Feb 24, 2024
ऐतिहासिक

मसनद ! पार्ट 1

Read Later
मसनद ! पार्ट 1
साल 1745 चालू होता. थोरले बाजीराव पेशवे यांचे निधन होऊन पाच वर्षे झाली होती. नानासाहेब पेशवे  आपला जम बसवण्यात व्यस्त होते. नानासाहेब पेशवे यांना बरीच कामे करायची होती. स्वतःची योग्यता सातारा दरबारात सिद्ध करायची होती. अंतर्गत विरोधकांचा विरोध पुसून टाकायचा होता. वडिलांचे राहिलेले अपुरे काम पूर्णत्वास न्यायचे होते. उत्तर आणि दक्षिण भारतात वचक बसवायचा होता.  पेशवाईत सपत्नीक मोहिमेवर जाण्याचा शिरस्ता होता. त्यावेळी नानासाहेबांची कर्नाटक मोहीम होती. म्हणून गोपिकाबाईसुद्धा सोबत गेल्या होत्या. सावनूर इथल्या नवाबाकडून खंडणी वसूल करून नानासाहेब पेशवे पुढच्या मोहिमेवर निघाले. पण गोपिकाबाई गर्भवती होत्या. त्यांना सावनूर इथेच ठेवून नानासाहेब पुढील मोहिमेवर निघाले. त्या दिवशी सावनुरात भलतेच प्रसन्न वातावरण होते. गार वारा सुटला होता. पक्षी गोड आवाजात गात होती. गोपिकाबाई थांबलेल्या त्या वाड्यात मात्र त्यांना असह्य पीडा होत होती. पण शेवटी बाळाचा रडण्याचा आवाज कानावर पडताच गोपिकाबाईच्या मुखावर हलकेसे हसू आले. गोपिकाबाईंची खास दासी विटी तर " मुलगा झाला " म्हणून आनंदाने नाचू लागली. बघता बघता खबर पूर्ण सावनूरात पसरली. सावनूरचा नवाब त्याच्या बेगमसोबत महालात होता. एक सेवक बातमी घेऊन आला. त्याने वाकून मुजरा घातला.

" हुजूर . गोपिकाबाई पेशवीन को लडका हुआ है !" तो सेवक म्हणाला.

नवाबाच्या चेहऱ्यावर हर्षित भाव उमटले. त्याने हातातली अंगठी काढून त्या सेवकाला दिली.

" ये तो खुशी की बात है . पेशवीन गोपिकाबाई को कोई तकलीफ नहीं होनी चाहीए. सारे सावणूर मे मिठाई बाटो. " नवाब म्हणाला.

बेगम त्याच्याकडे पाहतच होती. सेवक जाताच तो बेगमेकडे वळला.

" बेगम. हम चाहते है की हमारे ओर से आप मिलने जाए. उन्हे तौफो से नवाजे. और उस बच्चे का नामकरण भी सावनूर में हो. ये लोग कुंडली में बहुत विश्वास रखते है. किसीं बडे पंडित को वहा भेजना पडेगा. " नवाब दाढीवरून हात फिरवत म्हणाला.

माघ वद्य एकादशी शके १६६६ , रक्ताक्षीनाम संवत्सरी , शनिवारी म्हणजेच दि. १६ फेब्रुवारी १७४५ रोजी गोपिकाबाईंच्या पोटी पुत्र जन्माला आला. हा पुत्र भारतीय इतिहासात स्वतःचे नाव अजरामर करणार होता. हा पुत्र मराठेशाहीला सावरनार होता. त्यात नवे प्राण फुंकणार होता. त्याला सर्वोच्च बिंदूवर नेणार होता. असो. बेगम साहेबा तिच्या पालखीतून वाड्यात पोहोचली. वाडा इतका सजवला गेला होता की जणू दिवाळीच असावी. सावणूरचे लोकही वाड्यात मोठा जल्लोष होईल या आशेने गर्दी करत होते. गोपिकाबाईकडे जाताना बेगमेला लहानगे विश्वासराव धडकले. तेव्हा विश्वासराव अवघे चार वर्षाचे होते. बेगमला विश्वासरावांना उचलण्याचा मोह आवरता आला नाही. लोभस रूपामुळे ते सर्वांचे लाडके झाले होते. बायकांमध्ये सुंदर मस्तानी आणि पुरुषांमध्ये सुंदर विश्वासराव असे बोलले जाऊ लागले. बेगमसाहेबाने विश्वासरावांना कडेवर घेऊन लाड केले आणि मग त्या गोपिकाबाईंच्या खोलीकडे वळल्या. बेगमेला पाहून गोपिकाबाई उठून बसल्या.

" विटी. बेगमसाहेबसाठी काहीतरी आणण्याची व्यवस्था कर. " गोपिकाबाई आदेश देत म्हणाल्या.

" तुम्ही आराम करा. माशाअल्लाह कितना प्यारा बच्चा हुआ है आपको ! हे नवाबातर्फे काही नजराणे. " बेगम बाळाकडे बघत म्हणाली.

" अरे याची काहीच आवश्यकता नव्हती. शुक्रिया. " गोपिकाबाई म्हणाल्या.

" नवाब चाहते है की सावणूर में ही आपके बेटे का नामकरण हो. " बेगम म्हणाली.

" आम्हाला काहीच हरकत नाही. " गोपिकाबाई चेहऱ्यावर स्मितहास्य आणत म्हणाल्या. 

घाईघाईत एक पंडितही बेगमेच्या मागून खोलीत शिरला. बेगमने त्यांच्याकडे जरा रागानेच पाहिले. कारण त्याने यायला उशीर केला होता.

" गोपिकाबाई हे सावणूरचे मोठे ज्योतिष आहेत. हे तुमच्या बाळाचे भविष्य सांगतील. " बेगम म्हणली.

त्या पंडिताने बाळाची जन्मण्याची वेळ विचारली. विटीने ती सांगितली. खूप वेळ ग्राहनक्षत्र पाहून पंडिताच्या मुखावर अचानक प्रसन्नता आली.

" राजयोग. राजयोग. हा मुलगा इतिहासात आपले नाव कोरणार पेशवीनबाई. आजोबा , पणजोबा , वडीलासारखा हा देखील पराक्रमी निघेल. सारे सत्ताधीश याला नमुन वागतील. पण.." पंडित थांबले.

" पण काय ? " गोपिकाबाई विचारतात.

" मुलगा अल्पायुषी आहे. " पंडित लहान आवाजात आणि दुःखी स्वरात म्हणतात.

" काही हरकत नाही. आयुष्य कमी असेल तरीही कर्तृत्व मोठे पाहिजे. नदीची लांबी नाही तर खोली मोजायची असते. " गोपिकाबाई म्हणतात.

" बरोबर बोललात. आपके ससुर बाजीराव भी तो सिर्फ चालीस साल ही जीए पर आज भी उनका नाम सूनकर लोग काप उठते है. " बेगम म्हणाली.

" बरोबर. आमची एक इच्छा होती. जर बारसेसोहळ्यात तुमचीही उपस्थिती असेल तर आनंदच होईल. " गोपिकाबाई म्हणाल्या.

बेगमसाहेबांनी होकारार्थी मान हलवली.

वाड्यात बारसेच्या सोहळ्याची तयारी सुरू झाली. सुंदर पाळणा सजवण्यात आला. गोपिकाबाई नारंगी साडीत खूप सुंदर दिसत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर वेगळेच तेज आणि नजरेत वेगळाच रुबाब होता. गौरवर्णीय चेहऱ्याच्या कपाळावर चंद्रकोर आणि नाकात सुंदर सोनेरी नथ शोभून दिसत होती. बारसे सूरु झाले. छोटे बाळ टपोऱ्या पाणीदार नजरेने गोपिकाबाईना बघत होते. मध्येच बायका त्याला वरखाली करताना गालातल्या गालात ते खुदकन हसत.

" राम घ्या कृष्ण घ्या " बायका बोलू लागल्या.

" बाईसाहेब आता नाव ठेवावे लागेल. पंडिताने " म " पासून ठेवायला सांगितले. " विटीने आठवण करून दिली.

" आहे ध्यानात आमच्या. " गोपिकाबाई म्हणाल्या.

बेगम दुरूनच कार्यक्रमाचा आनंद घेत होती. बाळंतपणात त्यांनी गोपिकाबाईंची खुप काळजी घेतली होती.

" बेगमसाहेब. तुम्ही दूर का बसल्या आहात ? जवळ या. नाव सुचवा. " गोपिकबाई म्हणाल्या.

बेगम सुखावली. विटी दासीने मात्र तोंड वाकडे केले.

" गोपिकाबाई. आमच्या मनात एक नाव आहे. माधवराव पेशवे " बेगम म्हणाली.

गोपिकाबाई नाव ऐकून प्रसन्न झाल्या.

" हे तर खूपच सुंदर नाव आहे. बाळराजेंचे नाव माधवरावच असेल. " गोपिकाबाई म्हणाल्या.

बायका पाळणा हलवू लागल्या.

झुळवा पाळणा पाळणा बाळराजे माधवचा
पेशव्यांचे कुळ उजळवतो पुत्र तो गोपिकेचा

पाहुनी सर्वा हसे खुदकन गालातल्या गाली
मूठ कशी आवळतो जसे ध्येय तयाच्या मनी
शनिवारवाड्यात खेळेल कृष्ण हा पेशव्यांचा
दिल्ली दरवाजातून मोहीम उघडे पुत्र नानांचा

बाजीराव आजोबा याचे शौर्य ते उतरावे अंगी
तलवार तळपावी चहूकडे स्वागत व्हावे जंगी
मारूती जैसा रामास बनावा तैसा छत्रपतीस
मसलती पुण्यनगरीत धडकी भरावी दिल्लीस

राजस रूप गोजिरे जणू अभिमन्यू सुभद्रेचा
बोबडेबोल बोलतो ऐसे मधुर कितीही वाचा
कृष्ण जैसे बलरामा तैसा भाऊ विश्वासरावा
यवनांचेही पतन करेल गाजवेल गनिमीकावा

पेशवेकुळी आज नवीन कमळ बघा खुलले
सर्वांच्या मुखावर कैसे हास्य बघा ते फुलले
चंद्रासमान शीतलता सूर्यासमान तेज शोभे
स्वामी रयतेचा बनावा नाव इतिहासा कोरावे

झुळवा पाळणा पाळणा बाळराजे माधवचा
पेशव्यांचे कुळ उजळवतो पुत्र तो गोपिकेचा

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

सुकृत

Engineer

जय श्री राम

//