मातृत्वाचे दान. भाग -२

कथा मायेच्या ममतेची.


मातृत्वाचे दान.
भाग-दोन.


इकडे राखीला अपराधीपणाची भावना टोचत होती. आपल्यामुळे आई जाऊ शकत नाही याचे वाईट वाटत होते. ती अनाथ असल्यामुळे तिला माहेर तसे नव्हतेच. लग्न झाल्यापासून विभाच तिची आई झाली होती आणि आज अशा अवस्थेत तिला सोडून जायला विभाचे मन धजावत नव्हते.

दहा दिवसांनी रात्री विनयचा फोन आला. रश्मीला त्रास होऊ लागल्याने तिला ऍडमिट केले होते. हे ऐकून विभा रडायलाच लागली.
अजून नववा महिना लागायला काही दिवस बाकी होते नि अचानक काय झाले असेल ही चिंता विभाला छळत होती.

'रश्मी एवढं ये ये म्हणून बोलवत होती आणि मी टाळत राहिले.' या टोचणीने ती घायाळ झाली होती.

"अहो आई, तुम्ही काळजी करू नका. मी आहे ना? मी करेन सगळं मॅनेज. तुम्हाला सांगायला म्हणून तेवढा फोन केला." स्वतःच्या भावनांना आवर घालत विनय म्हणाला.
इकडे रात्रभर विभाच्या डोळ्याला डोळा लागत नव्हता. 'रश्मी ठीक असेल ना?' हाच विचार मनात येत होता.

"आई." सकाळी सुजितच्या म्हणजे तिच्या मुलाच्या हाकेने विभा जागी झाली.

"अगं, लवकर तयार हो. तुला रश्मीकडे जायचे आहे ना? रात्रभर तिच्याच विचारत होतीस म्हणून मी सकाळच्या पहिल्या फ्लाईटचे बुकिंग केलेय." तिच्याकडे बघून तो म्हणाला.

"अरे पण राखी?" तिच्या मनातला प्रश्न सुजितने लगेच ओळखला.

"अगं तिची काळजी करू नकोस. तिनेच हे बुकिंग करायला लावले. आणि मी आहे ना? मी घेईन तिची काळजी. तू निसंकोच जा." सुजित तिला म्हणाला.

"राखी, काळजी घे. उगाच उठू वगैरे नकोस. रश्मीला गरज आहे म्हणून मी जातेय पण तुझ्यात जीव अडकतोय आणि इथे थांबले तर रश्मीसाठी तीळतीळ तुटतो." डोळ्यातील पाणी पुसून ती म्हणाली.

"आई, आता सध्या रश्मी आपल्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही जा. सुजित आहे ना इथे. तसेही उद्या चेकअपला जायचे आहे, मी फोनवर सगळं कळवेन तुम्हाला." विभाचा हात हातात घेऊन राखी बोलत होती.


विमानात बसल्या बसल्या विभाने देवाला हात जोडले. 'सगळे नीट होऊ दे रे बाबा.' ती मनातच म्हणाली.

दोन तासांनी विभा रश्मी ऍडमिट असलेल्या हॉस्पिटलमध्ये पोहचली.

"आई, तुम्ही?" तिला अचानक बघून विनयचे डोळे भरून आले.

"होय हो. राहवलं नाही म्हणून पहिल्या फ्लाईटने निघून आले. रश्मी कुठे आहे? कशी आहे?" ती विचारत होती.

आयसीयूच्या बाहेरील काचेतून विनयने तीला रश्मी दाखवली. आत सिस्टर तिला मॉनिट करत होती. अचानक डॉक्टर तिथे आले आणि त्यांनी रश्मीला चेक करून विनायला त्यांच्या केबिनमध्ये बोलावले.

"मिस्टर विनय, अचानक वाढलेली बीपी आणि ब्लड लॉस यामुळे आपण आणखी जास्त वेळ रिस्क घेऊ शकत नाही. बाळ आणि आई दोघांनाही ते धोक्यात टाकण्यासारखे आहे. आपल्याला लगेच ऑपरेशनची तयारी करावी लागेल."डॉक्टर त्याला वास्तविकता सांगत होत्या.

"डॉक्टर, बाळ इतक्या लवकर बाहेर येणं सेफ असेल का?" त्याने आपले अश्रू पुसत विचारले.

"खरं तर ते आता आतही सुरक्षित नाहीये. बाळाचे ठोके मंदावलेत. देअर इज नीड टू हरी. नर्स रश्मीला ओटी मध्ये शिफ्ट करत आहेत तुम्ही तेवढी पेपरवर सही करून घ्या." डॉक्टर ऑपरेशन थीएटर मध्ये जायला उठल्या.

बाहेर येऊन त्याने थरथरत्या हाताने पेपरवर सही केली. ओटीत जाणाऱ्या रश्मीच्या चेहऱ्यावरून हात फिरवला आणि ती आत गेल्यावर विभाच्या गळ्यात पडून रडू लागला.

"नेमके काय झालेय जावईबापू? मला कळेल का?" त्याला तसे रडताना बघून विभा कासावीस झाली होती.

"रात्री टॉयलेटला जाताना रश्मी अचानक घेरी येऊन पडली, त्यातच तिला रक्तस्त्राव सुरू झाला. आम्ही लगेच हॉस्पिटलला आलो. डॉक्टरांनी तपासणी केल्यावर कळले की बीपी खूप जास्ती वाढली आहे. त्यात सुरू असलेले ब्लिडींग. डॉक्टरांनी तिला नॉर्मल करण्याचा प्रयत्न केला पण.."

"पण काय?"

"पण ते शक्य झाले नाही. बीपी अजूनही वाढूनच आहे आणि ब्लिडींग झाल्यामुळे बाळाचे श्वास कमी होत आहेत. म्हणून डॉक्टरांनी आता लगेच ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतलाय." तो लहान मुलासारखा रडत होता.
"तुम्ही स्वतःला सांभाळा. ठीक होईल सगळं." विभा त्याला धीर देत होती, पण आतून तीही खचली होती.
:
क्रमशः
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)

विभा म्हणते तसे सगळे नीट होईल का? वाचा पुढच्या भागात.
"*******

🎭 Series Post

View all