तू दुर्गा ! तू भवानी !! तूच जगत जननी!!!
आई - "अनु, अनु तुही उकिरड्यावर ची घाण आपल्या घरात का आणलीस? घराचं पावित्र्यच संपवलंस तू."
अनुराग - "आई अग हळू बोल, तिला खूप अशक्तपणा आला आहे आणि हो तिला उकिरड्यावरची घाण म्हणू नकोस. आपल्यासारखीच हाडामांसाची माणूस आहे ती. अगं जरा तरी माणुसकी दाखव."
आई - "आता हेच राहिलं होतं! तू आता मला माणुसकी शिकव. आयुष्यात आता आणखी काय बाकी राहिलं?"
अनुराग - "आई तुझा हा कांगावा बंद कर. मी हात जोडतो तुला."
आई - "काय कांगावा? मी कांगावा करते?"
अनुराग - (चिडुन ) "आई पुरे आता! नाहीतर मी घर सोडून निघून जाईन."
आई - "अनु, बाळा असं नको रे म्हणू (रडायला लागली) माझ्या म्हातार वयाला तुझ्याशिवाय कुणाचा आधार आता?"
अनुराग - "म्हणूनच म्हणतो कृपया माणुसकी सोडू नको. तूही जग आणि मला हि जगू दे. (छोटूकडे वळून) छोटू चल तुझ्यासाठी नवे कपडे आणि शाळेची पुस्तके आणुया."
छोटू - "डॉक्टर साहेब, आधी ताईला ठीक होऊ द्या. मग शाळेचं बघू."
अनुराग - "बरं ठीक आहे. जशी तुझी इच्छा. चल माझ्याबरोबर तूही दोन घास खाऊन घे."
छोटू - "नको डॉक्टर साहेब, मी नंतर जेवेन."
अनुराग - "चल जेव म्हणतो ना!"
अनुरागच्या आवाजातली जरब छोटूला जाणवली आणि छोटू अनुराग सोबत जेवला.
अनुराग हॉस्पिटलमध्ये जाण्याकरता तयार व्हायला त्याच्या खोलीत गेला, तोपर्यंत छोटूने डॉक्टर अनुरागची गाडी पुसली. लॉन मधला झाडांमध्ये टाकलेला पाण्याचा पाईप गुंडाळून नळ बंद केला . त्यांनतर छोटू आणि डॉक्टर अनुराग हॉस्पिटलला निघून गेले.
मंडळी ही गोष्ट आहे माया, तिचा लहान भाऊ छोटू आणि डॉक्टर अनुराग यांची. आपल्या कथानकाची नायिका माया हिचा भूतकाळ खूपच दारुण आणि संघर्षपूर्ण आहे.
माया एक सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातली सोळा सतरा वर्षाची स्वप्नाळू मुलगी. आणि छोटू तिचा लहान भाऊ. मायाला चारचौघींसारखं शिकून खूप मोठं व्हायचं होतं. स्पर्धा परीक्षा पास करून किरण बेदी सारखं कर्तृत्व गाजवायचं होतं. पण नियतीच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच होतं.
माया,छोटू,आई आणि बाबा असे चौकोनी मध्यमवर्गीय सुखी कुटुंब. मायाचे वडील खाजगी रुग्णालयात रुग्णवाहिका चालक तर आई गृहिणी होती. माया दहावीत असतानाची गोष्ट……
मायाचा अभ्यास जोरात सुरू होता. मायाची आईपण तिला अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहित करीत होती. माया जिद्दीने बोर्डाच्या परीक्षांच्या तयारीला लागली होती. तिचे सगळे पेपर संपले होते,फक्त एकाच विषयाचा पेपर बाकी होता. आणि महामारीमुळे टाळेबंदी सुरू झाली. वडील अत्यावश्यक सेवेत असल्याने त्यांना नोकरीवर जाणे आवश्यकच होते. त्यातच त्यांना कोरोनाने गाठले आणि त्यांचा अंत झाला. सरकारी नियमानुसार त्यांचा मृतदेहही मिळाला नाही आणि त्या धक्क्याने मायाची आईपण निवर्तली.
भावकितल्या लोकांनी येऊन दिवस पाणी आणि इतर सोपस्कार पार पाडले. पण आता खरा प्रश्न समोर उभा ठाकला होता पुढे काय? वडिलांच्या दहाव्याला छोटूने केस दिले. पिंडदानाचे वेळी ताईची काळजी घेण्याचं वचनही दिलं, पण त्या बिचाऱ्याला हे काहीच कळत नव्हतं आणि बारा वर्षाच्या छोटूला कळून काही उपयोगही नव्हता.
नात्यातली एक दूरची मावशी माया आणि छोटूला आपल्या शहरात घेऊन गेली. या मावशीचा नवरा एक नंबरचा बेवडा आणि वासनांध होता. पण मावशीच्या धाकाने तो वरमला. मावशीच्या घरी, माया मावशीला तिच्या गृहउद्योगात मदत करत होती, तर छोटू मावशीच्या मुलांना सांभाळत होता. बघता बघता दोन वर्ष कशी संपली ते मायाला जाणवलंच नाही. पण या दोन वर्षात मायाच्या हे लक्षात आलं की, आता आपली शाळा सुटली ती नेहमीचीच, पण छोटूला मात्र तिला शिकवायचं होतं. तिने तसा मावशीच्या मागे लकडा लावला. ही मावशी मात्र पक्की बेरकी होती. तिनं छोटूला शाळेत घालण्याच्या बदल्यात तिच्या गृहउद्योगाचे मसाले -पापड - लोणची छोटूने घरोघरी जाऊन विकायचं असं वचन मायाकडून घेतले.
मावशीला मायाच्या रूपात हक्काची -बिन पैशाची -चोवीस तासची मोलकरीण मिळाली होती. आणि छोटू सारखा सेल्समन ही. माया तरीही ह्या सगळ्याला तयार झाली आणि हळूहळू छोटूच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला.
असंच एकदा काही कारणाने मावशीला दोन दिवसांसाठी बाहेरगावी जायचं होतं. तिने मायाला सर्व समजावून सांगितलं, नवऱ्यालाही दम भरला आणि नीट वागण्याची ताकीद देऊन मावशी आपली मुलं घेऊन गावाला गेली.
पहिल्या रात्री छोटू आणि माया जीव मुठीत घेऊन झोपले . पण त्या दिवशी मावशीचा नवरा रात्री झोपायला घरी आलाच नाही. सकाळी छोटू शाळेत गेला आणि माया घरकाम आटपून मसाले पॅकिंग करायला बसली. दरम्यान दुपारी दोन वाजताच्या सुमारास मावशीचा नवरा दारूच्या नशेत तर्र होऊन डुलत -डुलत घरी आला. तो एवढ्या नशेत होता की रस्त्याने चालताना त्याचा सारखा तोल जात होता आणि दारूच्या नशेमुळे त्याचे डोळे लाल झाले होते.
मायाला घरी एकटीच बघून त्याच्यातला हैवान जागा झाला. तो मायावर तुटून पडणार पण तेवढ्यात माया सटकली. ती जरी सटकली तरी जाणार तरी कुठे? दोन खाणाचं मावशीचं घर ,त्यात मसाल्याचा पसारा, शिवाय छोटू पण अजून शाळेतून परत आला नव्हता. छोटू ला एकटं सोडून तिला कुठेच जायचं नव्हतं. मावशीचा नवरा परत एकदा मायाकडे लपकला पण ती चपळाईने बाजूला झाली आणि मावशीचा नवरा पाण्याच्या हंड्यावर आदळला आणि त्याचं डोकं सुजलं. आता तो फारच चवताळला आणि सर्वशक्तीनिशी मायावर झेपावला. मायाने परत एकदा त्याला हुलकावणी दिली आणि तेवढ्यात छोटूने घराचा लोखंडी दरवाजा उघडला. घाबरलेली माया - घरातलं अस्ताव्यस्त पडलेलं सामान - दारूच्या धुंदीतला मावशीचा नवरा-छोटूने पटकन स्वयंपाक घरातला बत्ता आणला . माया ने तो बत्ता छोटू च्या हातातून घेतला आणि ती , तो बत्ता मावशीच्या नवऱ्याच्या डोक्यात मारणारच होती, पण तो मद्यधुंद राक्षस खाली कोसळला आणि बत्ता त्याच्या पायावर पडून त्याच्या पायाचं हाड मोडलं त्यासरशी दोघही बहिण-भाऊ जीवाच्या आकांताने वाट मिळेल तिकडे धावू लागले. धावता धावता ते शहरातल्या \"त्या बदनाम\" वस्तीत केव्हा पोचले त्यांचं त्यांनाच कळलं नाही. संध्याकाळ झाली होती. छोटू अगदी थकून गेला होता. माया पण घाबरली होती. पण कुठे निवारा मिळणार होता त्यांना!
त्याच वस्तीतल्या जग्गू दादानं मायाला हेरलं. जग्गू मायाशी गोड गोड बोलू लागला. ताई-बाई करून तिला फसवायचा प्रयत्न त्याने सुरू केला. छोटूला एक भेळ घेऊन दिली. छोटूनं ताईकडे पाहिलं आणि मायाने होकार देताच छोटू भेळ खाऊ लागला. बिचारा छोटू सकाळपासून उपाशीच होता. जग्गूचा तो राकट चेहरा, गालावरचा चामखीळ, पांढरा बंगाली कुर्ता आणि त्यावर लाल मलमलचे जॅकेट आणि पान खाऊन रंगलेले ओठ ,याशिवाय त्याची वासनायुक्त नजर, माया आतून चरकली,पण मायाजवळ दुसरा कुठलाच मार्ग नव्हता.
जग्गू दादा तिला गुलाबबाईकडे घेऊन गेला. त्या बदनाम वस्तीची गुलाबबाई मुखिया होती. पण गुलाबबाई जरी वेश्याव्यवसाय करत होती तरी जर एखाद्या मुलीला या व्यवसायात यायचं नसेल तर ती बळजबरीही करत नव्हती. शिवाय त्या मुलीला सर्वसामान्य आयुष्य जगायला मदतही करायची. जणू अनाथ दीनवाण्या मुलींची आईच होती गुलाबबाई.
गुलाबबाईची हवेली राजमहालाला लाजवणारी होती. छताचे उंची काचेचे झुंबर, जमिनीवरचे किमती गालिचे, काचेच्या रंगीत भिंती, गालीच्यावरच्या पांढऱ्याशुभ्र गाद्या आणि धवल लोड तक्के यांची बैठक बघून मायाला भोवळच आली.
मायाला शुद्ध आली तेव्हा छोटू तिच्या बाजूलाच होता. गुलाबबाई मायेने मायाच्या डोक्यावरून हात फिरवत होती. माया घाबरून उठून बसली आणि हमसाहमशी रडू लागली. गुलाबबाईनं मायाला पोटाशी घेतलं. आश्वासनाचा धीराचा हात तिच्या पाठीवरुन फिरवला.
माया - (गयावया करत) "मला हे घाणेरडे काम करायचं नाही. मी तशी मुलगी नाही. मला जाऊ द्या ! मला जाऊ द्या!! मला जाऊ द्या!!!"
गुलाबबाई - "रो मत गुडिया तुझे कुछ नही होगा! तू गुलाब बाई की पनाह मे है, चुप हो जा, ले पानी पी ले."
माया - "नको, मला इथलं पाणीसुद्धा नको (छोटू कडे बघून) चल छोटू आपण कुठेतरी दूर निघून जाऊ."
गुलाबबाई - "कहा जायेगी मेरी बच्ची? बाहर सब भेडीये है तुझे खा लेंगे. मेरे पास रह जा. तुझे कुछ नही होगा."
माया - (रागाने) "मला हात लावू नका. मला इथे राहायचंच नाही आहे."
छोटू - "ताई ही मावशी खरच चांगली आहे ग. त्या मावशी सारखी नाही. आपण इथेच थांबूया ना."
माया -( रागाने छोटूला एक थापड मारते ) "नालायका या गलिच्छ वस्तीत राहून पुढे तुझं भवितव्य काय? अरे इथलं खाऊन तुही असाच झाला! चल उठ! चल माझ्याबरोबर."
मायाने उठायचा प्रयत्न केला पण ती खाली कोसळली.
गुलाबबाई - "बेटी मेरी बात मान ,तु यही रह जा ,अब यही जगह तेरे लिए ठीक है."
माया - (रागाने रडू येऊन) "नाही, मी नाही राहणार इथे."
गुलाबबाई - (माया ला एक थोबाडीत मारते ) "अब तुझे यही रहना है. मैने तुझे अपनी बेटी माना है. प्यार से समझा रही हू मान जा. जा बेटा छोटू, स्कूल की पढाई कर और सो जा."
गुलाबबाईच्या शेवटच्या शब्दानी मायाला खूप धीर मिळाला. पंधरा-वीस दिवसांनी मायाची तब्येत ठीक झाली आणि मायाने पण रात्र शाळेत बारावीला प्रवेश घेतला. छोटूचा सातवीचा अभ्यास सुरू झाला आणि परत एकदा दुर्दैवाने मायाचे दार ठोठावले.
एका सामाजिक संस्थेच्या कामासाठी गुलाबबाई एका दिवसासाठी शहराबाहेर गेली आणि जग्गूने नेमका तेव्हाच डाव साधला. तो मायावर तुटून पडला. मायावर परत तोच जीवघेणा प्रसंग आला, त्याच प्रसंगाची पुनरावृत्ती होत होती. पण यावेळीही छोटू मायाच्या मदतीला आला. जग्गूने जेव्हा मायाला बळजबरीसाठी खाली पाडले, तेव्हा मायाने त्याचा निकराने प्रतिकार केला आणि त्याचवेळी छोटूने प्रसंगावधान राखून दप्तरातला पेन जग्गूचा डोळ्यात खूपसला आणि जगूला मायापासून दूर केले. त्यानंतरच्या हाणामारीत छोटूला वाचवतांना मायाच्या डोक्याला खोक पडली आणि भळाभळा रक्त वाहायला लागलं. त्यामुळे मायाला भोवळ आली. जग्गूचा डोळा जायबंदी झाल्याने तो तिथून निघून गेला . छोटूने धावत धावत जाऊन वस्तीच्या बाहेर उभ्या असलेल्या इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या व्हॅनमधून डॉक्टर अनुरागला बोलावून आणले. डॉक्टर अनुरागने मायाचा इलाज केला पण वारंवार होणाऱ्या अतिप्रसंगामुळे माया मानसिकदृष्ट्या खचून गेली होती. म्हणूनच डॉक्टर अनुराग तिला इलाज करण्यासाठी घरी घेऊन आले. मधल्या काळात छोटू ने स्वतःची आणि त्याच्या बहिणीची आप -बीती डॉक्टर अनुरागला सांगितली.
डॉक्टर अनुराग यांच्या इलाजाने, छोटूच्या प्रेमाने माया आता बरी झाली होती. अनुरागने मायाला लग्नाची मागणी घातली.
आई - "अनु तु आता तीस वर्षाचा झाला लग्नाचा काही विचार करणार आहेस की नाही?"
अनुराग - "बरं झालं आई तूच विषय काढला. मी मायाशी लग्न करणार आहे."
आई - (रागाने) "अनु तुझं डोकं फिरलं नाही ना?"
अनुराग - "नक्कीच नाही. अग जरा विचार कर ,ज्या मुलीवर मी प्रेम केलं तिने मला धोका दिला. ज्या मुलीशी तू माझं लग्न लावून दिलं ती घरातले सर्व पैसे दागिने घेऊन लग्नाच्या तिसऱ्या दिवशी पळून गेली. मग त्या दोघींपेक्षा माया कधीही सरसच ना?"
आई - "अनु परत एकदा विचार कर तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे."
अनुराग - "आई मला लग्न करून संसार करायचा आहे भातुकलीचा खेळ खेळायचा नाही."
आई - "ठीक आहे जशी तुझी इच्छा."
एका शुभमुहूर्तावर डॉक्टर अनुराग आणि माया विवाह बंधनात अडकले. डॉक्टर अनुराग यांनी छोटूला शिक्षणासाठी पाचगणीच्या निवासी शाळेत प्रवेश मिळवून दिला.
कथा कशी वाटली नक्की कळवा तुमच्या अभिप्रायाच्या प्रतीक्षेत.