मायेची भेट

दिवाळीच्या वातावरणावर आधारित एक कथा

सुमन अग ये सुमन .हाक ऐकताच सुमन दरवाजा उघडायला धावली.सुमन आणि शिवराम गरीब शेतकरी जोडपे.नुकतेच लग्न झालेले.पैशाची श्रीमंती नसली तरी मनाची श्रीमंती भरपूर होती.सुमन स्वभावाने लाघवी आणि मनमिळावू होती.सासूबाईंचा पण भारी जीव तिच्यावर.शेतीवर अवलंबून असलेले कुटुंब पण मनातला ओलावा आणि प्रेम मात्र भरपूर...

आज पाडवा होता.सकाळीच शिवराम म्हणाला,"काय पायजे तुला"?सुमन बोलली काहीच नाही .शिवराम बाहेर कामाला गेला आणि सुमन एकटीच बसली असताना काय पायजे?हा प्रश्न आठवला.एकदाच फक्त एकदाच केलेला हट्ट.माहेरी भरपूर गरिबी आई बाप शेतात राबायचे तेव्हा कुठं दोन घास पोटात पडायचे.सुमन तशी खूप समजूतदार होती .एकदा तात्यांच्या पिंकीने वाजणारे पैंजण घातले होते.

सगळ्या शाळेत पिंकीच्या पैंजनांची चर्चा होती.सुमनने किती वेळा हात लावून पाहिलं होत.घरी आल्यावर सुमन आईला म्हणाली,"आई ,मला या दिवाळीला पैंजण पायजे".तू सांग ना ग दादा ला.आई कसनुस हसली सांगते बर. आपल्याला पैंजण मिळणार म्हणून ती खुश होती.पण ते चांदीचे पैंजण सुमन च्या आली बापाला शक्यच नव्हते.दिवाळीच्या दिवशी पैंजण नाही म्हणून सुमन ने पहिल्यांदा हट्ट केला आणि रडायला लागली.तेव्हा आईने चिडून खूप मारलं,इथं खायला नाय घरात आन पैंजन मागते कार्टी.सुमन रडत मागच्या दारी बसली असताना तिचा छोटा भाऊ जवळ आला.त्याने बाभळीच्या शेंगाने पैंजण बनवले होते.तायडे बग की कसा आवाज येतोय.सुमन त्याला जवळ घेऊन खूप रडली होती.

आज तो प्रसंग आठवताना परत डोळे भरून आले होते.ती उठली आज भाऊबीज आणि पाडवा दोन्ही एकत्र होते.सुमन छान तयार झाली.स्वयंपाक केला आणि मग देवपूजा केली.तेवढ्यात शिवराम आणि सुमन चा भाऊ दोघे आले.सुमन ओवाळ आधी दाजीला.नाय आदी भावाला ववाळ. तुमी भांडू नका!मी दोघांना पण ओवाळते.सुमन ने ओवाळल्यावर दोघांनी भेट पुढे केली.शिवराम म्हणाला,"लग्नाची खरेदी करताना आय ने जे घेऊन दिलं नव्हतं पैस कमी म्हणून ते हाय यात.भाऊ म्हणाला तायडे यावेळी खरे आहेत.आज सुमन च्या पुढ्यात दोन चांदीच्या पैंजनांचे जोड होते.पण तिच्या मनात मात्र भाऊ आणि नवरा अशा रुपात तिला जपणाऱ्या दोघांच्या मायेची रुणझुण वाजत होती.