Feb 22, 2024
गोष्ट छोटी डोंगराएवढी

माऊली स्पर्धा कथा

Read Later
माऊली स्पर्धा कथा
आषाढी एकादशी होती. पंढरपूरला विशाल जनसागर लोटला होता. अवघी पंढरी विठ्ठलभक्तीत न्हाऊन निघाली होती. जागोजागी वारकरी आणि त्यांचे भगवे झेंडे फडकत होते. ज्ञानोबा-तुकाराम हा जयघोष सर्वत्र ऐकू येत होता. रामराव आणि जानकीबाईही आनंदात होते. का नसणार ? मुलगा राघव आणि सुनबाई वैदेही यांनी वारी घडवली होती. सोबत लहानगा नातू कृष्णाही सोबत होता. प्रवासात रामरावांनी नातवाला भक्त पुंडलिक , संत ज्ञानेश्वर , संत तुकाराम यांच्या कितीतरी गोष्टी ऐकवल्या. पंढरपूरला येताच राघवने एका हॉटेलात रूम बुक केली. मग सर्वजण दर्शनाला गेले. शेवटी विठूमाऊलीचे दर्शन झाले. पण गर्दीत रामरावांना आणि जानकीबाईंना मुद्दाम एकटे सोडून त्यांचा राघव वैदेहीजवळ आला. त्याचे डोळे पाणावलेले होते.

" अहो , भावनिक नका होऊ. आपल्याला त्यांच्या म्हातारपणीचा खर्च झेपणार नाही. राघवच्या भविष्यासाठी तो पैसा गरजेचा आहे. चला लवकर. सासूसासरे आपल्याला शोधायच्या आत आपण पंढरपूर सोडू. " वैदेही म्हणाली.

जड अंतकरणाने राघव वळला. पण त्याच्या लक्षात आले की मुलगा कृष्णा जवळ नाहीये.

" वैदेही , कृष्णा कुठेय ?" राघवने घाबरत विचारले.

" तुमच्याकडेच होता ना ?" वैदेही म्हणाली.

दोघा नवराबायकोने मुलाचा शोध घेतला. वैदेही खूप रडत होती. पोलिसांकडे तक्रार दिली. पंढरपुरात लहान मुले किडनॅप करत असलेली गॅंग फिरत
असल्याची माहिती पोलीसांनी दिली.

" विठोबाने माझ्या पापाची शिक्षा मला दिली. मी तुम्हाला आईवडिलांपासून दूर केलं आणि त्याने मला माझ्या लेकरापासून. " वैदेही स्वतःलाच मारू लागली.

" मी पण तुझ्याइतकाच गुन्हेगार आहे. " राघव रडत म्हणाला.

शेवटी रात्री वैदेही-राघव हॉटेलमध्ये परतले. तिथे मुलगा कृष्णा " आई " करत वैदेहीला बिलगला. रामराव आणि जानकीबाई आराम करत होते.

" कुठे होते तुम्ही दोघे ? कृष्णा किती कासावीस झाला होता. " रामराव किंचित खोकला देत म्हणाले.

" पण तुम्ही तर गर्दीत ?" राघव म्हणाला.

" बघा. आम्ही गर्दीत हरवलो. पण तुम्ही दोघांनीच तर आम्हा तिघांना गर्दीतून बाहेर काढून हॉटेलमध्ये जेवू घातलं. मग इथं आणलं. " जानकीबाई हसत म्हणाल्या.

राघव आणि वैदेही एकमेकांकडे बघतच बसले.

" आजोबा , माझे बाबा पण भक्त पुंडलिकसारखे आहेत ना ?" कृष्णाने विचारले.

" हो बाळा. आमचे पुण्य थोर की आमच्या पोटी हा जन्मला. " रामराव समाधानाने म्हणाले.

वैदेही-राघवला खूप पश्चाताप झाला. त्यांनी आजन्म मातापित्याची सेवा केली. नकळतपणे रामराव-जानकीबाई आणि कृष्णाला विठोबा-रुकमाईने दर्शन दिले होते. माऊलीच ती भक्ताला एकट कस सोडणार ?

©®पार्थ धवन
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

सुकृत

Engineer

जय श्री राम

//