठाऊक? पण आता माझी परीक्षा संपली की नोकरीसाठी अर्ज करेन मी.' चिंतामणीला विचारात कधी झोप लागली हे कळलेच नाही.
_________________________

दामले मास्तरांनी आपला शब्द पाळला. माधवरावांची नोकरी वाचली. घरची घडी आता नीट बसू लागली होती.

_________________________

"मास्तर आहेत का?" सकाळी सकाळी आवाज ऐकून माई बाहेर आल्या.

"कोण?"

"मी पेठे. मास्तरांकडे माझं थोडं काम होतं."

इतक्यात माधवरावही बाहेर आले.

"मला दामले मास्तरांनी पाठवले. माझा मुलगा आपल्याच शाळेत शिकतो. तसा बाकी हुशार आहे. मात्र गणितात थोडा कच्चा आहे. त्याची शिकवणी तुम्ही घ्यावी, ही विनंती करायला आलो. मास्तर, नाही म्हणू नका. मागाल तेवढी फी देईन मी. गावच्या वेशीवर आपले दुकान आहे. त्यामुळे पैशांची चिंता नसावी. माझ्या माघारी दुकान माझ्या मुलानेच बघितले पाहिजे. मग त्याला हिशोब मांडायला यायलाच हवा. म्हणून म्हणतो मास्तर, नाही म्हणू नका." पेठे माधवरावांच्या समोर हात जोडत म्हणाले.

चहा -पाणी झालं. तसे माधवराव म्हणाले,
"मलाही आवडलं असतं शिकवणी घ्यायला. पण मी दिवसभर शाळेत जातो. यायला संध्याकाळ होते. शिवाय आता शाळेत जबाबदारी वाढली आहे. पण दामले मास्तरांचा शब्द मोडवत नाही. मी पाहतो काही सोय होते का."

चिंतामणी तिथेच घुटमळत होता. हे ऐकून तो म्हणाला, "दादा काही हरकत नसेल तर मी शिकवणी घेऊ का?"
हे ऐकून माधवराव पेठेंना म्हणाले, "तुमची हरकत नसेल तर माझा भाऊ तुमच्या मुलाची शिकवणी घेईल. गणितात तो उत्तम आहे. त्यामुळे काही काळजीचे कारण नाही."

अखेर हो, नाही करत पेठे तयार झाले आणि त्याच दिवसापासून त्यांचा मुलगा शिकवणीसाठी घरी येऊ लागला.

काही दिवसांतच चिंतामणीकडे आणखी सात -आठ मुले शिकवणीसाठी येऊ लागली. मिळकतही चांगली मिळू लागली. तरीही त्याने नोकरीसाठी अर्ज पाठवून देऊन आपले प्रयत्न सुरू ठेवले.

क्रमशः


 

🎭 Series Post

View all