मातृदिन विशेष आईस पत्र

Letter for mother on mothers day

प्रिय आई,

"आई आहे तर सर्व काही आहे

आई नाही तर काहीच नाही

आई विना घराला घरपण नाही "

                   पत्रास कारण की आज मातृदिन आहे.दरवर्षी मातृदिन हा येतोच पण या वर्षीचा मातृदिन माझ्यासाठी खास आहे कारण आज मला तुझ्या असण्याचे जास्त महत्त्व पटले आहे. आजपर्यंतच्या आयुष्यात आई मी तुला प्रत्येक वेळी गृहीत धरले. 

                 तु माझ्या प्रत्येक लढाईत माझी साथ दिलीस, सर्व संकटात माझ्या सोबत राहिलीस. आज मला जे आयुष्य भेटले ते तुझ्यामुळेच. आज मी जी कोणी आहे याचे सर्व श्रेय तुला आहे.

                 लहानपणापासून मी तुला कधीही आजारी पडलेले बघितले नव्हते पण काही दिवसांपूर्वी तु आजारी पडलीस, तुला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावे लागले त्यावेळी मात्र मी पूर्ण खचून गेले होते. हॉस्पिटलमध्ये जाऊन तिथे रहायची तुझी ही काही पहिली वेळ नव्हे पण इतर वेळेस बेडवर पप्पा असायचे व बेडच्या बाजूला तु असायचीस. गेल्या दहा वर्षापासून तु पप्पांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जायची व सही सलामत घरी परत घेऊन यायची. आम्हाला त्याबद्दल कधी काळजी करायची गरज पडली नाही कारण हॉस्पिटलमध्ये तुला होणारा त्रास,तुझी होणारी धावपळ तु आम्हाला जाणवू दिली नाहीस. तु हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्यावर हे सर्व आम्हाला कळाले.

                  तु हॉस्पिटलमध्ये असताना घराची सर्व जबाबदारी सांभाळताना प्रत्येक वेळी तुझी आठवण यायची, तु हे सर्व कसं निभावत असशील याचे आश्चर्य वाटायचे, आजपर्यंत घरातील बरीचशी कामे मी करायची टाळली कारण मला ती आवडायची नाही किंवा मला कंटाळा यायचा, तु मात्र न कंटाळा करता सर्व कामे कुठलीही तक्रार न करता करत राहिली. 

                  आजपर्यंत तु स्वतःच्या तब्येतीची काळजी न घेता घरातील सर्वांची काळजी घेत आलीस पण आता इथून पुढे तु तुझी काळजी घ्यायची आहे. तुला पुन्हा हॉस्पिटलमध्ये बघायची इच्छा नाहीये. कृपया आजारी पडू नकोस मला ते सहन होत नाही. 

                 माझ्यावर केलेल्या संस्कारांसाठी आणि तु दिलेल्या आयुष्यासाठी मी तुझी कायम ऋणी असेल. Thank you so much for everything aai.

©®Dr Supriya Dighe