मासिक पाळी ( टीम: विंग्स ऑफ फायर)

Social

मासिक पाळी

        टेबलावरील अलार्मने मयुरीला जाग आली.

“बापरे! सात वाजले. अलार्म स्नूज स्नूज करत करत आज उठायला खूपच उशीर झाला.” 

ती मनातल्या मनात पुटपुटली. गळ्याभोवती पिंगा घालणारे केस तिने क्लचरने वरती लावले. छोट्याशा वाकड्या तिकड्या झोपलेल्या विशालला सरळ करत,

“बापावरच गेलाय.. हा तरी कसा सरळ झोपेल?”

विचार करतच ती तिच्या नवऱ्याला अभिमानाला उठवू लागली.

“साहेब उठा आता. सात वाजलेत. पुन्हा ऑफिसला जायला उशीर झाला तर मला ओरडू नको.”

अंथरुणाची आवराआवर करत, ती सूचना देऊन बेडरूममधून बाहेर पडली. हॉलमध्ये पाय ठेवला अन तिला ओटीपोटात वेदनेची कळ उठली. 

“आई ग्ग्ग्ग्....”

म्हणत तिने जरा पोट दाबलं. ऑफिसला उशीर होईल, म्हणून तिने त्याकडे लक्ष दिले नाही. आपल्यापैकी बऱ्याच जणी अशाच असतात. आपल्याला कुठं दुखलं-खुपलं, किंवा थोडं बरं वाटत नसेल तरी त्याकडं दुर्लक्ष करायचं. अंगावरच रेटायचं. आणि जेव्हा सहनशक्तीच्या पलीकडे जाईल तेव्हा डॉक्टरांचा धावा करायचा. वेळच्या वेळी स्वतःची काळजी घेईल मग ती स्त्री कसली! स्त्री स्वभाव धर्म! त्याला मयुरी तरी कशी अपवाद असेल?

मयुरीने पोटातलं दुखणं बाजूला सारून पुन्हा कामात गुंतून गेली. ऑफिसला जाण्याची घाई, घरातली कामं, किरकिर करत अवतीभवती फिरणारा विशाल आणि प्रत्येक गोष्ट हातात मागणारा अभिमान. या सर्वांच्या पुढे पुढे करत ऑफिसमध्ये वेळेवर पोहचण्याची तिची कसरत चालू होती.

“विशाल चल लवकर... तुझे आवरून देते. शाळेला उशीर होईल बाळा.”

 ती विशालला आवाज देत म्हणाली.

“नको ना गं मम्मा. आता नको नंतर…”

म्हणून विशाल घरभर पळू लागला. पुढे पळणारा विशाल, त्याच्या मागे मयुरी. ऑलम्पिकची रेसच चालू होती जणू! एकदाचं मयुरीने त्याला पकडलं. पुन्हा एकदा तिला पोटामध्ये वेदनेची कळ उठली.

“आह्हह्ह! अरे पिरियड तर आला नसेल ना?”

तिने मनाला प्रश्न केला आणि दुसऱ्याचक्षणी हो उत्तर मिळाल्यावर ती हिरमुसली. तेवढ्यात तिच्या फोनची रिंग वाजली. तिने जरा नाराजीनेच फोन घेतला.,

“हॅलो... बाबा... बोला ना.”

“अगं आज आम्ही येतोय तिकडे. तयारी असू दे.”

“हो. बाबा. ठीक आहे. या तुम्ही."

जरा नाराजीच्या स्वरातच ती म्हणाली आणि फोन बंद केला. तिचे सासुसासरे घरी येणार होते. आता तिच्या मनात विचारांचे काहूर माजले होते.

'काय यार... यांना पण आत्ताच यायचे होते का? एकतर उठायला उशीर झाला. स्वयंपाक, घरातलं आणि या दोघांचं आवरता आवरता जीव अगदी मेटाकुटीला येतो. आणि त्यात  पिरियड पण आज यायला हवा होता का? दुष्काळात तेरावा!'

मयुरीचा मौनातला सवांद सुरू होता.  पण म्हणतात ना! जेव्हा सर्व पर्याय खुंटतात. तरीही मार्ग काढते ती स्त्री असते. मयुरी पुन्हा आवरू लागली. वेगाने ती एक एक काम संपवत होती. तोंडातील सूचनांचा पाठ नेहमीप्रमाणे चालू होता. जेवढे शक्य होईल तेवढे आवरून बाकीचे कामवाली शकू मावशीला शिल्लक ठेवले. कामवाली असली तरी देखील ती शकू मावशीच म्हणायची. कारण, कुणालाही काका,मावशी, मामा, अशी हाक मारायची. ही तिच्या आईची शिकवण तिने तंतोतंत पाळली होती. सर्व कामे आवरून तिने स्वतःचे आवरले. आज तिने साधाच पंजाबी ड्रेस घातला होता. कारण, या दिवसात आहारावर जरी ती लक्ष देत नसली तरी कपड्यांच्या बाबतीत तिचे काही नियम होते.


रोजच्या रहाटगाड्यातून वाट काढत शेवटी एकदाची ऑफिसमध्ये पोहोचली. टेबलावर पर्स ठेवत खुर्चीला टेकून तिने एक दीर्घ श्वास घेतला. मनातल्या मनात म्हणाली.

“चल मयुरी... घरी लढून आलीस.. आता इथे तरी थोडा आराम मिळेल.”

आज तिला जास्त काम नव्हतं. एक फक्कड चहा मारून निवांतपण कामाला सुरुवात करावी म्हणून ती उठली तोच, बॉसचा फर्मान आलं,

“मयुरी... ज्या क्लायंटची आपण गेली वर्षभर वाट बघतोय. शेवटी आज त्यांनी वेळ दिली आपल्याला. तू लवकर तयार हो. आपल्याला निघावे लागेल.”

बॉसची ऑर्डर ऐकून मयुरी जागेवरच शांत बसली. 

'एक तर ड्रेस कोड बदलावा लागेल. त्यात पिरियड आलेला. बॉसला नाही म्हटलं तर क्लायंटची मिटिंग कोण अटेंड करणार? मग करू तरी काय?' 

या सगळ्या विचार चक्रात तीने मागचा पुढचा विचार न करता 'हो' म्हणून टाकले. कारण शेवटी स्त्रीच ती! तिला तिच्या कामात कुचराई कशी आवडेल!

ऑफिसमधल्या तिच्या लॉकर मधून तिने तिचा ब्लू टॉप, ब्लॅक पॅन्ट आणि टॉपवर तश्याच रंगाचा लायनिंग असलेला ब्लेझर बाहेर काढला. वॉशरूम मध्ये जाऊन सॅनिटरी पॅडही चेंज केले. पुन्हा पुढे किती वेळ लागतोय माहित नाही. बॉसबरोबर ती क्लायंटच्या ऑफिसमध्ये पोहोचली.

        संध्याकाळ झाली होती मयुरीचे  प्रेझेन्टेशन संपण्यासाठी वेळ लागणार होता. तिने घरी कॉल केला. पण, नेटवर्क नसल्यामुळे कॉल काही केल्या लागेना.

'काय रे देवा! आजच सगळं सोबत यायचं होतं का? विशाल देखील वाट बघत असेल. त्यात आई बाबा देखील येणार. प्रेझेन्टेशनचा एक ताण. आणि त्यात पिरियड पण. सगळे जसे ठरवूनच आलेत माझी परीक्षा पाहायला.'

मयुरी स्वतःलाच दोष देत होती.

थोड्याच वेळात प्रेझेन्टेशन संपले. मयुरीने घाईत बॉसचा निरोप घेत घर गाठले. आज दिवसभराच्या धावपळीत मयुरी खुप थकली होती. आज अभिमानने स्वतःहून बाहेर जेवायला घेऊन जावे. असं मयुरीला मनापासून वाटत होतं.
तिने घरात प्रवेश केला तर समोर बाबा आई दिसले. विशाल देखील त्यांच्या अवतीभवती खेळत होता. मयुरीने त्यांना नम्रपणे नमस्कार केला. एक कटाक्ष अभिमानवर टाकला. त्याचा पडलेला चेहरा बघून तिने समजून चुकलं काहीतरी रामायण-महाभारत घडले असावे. पण शारीरिक व मानसिकरित्या थकलेल्या मयुरीने कुठलीही प्रतिक्रिया देणे टाळले आणि ती फ्रेश होण्यासाठी निघून गेली.

फ्रेश होऊन मयुरी कामाला लागली. तेवढ्यात आई किचनमध्ये आल्या व बोलू लागल्या.

“मयुरी, मला देखील कळते तू जॉब करते. तुला वेळ नसतो. पण आम्ही काय रोज रोज येतो का तुमच्याकडे? कधीतरी येतो. निदान तेव्हा तरी वेळ काढत जा. हे खुप आशेने म्हणाले होते, आज बाहेर जाऊ. पण तुला यायला उशीर झाला मग रद्द केलं. त्यांना गोळी असते ना बीपीची. तू आवर लवकर त्यांना भूक लागली असेल.”

आईचे बोलणे नेहमीप्रमाणे मयुरीने फक्त ‘हो’ म्हणून सोडून दिले.

आई, बाबा, विशाल व अभिमान मस्त हॉलमध्ये खेळत बसले होते. विशालच्या गमतीजमतीमध्ये ते रमले होते. तर इकडे मयुरी तिची जबाबदारी पूर्ण करत होती.

तेवढ्यात मोबाईल वाजला.बॉसचे नाव दिसतात मयुरीने हातातील काम बाजूला ठेऊन मोबाईल उचलला.

"मयुरी तू खरच ग्रेट आहेस. क्लायंटला तुझे प्रेझेन्टेशन खुप आवडले व त्यांनी डील देखील फायनल केली.अभिनंदन मयुरी."

बॉस खुप कौतुकाने बोलत होते पण त्यांना प्रतिसाद देण्यासाठी मयुरीच्या अंगात त्राण देखील उरला नव्हता.

तिने बळेबळेच 'थँक्स सर' म्हणून फोन ठेऊन दिला. तिला आता रडायचंच बाकी होतं. आपसूकच तिच्या डोळ्यांतून अश्रू येऊ लागले. शरीराने थकलेली मयुरी आता मनाने देखील खचून गेली होती.

'खरंच जग फक्त स्वार्थापुरते असते! जर आता त्या क्लायंट ला माझे प्रेझेन्टेशन नसते आवडले. तर सर असेच बोलले असते का? आज सकाळपासून शरीर साथ देत नसताना देखील मी इतकी धावपळ केली. पण मला साधे कुणी पाणी देखील विचारू नये. का? ते फक्त मी एक स्त्री आहे म्हणून? आज मी आईच्या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत म्हणून आईचा चेहरा पडला. पण मी दिवभर जे कर्तृत्व गाजवले त्याचे काहीच मोल नाही का ? स्त्रीने फक्त चूल व मुलं हेच  आयुष्यभर सांभाळावे का? त्याच स्त्रीला स्वतः ची स्वप्न, स्वतः च्या ईच्छा , स्वतः चे एक वेगळं मन असत हे कधी समजेल यांना? आज मी जीवाची पराकाष्ठा करून सगळ्या गोष्टी पूर्ण केल्या. पण, या बदल्यात काय मिळाले? फक्त माझ्याकडे अपराधी भावनेने बघणाऱ्या नजरा. कुणालाच साधं विचारावे देखील वाटले नाही की, मी काही खाल्ले का? तू बरी आहेस ना?'

तिच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं. आज तिच्या स्त्रीत्वावर प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. नोकरी व घर सांभाळणाऱ्या प्रत्येक स्त्रीची हीच कुचंबणा असते. स्वतः ला प्रबळ सिद्ध करता करता ती स्वतः चे अस्तित्व देखील विसरते व नेमके हेच आज मयुरीच्या बाबतीत झाले होते.

आता मयुरीला वेदना खुप जाणवत होत्या. या सगळ्या धावपळीत ती स्वतः च्या वेदना विसरली होती. पण, मनाला झालेल्या वेदनांनी तिला शारीरिक वेदनेची जाणीव करून दिली. ती किचन ओट्याला पकडून तशीच उभा राहिली. आता तिच्या हातापायमध्ये त्राण उरला नव्हता. किती केविलवाणे होते सगळे. घरासाठी झगडणाऱ्या स्त्रीची अशी अवस्था व्हावी! तेवढ्यात तिच्या डोळ्यासमोर अंधार पसरू लागला. किचन तिच्या भोवती फिरल्याचा भास होऊ लागला. ती जोरात खाली कोसळली. जवळ असलेल्या ग्लासला हात लागला व त्या आवाजाने सगळ्यांनी किचनकडे धाव घेतली. खाली पडलेल्या मयुरीला बघून सगळेच घाबरले. अभिमान तर तिला जवळ घेऊन फक्त, 'मयुरी उठ ना गं.' म्हणत होता. तोही भांबावून गेला होता. बाबांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांच्या फॅमिली डॉक्टरांना  केला.

        थोड्याच वेळात डॉक्टर गायत्री  तेथे पोहचल्या. त्यांनी मयुरीला चेक करून ‘सगळं काही ठीक आहे’ म्हणून सांगितले.

“मयुरीने कामाच्या गडबडीत सकाळपासून काहीही खाल्लेलं नाही. आणि त्यातच आलेल्या मासिक पाळीमुळे तिच्या शारीरिक वेदना तिला सहन झाल्या नाहीत. त्यामुळे तिला चक्कर आली.”

डॉक्टर गायत्रीने तिच्या चक्कर येण्याचं कारण सांगितलं  आणि त्या औषधे लिहून देऊ लागल्या.

मयुरीच्या आजारपणाचे कारण कळल्यावर आई आणखीच चिडल्या.

“असं कुठे असते का? बाईच्या जातीला ते नेहमीचेच असते. आम्ही नाही कधी  असा त्याचा इतका बाऊ केला. त्यात या शिकलेल्या मुली. फारच नाजूक असल्यासारखं वागतात. नुसतेच मॉडर्न मॉडर्न म्हणतात. यांनाच काय होतंय काय माहित?” 

आई तोंडाला येईल ते बोलून गेल्या. आईच्या या बोलण्याने घरातील सर्व शांत झाले. पण डॉक्टर बोलू लागल्या,

“अहो काकू... असे कसे बोलता.? शिकलेली आहे, म्हणून शारीरिक रचना थोडी बदलते? स्त्री ही फक्त स्त्रीच नसते. मुलगी, पत्नी, सून, गृहिणी, नोकरदार आणि किती तरी पात्र त्यांना निभवावी लागतात. आन त्यांना होणाऱ्या वेदना ह्या समानच असतात. उलट नोकरी व घर सांभाळताना तिची दमछाक होते. सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करता करता ती स्वतःच्या तब्येतीकडे सुद्धा लक्ष देत नाही. आज मयुरीचेच बघा ना! तिने जेवण केले नव्हते म्हणून तिला चक्कर आली. पण आपण फक्त तिच्या बेजबाबदारपणाला शोधत बसलो. पण, कुणी तिला मदत तर सोडा पण विचारले तरी का? तुझी तब्बेत बरी आहे का?'

डॉक्टर अभिनमानकडे पाहत म्हणाल्या,
"अभिमान. निदान तू तरी..! कधी समजणार आहे तुम्हांला? एका स्त्रीला फक्त मायेचे, प्रेमाचे दोन शब्द लागतात.  त्या दोन शब्दांनी तिला जग जिंकल्याची अनुभूती मिळते. ती तुमच्यासाठी जीवाचे रान करते व तिची अपेक्षा फक्त एकच! तुम्ही फक्त तिला विचारावं. की बाई तू जेवलीस का गं? तुझी तब्येत ठीक आहे ना? बस तिला पुन्हा दहा हत्तीचे बळ मिळते."

डॉक्टर बोलत होत्या व सगळे मान खाली घालून ऐकत होते. मयुरी देखील शुद्धीवर आलं होती. डॉक्टर आणि मयुरीला सॉरी म्हणून आई किचनमध्ये निघून गेल्या. मागोमाग अभिमानही गेला. त्याने पटकन मयूरीसाठी ऑरेंज ज्यूस बनवला. तिच्या शेजारी बसला.

मित्र आणि मैत्रिणींनो कथा लिहिण्याचे कारण म्हणजे, तुमच्या आसपास असणाऱ्या महिला. किती संकटांना सामना करून ऑफिस, कामावर, रोजंदारीवर जात असतात. बसमध्येमध्ये जर एखादी महिला, स्त्री, वृद्ध कुणीही असेल. तर स्वतः उठून त्यांना जागा करून द्या. भले ती सीट महिलांसाठी राखीव असो व नसो. त्या किती दिव्य पार पाडून आलेल्या असतात आपल्याला माहिती नसतं. स्त्री हि देवीचंच रूप आहे. त्या शक्तीला जपा. त्यांचा आदर करा. काळजी घ्या. तिला उभारी घेण्यासाठी मदत करा.

~ धन्यवाद 

@गीता सूर्यभान उघडे 
टीम ~ विंग्ज ऑफ फायर