मस्करीची कुस्करी

Bullying


मध्यंतरी एक व्हिडिओ बघण्यात आला. एका तरुण मुलाचा वाढदिवस आहे अन् तो मित्रांसोबत साजरा करण्यासाठी बाहेर आलाय.... सोबतचे मित्र त्याला केक फासतात... पोटात गुद्दे मारतात आणि तो मुलगा बेशुद्ध होतो... आणि कदाचित मरतोही...

हा व्हिडिओ खरा नसून जनजागृतीसाठी बनविण्यात आला आहे असं आता जाहीर झालं असलं तरी थट्टा-मस्करी ही एका मर्यादेपर्यंतच ठीक असते. तिचा अतिरेक झाल्यास बिकट प्रसंग निर्माण होतात.

आता हेच पहा ना...नीरजनं त्याच्या सोळाव्या वाढदिवसानिमित्त अगदी हट्टानं मित्रांना घरी बोलावलं.पावभाजीचा बेत ठरवला. नीरजचे बाबा एका खाजगी कंपनीत कामाला आहेत. पण मुलाची हौस आणि हट्ट म्हणून त्यांनी त्याला वाढदिवसाला चांगला महागातला अडीच हजाराचा शर्ट घेतला आणि ताईने तिच्या खाऊच्या पैश्यातून मोठ्ठा केक आणला. त्यांच्या घरी आजपर्यंत वाढदिवस साजरा करायची पद्धत नाही त्यामुळे केकचं अप्रूप अगदी आजीपासून सगळ्यांनाच होतं आणि नीरजला सुद्धा! केक खाण्यासाठी सगळे आतूर झालेत!

ठरल्यावेळी नीरजचे पाच- सहा मित्र आले... औक्षण झालं... केक कापला अन् काय होतंय हे कळायच्या आत केकचा मोठ्ठा तुकडा उचलून नीरजच्या तोंडाला आणि शर्टाला फासला... आणि मग केकची अक्षरशः फेकाफेकी करत मित्रांचा धिंगाणा सुरु झाला.



आज्जी बिचारी अरे -अरेच करत राहिली...केकची नासाडी तर झालीच पण स्वतःच्या खाऊच्या पैश्यातून हौसेने केक आणणाऱ्या ताईचं तोंड एव्हढसं झालं...केकच्या क्रीमने चिकट झालेला इतका महागाचा शर्ट आणि केक पायदळी तुडवल्या गेल्याने चिखल झालेली फरशी कशी स्वच्छ करावी ह्या कल्पनेने आईच्या डोळयांत अश्रू तरळले तर कष्टाने कमावलेल्या पैश्याची माती झालेली बघून बाबा हवालदिल झाले.

मित्रांच्या मस्करीची एक कृती सगळ्यांना दुःख देऊन आणि वाढदिवसाचा आनंद हिरावून गेली.

**********************

शुभांगीचं लग्न झालं... वरात सासरी आली... शेखर आणि शुभांगी मित्रमंडळींच्या अन् भावंडांच्या गराड्यात रमली.

इतक्यात कुणाला तरी नवरा- नवरीची थट्टा करण्याची लहर आली अन् त्यानं सगळ्यांसमोर शेखरच्या गर्लफ्रेंडबद्दल आणि अफेयरबद्दल शुभांगीला अगदी नावानिशी सांगितलं....

शेखरनं हे सगळं खोटं आहे असं सांगण्याचा क्षीण प्रयत्न केला पण मित्र आणि भावंडांनी शेखरचं काही चालू दिलं नाही.

सुखी संसाराचं स्वप्न पाहणाऱ्या नववधू शुभांगीला मात्र हे सगळं खरंच वाटलं अन् तिच्या मनात संशयाचं बीज रोवल्या गेलं.

प्रकरणाचं गांभीर्य लक्षात येताच काही महिन्यांनी शेखरनं आपल्या "त्या" भावाशी बोलून शुभांगीसमोर सत्य सांगायला लावलं... पण आपण फसवल्या गेलोय ह्याचा तिला जो धक्का बसला की आता हे "नवीन" सत्य स्वीकारायची तिची मानसिकता राहिलेली नाही.

ज्या मुलीचं नांव ह्यात गंमत म्हणून गोवलं तिच्याविषयी शुभांगीचं मन आजही कलुषित आहे.

आज लग्नाला 26 वर्षं झालीत तरी ही "मस्करीची कुस्करी" त्यांचा वरवर सुखी दिसणारा संसार पोखरते आहे.

**********************

स्नेहलच्या पुतण्याचं लग्न ठरलंय. आज कुळ-कुळाचार आणि नवरदेवाला हळद लावण्याचा कार्यक्रम आहे.

नवरदेवाला हळद लावताना कुणीतरी धुळवडीचे रंग आणले आणि एकमेकांना हळद आणि रंग लावणं... एकमेकांच्या अंगावर पाणी फेकणं सुरु झालं...

आमची स्नेहल म्हणजे नवरदेवाची सगळ्यात धाकटी काकू!  नवीन पिढीशी अगदी कनेक्टेड...अर्थातच उत्साही मंडळी स्नेहल काकूला रंग लावायला पुढे सरसावली...



इतक्यात कुणीतरी बादलीभर पाणी स्नेहलच्या अंगावर टाकलं. स्नेहल नखशिखान्त शहारली.... आधीच डिसेंबर महिना, थंडगार पाणी त्यात स्नेहल अस्थमा रुग्ण...

स्नेहलची मोठी जाऊ लगेच कोरडी साडी घेऊन तिच्याकडे धावली आणि नणंद मुलांना आवरायला... पण मुलं ऐकेनाच.... कुणालाच जुमानेनात... हल्ला गुल्ला करत अगदी आग्रहानं आणखी दोन बादल्या थंड पाणी स्नेहलच्या अंगावर ओतलंच.

परिणामी ऐन लग्नाच्या दिवशी मुलांच्या ह्या लाडक्या काकूला दवाखान्यात भरती करायला लागलं.

मुलांच्या मस्करीपायी आज काकू जीवालाच मुकली असती!

**********************

अनन्याचं लग्न राघवशी ठरलं. दोन्हीकडून लग्नाची जय्यत तयारी झाली. आदले दिवशी सीमंत पूजन आणि दुसरे दिवशी लग्न... वरधावा झाला, मंगळष्टकं झाली... गुरुजींनी वधूवरांना एकमेकांच्या गळ्यात हार घालण्याची सूचना केली.

अनन्या राघवच्या गळ्यात हार घालणार तोच राघवच्या मित्रांनी त्याला वर उचललं. हे पाहून अनन्याचा चुलत भाऊ गौतम आणि त्याचे मित्र पुढे सरसावले. त्यांनी देखील अनन्याला ती नको-नको म्हणत असताना उचलून घेतलं.

एकमेकांना उंच करण्याची चुरस वाढतच चालली... कुणीही माघार घ्यायला तयार नाही. नाजूक अनन्या उंचावर अक्षरशः हेलकावे खाऊ लागली. तिचा हिरवा चुडा वाढवला... केस विस्कटले... अन् नितंबांना कुणाचा तरी सहेतुक स्पर्श असह्य करत होता...ती ओरडत होती...पण ही हुल्लडबाजी किमान एक -दीड मिनिट सुरु होती.

शेवटी राघवच्या काकांनी मध्यस्थी करून राघवला खाली उतरायला लावलं... अन् अनन्याची ह्या जीवघेण्या प्रकारातून सुटका झाली.

अजूनही तो प्रसंग आठवला की अनन्याच्या अंगावर शहारा येतो. मित्रांच्या मस्करीमुळे तिला लग्नाची आठवण नकोशी झालीये !

**********************

पण लक्षात कोण घेतो!