आईस पत्र..
आई, आज पहिल्यांदा असं होतंय बघ. कसं व्यक्त होऊ ग! कसं लिहू? काय लिहू? कळत नाहीये बघ. शब्द गोठलेत जणू. तुझ्याविषयी लिहावं इतकी मोठी नाही ग झाले आणि हा विषयही इतका सहज सोप्पा नाहीच मुळी. पण आज ठरवलंय मी. माझ्या मनातलं तुला सगळं सांगायचं. पण समोर येऊन सांगणं फार कठीण झालं असत, मग डोळ्यातलं आभाळ रीत होऊ लागलं असतं. म्हणूंनच हा शब्दप्रपंच????????
"आई" नुसता शब्द उच्चारला तरी गलबलून येत ग. डोळे भरून येतात. आई, आज कळतोय ग मला पुसटसा अर्थ तुझ्या वेदेनेचा. तू नेहमी म्हणायचीस
“मनू तू जेव्हा आई होशील ना, तेंव्हाच तुला कळेल आई काय असते?”
आताशिक कळू लागलंय बघ. तुझ्यापासून दूर राहताना. तुझ्या वेदनेची जाणीव आता होऊ लागलीय बघ. प्रत्येक क्षणी तुझी आठवण. मला भूतकाळात घेऊन जाते. तो भूतकाळ किती वेदनादायी होता. तरीही त्या दुःखातही तुझ्या प्रेमाची शिंपण, त्यातला गारवा अजूनही तसाच आहे बघ. आई तुला सांगू, तुझा मायेचा स्पर्श, त्या स्पर्शातली ऊब जाणवते ग.
आठवतं मला तो दिवस. माझ्या येण्याची चाहूल तुला लागली तेंव्हा किती हरकून गेली होतीस तू. अगदी तुझ्या गर्भातही मला ती आनंदून गेलेली तुझ्यातली आईपणाची भावना. मला स्पर्शून गेली बघ. माझा जन्म झाला आणि मला पाहून तुझ्या डोळ्यात आलेलं पाणी. तुझा मला पाहून फुटलेला पान्हा. माझ्या पेक्षा तुलाच घाई होती ना ग आई, ते अमृत देण्याची. तुझं मोहरून जाणं, मी रडताना कासावीस होणं माझ्या हसण्यात तुझं हास्य सामावून जाणं मी अनुभवलय ग.
आठवतंय मला, माझं संगोपन करताना माझ्याबरोबर लहान झालेली तू. तुझं बोट धरून टाकलेलं पहिलं पाऊल. 'आई' म्हणून उच्चारलेला पहिला शब्द. बोबड्या माझ्या बोलीतही किती आनंद मिळायचा तुला. दिवेलागणीच्या वेळीस आजही देव्हाऱ्यात देवापुढे दीप लावते ना आई, तू शिकवलेली 'शुभं करोती' आजही आठवते ग. आपसूकच ओठांवर येते. तू शिकवलेले मनाचे श्लोक, देव-देवींच्या आरत्या, आजही तोंडपाठ. तू संस्कारमुर्ती. माझं दैवत.
आठवतो मला आई, माझा शाळेचा पाहिला दिवस. किती उत्साहित झाली होतीस. किती रडले होते मी. पहिल्यांदा तुझा मला खूप राग आला होता बघ. अशी कशी मला सोडून जात होतीस तू? एका अनोळखी ठिकाणी, अनोळखी लोकांच्या हाती सुपूर्द करून खुशाल निघून जात होतीस. पण आई ग.आज आठवतं मला. तुझं मागे वळून पाहणं. डोळ्यांच्या ओल्या झालेल्या कडा. तुझाही जीव कातर झाला होता ना? आपल्या काळजाच्या तुकड्याला असं त्रयस्थ व्यक्तीच्या हाती स्वाधीन करताना जीव पिळवटून निघाला होता ना? आज ते कळतंय मला. त्या दिवशी शाळा सुटेपर्यंत तू शाळेच्या गेट बाहेरच थांबली होतीस ग आई. तुला तिथे गेटवर पाहून किती आनंद झाला होता सांगू! मग नंतर नाही रडले कधी. नेहमी वाटायचं तू आहेस ना बाहेर मग भीती नाही वाटायची.
तू सकाळी सर्वांच्या आधी लवकर उठून सगळ्यांसाठी नास्ता, बाबांची ऑफिसची तयारी मग दादाची, माझी शाळेची तयारी. माझी आंघोळ, मला तुझ्या हातानी भरवणं. शाळेतला मधल्या सुट्टीतला खाऊचा डबा. अगदी वह्या पुस्तकांना कव्हर लावून देण्यापासून, तुझ्या सुंदर हस्ताक्षरात वह्यां-पुस्तकांवर नावं टाकण्यापासून, पालकसभा, अगदी परिक्षेच्या वेळीस अभ्यास घेण्यापर्यंत. सगळं सगळं मनापासून करायचीस. सर्वांच्या आधी उठून सगळी घरातली कामे आटोपून सगळ्यांच्या नंतर झोपी जायचीस. ते आठवलं की नवल वाटतं ग तू दमायची कशी नाहीस? मी एकदा विचारलं होत तुला
“आई, रोज त्याच त्याच कामाचा तुला कंटाळा कसा येत नाही? तूला थकवा कसा येत नाही?”
तू हसून म्हणायचीस
“तुमच्याकडे पाहिलं न बाळांनो सगळा क्षीण निघून जातो ग!नवीन ऊर्जा मिळते ग!”
किती निस्वार्थ प्रेम ग आई तुझं.
तुझ्या संस्कारात घडत होते. तूच दाखवलेल्या मार्गावर चालत होते. चुकत होते शिकत होते. आई तुझ्याशिवाय कधीच एक पानही हलायचं नाही माझं. आठवतो तो दिवस. ऋतुचक्राचा कौल. किती घाबरले होते मी. पण तू मला अलगद जवळ घेतलंस. सगळं प्रेमाने समजावून सांगितलंस आणि त्या दिवसापासून माझ्यात अचानक खूप बदल झाला. समाजाचं भान आलं जणू. मी तेंव्हाही तुझाच हात घट्ट धरून होते. आई तू हवी असायची मला. प्रत्येक क्षणी. दहावीच्या निकाल होता तेंव्हा किती काळजीत होतीस तू. चांगल्या मार्कानी पास झाले किती आनंदून गेली होतीस ना? सगळ्यांनी केलेल्या माझ्या कौतुकाने किती भारावून गेले होतीस. माझ्या अभिमानाने जणू तुझा ऊर फुलून आला होता.
आई, माझ्या प्रत्येक सुखदुःखाची तूच ग साक्षीदार. माझ्या आवडीनिवडी, कपड्यांची निवड, माझे छंद सगळं तुला माहीत असायचं. कॉलेजच्या प्रवेशप्रक्रिया असो, कॉलेजची निवड असो वा करियर असो. तूच होतीस ग आई. कॉलेजचे ते सोनेरी दिवस. झोपळ्यावाचून झुलण्याचे दिवस. फुलपाखरांचे भिरभिरण्याचे दिवस. किती छान होते नाही का ग आई? तूच तर होतीस माझी जिवाभावाची मैत्रीण. मनातलं सगळं सांगता येण्यासारखी, ऐकून घेणारी, माया करणारी, चुकलं तर थोडं रागावणारी माझी सखी. माझं विश्व होतीस तू.
आई तू नेहमी म्हणायचीस,
“मनू, मुलीच्या जातीला भाकरी करता आलीच पाहिजे बघ. कितीही शिकलीस तरी. अन्नपूर्णा तुझ्यात वसलीच पाहिजे.”
आई, तू मला शिकवलंस ग जमिनीवर राहायला. कितीही उंच भरारी घेतली तरी. आठवतं मला. तुला गाणं गायला फार आवडायचं शिकलीही होतीस थोडीफार. पण आमच्या संगोपणात काही गैरसोय नको म्हणून आपले छंदही मागे सोडून दिलंस ना? सगळ्यांना खूश ठेवण्याच्या नादात तू तुझा आनंद विसरून गेलीस ग.
मग तो आला. स्वप्नातला राजकुमार. लग्नाच्या रेशीमबंधात गुंफण्यासाठी. मला घेऊन जायला. आई मला तुला सोडून जायचंच नव्हतं ग कधी. किती रडले होते ग. पण मग तूच समजावलंस मला म्हणालीस,
“मनू सगळ्यां सोनपऱ्याना एक ना एक दिवस जावंच लागतं ग सासरी. मीही आले होते ग तुझ्या माई आजोबांना सोडून.आता तेच तुझं घर तीच तुझी माणसं. सासू सासरे आता तुझे आईबाबा आणि दिर, नणंद आता भाऊबहीण. सासरी गेल्यावर उंबरठ्याचं भान असावं. स्त्रीचा पदर ढळू देऊ नये कधीच.”
मी हसून म्हणाले होते.
“काय ग आई, जीन्सवर कुठला पदर?”
आठवतं तुला तू काय म्हणाली होतीस.,
“मनू, पदर विचारांचा, पदर संस्कारांचा, पदर संयमाचा, पदर चांगल्या वर्तणुकीचा, पदर मर्यादेचा.”
तेंव्हा नीटसं कळालं नव्हतं आता थोडं थोडं उमजू लागलंय. तू म्हणाली होतीस,
“तुळशीमाई दारात सदैव नांदायला हवी बरं! सायंकाळी तुळशीसमोर दिवा लावला गेला पाहिजे. सासरच्या माणसांची मनं जिंकता यायला हवी. लक्षात ठेव तुझ्या रूपाने तुझी आईच तिथे नांदते आहे. आईला बोल लागणार नाही असंच वाग ग. म्हणून निमुटपणे सगळं सोसत राहायचं असं मुळीच नाही बरं, कधीच अन्याय सहन करू नकोस. मी कायम तुझ्या पाठीशी उभी आहे हे विसरू नकोस बाळ”
किती धीर आला होता सांगू!
तू म्हणजे आई नावाचं मोकळं आभाळ. तू म्हणजे देव्हाऱ्यासमोरच्या नंदादीपाचा सात्त्विक प्रकाश. तू म्हणजे वात्सलसिंधु आई. तू म्हणजे घरातलं चैतन्य. तू माझ्यासाठी संस्काराचं विद्यापीठ. तू माझं विश्व.
तुझ्या उपकाराची उतराई कदापीही होता येणार नाही मला. सगळंच शब्दात मांडता येत नाहीये. डोळ्यातून पाणी झरत राहतं ग.भावना अनावर होतात. आई जन्मोजन्मी मला तुझ्याच पोटी तुझीच लेक बनून राहायचं ग. प्रत्येक जन्मात मला तूच माझी आई म्हणून हवी आहेस ग!
सांगू तुला आई., आता मला तुला आंनदी ठेवायचंय. सगळं केलंस तू माझ्यासाठी. आता मला करायचं आहे. मी तुझ्याइतकी चांगली आई होऊ शकेन की नाही माहीत नाही ग! पण मला तुला जपायचं, तुला सांभाळायचं आहे. तुझी आई होऊन.
हो आई मला आता तुझी आई व्हायचंय. जमेल ना ग मला आई. ऐकशील ना इतकंच माझं.
लव्ह यू सो मच आई, इतकंच सांगायचं तुला.
©निशा थोरे..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा