माऊली एक मायेची सावली. भाग- ४

ही एक कौटुंबिक कथा.. एका आईची व्यथा..

माऊली-एक मायेची सावली. भाग-चार.

आतापर्यंत आपण पाहिलं….
नंदिनी आणि सयाजी डॉक्टरांकडे जाऊन घरी आले, त्यानंतर सयाजीने आईला सत्य सांगितलं. ही गोष्ट पचवणं आईला जड जात होतं. हे पाहून नंदिनीला वाईट वाटत होतं. म्हणून तीने एक मोठा धाडसी निर्णय घेतला आणि त्यासाठी  सगळ्यांच्या नकळत ती घरातून बाहेर गेली होती.

आता पुढे

भाग -चार.

सर्वांच्या नकळत घरातून बाहेर पडलेली नंदिनी लगबगीने घराकडे चालली होती. झोपलेल्या आईबरोबरच सयाजीही  घरी यायच्या आधी तिला घरी पोहचणं गरजेचं होतं. झपझप पावले टाकत ती वाड्याच्या दारात पोहचली. पाहते तो काय! आई ओसरीवर पाय सोडून बसल्या होत्या.

नंदिनी येताना पाहून त्या तिथूनच ओरडून म्हणाल्या,

“अगं नंदिनी, कधीपासून तुला हाका मारतेय. कुठे गेली होती तू?जाताना मला सांगितलं पण नाही तू.”

नंदिनी घाबरली होती. ती म्हणाली,

"आई, मी मैत्रिणीकडे गेले होते आणि जातेवेळीस तुम्ही झोपल्या होतात म्हणून मग मी झोपमोड नाही केली. काही काम होतं का?"

आई वैतागून म्हणाल्या,

“अगं काम असेल तरच तुला आवाज देते का मी? काळजी वाटली म्हणून शोधत होते. अशा अडचणीच्या दिवसात मैत्रिणीकडे जाण्याची अशी काय गरज भासली तुला?”

नंदिनी नजर चोरत म्हणाली,

“मैत्रिणीची तब्येत बरी नव्हती म्हणून तिला पाहून आले.”

आई म्हणाल्या,

“ठिक आहे पण आधी तू तुझ्या तब्येतीची काळजी घे.”

नंदिनी होकारार्थी मान हलवून तिथून आतमध्ये निघून गेली.

दिवस वेगाने सरत होते. सयाजी आणि आईने आता मुलाची आशा सोडली होती. हेच आपलं प्राक्तन म्हणून त्यांनी स्वतःची समजूत घातली होती. पण एकेदिवशी अचानक नंदिनी किचनमध्ये चक्कर येऊन पडली. आईने सयाजीला कॉल करून घरी बोलवून घेतलं. तोपर्यंत नंदिनी शुद्धीवर आली होती. पण तरीही तिला डॉक्टरकडे नेणं गरजेचं होतं.
सयाजीनं लगबगीनं तिला गाडीत बसवलं आणि दोघेही डॉक्टर पत्कींच्या हॉस्पिटलकडे निघाले. वाटेत तो तिच्याशी बोलत म्हणाला,

“नंदू,आता बरी आहेस ना तू?काही त्रास होतं नाही ना?”

नंदिनी त्याला म्हणाली,

"हो ठीक आहे मी. पण मळमळत आहे. उलटी आल्यासारखं होतं आहे.”

सयाजी तिला समजावत म्हणाला,

“टेन्शन नको घेऊ, कदाचित पित्त वाढलं असेल. पित्तामुळे होतं असं कधीकधी.”

इतक्यात गाडी पत्कींच्या हॉस्पिटलच्या दारात पोहोचली. सयाजी गाडीतून पटकन खाली उतरला आणि त्याने नंदिनीचा हात पकडून तिला आधार देत खाली उतरवलं. तो तिला तडक आतमध्ये घेऊन गेला. डॉक्टर पत्कींच्या केबिनमध्ये गेल्यावर डॉक्टरनी त्यांना विचारलं,

“काय झालं नंदिनी? तब्बेत का बिघडली?  काय त्रास होतोय तुला?”

यावर नंदिनी म्हणाली,

"डॉक्टर, सकाळी अचानक गरगरल्या सारखं झालं. चक्कर आली आणि मी जमिनीवर कोसळले. आताही चक्कर आल्यासारखं  वाटतंय.अंगात काही  त्राणच उरलं नाही. खूप अशक्तपणा जाणवतोय” 

डॉ. पत्की म्हणाले,

“ओके, चल आधी मी तुला तपासून घेतो. मग समजेल तुला काय झालंय ते? ये झोप त्या टेबलवर“

सयाजीने नंदिनीच्या हाताला पकडून तिला आधार देत टेबलावर झोपवलं. डॉक्टर पत्कीनी तिच्या हृदयाचे ठोके, ब्लडप्रेशर, हाताच्या  नाडीचे ठोके  तपासले. क्षणाक्षणाला त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलत होते. नंदिनीला तपासल्या नंतर त्यांना एकदम आश्चर्याचा धक्काच बसला. 
डोक्याला हात लावत ते म्हणाले,

“ओह नो!  सयाजी मी तुम्हाला सर्व गोष्टींची पूर्ण कल्पना दिली होती, तरी तुम्ही निष्काळजीपणे वागलात. की जाणीवपूर्वक तुम्ही हा धोका पत्करला आहे?”

सयाजीला काहीच कळत नव्हतं. तो एकदम गोंधळून गेला.  तो डॉक्टरांच्या चेहऱ्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत म्हणाला,

“डॉक्टरसाहेब, तुम्ही काय बोलताय मला काहीच कळेनासं झालंय? कसला निष्काळजीपणा? आणि कसला धोका? मी काहीच समजलो नाही.”

पण नंदिनीला सगळं समजलं होतं,  ती शांत होती.

डॉक्टर पत्की म्हणाले,

“सयाजी,मी तुम्हाला नंदिनीच्या प्रेग्नन्सीबद्दल सगळी कल्पना दिली होती.”

यावर सयाजी होकारार्थी मान हलवत म्हणाला,

“हो, तुम्ही सगळी कल्पना दिली होती आणि आम्ही योग्य खबरदारी घेत आहोत.”

डॉक्टर पत्की म्हणाले,

“चूक एकदम चूक.. सयाजी तूम्ही चुकला आहात.. याचे खूप गंभीर परिणाम होऊ शकतात याची तुम्हाला जाणीव असताना तूम्ही गाफिल राहिलात.”

सयाजीला डॉक्टर पत्की काय बोलत आहेत काहीच कळेनासं झालं. तो म्हणाला,

“डॉक्टरसाहेब मला समजेल असं स्पष्ट सांगा. मला तुमचं बोलणं अजिबात कळत नाहीये.”

यावर डॉक्टर पत्की  चिडून सयाजीला म्हणाले,

"सयाजी नंदिनी गरोदर आहे.  शी ईज प्रेग्नेंट"

“काय?”

सयाजी आश्चर्याने जवळजवळ किंचाळलाच.

“डॉक्टर काहीही काय बोलताय? नंदिनी गरोदर कशी  होऊ शकते? अहो डॉक्टर, तुम्हीच तर नंदिनीला गर्भनिरोधक कॉपर टी बसवली होती. मग ती प्रेग्नेंट कशी होऊ शकते? तुमचा काही गैरसमज होतोय.  तुम्ही  पुन्हा नीट तपासून पहा नंदिनीला.”

सयाजी डॉक्टर पत्कीना समजावण्याच्या सुरात बोलत होता. 

“नाही, माझ्या इतक्या वर्षाच्या अनुभवावरून मी सांगतोय. नंदिनी प्रेग्नंट आहे”

डॉक्टर पत्की ठामपणे बोलत होते. सयाजी पूर्णपणे गोंधळून गेला होता. दोघांनीही आश्चर्याने नंदिनीकडे पाहिलं. ती मान खाली घालून शांत बसली होती. 

“नंदिनी आता तरी सांगशील खरं काय ते?” 

डॉक्टरांनी रागाने नंदिनीला विचारलं.

“डॉक्टर, मी माझ्या मैत्रीणीच्या डॉक्टरांकडे जाऊन माझी  कॉपर टी काढून टाकली.” 

नंदिनी शांतपणे म्हणाली.  

“का नंदू?, का केलंस असं? डॉक्टरांनी आपल्याला गंभीर परिणामांची कल्पना दिली होती ना! कोणालाही न सांगता तू इतका मोठा निर्णय कसा घेतलास?”

सयाजी काकुळतीला येऊन बोलत होता. त्याच्याही डोळ्यांत पाणी साचू लागलं. 

“मी सासूबाईंच्या आनंदासाठी हा निर्णय घेतला. वंशाला दिवा हवा म्हणून त्या किती आस लावून बसल्या होत्या. मी त्यांच्यासाठी  इतकीही करू शकत नाही याच शल्य मला स्वस्थ बसू देत नव्हतं. म्हणून मग मी कोणालाही न सांगता डॉक्टर अहुजा यांच्याकडे जाऊन कॉपर टी काढून टाकली” 

नंदिनीच्या डोळ्यांतून पाण्याच्या धारा वाहू लागल्या.

“डॉक्टर, आता काही करता येईल का? मला हे मूल नकोय. मला माझी नंदिनी हवीय. प्लिज काहीतरी करा डॉक्टर!”

सयाजी डॉक्टर पत्कीना आर्जवे करू लागला. डॉक्टरांनी सयाजीला शांत केलं. नंदिनीच्या आणखी काही तपासण्या केल्या. काही प्रश्न विचारले. आणि  गंभीरपणे म्हणाले,

“सयाजी, आता काहीही शक्य नाही. नंदिनीला गर्भधारणा होऊन चार महिने उलटून गेलेत. आता अबोर्शन करता येणार नाही. नंदिनीच्या जीवाला धोका होऊ शकतो. मुलाला जन्म देण्याखेरीज आपल्याकडे दुसरा कोणताच पर्याय नाही. तुम्ही आता नंदिनीच्या प्रकृतीची काळजी घ्या. नीट पथ्यपाणी जपा. आता देवाजीच्या मनात हेच असेल तर आपण तरी काय करणार? देवावर विश्वास ठेवा. सगळं नीट होईल.”

डॉक्टरांनी नंदिनीला काही औषधे  लिहून दिली. पथ्यपाणी समजावून सांगितलं. थोड्या वेळाने डॉक्टरांचा निरोप  घेऊन ते घराच्या दिशेने निघाले. पूर्ण रस्ताभर कोणीही एक शब्दही बोलले नव्हते. दोघेही घरी  पोहचले. नंदिनीला गाडीतून उतरवत तिचा हात धरून सयाजी घरात घेऊन आला. 

सयाजीची आई बाहेर ओसरीवर वाट पहात बसली  होती. त्यांना पाहताच लगबगीने आत आली. 

“काय झालं सयाजी? नंदिनी ठीक आहे ना? काय म्हणाले डॉक्टर?” 

सयाजीवर प्रश्नांचा भडिमार झाला.  

“आई थांब जरा., सांगतो सगळं”

सयाजीने डॉक्टर पत्कीच्या क्लिनिकमध्ये घडलेला संपूर्ण वृतांत सांगितला. नंदिनीच्या या धाडसी निर्णयाचं आईलाही खूप नवल वाटलं आणि तिची काळजीही. आपल्या घराण्याला वंशाचा दिवा देण्यासाठी सुनेने इतकं मोठं पाऊल उचलंल होतं. कौतुक करावं की तिला रागवावं? आईला समजेना

“आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चालेना.”

आईच्या तोंडून आपसूक शब्द बाहेर पडले. नंदिनीच्या काळजीने  सयाजीची आई चिंतातुर झाली. 

ऋतुचक्र वेगाने फिरत होते. दिवसांमागून दिवस सरत होते.
नंदिनीच्या देहात बदल होऊ लागले. पोट दिसू लागलं होतं.
सयाजीची आई दोन्ही मुलींची काळजी घेत होत्या. नंदिनीच्या प्रकृतीचीही  काळजी घेत होत्या. रोज घरात पूजाअर्चा, होम हवन सुरू होतं. आपल्या सुनेच्या आणि तिच्या पोटात वाढणाऱ्या बाळासाठी देवाला नवस बोलत होत्या. साकडं घालत होत्या. 

नंदिनीला आता नववा महिना लागला होता. गरोदरपणाचं तेज जरी चेहऱ्यावर दिसत असलं तरी तिची प्रकृती ढासळत चालली होती. अशक्तपणा स्पष्टपणे दिसत होता. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नंदिनी स्वतःच्या जीवावर उदार होऊन लढत होती. ही एका आईची लढाई होती.. तिच्या आईपणाची लढाई होती. 

आणि एक दिवस मध्यरात्री नंदिनीच्या पोटात दुखू लागलं. बाळंतकळा सुरू झाल्या. तिने शेजारी झोपलेल्या सयाजीला हलवून जागं केलं. सयाजीने पटकन गाडी काढली. आईला उठवून मुलींकडे पाहायला सांगितलं. आणि तो तडक डॉक्टर पत्कीच्या हॉस्पिटलमध्ये दाखल झाला. तिचं ते प्रसववेदनेने तळमळणं त्याला पाहवत नव्हतं. सर्व तज्ञ डॉक्टर्स, नर्स, स्वतः डॉक्टर पत्की यांची टीम हजर झाली. लगेच नंदिनीला ऑपरेशनसाठी हलवण्यात आलं. उपचाराला सुरुवात झाली. रात्रभर नंदिनी प्रसववेदनेने तळमळत होती. सारे डॉक्टर्स तिला यातून सुखरूप सुटका करण्याचा अतोनात प्रयत्न करत होते. सयाजी चिंतीत होऊन ऑपरेशन थेटरच्या बाहेर फेऱ्या मारत होता. घरी सयाजीची आई देव पाण्यात ठेवून नामस्मरण करत होती. सुखरूप सुटका व्हावी म्हणून ईश्वराकडे प्रार्थना करत होती. 

पूर्ण एक रात्र डॉक्टर्स प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते. पहाटे पाच वाजता ऑपरेशन रूमचा दरवाजा उघडला. डॉक्टर पत्की बाहेर आले. सयाजी धावतच त्यांच्याजवळ आला. काकुळतीला येऊन म्हणाला,

“डॉक्टर, काय झालं? माझी नंदिनी ठीक आहे ना? बाळ सुखरूप आहे ना?”

त्याच्या या प्रश्नांनी व्यथित होऊन डॉक्टर पत्की म्हणाले,

“सयाजी, तुम्हाला मुलगा झाला आहे. पण..?”

“पण काय डॉक्टर?” 

त्याने घाईने विचारलं. 

“आम्ही नंदिनीला नाही वाचवू शकलो. खूप निकरीचे प्रयत्न केले. नंदिनीने सुद्धा कमालीची झुंज दिली. पण नाही वाचली. आय अँम सॉरी सयाजी”

डॉक्टर पत्कीचे हे शब्द ऐकून  सयाजी खूप मोठा धक्का बसला. अगदी उन्मळून पडला. सर्वत्र दुःखाची छाया पसरली.

पुढे काय होतं? सयाजीच्या मुलांचं पुढे काय होईल? पाहूया पुढील भागात..

क्रमशः
सारंग चव्हाण
९९७५२८८८३५

🎭 Series Post

View all