मातृत्वाचे दान. भाग -एक.

कथा मायेच्या ममतेची.

मातृत्वाचे दान. भाग -एक.


"आई ग, आठवा महिना सुरू झालाय. तू केव्हा येणार आहेस?" रश्मी विभाची मुलगी तिला फोनवर विचारत होती.

"अगं आत्ता कुठे आठवा महिना लागलाय ना? नववा महिना सुरू झाल्याबरोबर दारात पाय ठेवते की नाही बघ." विभा हसून म्हणाली.

"काय गं आई, मला वाटलं होतं मागच्या महिन्यात आली तेव्हाच माझ्याकडे थांबशील पण तू निघून गेलीस आणि आता म्हणतेस की पुढच्या महिन्यात येईन."
रश्मी जरा खट्टू झाली होती.

"रश्मी, तुला घरातील परिस्थिती माहितीये ना? म्हणून काही दिवस थांबतेय. पुढल्या महिन्यात तुझ्या फोन आधीच मी येते बघ हं." विभा तिला समजावत म्हणाली. थोड्यावेळ गप्पा झाल्यावर मग रश्मीने फोन ठेवला.

"काय झालं आई? रश्मी बोलवत होती ना? अहो, मग जायचं ना. रश्मीची पहिलीच वेळ आहे, तिला तुम्ही जवळ असणं अपेक्षित असेलच ना?" गोळी घ्यायला उठलेली राखी म्हणजे विभाची सून तिला म्हणाली.

"हो. पण सध्या तुझ्याजवळ असणं जास्त गरजेचे आहे. तू नको लक्ष देऊ." तिला हसून पाणी देत विभा बोलली.

खरंतर विभाची कोंडी झाली होती. रश्मी तिची लाडकी लेक. लग्नाच्या चार महिन्यातच प्रेग्नन्ट राहिली. ती थोडीशी अल्लड, त्यात इतक्या लांब. सासर माहेर दोन्ही दूर. घरात नवराबायको दोघेच. विनय तिची काळजी घ्यायचा. घरात कामाला बाई होती. तिला कसला त्रास नव्हताच तसा. सासरी कोणी बाईमाणूस नसल्यामुळे आई सातव्या महिन्यापासून इकडे येणार हे रश्मीने गृहीत धरले होते. तसे विभाने तिला बाळंतपणासाठी माहेरी ये म्हणून कित्येकदा गळ घातली होती पण विनायशिवाय राहण्याच्या कल्पनेनेच रश्मीने नकार दिला.

"इकडे सगळं होईल गं मॅनेज. तू तेवढी ये." रश्मीच्या हट्टापुढे विभा नाही म्हणू शकली नाही.

सातव्या महिन्याचा कार्यक्रम देखील रश्मी राहते त्याच ठिकाणी करण्याचा तिने घाट घातला. विभा कुटुंबासोबत रश्मीकडे आली होती. कार्यक्रम आनंदाने पार पडला.

रात्री आवराआवर करताना अचानक राखीला गरगरल्यासारखे झाले. दुसऱ्या दिवशीही तसेच त्यात भर म्हणून मळमळ देखील सुरू झाली म्हणून मग तिथल्याच दवाखान्यात गेल्यावर तिच्याकडे गुड न्यूज असल्याचे कळले. सगळ्यांच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. कारण राखी आणि सुजितच्या लग्नाला चार वर्ष उलटून गेली तरी घरात पाळणा हलला नव्हता आणि या वेळी अगदी अनपेक्षित पणे हे घडले होते.

"अभिनंदन वहिनी." रश्मीने राखीला मिठी मारली तशी राखीच्या डोळ्यातून आनंदाश्रू बाहेर आले.

इतक्या वर्षांनी सून गरोदर राहिली त्यामुळे विभा खूप आनंदी होती. आता राखीला जास्त दगदग नको म्हणून काही दिवस राखीसोबत घरी थांबून नंतर रश्मीकडे जाण्याचा विभाचा विचार होता पण सगळे कुठे आपल्याला वाटते तसे घडते?

एक आठवडा सुखरूप गेल्यावर राखीला अचानक ब्लिडींग सुरू झाली. डॉक्टरांनी तिला तीन महिने सक्तीची विश्रांती घ्यायला सांगितली. अगदीच टॉयलेटला वगैरे जायचं असेल तर पाय खाली टेकवायचा. त्याव्यतिरिक कुठलीही हालचाल करायला मनाई केली होती.

तिची ही अवस्था म्हणून मग विभाचे रश्मीकडे जाणे परत लांबले. आज तिचा फोन आला तेव्हा नववा महिना लागताक्षणी दारात हजर असेन असे त्यांनी तिला सांगितले.

इकडे राखीला अपराधीपणाची भावना टोचत होती. आपल्यामुळे आई जाऊ शकत नाही याचे वाईट वाटत होते. ती अनाथ असल्यामुळे तिला माहेर तसे नव्हतेच. लग्न झाल्यापासून विभाच तिची आई झाली होती आणि आज अशा अवस्थेत तिला सोडून जायला विभाचे मन धजावत नव्हते.

दहा दिवसांनी रात्री विनयचा फोन आला. रश्मीला त्रास होऊ लागल्याने तिला ऍडमिट केले होते. हे ऐकून विभा रडायलाच लागली.

काय झाले असेल रश्मीला? वाचा पुढील भागात.

:
क्रमश :
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)


🎭 Series Post

View all