Login

आख्खा मसूर Recipe in Marathi

पौष्टिक आणि स्वादिष्ट अशी आख्खा मसूर रेसिपी नक्की करून आणि खाऊन बघा


आख्खा मसूर रेसिपीज

     


  आख्खा मसूर किंवा मसुराची डाळ खाण्याचे खुप फायदे आहेत . कारण त्यात खुप पौष्टिक तत्व आहेत तसेच त्यामध्ये कॅलरी कमी आणि प्रोटीनची मात्रा अधिक आहे त्यामुळे आपल्या स्वास्थ्यसाठी आणि वजनासाठी चांगले आहे . यात फायबर आणि प्रोटीन असल्यामुळे भुक लगेच शांत होऊन पोट भरते .

यामधील फायबर रक्तातील साखर कमी करण्याचे काम करते त्यामुळे शुगर लेवल नियंत्रित राहते . पचनाच्या समस्या दुर होतात . यात वेगवेगळे मिनरल्स असतात त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते . तसेच यात असणारे पॉलीफेनॉल्स कॅंसर होण्यापासून बचाव करतात .

तसेच यात कॅल्शियम , फॉस्फरस , मॅग्नेशियम असतात . ते आपले दात आणि हाड मजबूत करतात .
मसुर डाळीत व्हिटामिन बी आणि सी असतात जे आपल्या केसांना देखील चांगले असते .
तर असे बरेच फायदे आहेत आख्खा मसूर किंवा मसुर डाळ खाण्याचे त्यामुळे आहारात याचा समावेश नक्की करा .

काही सोप्या रेसिपीज आहेत ज्या तुमच्यासाठी मी घेऊन आले


मसूर पुलाव

साहित्य : दोन वाट्या बासमती तांदूळ किंवा जो घरात वापरत असाल तो, एक वाटी आख्खे मसूर, दोन मोठे कांदे बारीक चिरलेले, एक मोठा टोमॅटो मध्यम आकारात चिरलेला, एक बटाटा मध्यम आकारात चिरलेला, दोन हिरव्या मिरच्या, दहा बारा लसूण पाकळ्या, आलं एक इंच, चार ते पाच लवंग मिरे, दोन तीन तमालपत्र, एक हिरवी वेलची, हळद, दोन चमचे लाल मिरची पावडर, एक चमचा गरम मसाला, एक चमचा धने जीरे पावडर (हि नसेल तरी चालेल) दोन चार चमचे साजूक तुप, तेल, चवीनुसार मीठ.

सगळ्यात पहिल्यांदा मसूर गरम पाण्यात एक दोन तास किंवा किमान अर्धा तास तरी भिजत ठेवावे म्हणजे ते मऊसर शिजतात. किंवा मग मोड आलेले मसूर घेतले तरी चालेल.

कृती : सर्वप्रथम तांदूळ स्वच्छ धूवून भिजत ठेवावे. एका बाजूला गॅसवर पाणी गरम करायला ठेवणे. नंतर कुकरमध्ये तेल घालून त्यात सर्व खडे मसाले परतवल्यावर जीरे मोहरी कांदा आणि हिरव्या मिरचीला थोडी चीर देउन त्यात घालावी. कांदा छान गुलाबीसर परतल्यावर त्यात टोमॅटो घालून मऊ शिजवून घ्यायचा. नंतर त्यात आलं लसूण पेस्ट घालून सगळे मिरचे मसाले घालावे आणि छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे. बिर्याणी मसाला असेल तर घालायचा किंवा मग घरातला गरम मसाला चमचाभर घालायचा.

आता त्यात भिजवलेला आख्खा मसूर घालून परतवणे मग थोडा वेळानंतर त्यात तांदूळ घालावे आणि पुन्हा छान परतवून घेणे तसेच त्यात साजुक तुप देखील आत्ताच घालायचे. तुपात छान भाजल्या जाते आणि चवही वाढते.

आता त्यात तांदळाला लागेल तेव्हढे गरम पाणी घालून घेणे आणि चवीनुसार मीठ घालून एकत्र करून कुकरचे झाकण लावून देणे. दोन ते तीन शिट्ट्यांमध्ये आपला मसूर पुलाव छान शिजून तयार होतो. कुकरची वाफ गेल्यानंतर झाकण उघडून त्यात वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरमागरम खायला घ्यावे. यासोबत मस्त दह्यातील कोशिंबीर, पापड आणि लोणचे खायला छान लागते.


आख्खा मसूराची आमटी

साहित्य : एक वाटी आख्खा मसूर , एक मोठा कांदा बारीक चिरलेला , टोमॅटो एक , आले बारीक चिरलेले , हळद , लाल मिरची पावडर , धने जीरे पावडर , गरम मसाला किंवा घरचा मसाला , बारीक चिरलेली कोथिंबीर , तेल , चवीनुसार मीठ .

कृती : सगळ्यात पहिले मसूर स्वच्छ धुवून घ्यावा . आता कुकरमध्ये तेल घालून त्यात मोहरी जीरे तडतडल्यानंतर कांदा परतवणे, कांदा छान गुलाबीसर झाल्यावर त्यात टोमॅटो घालून शिजवून घेणे आता त्यात बारीक चिरलेले आले घालणे . तसेच त्यात हळद लाल मिरची आणि बाकीचे मसाले घालून परतवणे. आता त्यात धुतलेले मसूर घालून परतवणे. चवीनुसार मीठ घालून एक दोन ग्लास गरम पाणी घालून कुकरला दोन तीन शिट्ट्यात मसूर शिजवून घ्यावे. कुकर थंड झाल्यावर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणे . छान घट्टसर आख्खा मसूराची आमटी तयार आहे.
ही आमटी तुम्ही चपाती, भाकरी किंवा भातावर घालून तर अप्रतिम लागते.

अशीच सेम कृती तुम्ही मसूराच्या लाल डाळीची आमटी देखील बनवू शकता .

आख्खा मसूराची मसाला आमटी

साहित्य : दोन कांदे , दोन चार खोबऱ्याचे तुकडे , आलं लसून पेस्ट एक चमचाभर , तीळ जीरे एक चमचा , हळद , लाल मिरची पावडर , गरम मसाला ,  कोथिंबिर बारीक चिरलेली , मीठ चवीनुसार , तेल .

कृती : कांदा खोबरे आणि तीळ जीरे थोडेसे भाजून घेणे . आता मिक्सरमध्ये कांदा खोबरे आल लसूण जीरे तीळ कोथिंबीर हे सर्व बारीक वाटून घेणे . मसाला तयार झाल्यावर एका कुकरमध्ये तेल घालून हा मसाला परतवून घेणे छान तेल सुटेपर्यंत . आता त्यात हळद हिंग लाल मिरची घालून पुन्हा सगळे थोडा वेळ परतवणे आणि नंतर धुतलेले आख्खा मसूर आणि मीठ घालून एकत्र करुन घेणे . त्यात दोन ते तीन ग्लास गरम पाणी घालून कुकरचे झाकण लावून दोन तीन शिट्ट्या होऊ द्यायच्या म्हणजे छान शिजेल . कुकर थंड झाल्यावर त्यात थोडी बारीक चिरलेला कोथिंबीर घालून आपली आख्खा मसुराची मसाला आमटी तयार आहे.


भाजीला घरात काही नसले तर तुम्ही ही रेसिपी करून आणि खाऊन बघा, नक्कीच तुम्हांला आवडेल.


चला तर मग वाट कसली बघताय, नक्की तुम्ही पण करून बघा ही रेसिपी, चवीला खूप छान आणि पौष्टिक आहे.


किचन तुमचे आणि रेसिपी माझी.

रेसिपी आवडल्यास लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका.
खात रहा आणि अशाच स्वादिष्ट रेसिपी साठी मला वाचत रहा.