माऊली-पर्व दुसरे. भाग-2

Stori of a mother who lost her child.

माऊली-पर्व दुसरे-भाग-दोन.


 

भैरवीने स्मितहास्य केलं आणि म्हणाली,

"चला आता निघूया.दिवाळीच्या फराळाचा बाजार आणून सगळं वेळेवर करून घ्यायला हवं. मी काय म्हणते आपण रविवारी मुलांना घेऊन फॅशनवर्ल्ड मध्ये जाऊन एकदम भारीतले कपडे घेऊया.शुभ्रा आणि श्वेता त्यांच्या आवडीने काय घ्यायचे ते ड्रेस घेऊदेत. पण बंटीचे(परीक्षित)कपडे मी पसंद करीन. माझा मुलगा अगदी पाटलांचा राजकुमार शोभून दिसला पाहिजे."

सयाजीने तिला होकार देत गाडीचा स्टार्टर मारला आणि गाडी बाजाराच्या दिशेने धावू लागली.

थोड्याच वेळात दोघं बाजारात पोहोचले, दिवाळीसाठी लागणार एकेक साहित्य त्यांनी खरेदी केलं.ते साहित्य गाडीत भरून ते घराकडे निघणार इतक्यात त्यांच्या गाडीच्या बाजूलाच रस्त्याच्या कडेला एक वयोवृद्ध माणूस बसलेला सयाजीला दिसला. ते पाहून सयाजी गाडीमधून बाहेर उतरू लागला.

इतक्यात त्याला भैरवी म्हणाली,

"अहो, आता आणखी काय राहिलं? लिस्टमधील सगळं साहित्य तर आपण घेतलं आहे."

यावर सयाजी तिला म्हणाला,

"भैरवी,मी दोनच मिनिटात आलो."

भैरवी म्हणाली,

"काय हे? इथेपण तुमचं ऑफिसचं काम निघालं वाटतं. घरी मुलं आणि आई आपली वाट पाहत असतील."

सयाजी तिचं बोलणं न ऐकताच समोरील एका हॉटेलमध्ये गेला आणि पाच मिनिटांनी हातात एक थैली आणि पाण्याची बाटली घेऊन येताना तिला दिसला.

भैरवी ते पाहून म्हणाली,

"देवा, काय करावं यांचं? आता घरीच तर जायचं आहे. मग हे खाद्यपदार्थ कशाला आणलेत? आता हे खाल्लं तर घरी गेल्यावर पुन्हा कसं जेवायचं? ते अन्न वाया जाणार."

इतक्यात तिने पाहिलं कि सयाजीने ती थैली आणि पाण्याची बाटली रस्त्याकडेला बसलेल्या त्या वृद्ध माणसाच्या हातात दिली आणि त्याला म्हणाला,

"बाबा, भूक लागली असेल ना? यात जेवण आहे. खाऊन घ्या."

आणि एक स्मितहास्य करून तो गाडीत येऊन बसला.

भैरवीला त्याचं कौतुक वाटलं, ती त्याच्याकडे प्रेमाने बघत म्हणाली,

"खरंच तुम्ही ग्रेट आहात.दीन दुबळ्यांना मदत करणे तुम्हाला किती सहजपणे जमते. घरी जाण्याच्या घाईत मला तो माणूस दिसलापण नव्हता.पण तुम्हाला तो दिसला आणि तुम्ही त्याच्या चेहऱ्यावरून तो उपाशी आहे हे ओळखलत."

सयाजी म्हणाला,

"भैरवी, उगाच मला हरभराच्या झाडावर चढवू नको. अगं दीनदुबळ्यांना मदत करण्याचा वारसाच आपल्या घराला लाभला आहे. बाबाजी पाटील यांचं नुसतं नाव जरी काढलं ना,तरी त्यांच्या आठवणीने आजही कित्येक लोकांच्या डोळ्यांच्या कडा पानांवतात.ही माणसं त्यांनी मिळवली आहेत, आपल्या स्वभावामुळे जोडली आहेत. देव न करो उद्या आपल्यावर काही वाईट वेळ आली तर आपल्या पूर्वज्यांची पुण्याई आपल्या मदतीला नक्की धावून येईल बघ."

भैरवी म्हणाली,

"हो. तुमचं अगदी बरोबर आहे."

सयाजी गालात हसत म्हणाला,

"धन्यवाद भैरवी.आता निघूया आपण. पिल्लं घरी वाट पाहत असतील."

भैरवीने एक स्मितहास्य केलं आणि ती सयाजीच्या हातावर हात ठेऊन म्हणाली,

"अहो,ऐका ना.काहीतरी सांगायचं होतं."

सयाजी म्हणाला,

"हो.बोल ना.काय सांगायचं आहे?"

भैरवी लाजत म्हणाली,

"माझं तुमच्यावर खूप खूप प्रेम आहे."

सयाजी फक्त गालात हसला आणि त्याने गाडीचा स्टार्टर मारला आणि ते घराच्या दिशेने निघाले.

थोड्याचवेळात गाडी पाटीलवाड्याच्या दारात येऊन थांबली. तसें शुभ्रा, श्वेता आणि बंटी धावतंच गाडीपर्यंत आले.

त्यांना धावत आलेलं पाहून सयाजी आणि भैरवी गाडीतून पटकन बाहेर आले.

श्वेता आणि शुभ्रा सयाजीकडे धावल्या, तर भैरवीचा लाडका बंटी तिच्याकडे धावला आणि तिला बिलगला.

बंटी आपल्या बोबड्या बोलात म्हणाला,

"आई, तुमी कुत गेलता, मी शालेतन आल्यापातन तुमती वात बगतोय. या दोगी मला मालत्यात बग. त्याचनी माल तू आता."

यावर श्वेता आणि शुभ्रा म्हणाल्या,

"नाही ग आई. आम्ही याला नाही मारलं. उलट हाच आई कुठे गेलीये सांगा म्हणून आम्हाला मारत होता. हातात येईल ते फेकून मारत होता. म्हणून आम्ही फक्त त्याचं हात पकडले होते. तर म्हणतोय कसा,'आई आल्यावलं तुमाला कसा पलसाद देती बग. मी सांगणाल मला मालल मनून.' आणि आता तुम्हाला असं सांगतोय बघा."

यावर सगळेजण हसू लागले.

सयाजी बंटीकडे पाहून हसत म्हणाला,

"अरे लबाडा. असा हायस होय. विनाकारण बहिणींच्या खोड्या काढतोस होय. थांब तुला शिक्षाच देतो."

सयाजीचं बोलणं ऐकून बंटी त्याच्यापासून दूर पळू लागला आणि सयाजी त्याच्या पाठलाग करू लागला.

ते पाहून श्वेता आणि शुभ्रा सयाजीच्या मार्गात आडव्या येत म्हणाल्या,

"पप्पा जाऊदे ओ. नका त्याला घाबरवू.लहान आहे तो."

हे पाहून सयाजी आपल्या कमरेवर हात ठेवत म्हणाला,

"पाहिलंस भैरवी!बहीण भावांचं प्रेम.तक्रार यांचीच,साक्ष यांचीच आणि दयेचा अर्जंही यांचाच. हाहाहाहाहाहाहा."

भैरवी खळखळून हसू लागली.

सयाजी गाडीची डिकी उघडून साहित्य बाहेर काढत म्हणाला,

"हे असतं भावाबहिणींच नातं.

तुला माहिती आहे भैरवी. आमची सई सुद्धा अशीच होती गं.नेहमी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी माझी धाकटी बहीण. मी काहीतरी खोड्या केल्यावर बाबा मला रागवायला लागले किंवा मला मारायला धावले तर ही बाबांच्या पायाला हातांचा विळखा घालून त्यांना थांबवायची आणि म्हणायची,'माझ्या दादाला मारू नका, नाहीतर मी तुम्हाला सोडून निघून जाईन.'

आणि खरच एकेदिवशी ती आम्हाला सोडून निघून गेली गं.खूप आठवण येते गं तिची. कुठे शोधू तिला? या पाटीलवाड्यात लहानपणी खेळलो बागडलो, भविष्याची स्वप्न पाहिली. इथल्या कणाकणाला तिचा स्पर्श झाला आहे गं. तिच्या उणीवेमुळे हा वाडा मला खायला उठतो. भाऊबीज आणि रक्षाबंधन मला प्रत्येकवेळी रडवून जातात. कुठे असेल गं आमची चिमणी?"

सयाजीचा अश्रुंचा बांध फुटला. सईच्या आठवणीत तो हमसून हमसून रडू लागला.

भैरवी त्याला धीर म्हणाली,

"अहो, असं सणावाराच्या तोंडावर रडू नका. शांत व्हा.आत घरात चला.सावरा स्वतःला."

ती त्याला धीर देत आतमध्ये घेऊन आली.

सयाजीच्या डोळ्यांच्या कोपऱ्यात अजूनही अश्रुंची ओल बाकी होतीच. ही ओल त्याने कितीतरी वर्षे डोळ्यात राखून ठेवली होती.

भैरवीने त्याला खुर्चीवर बसवलं आणि प्यायला पाणी आणून दिलं.

नोकरांनी गाडीतील साहित्य आतमध्ये आणून ठेवलं.

थोड्याच वेळात रात्र झाली.

भैरवी जेवणाच ताट घेऊन आईच्या म्हणजेचं सासूबाईंच्या खोलीत गेली. त्यांना उठवून जेवायला दिलं आणि काय हवं नको ते पाहू लागली.

आईचं जेवून झाल्यावर भैरवीने तिच्याजवळ हळूच सईचा विषय काढला.तिला फक्त थोडी थोडकीच माहिती होती. पण आजची सयाजीची परिस्थिती पाहून तिला तिच्याबद्दल सविस्तर माहिती करून घ्यावीशी वाटतं होती.

ती आईला म्हणाली,

"आई, एक विचारू का? सांगाल का सगळं मला?"

आई म्हणाली,

"बोल कि बाळ. काय विचारायचं आहे?"

भैरवी म्हणाली,

"आई, सईबद्दल मला जास्त काहीच माहिती नाही आणि आजवर ते जाणून घेण्याची मला गरजही वाटली नाही. पण आज यांना तिच्या आठवणीत व्याकुळ होऊन रडताना पाहून मला तिच्याबद्दल जाणून घेण्याची तीव्र इच्छा झाली आहे."


 

आईच्या प्रसन्न चेहऱ्यावर एकदमच दुःखाचं सावट पसरलं.

ते पाहून भैरवीला,'आपण चुकलो कि काय?' असं वाटू लागलं आणि ती आईची माफी मागून तिथून उठणार इतक्यात आई सांगू लागली.

आई म्हणाली,

"सयाजीचं रडणं स्वाभाविक आहे. भाऊबीज जवळ आलीये आणि त्याची लाडकी बहीण गेली कित्येक वर्षे आम्हाला सोडून गेली आहे. एका मुलाच्या प्रेमात आंधळी होऊन जे नको होतं ते करून बसली.काय कमी केलं नव्हतं गं आम्ही तिला. आम्हाला आमच्या संस्कारावर खूप विश्वास होता,पण एकेदिवशी सयाजीने सईला एका मुलाबरोबर गाडीवरून फिरताना पाहिलं आणि त्याला धक्काच बसला. त्याने स्वतःला सावरलं आणि घरी न सांगता मोठा भाऊ या नात्याने बाहेरच्या बाहेर तिला समजवण्याचा प्रयत्न केला. पण तिने फक्त 'हो, हो.' म्हणून वेळ मारून नेली पण तिने त्या मुलाबरोबर फिरणं सुरूचं ठेवलं.पण एकेदिवशी ती तिच्या बाबांनाच सापडली आणि त्यांनी तिला ओढत आणून गाडीत बसवून घरी आणली.दारात गाडी येताच मी नेहमीप्रमाणे बाहेर गेले आणि पाहते तर हे सईच्या दंडाला पकडून ओढत आणत होते. त्यांच्या डोळ्यात अंगार दिसत होता. मी पूढे जाऊन सईला यांच्याकडून सोडवून घेतलं आणि विचारलं,"काय झालंय? अशी जनावरासारखं ओढत का आणताय तिला?"

त्यावर ते रागाने म्हणाले,

"विचार तुझ्या दिवटीला, कोणासोबत कुठे उनाडक्या करत फिरत होती? बाप इथे गोरगरीबाची पोरं चांगल्या मार्गाला लागावी,म्हणून खस्ता खातोय आणि त्याची स्वतःची मुलगी शेण खातं एका टवाळखोर मुलाबरोबर बाहेर फिरतेय.एक लक्षात ठेवा,बाबाजी पाटील प्रत्येक गोष्ट सहन करेल, पण आपल्या घराण्याची अब्रू वेशीवर टांगलेली कदापि सहन करणार नाही.माझ्या बापजाद्यानी जीवापाड जपलेली इभ्रत मी अशी धुळीला जाऊ देणार नाही.सांगा तुमच्या दिवटीला."

 असं सुनावून ते पाय आपटत आपल्या खोलीत निघून गेले.

इकडे सईची रडून रडून कोमेजलेल्या फुलासारखी स्थिती झाली होती. मी तिला आपल्या आतमध्ये घेऊन गेले आणि चार समजुतीच्या गोष्टी सांगितल्या. त्यावर त्यावेळी ती काहीच ऐकून घेण्याच्या अथवा बोलण्याच्या स्थितीत नव्हती. मग मी सयाजी येण्याची वाट पाहत होते.

जेव्हा सयाजी घरी आला तेव्हा मी त्याला घडला प्रकार सांगितला.

त्यालाही सईचा प्रचंड राग आला होता कारण त्याने तिला खूपदा समजावूनसुद्धा तिने त्या मुलाबरोबर फिरणं बंद केलं नव्हतं.

सयाजी सगळा राग गिळून तिला पुन्हा समजावत म्हणाला,

"सई, मी तुला कित्येकदा समजावलं. पण तू त्या मुलाबरोबर फिरणं बंद का नाही केलं? आम्ही सगळे तुझ्या हिताचाच विचार करतो गं सई. आजपर्यँत तुझे सगळे लाड पुरवले आई बाबांनी. सगळ्यांनी तुला फुलासारखी जपली, तुला काय आवडतं काय आवडतं नाही त्यानुसार आपल्या आवडीनिवडी आम्ही बदलल्या. ते पुढे जाऊन तू आमचा मानसन्मान पायदळी तुडवावा म्हणून का? अगं आपल्या घराण्याच्या इज्जतीचा तरी विचार कर. जे झालं ते झालं आधी माझ्यापूरती मर्यादित असणारी गोष्ट आता घरापर्यंत आली आहे. सावर स्वतःला आणि आपल्या घरच्या इभ्रतीला."

असं म्हणत सयाजीने तिच्यासमोर हात जोडले.

पण त्याचं म्हणणं न जुमानता सई त्याच मुलाची बाजू मांडू लागली.

"दादा मनोज चांगला मुलगा आहे, तो माझ्याशी कधीच चुकीचं वागला नाही.आमचं प्रेम आहे एकमेकांवर आणि माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे."

सयाजीची तळपायाची आगं मस्तकी गेली, पण बहिणीवर असणाऱ्या मायेपोटी त्याने राग गिळला आणि म्हणाला,

"हे बघ सई, दिवसातील काही तासाची सोबत आणि आयुष्यभराची सोबत यात जमीनअस्मानचा फरक असतो.काही तासात आपण त्या माणसाला पूर्णपणे ओळखू शकत नाही. तो मुलगा चांगला असेलही,पण ही फक्त शक्यता आहे. खात्री नाही. आणखी एक म्हणजे प्रेमाने पोट भरता येत नाही. त्यासाठी नोकरींधंदा करावा लागतो,पैसा कमवावा लागतो. हे वय करियर करण्याचं आहे.आधी शिक्षणाकडे लक्ष द्या, मग पुढे प्रेम करण्यासाठी पूर्ण आयुष्य आहे.तो स्वतःच्या पायावर उभा राहिला तर मी स्वतः तुमचं लग्न लावून देईन.पण सद्या तू त्याच्यापासून दूर रहा."

यावर सई म्हणाली,

"दादा, आम्ही नाही राहू शकत एकमेकांशिवाय.आम्हाला भेटायची बोलायची सवय झाली आहे. मी त्याला असा सोडू शकत नाही. माझ्यावर विश्वास ठेवा मी चुकीचं काहीच होऊ देणार नाही."

इतक्यात बाबाजी पाटील रागाने फणफणत आत आलेत, त्यांनी सईचं बोलणं ऐकलं होतं. त्यांच्या कानाच्या पाळ्या लाल झाल्या होत्या. नाकपुड्या फुगल्या होत्या.कोपऱ्यात पडलेली छडी त्यांनी हाती घेतली आणि ते सईकडे धावले. त्यांनी छडी उगारली आणि सईला मारणार इतक्यात सयाजी मध्ये आला आणि त्यांनं तो घाव आपल्या अंगावर झेलला आणि म्हणाला,

"बाबा, तिला मारू नका. आपली चिमणी आहे ती. आजवर आपण तिला जीवापाड जपलं. तिच्या अंगावर साधा ओरखडा पडू नाही दिला आणि आज आपणच हिला मारायचं? नाही बाबा नाही. तुमचा राग माझ्यावर काढा पण चिमणीला काही करू नका."

उपस्थित सगळ्यांच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं.

बाबाजी पाटील म्हणाले,

"आरं पोरा. तुला काय वाटलं मी हिला मारत होतो का?स्वतःच्या लेकराला मारण्याआधी आईबापाला स्वतः जिवंतपणी मरावं लागतं.आरं हीच वागणं बघून मीच मेलोय.मी हिला काय मारणार रं? आमचे संस्कार कमी पडलेत रं सयाजी. आज एक बाप म्हणून मी कमी पडलो. हरलो मी. जगाच्या पोरांना चांगल्या मार्गाला लावलं. पण स्वतःच्या मुलीबाबत कमी पडलो."

 असं म्हणून बाबाजी रडू लागले.

सयाजी त्यांना बाहेर घेऊन गेला.

त्या रात्री सगळे न जेवताच झोपलो.खरंतर सगळे तळमळत पडले होते झोप कोणालाच नव्हती. पहाटे पहाटे सगळ्यांना जरा डोळा लागला.

आणि सकाळी उठून मी सईच्या खोलीत जाऊन बघते तो काय!ज्याचा कधी विचारही केला नव्हता ते आमच्यासमोर सईने वाढून ठेवलं होतं. मला काहीच सुचेना मी ओरडत बाहेर पळाले आणि बाबाजींना सांगितलं. इतक्यात माझ्या ओरडण्याने सयाजीही धावत आला आणि ते दोघे सईच्या खोलीकडे धावले. "


 

क्रमशः

©®सारंग शहाजीराव चव्हाण.

कोल्हापूर.9975288835.

कथा आवडल्यास लाईक करा,कमेंट करा आणि शेअर करा.

माऊली पर्व एक आणि माझ्या आणखी कथा वाचण्यासाठी माझ्या प्रोफाइलवर जाऊन मला फॉलो करा.????????????????????????धन्यवाद ????????????????????????

🎭 Series Post

View all